Login

सगळी जबाबदारी तिचीच कशी... भाग 2

Sagli jababadari tichich Ka

सगळी जबाबदारी तिचीच कशी... भाग 2


“काय चाललंय तुझं रीमा?”
“कुठे काय?”
“कुणाला स्वतःची कामे करायला सांगते आहेस तू?”


“नाही काही नाही.” रीमाने बोलणं टाळलं आणि ती तिथून निघून गेली.
आता हे रोजचंच रुटीन झालं होतं. सगळ्यांच्या हातामध्ये सगळं आयत हवं असायचं, कुणीही उठून करण्याची तसदी घेत नसे.

असेच काही महिने गेले, आणि रीमाला दिवस गेले. ही खूप आनंदाची गोष्ट होती.  पण रीमाला याचा आनंदच होत नव्हता.
तिने ही आनंदाची बातमी प्रशांतला सांगितली. त्याला खूप आनंद झाला, घरच्यांनाही आनंद झाला.


प्रशांतला रीमाच्या चेहऱ्यावर नेहमी उदासीनता दिसायची. एक दिवस न राहवून त्याने तिला विचारलं,


“काय झालं रीमा, तू आनंदात का नाही आहेस? इतकी आनंदाची बातमी आपल्या आयुष्यात आली आणि तुझ्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत नाही, काय झाले बोल ना रीमा?”

“प्रशांत मला खूप भीती वाटते मी हे सगळं करू शकेल का? आताच बघ ना कामाची किती धावपळ असते. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत दिवस असाच जातो. बाळ आल्यानंतर मी बाळाला वेळ देऊ शकेल का? माझ्याकडून बाळावर अन्याय तर होणार नाही ना? हेच विचार मनात घोळत असतात.”

“अग तू काहीही का विचार करतेस? आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत.”


‘तुम्ही सगळे फक्त बोलायला आहात माझ्यासोबत.’ रिमा मनातल्या मनात बोलली.


“कुठल्या विचारात गुंतलीस?”

“नाही काही नाही.”


त्यानंतर रीमाने विचार केला उदास राहूनही काही उपयोग नाही आपण आनंदात असू तरच माझं बाळ आनंदात असेल या विचाराने तिने नकारात्मकता मनातून काढून घेतली आणि ती आनंदात राहायला लागली.


नेहमीप्रमाणे सगळं करून ती ऑफिसला जायची, तिकडून आल्यानंतर पुन्हा तेच काम करायची.

बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले आणि रीमाने एका गोंडस मुलीला जन्म दिला, दोन महिने रीमाची आई रीमाकडेच होती. दोन महिने तिच्या आईने केलं आणि ती तिच्या घरी परत गेली.
त्यानंतर मात्र रीमाला खूप एकटे एकटे वाटायला लागलं. रीमाला सासूची कोणतीच मदत होत नसे. घरातलं सगळं करून मुलीचा सांभाळ करणं सोपं नव्हतं तरी रिमा सगळं करायची. कुणाला तक्राराची जागा देत नसे पण तिच्या वाट्याला फक्त टोमणे आणि टोमणे यायचे.

“हिला काहीच जमत नाही, एक मुलगी सांभाळता येत नाही, कशाला तरी मुलाला जन्मला घालायचं? बाया पाच पाच लेकरं करतात आणि हिच्याने एक लेकरू सांभाळून होत नाही.” सासूबाईचा नेहमीचाच टोमणा असायचा.


क्रमशः


0

🎭 Series Post

View all