Login

सागराला ओढ किनाऱ्याची!! ( भाग ७)

दिवसागणिक श्री आणि शरयूच्या नात्यातील वाढत जाणारी जवळीक त्यांच्यातील प्रेम वृध्दिंगत व्हायला कशी मदत करते त्याबरोबरच माधवकाकांच्या पुढाकारामुळे दोघांचे नाते कसे फुलत आहे याचे सुंदर वर्णन या कथेत केले आहे.


शरयूचा पेपर झाला. श्रीसोबत काही काळ का होईना पण एकांतात जवळून तिला त्याला अनुभवता आले होते. यातच ती खूप समाधानी होती.

त्याच्या मनातील गूज तिला समजले. त्याचा प्रामाणिकपणा, हुशारी, मोठ्यांचा आदर करण्याची त्याची वृत्ती, बोलण्यातील नम्रपणा, साधेपणा, संयम, या साऱ्या गोष्टी शरयूने जवळून अनुभवल्या होत्या.

श्री जरी पहिल्या भेटीतच तिला आवडला होता तरी आता तिने जवळून प्रत्यक्ष त्याला अनुभवल्यामुळे तिच्या मनातील त्याचे स्थान आता कैकपटीने वाढले होते. आणि आता सागराबरोबरच किनाऱ्यालाही त्याची लागलेली ओढ स्पष्ट दिसत होती.

म्हणूनच तर लग्नाची पुढची बोलणी करण्यासाठी माधवरावांनी नाना आणि सुनीताताई दोघांनाही बोलवून घेतले होते. ते देखील लागलीच निघून आले मुंबईला.

दुसऱ्याच दिवशी श्रीच्या घरी श्री आणि शरयूच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी माधवराव, नाना, सुनीताताई सगळेच गेले. त्यानिमित्ताने नानांनाही श्रीचे घर, घरातील माणसे जवळून अनुभवता आली.

लग्नाची बोलणी झाली. श्री चे काका काकू, मामा मामी, दोन्ही आत्या सगळेच हजर होते त्यावेळी.
एक महिन्यानंतरचा मुहूर्त काढण्यात आला. लग्न मुंबईतच करण्याचा सर्वांचा निर्णय पक्का झाला. लग्नाची सर्व जबाबदारी श्रीच्या घरच्यांनी घेतली.

"आमची पाहुणे मंडळी जास्त असणार आहेत त्यामुळे सर्व व्यवस्था आम्ही आमच्या पद्धतीने करतो." अशी आप्पांची इच्छा होती.

"आणि देण्या घेण्याचे म्हणाल तर, मीही दोन मुलींचा बाप आहे, एका बापाच्या मनाची घालमेल मी समजू शकतो."

"मुलीचे कन्यादान करून तिला सासरी पाठवताना काय अवस्था होत असेल त्या बापमनाची ही कल्पनाच करवत नाही. मीही गेलोय त्यातून."

"त्यामुळे मुलीने फक्त तिचे अमूल्य असे संस्काररुपी दागिने घेवुनच सासरी गृहप्रवेश करावा. आणि पुढे आजन्म त्या दागिन्यांची जपणूक करावी. त्यापुढे सोन्या नाण्याला आमच्या लेखी तरी शून्य किंमत आहे. आम्हाला फक्त मुलगी द्या बाकी कुठलीही अपेक्षा नाही नाना."

हा विचार जर प्रत्येक मुलाच्या पालकांनी केला तर कोणत्याही मुलीच्या बापाला तिच्या जन्माचे मग ओझे वाटणारच नाही.

"खरंच,आप्पांच्या या बोलण्याने नाना आणि सूनिताताई मनोमन सुखावल्या होत्या. शरयूचे नशीब थोर अशी लाखात एक माणसे तिला मिळाली होती. श्री सारखा समजूतदार जोडीदार तिला लाभला होता. काय हवं आणखी?"
"सुख म्हणजे नक्की ते हेच का??"

"नक्कीच मागच्या जन्मी आम्ही काहीतरी पुण्य केले असेल तिच पुण्याई आज आमच्या लेकीच्या कामी येत आहे."
नाना मनातच बोलले.
क्षणभर बापाचा उर भरून आला. डोळ्यात आसवांची दाटी झाली पण परिस्थितीचे भान राखत त्यांनी स्वतःला सावरले.

"पण आप्पा माझा एक वैयक्तिक प्रस्ताव आहे, पाहा पटतो का तुम्हाला आणि नाना तुम्हालाही." तितक्यात माधवराव बोलले.

