Login

सागराला ओढ किनाऱ्याची!!(भाग १)

पहिल्याच भेटीत, पहिल्याच कांदे पोह्यांच्या कार्यक्रमात शहरातील मुलगा गावच्या मुलीच्या प्रेमातच पडतो आणि तिथूनच सुरू होते ही अनोखी प्रेमकहाणी.


खूप वेळापासून पाहुण्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले नाना खुर्चीतून उठून घाईगडबडीतच बाहेर अंगणात येवून उभे राहिले. दुरुनच येत असलेली फॉर्चूनर इनोव्हा त्यांच्या घराकडे वळली नि नाना सावध झाले. गाडी दारात आली तशी नाना ओट्याच्या दोन पायऱ्या उतरुन गाडीच्या दिशेने पुढे गेले.
"हा बस बस इथे आंब्याच्या झाडाखाली सावलीला पार्क करा", म्हणत पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी ते पुढे सरसावले. नानांच्या वागण्या बोलण्यातील आपलेपणा सर्वांनाच भावला. गाडीतून एक पंचवीशीतील तरुण, त्याचे आई वडील नि मामा अशी मंडळी उतरली. कडक कपड्यातील पॉश लोकांना पाहून नानांना थोडी धास्तीच वाटली. पण तितक्यात माधवराव म्हणजेच नानांचे अगदी खास मित्र लागलीच हजर झाले. तसा नानांच्या जीवात जीव आला. गाडीवरून उतरतच माधवराव नानांना म्हणाले, "काय रे नाना, कसा आहेस?"

"ठीक आहे रे माधवा." म्हणत त्यांनी माधवरावांना प्रेमाने आलिंगन दिले.
"किती दिवसापासूनची भेट घ्यायची इच्छा आज तुझ्या शरयूमुळे पूर्ण झाली बघ." माधवराव हसतच म्हणाले.
नाना आणि माधवराव जुने मित्र. एकत्र बालपण घालवलेले हे दोन मित्र आज पुन्हा एकदा भेटले. शिक्षण पूर्ण झाले नि नोकरीनिमित्त माधवराव शहरात गेले आणि शहरातीलच एक होवून गेले. गावी यायचे अधून मधून पण हल्ली कमी झाले होते त्यांचे गावी येणे. पण फोनवरून मात्र आवर्जून सर्वांशी संपर्क ठेवायचे. गावाशी असलेली नाळ आजही त्यांनी प्रेमाच्या धाग्याने अगदी घट्ट बांधून ठेवली होती. नाना मात्र त्यांचा शेती व्यवसाय सांभाळण्यात व्यस्त झाले. नानांच्या मुलीसाठी म्हणजेच शरयूसाठी माधवरावांनी शहरातील स्थळ सुचविले होते. माधवरावांच्या विश्वासातील हे स्थळ. मुलगा त्यांच्या पाहण्यातील होता. त्याच्या घरच्यांसोबत जास्त काही संपर्क नव्हता माधवरावांचा पण श्रीकांतसोबत बिझनेस संदर्भात अनेकदा भेटीगाठी व्हायच्या त्यांच्या. श्रीकांतचा प्रामाणिकपणा आणि त्याची हुशारी, कामातील जिद्द माधवरावांना खूपच आवडायची. खूपदा ते त्याचे कौतुकदेखील करायचे. वेळोवेळी त्याला कामासाठी प्रोत्साहन द्यायचे.
श्रीकांतला पाहिले की माधवरावांना शरुचा चेहरा आठवायचा. शरु आणि श्रीकांतची जोडी किती छान दिसेल नाही, खूपदा हे माधवरावांच्या मनात यायचे. माझी स्वतःची लेक असती तर नक्कीच मी श्रीकांतला जावई करुन घेतले असते. असे मनोमन माधवरावांना वाटायचे. श्रीकांतसारखा गुणी आणि कष्टाळू मुलगा नक्कीच आपल्या शरुला अगदी सुखात ठेवेल याची खात्री होती माधवरावांना. पण नाना तयार होईल का शरुला शहरात द्यायला.? शेवटी त्यानेही आपल्या मुलीसाठी काहीतरी ठरवलेच असेल ना? एक दिवस माधवरावांनी श्रीकांतबद्दल नानांना कल्पना दिली.
त्यावर नाना म्हणाले,"अरे माधवा, शरु माझ्यापेक्षा जास्त तुझी मुलगी आहे रे. तू तिच्या भविष्याची तसदी घेतोयेस हे पाहूनच खूप आनंद झाला बघ. शरुच्या बाबतीत तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य नसेल हा विचार सोडूनच दे तू?"

