Login

सागराला ओढ किनाऱ्याची!!(भाग ३)

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होताच मुलाकडून लगेचच होकार येतो पण घाईत कोणताही निर्णय नको म्हणून कथेतील नायिका शरयू मुलाला, त्याच्या घरच्यांना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ मागून घेते. रुढी परंपरेला छेद देत स्वतःच्या भविष्याचा ती योग्य निर्णय घेते. वडीलही तिला पाठिंबा दर्शवतात. तसेच मुलाची आई सोडून बाकी सगळेच आनंदाने तिच्या या निर्णयाचे स्वागतच करतात. नव्या पिढीची बदलती विचारसरणी आणि जुन्या पिढीकडून तिला मिळणारे प्रोत्साहन यावर आधारित ही कथा.


श्रीकांत आणि त्याच्या घरच्यांनी शरयूला लग्नासाठी होकार दिला होता. सगळेच आनंदी होते. लवकरात लवकर पुढची बोलणी करुन लग्नाची तारीख फायनल करण्याचा विचार होता सर्वांचाच. पण आता शरयूच्या बोलण्याने नाना थोडे विचारात पडले. काय आणि कसे सांगावे त्यांना? याच विचारात ते होते.

तेवढ्यात सुनीताताई म्हणाल्या, " काहीही म्हणा पण मला तुमचे हे अजिबात नाही पटले बरं का."

"अहो, इतके चांगले स्थळ शोधूनही नाही सापडणार. मग आता शरुच्या आग्रहाखातर त्यांना असं ताटकळत ठेवायचं का? त्यात आपली मुलीची बाजू हे असं वेळ वाढवून घेणं, ते लोक काय विचार करतील? आणि तिला तरी काय समजतंय एवढं?"

"मुलांच्या सगळ्याच गोष्टी ऐकत बसलो आपण तर होवू नये ते होवून बसायचे. उगीच चांगले स्थळ हातचे निसटून जायचे. मला खूप भीती वाटतिये."
सूनीताताई लेकीच्या काळजीपोटी बोलत होत्या.

"अगं पण शरूच्याही मनाचा विचार नको का करायला? तसंही तिने लग्नाला नाही कुठे म्हटलंय फक्त थोडा वेळ हवा आहे तिला. कोणालाही वाटणारच ना ते. आणि आता पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही ग. मुलांनाही एकमेकांना जाणून घेण्याची ओढ असतेच. त्यांचेही दिवस आहेत हे. जगू देवू त्यांनाही त्यांच्या मनासारखं. एकमेकांशी बोलले की आपोआप ओढ लागते बघ. लग्न झाल्यावर आताचे हे दिवस पुन्हा कधीच येणार नाहीत. आणि तसंही मलाही वाटतं उगीच जास्त घाई करण्यातही काही अर्थ नाही. मी बोलतो माधवसोबत."

"चालू दे तुमचं बाप लेकीचं. तुम्ही तुमचंच खरं करणार. आता मी कितीही बोलले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा तुमच्यात लक्ष न घातलेलेच बरे." एवढे बोलून रागातच सुनीताताई आत निघून गेल्या.

नानांनी मग माधवरावांना फोन करुन सगळं काही सांगितलं. पुढची बोलणी काही दिवस पुढे ढकलूयात. शरयूसाठी त्यांनीही मग काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला. फक्त आता श्रीकांतच्या वडीलांना म्हणजेच आप्पांना ही गोष्ट पटवून देणे गरजेचे होते. दुसऱ्याच दिवशी माधवरावांनी आप्पांना फोन लावला.
"कसे आहात आप्पा..?"माधवराव म्हणाले.

"आम्ही ठीक आहोत ओ. तुम्हीच सांगा,
"नानांसोबत झालं का तुमचं बोलणं? म्हणजे तशी पुढची बोलणीही लवकरच करुन घेवूयात.

"अहो आप्पा त्याबद्दलच थोडे बोलायचे होते मला."

"निसंकोचपणे बोला माधवराव." आप्पा म्हणाले.