"म्हणजे मला तर मुलगी नाही. पण शरयूला मी माझी मुलगीच मानतो. ती नानांची कमी आणि माझीच लेक जास्त आहे."

"त्यामुळे मी असं ठरवलंय, लग्नाला तर अजून महिनाभर उशीर आहेच तर मग उद्या किंवा परवा शरयू आणि श्रीकांतची अगदी साध्या पद्धतीने एंगेजमेंट झाली तर ? आणि तीही आमच्या घरी."

चालेल आमची काहीच हरकत नाही. आप्पा लागलीच उत्तरले.

पण नाना थोडे विचारचक्रात गुंतले.

माधवरावांना एका बापाच्या मनाची घालमेल समजली.

"अरे नाना; बाकी कोणताच विचार करु नकोस मी इथे असताना."

"अरे मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. जरा येतोस का??" नाना काळजीच्या स्वरात बोलले आणि माधवरावांना घेवून थोडं बाजूला गेले.

"अरे माधव, इतक्या घाईत कसं मॅनेज होणार रे? हे एंगेजमेंटचं."

"म्हणजे जरी घरगुती कार्यक्रम असला तरी मुलासाठी अंगठी आली. मुलीसाठी साडी आली. हे एका दिवसात कसं शक्य आहे.?"

"तू नको त्याची काळजी करुस. मी आहे ना."

पण अरे, मी काय म्हणतो..

"आता पण नाही आणि बिन नाही. आप्पा पण हो म्हणालेत ना आता."

"अरे पैशांची तजवीज एवढ्या घाईत नाही होणार रे माधव माझ्याकडून."
नाना थोडे काळजीच्या स्वरातच बोलले.

"बस काय नाना. क्षणात परकं करुन टाकलंस रे मला तू. शरयू माझ्या मुलीसारखी नाही तर माझी मुलगीच आहे रे."

"मी माझ्या स्वेच्छेने आणि मुलांच्या आनंदासाठी हा कार्यक्रम करायचं म्हणतोय. मुलांच्या भावना आपणच जपायला हव्यात रे. असंच वाटतं मला."
"आणि अनायासे तुम्ही सगळे आहातच तर मग होवून जाईल हा छोटेखानी कार्यक्रम. आणि श्री च्या घरातील इतरांनाही शरयूला भेटता येईल."
"तसंही बाकी कुणीच तिला पाहिले देखील नाहीये."

"आणि असा विचार तरी कसा तूझ्या मनात आला, मी तुझ्याकडून त्याचे पैसे घेईल??"
"एक रुपया सुध्धा मी तुझ्याकडुन घेणार नाहीये ध्यानात ठेव ही गोष्ट. माझी लेक असती तर मी केलाच असता ना रे खर्च."

"अरे पण बाकी ठीक आहे, पण श्री साठी अंगठी मी घेतो. आता तू दे पैसे. मी नंतर तुझे तुला परत करील."

"बरं बाबा. ते पाहू नंतर तेव्हाचे तेव्हा."

"आणि आजच करुन घेवू सर्व खरेदी. आणि उद्याचा दिवस थांबूयात. बाकीची पण तयारी करावी लागेल. हवं तर परवाचा दिवस ठरवूयात. मग तर झालं."

"तू काळजी करू नकोस मी करतो सगळं मॅनेज."

"म्हणजे तू आता आमचा मुक्काम वाढवणार असंच दिसतंय सगळं. अरे शेतीची कामं खोळंबलीत रे गावी म्हणून म्हटलं."

"हे बघ आता फक्त लेकीच्या लग्नाचा विचार कर. शेती काही दिवसासाठी कोणाच्या तरी मदतीने करुन घे."

"हो रे तसंच करावं लागेल."

"बरं चल आप्पांनाही सांगूयात आणि काळजी करू नकोस आता कोणतीही ."

फायनली शरयू आणि श्रीकांतच्या लग्नाची बोलणी व्यवस्थितपणे पार पडली. दोन दिवसांत एंगेजमेंट आणि एक महिन्यानंतरची लग्नाची तारीख ठरली.

इकडे शरयू आणि श्रीकांतला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तर दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला.
इतक्या लवकर हे सगळं असं घडून येईल यावर विश्वासच बसत नव्हता दोघांचाही.

