Login

सागराला ओढ किनाऱ्याची!!(भाग ६)

हळूहळू फुलत जाणारे प्रेमाचे नाते काळाबरोबर अधिकच बहरते. दिवसागणिक वाढत जाणारे नात्यातील प्रेम, आपुलकी, विश्वास यामुळेच तर नात्याचा पाया घट्ट होत जातो. शरयू आणि श्री ची प्रेमकहाणी हळुवारपणे कशी फुलत जाते याचे सुंदर चित्रण या कथेत दर्शवले आहे.


शरयू माधव काकांसोबत त्यांच्या घरी पोहोचली. बोलता बोलता घर कधी आले ते दोघांनाही समजले नाही. घरी काकू त्यांची वाटच पाहत होत्या. काकांची दोन्ही मुले आकाश आणि अक्षय, शरयू ताई येणार म्हणून खूपच आनंदात होते. लहान भावंडांप्रमाणे ती देखील त्यांना जीव लावायची.

खरंच सख्ख्या नात्यातही इतकी ओढ नसेल जितकी या जोडलेल्या नात्यात होती. स्वतःच्या मुलीप्रमाणे काकू देखील शरयूला जीव लावायच्या. त्याही तिला आपली मुलगीच मानायच्या.
मुलांना आवडतात म्हणून सुनीताताईंनी नारळाच्या वड्या पाठवल्या होत्या शरयूसोबत. मुलेही खूपच खुश झाली वड्या पाहून.

"तितक्यात माधव काका म्हणाले, दोन चार वड्या तूझ्या श्री साठीही ठेव ग शरयू. त्यालाही खूप आवडतात बरं नारळाच्या वड्या."

"नाही काका, त्यांच्यासाठी देखील आणल्यात मी. ह्या खावू देत मुलांना."

काकांनी तर भुवयाच उंचावल्या.

"शरु खाल्लीस पुन्हा एकदा माती,
दाताखाली जीभ चावत मनातल्या मनातच शरयू बोलली. आता काकांच्या नजरेला नजर देण्याची शरयूची हिम्मत काही होइना.

"तुमचं आधीच ठरलं होतं की काय भेटायचं.?
काकांनी आश्चर्य कारकरित्या प्रश्न केला."
"हे बरंये बुवा, आम्हाला म्हणायचं वेळ हवा आणि तुम्ही मात्र ट्रेनच्या वेगाने धावायचं.

"हे काही बरोबर नाही बुवा"

तिची खेचण्याचा हा चान्स देखील माधव काकांनी सोडला नाही.

आता शरुयाला तर कुठे तोंड लपवू आणि कुठे नाही असेच झाले क्षणभर.

तेवढ्यात काकू म्हणाल्या,"तुम्ही नाही सुधरणार.
काय आनंद मिळतो तुम्हाला काय माहीत असं एखाद्याची खेचताना."

"तिचा चेहेरा तर पाहा जरा, लाजेने कसा गोरमोरा झालाय."
पण तू टेन्शन नको घेवूस शरयू, मी मात्र तुझ्याच पार्टीत आहे बरं का. म्हणत काकूंनी काकांकडे पाहत डोळा मिचकावला.

"काकू...आता तुम्हीही."

"तसं नाही ग, आता लग्न म्हटलं की ह्या गोष्टी आल्याच. पण तू मात्र प्रत्येक क्षण अगदी भरभरुन जगून घे. ह्याच आठवणी जपायच्या पुन्हा मग आयुष्यभर."
"तुझ्या लग्नामुळे मला आता आमच्याच लग्नाचे ते सोनेरी दिवस आठवत आहेत बघ." काकू म्हणाल्या.

"पण सौभाग्यवती एक माहितीये का तुम्हाला, आज कोणाला तरी श्री भेटला बरं का."

"काय सांगता?"

" खरंच की काय ग शरयू.?
काकूंनी देखील आश्चर्य कारण रित्या प्रश्न केला शरयूला.

पण आता ती बिचारी तरी काय बोलणार होती.
काका काकूंच्या तावडीत बरोबर सापडली होती ती.
.
तेवढ्यात काका बोलले,
" हे दोघेही खुप छुपे रुस्तुम आहेत बरं का, गुपचूप गुपचूप बोलतात, भेटतात आणि आम्हाला थोडा वेळ हवाय असं सांगून लग्न लांबणीवर टाकतात."
काकांनी पुन्हा एकदा शरयुची खेचायला सुरुवात केली.

"काकू अहो मी त्यांना बोलावलंच नव्हतं. ते येणार आहेत हे मला माहिती पण नव्हतं. उलट काकांनीच त्यांना बोलावलं आणि आता सगळं माझ्यावर ढकलत आहेत."