शरयूचे म्हणणे मग माधवरावांनी आप्पांना पटवून दिले. त्यावर ते म्हणाले,
" पण आपण कुठे लगेच त्यांना लग्नाच्या मांडवात उभे करतोय. आणि पुढची बोलणी ते लग्न यामध्ये वेळ जाणारच आहे. दरम्यानच्या काळात एकमेकांना जाणून घेण्यासाठी भरपूर वेळ आहे. बाकी तुम्हाला तर सगळी माहिती आहेच श्रीकांतबद्दल आणि आमच्याबद्दलही. आता आणखी ताणण्यात काय अर्थ आहे मग माधवराव?"
" उगीच आमच्यावर अविश्वास दाखवल्यासारखे नाही होत का ते? पण तरीही तुम्ही म्हणत असाल तर थोडे दिवस थांबूयात आपण."

"वाईट नका वाटून घेवू आप्पा. तुमच्यावर नाही कुणी अविश्वास दाखवत. आणि मी असताना ते शक्यही नाही. फक्त लेकीच्या इच्छेखातर नानांनाही तिचे मन जपावेसे वाटते ओ. त्यात त्यांची एकुलती एक मुलगी. पहिल्याच पाहण्यात समोरून पसंती आली आणि लगेच लग्न, म्हणून थोडी घाई झाल्यासारखी वाटतिये त्यांना. बाकी काहीच अडचण नाही. तसंही शरयूला श्रीकांत मनापासून आवडलाय. तिही या लग्नाला तयारच आहे. हां फक्त थोडा वेळ हवा आहे तिला."

" बरं आता यावर मी तरी काय बोलणार माधवराव. तुम्ही म्हणताय थांबायचं तर थांबूयात थोडे दिवस. देवूयात थोडा वेळ श्रीकांतला आणि तिलाही. फक्त एकमेकांना जाणून घेण्याच्या नादात नात्यात दुरावा यायला नको म्हणजे मिळवलं.

"आपण मुलांना सूट देवून चूक तर करत नाही ना माधवराव.?"
आप्पा थोडे काळजीपोटीच बोलले.

"नाही आप्पा तुम्ही काहीच काळजी करु नका. तुम्ही जितकं श्रीकांतला ओळखता तितकेच मी शरयूला. खूप गुणी पोरगी आहे ओ ती. फक्त सगळं जरा घाईत घडतंय म्हणून थोडी काळजी वाटत असणार तिला. इतकी अविचारी मुलगी नाही ओ ती. तुम्ही नका टेन्शन घेवू. जरा जावू द्या एखाद महिना, करुयात आपण पुढचे प्रयत्न. मी अधूनमधून संपर्कात राहीलच तुमच्या."

माधवरावांनी विश्वास दिल्याने आप्पांनाही थोडा धीर मिळाला. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर दोघांनीही मग फोन ठेवला.

माधवरावांचे आणि आप्पांचे सुरू असलेले सर्व बोलणे मालतीताईंनी ऐकले होते. त्यांनाही आता सर्व गोष्टींचा अंदाज आलाच होता. त्यांना मात्र शरयूचे हे वागणे अजिबात पटले नाही.

"मुलीच्या जातीने थोडा विचार करुन वागायला नको का.? असं अविचारी वागणे ते काय कामाचं?"
"आमचा श्रीकांत काही तुझ्या एकटीवरच विसंबून नाही म्हणावं तिला. एकसे बढकर एक मुली आजही शोधायची तयारी आहे आमची."
"आणि तसंही तिच्या एकटीवरच काही शिक्का मारलेला नाही. माझा तर या लग्नाला आधीपासूनच विरोध होता आणि आता तर गोष्टी पुढे नेण्याचा काही प्रश्नच राहिलेला नाही."

"आताच्या आता फोन करुन माधवरावांकरवी नकार कळवून टाका त्यांना."
"मुलीचं ठीक आहे, आताची पिढी थोडी फॉरवर्ड विचारांची असणारच पण नानांना काही गोष्टी समजतात की नाही? लेकीने ही अशी अट घातली तर लगेच तिच्या म्हणण्याप्रमाणे इतकं अविचाराने वागायचे असते का कुठे.? "
मालती ताईंना आता राग अनावर झाला होता.

बाहेर आईंचे सर्व बोलणे श्रीकांतने ऐकले होते. पण त्यालाही नेमकं काय झालंय याचा अंदाज येईना. नुकताच तो घरी येतच होता. दरवाजा बाहेर येताच आईचा मोठ्याने बोलण्याचा आवाज आला आणि तिथेच तो थबकला.