कित्ती दिवसाची ती ओढ आता लग्नाच्या बोलणी पर्यंत येवून पोहोचली होती. दोन दिवसांतच दोघांचेही आयुष्य अगदी बदलूनच गेले होते.

लग्नाची बोलणी काय झाली आणि दोघेही आता जणू पती पत्नीच्या नात्याची ती गोड गुलाबी स्वप्न आतापासूनच जणू रंगवू लागले.
शब्दांना शब्दांची ओढ लागली.
एकमेकांना नजरेत सामावण्याची मग धडपड सुरू झाली.
बंद पापणीच्या पलिकडे एकमेकांचे दडलेले चेहरे आठवत
शब्दांना साज चढत गेला.
ओढ लागली ती आता त्या गोड गुलाबी स्पर्शाची,
एकमेकांना कायस्वरुपी नजरेत सामावून घेण्याची,
डोळ्यांतील झोप आता स्वप्नांच्या अधीन झाली,
नि साऱ्या जगाचा मग दोघांनाही हळूहळू विसरच पडत चालला.

दुसऱ्या दिवशी मग एंगेजमेंट ची सर्व तयारी करण्यात आली. शरयू साठी मग श्रीने स्वतःच्या पसंतीने साडी खरेदी केली.

आप्पा, माधवराव आणि नानांनी मग मुलांसाठी त्यांच्या पसंतीने अंगठ्याही खरेदी केल्या.

आणि माधव काकांच्या घरी मग छोटेखानी घरगुती एंगेजमेंटचा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला.

साडीमध्ये शरयुचे खुलून दिसणारे रुप आज थोडे जास्तच खुलले होते. श्रीच्या प्रेमाचा रंग तिच्या गाली उठून दिसत होता.
जोडा अगदी एकमेकांना साजेसा होता.
मालती ताई देखील होणाऱ्या सुनेचे ते रूप पाहून क्षणभर गोंधळल्या.
आनंदाचा सुखद धक्काच बसला त्यांना.

"उगीच मी खेड्यातील मुलींना नावे ठेवत होते आतापर्यंत. परिस्थितीनुसार आपोआपच बदल घडत असतात प्रत्येकात. हेही तितकंच खरं."
मालती ताई मनातून खूपच आनंदी झाल्या शरयूला पाहिल्यावर.

"चला हे एक बरे झाले. म्हणजे निदान माझ्या सुनेला कोणाची बोलणी तरी खावी लागणार नाहीत. आणि मलाही कोणाचे ऐकून घ्यावे लागणार नाही."
मालती ताई मनातच बोलल्या.

श्री चे काका काकू, मामा मामी, त्याच्या दोघी बहिणीदेखील आल्या होत्या. सर्वांनाच शरयू आणि श्री ची जोडी मनापासून पसंत पडलीं.

माधव काकांच्या बायकोने म्हणजेच अनुराधा ताईंनी तयार केले होते शरयूला.अगदी त्यांच्या पद्धतीने.
आज पहिल्यांदा शरयू इतकी नटली होती.
पाहताक्षणी तर कुणाचा विश्वासच बसणार नाही की ही खेडेगावात वाढलेली मुलगी आहे म्हणून.

आरशात स्वत:ला न्याहाळताना स्वतःच्याच प्रेमात पडावेसे वाटले शरयूला क्षणभर.
कारण आतापर्यंत स्वतःसाठी कधी असा वेळ दिलाच नव्हता तिने.

आज श्रीचे मात्र काही खरे नव्हते. आधीच तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला श्री आज तिचे हे रूप पाहून नक्कीच स्वतःलाही विसरून जाणार यात शंकाच नव्हती.

आणि शेवटी तसेच झाले. शरयू समोर येताच श्रीतर तिच्यावर फिदाच झाला. पण इच्छा असूनही तिचे ते सौंदर्य त्याला मनसोक्त डोळ्यांत साठवता मात्र येइना.
पण तरीही अधूनमधून तिच्याकडे एखादा चोरटा कटाक्ष टाकण्याचा मोह मात्र त्याला आवरेना.

एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम पार पडला. पुन्हा एकदा प्रेमाचा तो हळवा स्पर्श नात्यातील ऊब वाढवून गेला.
असेच छोटे छोटे अनेक क्षण त्यांनी हृदयात साठवून ठेवले.

फायनली आता श्री आणि शरयूच्या नात्याचा सुरू झालेला हा प्रवास दिवसागणिक अधिकच घट्ट होत जाणार हेही तितकेच खरे होते.