माधवरावांनी मोठ्या विश्वासाने शरयूसाठी श्रीकांतचे स्थळ आणले होते. शरयू म्हणजे माधव काकांची अगदी लाडाची गुणी लेकच होती जणू. स्वतःच्या मुलीप्रमाणे ते शरयुला मानत होते. कॉलेज संपले नि बँकेच्या परीक्षेसाठी अनेकदा शरयूचे शहरात येणे जाणे व्हायचे. तेव्हा हक्काने ती आपल्या या माधव काकाच्याच घरी थांबायची. तिला रेल्वे स्टेशनवर घ्यायला येण्यापासून ते पुन्हा तिला बसवून देईपर्यंत सारे काही स्वतःच्या मुलीप्रमाणे माधवराव शरुची काळजी घ्यायचे. परीक्षा असली की शरुला परीक्षा केंद्रावर सोडणे आणि पुन्हा आणणे ही माधवरावांची जबाबदारीदेखील ते उत्तम पार पाडायचे. मुलगी नाही याची खंत कधीच वाटली नाही माधवरावांना. शरयूमधेच ते स्वतःच्या मुलीला पाहत होते. त्यांच्या आकाश आणि अक्षयला देखील शरयूच्या रुपात एक हक्काची बहीण मिळाली होती. माधवरावांमुळेच तर तिकडे गावी नाना निश्चिंत असायचे. माधव आहे ना मग मला काही टेन्शन नाही असे वारंवार ते बोलूनही दाखवायचे.

नानांचा शरयूसाठी मुलगा पाहण्यासाठी होकार मिळाल्यावर माधवरावांनी श्रीकांतच्या वडिलांशी संपर्क साधला. शरयूबद्दल सर्व माहिती त्यांनी श्रीकांतच्या वडीलांना दिली. श्रीकांतबद्दल तर आधी त्यांना माहिती होतीच पण त्याच्या घरच्यांविषयी देखील त्यांनी अधिक माहिती काढली. सगळंकाही माधवरावांच्या मनाप्रमाणे होते. श्रीकांत त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. दोन बहिणी, दोघीही सासरी अगदी आनंदात नांदत होत्या. श्रीकांत म्हणजे घरातील लाडके शेंडेफळ. सर्वांचा लाडका पण लहान असूनही तितकाच समजूतदार बरंका. एक हुशार कर्तबगार कष्टाळू मुलगा. नात्यातील सर्व भावंडांचा तो आदर्श. स्वतःला कामात सतत व्यस्त ठेवण्याच्या त्याच्या सवयीचे सर्वांनाच कौतुक वाटायचे.
माधवरावांनी श्रीकांत आणि त्याच्या कुटुंबियांविषयी नानांशी बोलून घेतले. माधवरावांवर स्वतःपेक्षाही जास्त विश्र्वास होता नानांचा. त्यामुळे जास्ती आढेवेढे न घेता पुढे एक महिन्यातच शरयू आणि श्रीकांतचा पाहण्याचा कार्यक्रम करण्याचे ठरले आणि ठरल्याप्रमाणे मंडळी आली मुलगी पाहण्यासाठी.