"अगं हो हो पण मी काही बोललो का त्याबद्दल तुला. उलट चांगलंच आहे ना."
काका हसूनच बोलत होते.

"पण ते काहीही असो, छान जुळलेलं दिसतंय तुमचं सुत."

"आणि हे एक बरंच झालं. चला तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे. एकदा का लग्न निर्विघ्नपणे पार पडलं म्हणजे आम्ही निश्चिंत होवू बघ."

बोलता बोलता काका म्हणाले,
"शरयू, माझ्या डोक्यात सहज एक कल्पना आली, बघ तुला पटतिये का..
"अगं अनायासे तू आलीच आहेस इकडे तर मग लग्नाची पुढची बोलणीही इकडेच उरकून घेवूयात. नानाला घेवू उद्या इकडेच बोलवून."

"मला जर तुमच्या या प्रगतीची आधीच कल्पना असती तर मी नानाला आजच तुझ्यासोबतच बोलावून घेतलं नसतं का?"

बरं तू सांग काय करायचं ते?, उद्याच नानाला आणि वहिनींना बोलावून घ्यायचं का.? आज ना उद्या पुढची बोलणी करायची आहेतच मग हीच ती योग्य वेळ वाटते मला तरी."

"चालेल काका, तुम्हाला जे योग्य वाटेल तसं करा." शरयू उत्तरली.

"बरं मी आप्पांसोबत पण बोलून घेतो तसं."
उद्या तुझा पेपर झाला की परवाच करुयात सगळं फायनल.

खरंच माधव काकांमुळे एक हक्काचं कुटुंब मिळालं होतं शरयूला. अगदी सख्ख्या नात्याहुनही आपलंसं.

नेहमीपेक्षा शरयू आज थोडी जास्तच आनंदी दिसत होती.
कारण त्या दिवसानंतर आज पहिल्यांदा ती श्रीला भेटली होती. एकमेकांना असलेली ती अनामिक ओढ भेटीचा आनंद द्विगुणित करुन गेली.

आणि आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे उद्या श्री स्वत: काकांच्या सांगण्यावरून शरयूला परीक्षा केंद्रावर सोडणार होता. तिलाही उत्सुकता लागली होती त्याला भेटण्याची.

माधव काकांमुळेच सर्व कसं दोघांच्याही मनासारखं घडत होतं. जणू दोघांचीही मने त्यांनी जाणली होती.
दोन पिढ्यांत एवढं मोठ्ठं अंतर पण तरीही काका मुलांच्या आनंदासाठी झटत होते.
कारण एकच दोघांवरही त्यांचा असलेला विश्वास. स्वतःपेक्षाही जास्त माधवरावांचा श्री आणि शरयू वर विश्वास होता. दोघांनाही अगदी जवळून ओळखत होते ते.
त्यांच्याच आनंदासाठी हा सगळा खटाटोप सुरू होता त्यांचा.

काही काळ तरी दोघांनाही एकमेकांसोबत घालवता यावा यासाठी काकांनीच श्रीला तिला सोडवायला सांगितले होते. त्यांना कुठलीही मीटिंग वगैरे काहीही नव्हती.

जेवणं आटोपली, छान हसत खेळत गप्पाही झाल्या. शरयू आल्यामुळे आज माधवरावांच्या घराचे गोकुळ झाल्यासारखे वाटत होते.
खरंच लेक माहेरी यावी, अगदी तसंच शरयू आल्यावर त्यांच्या घरातील आनंद नेहमी असाच ओसंडून वाहायचा. पण आज नेहमीपेक्षा थोडा जास्तच होता.

तिकडे श्री मात्र त्याने शरयूला पाठवलेल्या मॅसेजची केव्हापासून वाट पाहत बसला होता. कधी एकदा उद्याचा दिवस उगवतो नि शरयूला भेटतो असं झालं होतं श्री ला.
ती भेटीची ओढ त्याला काही शांत झोपू देईना.

इकडे शरयू देखील एव्हाना श्री चा मॅसेज आला असेल म्हणून बेचैन झाली होती. पण आता मोबाईल हातात जरी घेतला तरी काका पुन्हा सुरु होतील म्हणून ती तशीच स्वत:च्या भावनांना आवर घालत कधी एकदा सगळे झोपतात याचीच वाट पाहत होती.