पण या साऱ्यात अजून महिन्याभराचा विरह सहन करण्यासाठी दोघांनाही मनाची तयारी मात्र करावी लागणार होती.

खूप साऱ्या गोड आठवणी सोबत घेवून शरयू, नाना आणि सूनिताताईंसोबत गावी जाण्यासाठी निघाली.
माधवराव आणि श्रीकांत मग त्यांना सोडवायला स्टेशनवर गेले. ह्यावेळी देखील माधवरावांनी श्रीकांतला मुद्दामहून बोलावून घेतले होते.

निघताना पाय जड झाले होते शरयुचे.

"एकदा तरी जावून शरयूला एक घट्ट मिठी मारावी, तिचा हात हातात घ्यावा. खूप काही बोलावे तिच्यासोबत असे वाटत होते श्रीकांतला."
पण यातील एकही गोष्ट त्यावेळी करणे शक्य नव्हती. याची कल्पना होती श्रीला.

कदाचित शरयूची नजरही त्याच्या मनातील भावनांना प्रतिसाद देवू इच्छित होती. मर्यादेची सारी बंधने तोडून ती स्वत:ला त्याच्या स्वाधीन करु पाहत होती.

क्षणभराचाही विरह आता सहन करु वाटत नव्हता दोघांनाही. सारं काही मनाप्रमाणे घडत होते. एकमेकांची नजर आता फक्त प्रेमाची ग्वाही देत होती.
नव्या प्रेमाची नवलाई दोघांच्याही नात्याला चढली होती.
पण अजून एक महिना थांबणं दोघांनाही आता खूप कठीण जाणार होतं.

दोन दिवसाचा तो सहवास कधी इतका हक्काचा झाला ते दोघांनाही समजलेच नाही.

"आता भेटू डायरेक्ट लग्न मंडपात"
अशी नजरेतूनच श्रीला सांगत होती ती. जड अंतःकरणाने मग शरयू गाडीत बसली. नजर फक्त श्रीवर खिळली होती तिची.

"पुन्हा लवकर ये मी वाट पाहतो,"
श्रीची नजरदेखील जणू शरयूला हेच सांगत होती.

प्रेमाची ओढ दोघांच्याही नजरेतूनच ओसंडून वाहत होती.

शेवटी जेव्हा शरयू नजरेआड झाली नि श्रीच्या जणू काळजाचा ठोकाच चुकला.

दोघांनाही एकमेकांच्या सहवासाची, प्रेमाची, शब्दांची, स्पर्शाची आता आणखीच ओढ लागली होती. प्रेमाचे ते गुलाबी क्षण दूर राहूनही दोघेही सजवत होते.

सर्वांच्या नकळत हळूच एकमेकांना फोन करणे, मॅसेज करणे सुरुच होते दोघांचेही. सर्व काही आता हक्काच्या त्या प्रेमळ नात्यात परिवर्तित झाले होते. त्यामुळे वागण्या बोलण्यातील तो हक्क, प्रेम आता स्पष्ट दिसत होते.
प्रेमाच्या त्या मुक भावनेला आता कुठे खरा अर्थ प्राप्त झाला होता.
प्रेमाचा गुलाबी रंग आता दोघांच्याही गाली चढला होता.

श्रीचे ते गमतीने बोलणे आणि शरयूचे त्यावर लाजणे.
तिला भेटण्यासाठी त्याची लाडीगोडी सुरू असणे नि "आता थोडेच दिवस" म्हणत तिचे त्याला मनवणे.

प्रत्यक्ष भेट नाही निदान व्हिडिओ कॉल तरी उचल म्हणत तिला पाहण्यासाठी आतुर झालेल्या श्रीचा लाडिक हट्ट पुरविण्यासाठी सर्वांच्या नकळत मग शरयूची धडपड सुरु होणे.

हे सारं काही दोघांच्याही नात्याची वीण अधिकच घट्ट करत होते. दिवसागणिक त्यात क्षणाक्षणाची भर पडत होती. दोघांमधील मैत्रीच्या नात्याला आता हळूहळू प्रेमाचा रंग चढत होता आणि दिवसागणिक तो अधिकच गडद होत चालला होता.
लग्नाआधीचे ते प्रेमळ गुलाबी क्षण दोघेही अगदी भरभरून जगत होते.

दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा माधवरावांनी नानांना आणि शरयूला मुंबईला बोलावून घेतले.

लग्नाच्या साड्या आणि दागिने खरेदीसाठी मग दोघेही एक दिवसासाठी मुंबईला आले.

