सगळी जबाबदारी तिचीच कशी...भाग 1
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
पहिली फेरी- कथामालिका
“काय ग रीमा आज दुपारचा नाश्ता कमी करून ठेवलेला होता का? थोडा थोडाच खावा लागला. उद्या पासून ना तू तुझी काम नीट करून जात जा, नंतर माझ्याने काही करून होत नाही. उगीचची दगदग नको बाई मला.”
देवाजवळ दिवा लावत मंजुषाताईंच्या तोंडाचा पट्टा सुरू होता.
रीमाने दारात पाऊल ठेवलच होतं की सासुबाई बोलणं सुरू केलं होतं.
“आई मी उद्यापासून जास्त करून ठेवत जाईल.” अस म्हणून रीमा फ्रेश व्हायला आत गेली.
रीमा आणि प्रशांत लग्नाला नऊ-दहा वर्षे झाली होती. अनया आणि मानस अशी दोन गोंडस मूल होती. घरात मंजुषाताई (सासू), विनायक राव (सासरे), दोन मुलं आणि रीमा, प्रशांत राहायचे.
रीमा लग्नाच्या आधीपासूनच नोकरी करायची. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. आणि प्रशांत केमिकल इंजिनिअर.
लग्न ठरलं तेव्हा रीमाच्या आई बाबांनी प्रशांत आणि त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं की
“आमची मुलगी नोकरी करते, कधी कधी तिला ऑफिसमधून यायला उशीर होतो तर तुम्हीही थोडं तिला समजून घ्यावं.”
त्यावेळी मंजुषा ताई बोलल्या होत्या.
“ताई तुम्ही काही काळजी करू नका, तुमची मुलगी आता आमची मुलगी आहे, तिला कुठलाही त्रास होणार नाही. तिच्यावर घरची जबाबदारी नसणार आहे, घरातलं बघायला मी आहे ना, तिने तिची नोकरी सांभाळली म्हणजे झालं.”
हे ऐकून रीमाचे आई वडील सुखावले होते.
‘आपल्या मुलीने भाग्य काढले हो, इतक्या चांगल्या घरात जातीय ती.’ रीमाची आई मनोमन विचार करु लागली.
लग्नानंतर सुरुवातीचे दिवस छान मजेत गेले. रीमाने एक महिन्याची सुट्टी घेतली होती. ती संपली आणि रीमाने ऑफिस जॉईन केलं.
रीमा सकाळचं सगळं करून जायची, तिला कसेही करून साडेनऊ पर्यंत घरून निघायला लागायचं. पाचला उठून ब्रश चहा करायची, त्यांनतर झाडझुड, पोछा, बाई सकाळी येत नसल्यामुळे सासुबाईने फर्मान सोडलं होतं की घराला सकाळी झाडू लागायलाच हवा आणि रोज पूर्ण घराला पोछा लागायलाच हवा. त्यानुसार रीमा रोज सकाळी उठून तेच करायची, त्यांनतर अंघोळ करून पूजा आणि स्वयंपाक करायची, तोवर आठ वाजलेले असायचे. मग प्रशांत आणि त्याचे आई बाबा उठले की रीमाचा सगळा वेळ त्यांच्या मागे मागे करण्यात जायचा.
एक दिवस रीमाची खूप चिडचिड व्हायला लागली.
“सगळी काम मीच करायची, स्वतःची कामे तरी स्वतः करायला नको का?”
अनावधनाने तिचे शब्द प्रशांतच्या कानावर पडले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा