Login

सगळी जबाबदारी तिचीच कशी..? भाग 3 अंतिम

Sagali Jababdari Tichich Kashi
सगळी जबाबदारी तिचीच कशी..?भाग 3 अंतिम


तिथे तिच्यावर ट्रीटमेंट सुरू झाली,

काही वेळाने डॉक्टर बाहेर आले.

"डॉक्टर कशी आहे रिमा?"

"हे बघा त्या व्यवस्थित आहेत, काळजी करण्याचं काही कारण नाही. ताप असल्यामुळे कदाचित होऊ शकत. त्यांनी काही खाल्लेल नसेल म्हणून त्यांना गरगरायला झालं आणि त्या बेशुद्ध झाल्या. काळजी करण्याचं काही कारण नाही आम्ही आता त्यांना इंजेक्शन दिले आहे काही वेळाने त्या शुद्धीवर येतील पण तुम्हाला त्यांची थोडी काळजी घ्यावी लागेल त्या थोड्या अशक्त झालेल्या आहेत. हिमोग्लोबिन कमी झालेल आहे.त्यांची काळजी घ्या बाकी सगळं नॉर्मल आहे."

असं म्हणून डॉक्टर तिथुन निघून गेले.

तो तिच्या जवळ गेला तिला अजूनही सलाईन लावलेली होती.

तो तिच्या जवळ बसला, तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती.
त्याला तिच्याशी बोलायचं होतं खूप काही बोलायचं होतं, तिला सॉरी म्हणायचं होतं, तिची समजूत घालायची होती, तिला प्रेमाने जवळ घ्यायचं होतं, तिच्या ओठावरून ओठ फिरवायचे होते, गालाला कीस करायची होती, तिला मिठीत घ्यायचं होतं, घट्ट पकडायचं होतं, पण हे फक्त त्याच्या मनात सुरू होता कृतीत उतरलच नव्हतं.

रिमा घरी आली, काही दिवस आराम केला.

रीमाने ठरवलं आता फक्त स्वतःसाठी जगायचं, स्वतःपुरतं जगायचं.
हळूहळू दिवस सरकत गेले आणि सासर्‍यांची तब्येत खालावली, काही दिवसांनी ते हे जग सोडून गेले.


आता मात्र सासूची जास्त चिडचिड व्हायला लागली. त्यांना एकाकी वाटू लागलं होतं. आता त्यांना गरज होती ती कुणाच्या तरी आधाराची, तो आधार रीमाने दिला,  रीमा आता सासुबाई सोबत स्वतःला पण वेळ देऊ लागली. रीमाने स्वतःसाठी जगण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ती ऑफिस आणि घर याव्यतिरिक्त स्वतःचे छंद जोपासायला लागली.

सुट्टीच्या दिवशी बाहेर वेळ घालवायची, मैत्रिनींना भेटायची. बाहेर जायचं असेल तर प्रशांत आला तर ठीक नाहीतर ठीक,ती एकटीच निघून जायची. कधी कधी सासुबाईंना मंदिरात घेऊन जायची, त्यांच्याने तेवढं चालणं व्हायचं नाही, पण त्यांना फ्रेश वाटावं म्हणून कधी मंदिर, कधी गार्डन मध्ये घेऊन जायची.

वयोमानाने त्यांना उठणं बसणं होत नव्हतं, त्यांना आता कुठलंच स्वतःचही काम होत नसे. रीमाने सासू साठी एक वेगळी बाई ठेवली. ती सासूचा दिवसभर सगळं करून देत असे. एकदा असं सासूबाईला बरं नव्हतं त्यांच्या अंगात खूप ताप होता. बाई जवळ बसलेली असूनही त्या वारंवार रीमाचं नाव घेत होत्या. त्या रीमा कुठे आहे रीमा कुठे असे विचारत होत्या.

काही वेळाने रिमा घरी आली काय कुणास ठाऊक पण त्या तिच्याशी खूप प्रेमाने बोलल्या.

“कुठे गेली होती रीमा? कधीची तुला हाका मारते.”

“आई मी बाहेर गेले होते, बोला ना काही होतंय का तुम्हाला?”

“तू त्या बाईला ठेवलंस माझ्याजवळ पण तिच्यात तो आपलेपणा नाहीये गं, तू आजूबाजूला असलीस की कसं सुरक्षित वाटतं मला. ती बाई असली की मला सुरक्षित नाही वाटत. तू माझ्याजवळ राहशील दिवसभर?”
“माफ करा आई, मला खरंच तेवढा वेळ नाहीये मला वेळ असता ना तर मी नक्की तुमच्याजवळ थांबले असते. दिवसभर पण मलाही माझी स्वतःची कामे असतात म्हणून मी सगळ्या कामाला बाई ठेवली आहे.”

“मला माहिती आहे रीमा मी तुला खूप त्रास दिला ना म्हणून तुला आता माझी सेवा करायची नाहीये. हो ना? मला कळतंय मी तुला खूप त्रास दिला. तुला नको नको ते बोलले, तुला कुठल्याच कामात कधीच मदत केली नाही. म्हणून तू असं वागतेस माझ्याशी.”

“नाही आई तुम्ही असा विचार का करताय? मी असे का वागेल तुमच्याशी? असं खरंच काही नाहीये.”

“रीमा एक विचारू?”
“बोला ना.”

“आजचा दिवस मला भरवशील?” रीमाने होकारार्थी मान हलवली.

रीमाने त्यांना जेवण भरवलं.

“तुला माहिती आहे रीमा आज का कुणास ठाऊक खूप दिवसांनी पोट भरल्यासारखं वाटतंय ग.” त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला.

रीमा तिच्या खोलीत निघून गेली, आज पहिल्यांदा सासूबाईंनी डोक्यावर हात ठेवला म्हणून रीमाला खूप बरं वाटलं.

काही महिन्यांनी सासूबाई मरण पावल्या, त्यानंतर रिमा आणि प्रशांत दोघच असायचे. रीमा पूर्णवेळ स्वतःला द्यायला लागली स्वतःपुरतं जगायला लागली...

समाप्त:

आयुष्यात नात्यांना खूप महत्त्व आहे, एकमेकांची सोबत खूप गरजेची आहे. एकमेकांना साथ देणे,सोबत देणे हेही गरजेचे आहे. सासूबाईंनी थोडं रीमाला समजून घेतलं असतं, तिला मदत केली असती तर गोष्टी सोप्या झाल्या असत्या. आपण चोवीस तासातला काही वेळ स्वतःसाठी ठेवावा. घरची जबाबदारी आहेच तीही निभवायला हवी पण म्हणून घरातलं काम कुणी एकानेच करावं हे बरोबर नाही, घर सर्वांच आहे तर जबाबदारी पण सर्वांची असायला हवी. सगळी जबाबदारी तिचीच कशी?...


🎭 Series Post

View all