"मालती, तू शांत हो बरं आधी. मलाही आधी तुझ्यासारखाच राग आला होता. पण माधवरावांनी काही गोष्टी समजावून सांगितल्या तेव्हा मलाही पटले त्यांचे म्हणणे."

"शरयू एकुलती एक मुलगी आहे नानांची. जास्त घाई नको करायला इतकंच म्हणणं आहे त्यांचं. आणि तसंही, थोडा वेळच तर मागितला आहे त्यांनी. आणि ही काही एवढी मोठी गोष्ट नाही वाटत मला तरी."
"फक्त आपली मुलाची बाजू आहे म्हणून त्यात कमीपणा वाटण्याचे काहीच कारण नाही."
"जमाना खूप बदललाय ग आता. आपणही त्यानुसार बदलायला हवं. नव्या पिढीच्या ह्या विचारांचा आपण नाही मग कुणी आदर करायचा?"

"आणि मला सांग, ही अट जर आपल्या श्रीने घातली असती तर एक मुलगा म्हणून सर्वांनीच त्याला पाठिंबा दिला असता."
"हो ना...??"

आप्पा आईची समजूत घालत होते तितक्यात श्रीकांत घरात आला. त्याला पाहून तर मालती ताई पुन्हा सुरू झाल्या.

"घे बाबा श्री, सून घरात यायच्या आधीच तिची मनमानी सुरु झाली बघ. आता तूच ठरव हे लग्न करायचं की नाही ते?"

"आई मला थोडं समजेल असं बोलशील का प्लीज?"
आप्पांनी मग श्रीकांतला सगळ्या गोष्टी विस्कटून सांगितल्या. श्रीकांतलाही थोडे वाईट वाटले आधी.

"अरे काय हे? इथे सागराला एकट्यालाच ओढ लागलेली दिसते आहे किनाऱ्याची. किनाऱ्याला तर काही फरकच पडत नाहीये." "म्हटलं आता पसंती झालीये, लवकरच लग्नही होईल.
"पण छे. ह्या शरयू मॅडम पण ना. असं असतं का कुठे राव?"
श्रीकांत विचारचक्रात गुंतला होता.

"श्री तुला आताच सांगून ठेवते, मला हे लग्न मान्य नाहीये. बाकी तुझा निर्णय सांग. म्हणजे तसं त्यांनाही कळवायला हवं."

"आई अगं नको ग इतकी घाई करु. तिला जसं मला जाणून घ्यावंसं वाटतंय ना तसंच मलाही तिला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल."

"मग लग्नाआधीच तिला इथे आणून ठेवण्याचा विचार आहे का तुझा??"
मालतीताई थोड्या चरफडतच बोलल्या.

"आई, अगं तसं कुठे म्हणालो ग मी. दूर राहूनही एकमेकांना जाणून घेता येत नाही का?"
" एकमेकांशी नुसतं फोनवरून बोललं तरी बोलण्यातूनही माणसाच्या स्वभावाचा अंदाज येतोच ना."
"एकमेकांच्या आवडीनिवडी समजतात. नात्यात आपलेपणा निर्माण होतो. अचानक माहेर सोडून असं सासरी येताना मग तिलाही अवघडल्यासारखे नाही वाटणार."
" बस त्यासाठी थोडं थांबायची माझी तरी तयारी आहे. कारण आवडलिये ग मला ती मनापासून."

"म्हणजे एकाच भेटीत तुला ती इतकी आवडली की ती म्हणेल ते करण्याची आतापासूनच तुझी तयारीही सुरू झाली. उद्या लग्न झाल्यावर काय होणार आहे याचे चित्र आतापासूनच दिसायला लागलंय मला श्री."
एवढे बोलून मालतीताई रागानेच मग त्यांच्या रुममध्ये निघून गेल्या.

"आप्पा काही चुकलं का हो माझं?"

"नाही रे. काही चुकीचं नाही बोललास तू. फक्त आतापासूनच मालतीमधील सासू मला दिसायला लागलीये. जे पुढे जावून त्रासदायक ठरू शकतं आपल्या सर्वांसाठीच."