नानांनी पाहुण्यांचे प्रेमाने स्वागत केले. सर्वांना घरात नेले. नानांचे साधे कौलारू घर पण अगदी टापटीपित. सगळ्या वस्तू अगदी जागच्या जागी. श्रीकांतला मामाच्या गावची क्षणभर आठवण झाली. त्याचे मामाचे घरही असेच खेडेगावात. मामाचेही असेच कौलारु घर. उन्हाळ्याच्या सुट्टीत हट्ट करून मामाच्या गावी तो जायचा. संपूर्ण सुट्टी तो गावी घालवायचा. पण त्याच्या आईचे म्हणजेच मालती ताईंचे बालपण मात्र शहरातच त्यांच्या मावशीकडे गेले. त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात शहरी बाज जाणवायचा. श्रीकांतच्या सुट्टीत काय ते फक्त त्या माहेरी जायच्या. एरव्ही गावची जास्त ओढ नव्हती मालती ताईंना.
आता गावची मुलगी सून करुन घेण्याचा श्रीकांत आणि त्याच्या वडिलांचा निर्णय त्यांना जास्त काही मान्य असेल असे वाटत नव्हते. पण तरीही त्याच्या वडिलांच्या शब्दाचा मान राखला होता त्यांनी. लहान असल्यापासूनच मालती ताईंना शहराचे शहरी वातावरणाचे खूपच आकर्षण होते. त्यांच्या शहरातील मावस बहीण जेव्हा गावी यायच्या तेव्हा आपणही त्यांच्यासारखं राहायला हवं, छान छान दिसायला हवं, कपड्यांची फॅशन करायला हवी असं मनातून खुप वाटायचं त्यांना. पण गावच्या वातावरणात त्याकाळी असं थोडं जरी कुणी स्टायलिश राहिलं तरी आजूबाजूचे लोक नावे ठेवून मोकळे व्हायचे. पण न राहवून एकदा मावस बहिणीचे मेक अपचे सामान वापरुन तिचा सुंदर असा ड्रेस घालून खूप छान तयार झाल्या मालतीताई. आणि जे व्हायला नको होते तेच झाले. जो तो मालतीला बोलू लागला. तिची खेचण्याचा एक चान्स सोडला नाही कोणी.
"कशाला उगीच हे नखरे करावेत, आपल्याला शोभेल असंच राहावं माणसाने, पोरीच्या जातीला हे असे नखरे शोभत नाहीत, काय ते व्हट लाल करुन ठेवलेत, त्या झिंज्या कशा मोकळ्या सोडल्यात आणि काय तो ड्रेस घातलाय. आपल्यासारख्याचे काम नाही हे मालते. मातीतली माणसं आपण. हे असं वागणं बरं दिसतं का? जा पळ ते तोंड धू आणि कपडे बदल आधी. हा आणि मोठ्या आईकडून वेणी घालून घे घट्ट." मालतीची चुलती तिच्या मनाला लागेल असं अगदी खोचून बोलली. शेवटी बालमनच ते, असं कुणी बोलल्यावर दुखावलं जाणारच. आता कुठे चौथीत गेली होती मालती. खूप राग आला तिला तिच्या काकीचा. खूप रडली ती आईजवळ. तेव्हाच तिने ठरवलं. ह्या अशा विचारांच्या लोकांत राहायचंच नाही मला. लोकांच्या या विचारांची तिला खूपच चीड यायची. आई बाबांकडे हट्ट करून मग ती शहरात तिच्या मावशीकडे शिक्षणासाठी गेली आणि कायमची शहरातीलच झाली. शहरी वातावरणात ती अगदी सहज रुळली. तिला हवे तसे सारे काही मिळाले. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले नि लग्न होवून मालती कायमस्वरूपी शहराचाच एक भाग झाली. आता सून निवडीच्या बाबतीतही कोणतीही रिस्क तिला नको होती. शहरातील मॉडर्न मुलगीच सून म्हणून घरात आणण्याचा मालतीताईंचा विचार पक्का होता. गावच्या मुलीचा तिने सून म्हणून स्वप्नातही विचार केला नव्हता कधी. पण, श्रीकांतच्या वडीलांच्या म्हणण्यानुसर "फक्त मुलगी पाहायला हरकत काय आहे? बाकीच्या गोष्टी पुढच्या पुढे." या त्यांच्या एका वाक्यावर त्याही तयार झाल्या होत्या शरयूला पाहायला.

शरयूच्या आईने पाहुण्यांचे आदरातिथ्य केले. पाहुणे शहरातील असल्याने त्याही थोड्या बिचकल्याच होत्या. पाहुण्यांना पाणी देत हलकेच सगळ्यांना आणि विशेष करून श्रीकांतला न्याहाळत सूनिताताई पुन्हा आत जायला वळल्या. तितक्यात माधवराव म्हणाले, "वहिनी झाली की नाही शरयू तयार.? बोलवा आमच्या लेकीला." माधवराव बोलले तशी श्रीकांतची नजर खाली झुकली. तोही खूप आतुर झाला होता शरयूला भेटायला.