ह्यावेळी देखील माधवरावांनी श्री आणि शरयूची भेट घडवून आणली.
शरयू साठी साड्या खरेदी करताना मग श्रीची खूप मदत झाली.

साड्यांची खरेदी हा तर निव्वळ बहाणा होता. वारंवार जाणूनबुजून एकमेकांचा होणारा तो प्रेमाचा स्पर्श दोघांनाही मग हवाहवासा वाटत होता.

नकळतपणे साडी निवडताना, साड्यांच्या त्या ढिगाऱ्याखाली श्रीने अलगद शरयूचा हात हातात घेतला.

तशी शरयू थोडी बावरलीच. हृदयाची स्पंदने तुफान वेगाने धावू लागली.

"नको रे श्री. खूप वाटतं रे, द्यावी सारी ही मर्यादेची बंधने झुगारून आणि झोकून द्यावे स्वतःला तूझ्या बाहुपाशात."

"तूही किती आतुर झाला आहेस मला मिठीत घेण्यासाठी समजतंय रे. पण आता काहीच दिवसांचा तर प्रश्न आहे."

"मग नंतर आयुष्यभर तूझ्या प्रेमाच्या मिठीतून स्वतःला कधीही दूर करणार नाही. याची खात्री देते."

एकमेकांची हाताची पकड आणखीच घट्ट करत चोरट्या नजरेतूनच दोघांनीही मग एकमेकांच्या मनाला समजावले.

परिस्थितीचे भान राखत शरयूने अलगद श्रीच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घेतला.
इच्छा नसतानाही श्रीने मग शरयुचा हात सोडला.

भावनांना आता आवर घालणं खूपच कठीण होऊन बसलं होतं.
प्रत्येक भेटीदरम्यान दोघांमधील जवळीक मात्र वाढत होती. मर्यादेचे अंतर आता हळूहळू कमी होत होते.

खरेदी तर झाली पण पाच मिनिटे का होइना पण एकांतात भेटायचेच शरयूला. असे मनोमन श्रीने ठरवलेच होते.

"काका आम्ही आलोच पाणी पिवून तोपर्यंत तुम्ही बिल पेड करा."

म्हणत शेवटी श्रीकांतने शरयूला त्या गर्दीतून बाजूला नेलेच.

आजूबाजूला कोणी नाही हे पाहून पुन्हा एकदा श्रीकांतने शरयूचा हात हातात घेतला.
तिचे ते लाजणे, ओठांवरील लाजेचे हसणे सारं काही श्रीकांत नजरेच्या कप्प्यात साठवून घेत होता.

त्याच्या नजरेला नजर देण्याची शरयू ची मात्र हिम्मत होइना.

त्याचे ते एकटक पाहणे तिला आणखीच घायाळ करत होते. अखेर तिच्या भावनांचा बांध तुटला.
नाही थांबवू शकली ती स्वतःला.

अलगद श्रीच्या कुशीत शिरली नि घट्ट बिलगली मग ती श्रीला.

श्री देखील नाही थांबवू शकला स्वतःला. तीच्याभोवतीची हातांची पकड अधिकच घट्ट झाली.

अखेर सागराला लागलेली किनाऱ्याची ओढ त्या एका क्षणातील मिठीने तात्पुरती तृप्त तर झाली होती.

पण ती पहीली मिठी दोघेही आयुष्यात कधीही विसरणार नव्हते.
तो पहिला प्रत्येक क्षण दोघांनीही मनातील भावनांच्या पेटीत आयुष्यभरासाठी बंद करुन ठेवला होता.

परिस्थितीचे भान राखत दोघांनीही मग काही सेकंदातच प्रेमाची ती घट्ट मिठी अलगद सोडवली देखील.

खरंच, आयुष्यातील एक एक टप्पा पार करत आता श्री आणि शरयू दोघेही प्रेमाच्या त्या गुलाबी वाटेवरून मनातील स्वप्नांच्या दिशेने हळूहळू मार्गक्रमण करत होते.

आयुष्यभरासाठी सागर आणि किनारा दोघेही निघाले होते प्रेमाच्या गावी, मनातील स्वप्नांना प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी.

आता पुढील भागात तरी होतील का हे सागर आणि किनारा जन्मभरासाठी एकरुप??
एकमेकांची लागलेली ही ओढ उतरेल का आता तरी सत्यात.?? जाणून घ्या पुढील भागात.