"पण तू नको काळजी करुस, होईल आपोआप शांत ती. मी समजावतो तिला."
"तू एक काम कर माधवरावांकडून शरयूचा नंबर घे. तिला फोन कर एकदा. आणि मोकळेपणाने बोल तिच्यासोबत. म्हणजे तिलाही बरं वाटेल."

"हो आप्पा."
श्रीकांतलाही कधी एकदा शरयू सोबत बोलतोय असं झालं होतं. माधव सरांना फोन करून त्याने शरयूचा नंबर मिळवला. लगेचच त्याने तिला फोन लावला.

"हॅलो, मी श्रीकांत बोलतोय."

"बोला श्रीकांतराव." समोर फोनवर नाना होते.

"नाना कसे आहात तुम्ही?" श्रीकांतनेही आपुलकीने नानांची चौकशी केली. त्यांनाही खूप छान वाटले.

"नाना शरयू असेल तर द्या ना तिच्याकडे," श्रीकांत म्हणाला.

नानांनी शरयूला आवाज दिला. पण ,
"नाना मी भाकरी करतीये. त्यांना म्हणावं मी करते माझं आवरल्यावर फोन."
दुरुनच आलेला तिचा तो आवाजही श्रीकांतला खूप जवळचा वाटला.
"श्रीकांतराव ती करेल तुम्हाला फोन. बाकी सगळे मजेत ना."

"हो नाना"
श्रीकांतही मग आपलेपणाने उत्तरला.

"श्रीकांत मी तुमच्या वडीलांच्या ठिकाणी आहे. त्याच नात्याने एक विचारतो, शरयूचा निर्णय तुम्हाला नक्की पटलाय ना?"

"हो नाना, एखाद्या मुलीच्या तिच्या स्वतःच्या लग्नाबद्दल, होणाऱ्या पतीबद्दल, सासरबद्दल काही अपेक्षा या असूच शकतात ना. शरयूचा हा स्वभाव उलट मला तर खूपच भावला."

माधव काका म्हणतात तसं,
"खरंच खूप विचारिक आहे तुमची मुलगी. तिच्या मनाचे समाधान होईपर्यंत एखाद्या गोष्टीच्या शोधात तिची धडपड सुरू असते."
खरंच अशी जिद्दही असायलाच हवी माणसाकडे.

"आणि तसंही आपण तर एखादी वस्तू खरेदी करताना देखील आधी ती नीट पारखून, दहादा तपासून मगच घेतो. इथे तर संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. अशावेळी घाई करण्यात काहीही अर्थ नसतो, हे नव्याने शिकलोय मी तुमच्या लेकीकडून."

"खूप छान वाटलं श्रीकांतराव तुमच्याशी बोलून. तुम्ही आमच्या आयुष्यात आलात आणि मुलगा नसल्याची खंत आता राहिली नाही बघा."
"आमची शरयू खूप नशीबवान आहे. तुमच्यासारखा समजूतदार जोडीदार तिला लाभला. आणि खरं तर शरयूच्या या निर्णयामुळे आज मलाही तुम्हाला जाणून घेण्याची संधी मिळाली."

"खरंच माधवने तुमच्याबद्दल सांगितलेली एक ना एक गोष्ट अगदी खरी आहे श्रीकांतराव. खूप नशीबवान आहोत आम्ही तुमच्यासारख्या माणसांशी आमचे संबंध जुळले."

"बस बस नाना, किती तारीफ कराल आता?? छान वाटले पण तुमच्यासोबत बोलून. असाच आशीर्वाद कायमस्वरुपी आता पाठीशी असू द्या."

"तो तर असणारच आहे ओ, बरं मी काय बोलत बसलोय. तुम्ही शरूसाठी फोन केला आणि मीच आपला बोलत बसलोय. ती करेल तुम्हाला फोन थोड्या वेळात. काळजी घ्या. ठेवतो मी फोन म्हणत नानांनी फोन कट केला."

किती साधी माणसे आहेत ही. किती पटकन आपलंसं करून घेतात एखाद्याला." श्रीकांत मनातच बोलला.

"पण जीच्याशी बोलायचं आहे ती मात्र अजून किती वेळ अशी ताटकळत ठेवते काय माहिती?"
म्हणत श्रीकांत शरयूच्या फोनची वाट पाहत तसाच बेडवर आडवा झाला. खूप झोप येत होती त्याला पण तरीही दर दोन मिनिटाला मोबाईलकडे त्याचे लक्ष जायचे.