"हो हो. झालीच आहे तयार. आलेच मी तिला घेवून" म्हणत सुनीताताई आत निघून गेल्या.
आत गेल्या गेल्या त्यांनी शरुला सावध केले. अग मुलगा लाखात एक आहे बरं का शरु. माधव काका बोलले होते ते काही खोटं नाही. मुलगा गोरापान, नाकी डोळी अगदी तरतरीत आहे बघ. अगदी तुला साजेसा. तुझी सासूही खूपच फॅशनेबल आहे बरं का. पाहताक्षणी लपत नाही ते. हे एक बरंच झालं पण, म्हणजे तुझ्या फॅशन करण्यावर त्यांचा काही आक्षेप नसेल. आणि माणसे पण
खूप मोठी आहेत बरं. लाखात एक स्थळ शोधलं बाई माधव भाऊजींनी तुझ्यासाठी.

"आई अजून कशातच काही नाही आणि तू तर माझं लग्न लावून मोकळीही झालीस. त्यांनी मला आणि मी त्यांना पाहिलंही नाही आणि तू तर त्यांना माझी सासू बनवूनही टाकलंस."

"माझी शरु लाखात एक आहे. कोणाची हिंमत आहे तिला नापसंत करण्याची."असे म्हणत सुनीता ताईंनी लेकीच्या तोंडावरून हात फिरवत कडाकड बोटे मोडली. नकळतपणे आईच्या डोळ्यांत पाणी तरळले.
"बरं चल तो पोह्यांचा ट्रे घे. आणि घाबरु नकोस. विचारलेल्या प्रश्नांची बिंदास उत्तरे दे. तुला काही सांगायची गरज नाही म्हणा. पण तरी आईचं मन ग काळजी वाटणारच ना. पहिल्यांदा माझं लेकरु बँकेची नाही तर आयुष्याची परीक्षा द्यायला चाललंय. तिच्या खांद्यावरील पदर सावरत सुनीताताई बोलल्या. तिचे साडीतील ते देखणे रूप डोळ्यांत मनसोक्त साठवून घेतले त्यांनी. माझीच दृष्ट लागायची बाई माझ्या लेकीला म्हणत त्यांनी पदराने डोळे टिपले. शरयू देखील त्याक्षणी भावूक झाली.
"आई, अगं फक्त पाहण्याचा कार्यक्रम आहे ग आज. लग्न नाही ठरलं अजून माझं. आताच कशाला रडतेस. आणि तू काळजी करू नकोस लग्न झाल्यावर पण मी येणार बरं तुला त्रास द्यायला." आईला हसविण्याचा प्रयत्न करत तीला घट्ट मिठी मारली शरयूने.

"हो ग बाळा. पण मुलगी एकदा का सासरी गेली की सगळ्यांच्या मर्जीत राहावं लागतं ग. शेवटी आधी सासर आणि सासरची माणसं त्यांनतर माहेर, असंच असतं बाईचं आयुष्य."
"आता यावर पण तुझ्याकडे उत्तर ठरलेलं असणार हे माहीत आहे मला. पण, आता बोलण्यात वेळ घालवला तर पाहुणे जातील निघून. चल आवर पटकन म्हणत पोह्यांचा ट्रे शरयूच्या हातात टेकवत तिला पुढे केले आणि तिच्या मागोमाग सुनीताताई देखील बाहेर यायला निघाल्या.

"शरयू" नावच खूप भावले होते श्रीकांतला. माधव सरांकडून शरयूचे ऐकलेले वर्णन आठवत डोळ्यासमोर तिची प्रतिमा त्याने आधीच रेखाटली होती. सरांनी सांगितल्याप्रमाणेच असेल का शरयू? की माझ्या मनातील कल्पनेपेक्षाही सुंदर असेल? सर म्हणाले म्हणजे नक्कीच मला साजेशी असणार. विचार करत असतानाच अधून मधून श्रीकांत वर मान करुन हळूच शरयूच्या येण्याची चाहूल घेत होता. तितक्यात अबोली रंगाच्या साडीत हातात पोह्यांचा ट्रे घेवून शरयू बाहेर आली. तशी सर्वांचीच नजर तिच्यावर खिळली. श्रीकांत तर पाहताच क्षणी जणू तिच्या प्रेमातच पडला. तिचा गोरापान रंग, काळेभोर डोळे, पाठीवर रुळणारी सैलसर वेणी, कमनीय बांधा, गालावर पडणारी खळी नि त्यावर हलकेच स्पर्श करुन जाणारी केसांची बट तिच्या सौंदर्याचे तेज अधिकच खुलवित होती. त्यातच तिच्या चेहऱ्यावरील स्मित श्रीकांतला आणखीच घायाळ करुन गेले.

"अहाहा काय ते सौंदर्य"\" श्रीकांत मनातच स्वतःशी बोलत होता. तिच्यावरील त्याची नजर हटायचे काही नावच घेईना. त्यातच स्वतःसाठी मुलगी पसंत करण्याचा श्रीकांतचा हा पहिलाच अनुभव. त्याच्या आयुष्यातील हा पहिलाच कांदे पोह्यांचा कार्यक्रम. त्यामुळे आधीपासूनच तो खूप एक्झाइट झालेला होता. पण आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवून मनाला आवर घालणे जरी कठीण असेल तरी आता दुसरा पर्याय देखील नव्हता. कसेबसे मनाला समजावत त्याने शरयूवरील त्याची नजर खाली झुकवली. तरी अधून मधून तो एखादा कटाक्ष तिच्यावर टाकतच होता. शरयुने एक एक करत सर्वांना पोहे दिले. आता पोह्यांचा ट्रे घेवून ती श्रीकांत समोर आली. ती समोर आली तशी श्रीकांतच्या हृदयाची स्पंदने आगगाडीच्या वेगाने धावू लागली. त्यातच समोर येताच तिच्या साडीचा स्पर्श श्रीकांतच्या पायाला झाला तसा त्याच्या अंगावर शहारा आला. जणू काही शरयुचा स्पर्श झाल्याचा क्षणभर त्याला भास झाला.
ट्रे मधून पोह्यांची प्लेट श्रीकांतने उचलली. त्यावेळी न राहवून शरयूने पहिला कटाक्ष श्रीकांतवर टाकला, योगायोगाने दोघांची नजरानजर झाली. तत्क्षणी दोघांनीही नजर चोरली. आपसूकच दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित खुलले.
"अरे, वेडा आहेस का तु श्रीकांत. काय गरज होती वर पाहण्याची? काय विचार करेल आता ती? श्रीकांत मनातच बोलला.

इकडे शरयूची देखील काही वेगळी अवस्था नव्हती. काही सेकंदात तिने श्रीकांतला त्या पहिल्या नजरेच्या कप्प्यात सामावून घेतले. दोघांची नजरानजर झाली तशी शरयू बावरली.
"अरे देवा, हे काय झाले, उगीच मी वर पाहिले? इतकी घाई कशाला केलीस शरु? काय विचार करेल आता तो तुझ्याबद्दल? पोहे देवून ती थोडी मागे सरकली. आता पुढे काय? अशीच उभी राहू की बसायचे आहे मी खाली? ती मनात स्वतःशीच बोलली. तिला काहीच कळेना.
तितक्यात माधव काका म्हणाले, "ये बेटा बैस इथे."

शरयू माधव काकांच्या बाजूला असलेल्या खुर्चीत जावून बसली. "हा, आता हे ठीक आहे." श्रीकांत मनातच बोलला. कारण आता शरयूला न्याहाळणे त्याला सोप्पे झाले होते. अगदी सहज कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने तो शरयूला मनसोक्त पाहू शकत होता.
श्रीकांतच्या आईने म्हणजेच मालतीताईंनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. नाव, शिक्षण, आवडी निवडी, तिच्या अपेक्षा ह्या सर्व फॉर्मल प्रश्नांची पूर्तता झाली. पुढे त्या म्हणाल्या तू बँकेच्या परीक्षा देतियेस असं समजलं आम्हाला.
"हो."शरयुने होकारार्थी मान हलवली.