"अजून कसा हिने फोन केला नाही?"
एक तास झाला, दोन तास झाले पण शरयूचा काहीच रिप्लाय नाही.
"काय करावं? करु का पुन्हा एकदा मीच फोन? विचार त्याच्या डोक्यात आला. पण नको, कदाचित ती माझी परीक्षा घेत असली तर? उगीच नापास व्हायचो मी. थोडा वेळ वाट बघूयात. नाहीच आला फोन तर मग msg करता येईल. म्हणत तसाच तो शरयूच्या फोनची वाट पाहत बसला.

त्यानंतर तब्बल एक तासाने शरयूचा मॅसेज आला.
"हाय, जागे आहात की झोपलात?"

त्यानेही थोडी मग फिरकीच घेतली तिची,
"हो आत्ताच झोपलो. आताशी तुमचा स्वयंपाक उरकला का?"

"हो म्हणजे, नाही म्हणजे, आता घरात सगळे असताना एकटीने बाजूला जावून बोलत बसणं योग्य नाही वाटत ना."
अगदीच सोज्वळ उत्तर दिलं शरयूने.

"पण कोणाला तरी मला जाणून घेण्याची मनातून खूपच इच्छा होती म्हणे. पण त्यातही त्या व्यक्तीची ओढ काही दिसेना. पण आम्हालाच काळजी बाबा सर्वांची. एवढ्या वेळात झोपेच्या अधीन होणारा मी बसलो कुणाचीतरी काळजी करत."

"अच्छा, हो का..बरं एक सांगू?
"सर्वात आधी तुम्ही मला अहो जाहो घालणं बंद करा हो. म्हणजे मला तरी तुम्ही अरे तुरे करावं असंच वाटतंय. आणि तसंही होणाऱ्या बायकोला कुणी अहो जाहो करतं का?"

"नाही तुमचं बरोबर आहे. मी करेल अरे तुरे पण एका अटीवर. तुम्हीही मला फक्त "श्री" म्हटलेलंच आवडेल मला."

"पण कसं शक्य आहे ते? गावाकडे असं होणाऱ्या नवऱ्याला एकेरी नावाने हाक मारली की लगेच लोक नावे ठेवतात. मला नाही वाटत मला ते जमेल."

"मग मलाही नाही जमणार."
"अटी काय फक्त तुम्हीच घालायच्या का हो.? आमच्या शब्दाला काही किंमतच नाही मुळी. आजच जर सुरुवात केली तरच पुढे जावून एकेरी नावाने हाक मारायची सवय लागेल."
"आणि आता असं msg वरच बोलायचं की, आवाज पण ऐकायला मिळणार आहे तुमचा?"

"आज नको खूप उशीर झालाय आता. उद्या नक्की मी कॉल करते तुम्हाला."

"ओके. गुड नाईट" म्हणत दोघांनीही चॅटिंग थांबवलं.

त्यानंतर दोघांनाही झोप लागली असेल तर शपथ. ती पहिली भेट, पहिल्यांदाच झालेली ती नजरभेट. अगदी थोडाच वेळ एकांतात घालवलेले ते सोनेरी क्षण मनाच्या कप्प्यात साठवून ठेवले होते दोघांनीही.
सारं काही डोळ्यासमोरून हटायला तयारच होत नव्हतं. ते सारे क्षण पुन्हा एकदा आठवून स्वप्नांच्या दुनियेत दोघेही रममाण झाले. आणि कधी एकदा झोपेच्या अधीन झाले ते दोघांनाही समजलं नाही.
खरंच आता कुठे एकमेकांना ते दोघे ओळखू लागले होते. आता कुठे सुरुवात झाली होती सागराची आणि किनाऱ्याची मैत्री व्हायला. ही मैत्री प्रेमाच्या गावी पोहोचणार हे निश्चित होतं. पण वाटेत येणाऱ्या अनेक वादळांचा त्याआधी सामना करावा लागणार होता हेही अगदी खरं होतं.

आता कहाणी नेमके कोणते वळण घेणार? श्रीकांतची आई तयार होईल का त्यांच्या लग्नाला? शरयू आणखी किती दिवस वाट पाहायला लावणार श्रीकांतला? जाणून घ्या पुढील भागात.