आतापर्यंत किती परीक्षा दिल्यास.?

"पाच."शरयू उत्तरली.

मग एकही नाही सुटली का अजून..??

दोघांचे रिझल्ट लागले, अजून तीन लागायचे बाकी आहेत. पहिल्या वेळी काहीही अंदाज नव्हता. सुरुवातच होती माझी त्यामुळे पहिला पेपर नाही सुटला. दुसऱ्या वेळी पूर्ण प्रयत्न केले पण दोन मार्क वरून तोही चांस हुकला. शरयूने न घाबरता जे आहे ते अगदी मनमोकळेपणाने सांगून टाकले. तिचा हा प्रामाणिकपणा सर्वांनाच भावला. श्रीकांतला तर शरयूने थांबूच नये बोलतच राहावे असेच वाटत होते. तिच्या बोलण्याच्या प्रवाहात तोही मनसोक्त डुंबत होता.

"म्हणजे प्रत्येक वेळी प्रगती आहे म्हणायचं तर. मग पुढच्या तीन मध्ये एक तरी पेपर सुटणार असंच दिसतंय."श्रीकांतचे वडील मधेच बोलले. सगळेच त्यांना आप्पा म्हणायचे.

"नाही सांगू शकत काका. शेवटी ते वेळच ठरवेल. मी तर माझे १००% दिलेत पण नशिबाचीही साथ असायला हवी." शरु प्रांजळपणे उत्तरली. कारण उगीच पुढच्या गोष्टीबद्दल आधीच बोलण्यात काहीही अर्थ नाही. कारण नशिबातील तारे केव्हा चमकतील किंवा चमकणारच नाहीत हे प्रत्यक्ष वेळच ठरवेल. ते काहीही असो पण, शरयूच्या "काका" म्हणण्याने आप्पा मात्र मनोमन सुखावले होते. अगदी सहजच ती श्रीकांतच्या वडिलांना काका म्हणाली होती. "किती लाघवी आहे ही मुलगी." तितकीच हुशार आणि संस्कारी अगदी माधवराव म्हणाले होते त्यात तिळमात्रही शंका नाही. अप्रत्यक्षरीत्या आता आप्पांचाही शरयूला होकारच आहे हे स्पष्ट दिसत होते.

तेवढ्यात माधवराव म्हणाले,"का नाही असणार नशीबाची साथ? आपले प्रयत्न प्रामाणिक असल्यावर यशही एक ना दिवस धावत येईल तुझ्याकडे." तसे शरयुने त्यांच्याकडे पाहून त्यांनी तिच्यावर दाखवलेल्या विश्वासाला हलकेच हसून प्रतिसाद दिला.

तेवढ्यात मालतीताई पुन्हा बोलल्या, पण सद्ध्या ठीक आहे, अभ्यासासाठी तुला तेवढा वेळ मिळतो, विशेष म्हणजे शक्य तितका वेळ तू सद्ध्या देवू शकतेस. आणि प्रत्येक मुलीला लग्नाआधी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं तितकं अवघड जात नाही. पण, उद्या लग्न झाल्यावर जबाबदारी वाढणार. नोकरी मिळेलही तुला पण घरचं सगळं पाहून नोकरी करताना ओढाताण झाली तर तुझीच पुन्हा चिडचिड होणार आणि या सगळ्यांत घरचे वातावरण मात्र बिघडणार. मग अशावेळी कसं मॅनेज करशील तू? पुढे जावून वाटणारी शक्यता मालतीताईंनी आधीच बोलून दाखवली. आता शरयू यावर काय उत्तर देते? याची सर्वांनाच उत्सुकता लागली.

खरंच आता शरयू तिच्या उत्तराने जिंकणार का पुन्हा एकदा सगळ्यांचे मन? मालतीताई शरयूच्या उत्तराने समाधानी होतील का? की आणखी प्रश्न विचारुन त्या शरयूची परीक्षा घेणार? खेडेगावातील मुलगी सून म्हणून करून न घेण्याचा त्यांचा विचार बदलणार तर नाही ना? पहिल्याच भेटीत झालेली शरयू आणि श्रीकांतची नजरानजर त्यांना प्रेमाच्या गावी घेवून जाईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील भागात नक्की वाचा.