तितक्यात काकू म्हणाल्या,
"चला शरयू मॅडम झोपून घ्या आता. सकाळी पुन्हा लवकर उठावं लागेल."
आणि आज काय अभ्यास तर काही पाहिलाही नाहीस तू. पण आता नको जागत बसू. झोपून घे. तसंही इतक्या परीक्षा झाल्यात म्हटल्यावर आधीच तयारी झालेली असणार तुझी."

" हो काकू, बऱ्यापैकी तयारी आहे त्यामुळे नाही जास्त टेन्शन येत आता पाहिल्यासारखं."
"पण तरीही एकदा नजरेखालून घालून घ्यावं वाटतंय."

"हो पण जास्त वेळ नको जागरण करुस. आणि तुला अभ्यास करायचा असेल तर इथेच हॉलमध्ये बस. नंतर झोपायला ये तिकडे बेडरुममध्ये. काका झोपतील आज मुलांच्या रुममध्ये."
एवढे बोलून काकू झोपायला निघून गेल्या.

काका आणि मुलेही जावून झोपली.

कधी एकदा श्री ला मॅसेज करते असे झाले होते शरयूला.

श्रीला मॅसेज करण्यासाठी तिने फोन हातात घेतला तर श्रीचाच मॅसेज आलेला होता.

" फ्री झाल्यावर शक्य असेल तर कॉल कर नाहीतर मॅसेज कर."

तिलाही खूप बोलावंसं वाटत होतं श्रीसोबत पण पुन्हा एकदा मर्यादांचे बंधन आडवे येत होते.

"नाही रे, कॉल नाही करता येणार. आपण मॅसेजवरच बोलुयात."

"चालेल??"

शरयू चा मॅसेज आला तसे श्रीच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उलटली.

"चालेल ग, समजू शकतो मी."
अगदी समजूतदारीच्या शब्दात श्री बोलला.

" झोपला नाहीस का अजून?"

"तू माझी झोप उडवलीस आणि आता विचार, झोपला नाहीस का??"

पुन्हा एकदा तोच त्याचा गमतीशीर स्वभाव तिच्या मनातील आंतरिक भावनांना सुखावून गेला.
चेहऱ्यावर आपसूकच मग लाजेचे हास्य उमटले.

"मी काय रे तुझी झोप उडवली?"
"आणि तू काही वेगळं केलंस का?"

"इथे माझ्या आयुष्यातील इतकी महत्त्वाची एक्झाम आहे आणि पहिल्यांदा असं होतंय मी खूप लाईटली घेतिये.
कितीही मनाला एका ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा ते तुझ्याकडेच धावत येतंय."

"न राहवून तुला भेटण्यासाठी ते उगीचच धडपडतंय."

"आता तूच सांग, मी काय करावं??"

"बिंदास येवू दे त्याला माझ्याकडे. मी मात्र अलगद जपेल त्याला, याची खात्री देतो."

त्याच्या या बोलण्यातून एक हक्काचा, आपलेपणाचा आणि खात्रीचा आधार शरयूला श्रीला भेटण्याची ओढ आणखीच गडद करुन गेला.

कधी एकदा सकाळ होते आणि भेटीची ती आस पूर्ण होते असेच झाले होते दोघांनाही.
सागराची आणि किनाऱ्याची ही मैत्री कधी प्रेमाच्या गावी पोहोचली हे दोघांनाही समजले नाही.
पण दूर राहूनही प्रेमाच्या त्या चिरंतन सुखात दोघेही अगदी न्हावून निघाले होते. मनाने तर आता दोघेही एकरुप झालेच होते.

फक्त आता ओढ होती ती त्या पहिल्या नाजूक हळव्या स्पर्शाची, पुन्हा एकदा नजरेत एकमेकांना सामावून घेण्याची, मनात सुरू असलेल्या भावनांच्या गर्दीतून बाहेर पडण्याची नि मर्यादेची सारी बंधने तोडून प्रेमाच्या त्या अथांग महासागरात मनसोक्त डुंबण्याची.
"अशीच असते ना पहिल्या प्रेमाची ती नवी नवलाई.??"

सकाळी लवकर उठायचे म्हणून दोघांनीही बोलणे आटोपते घेतले. इच्छा नसतानाही जबरदस्तीने मनातील भावनांना मग दोघांनीही आवर घातला.

एकमेकांना समजून घेण्याची दोघांचीही ही कला नात्याचा पाया आणखीच घट्ट करत होती.
एक समजूतदारीचे प्रेमळ नाते प्रेमाच्या त्या मऊ मखमली दोऱ्यात अलगदपणे गुंफले जात होते.

प्रेमाच्या त्या बहरलेल्या वटवृक्षाला दिवसेंदिवस प्रेमाची नवी पालवी फुटत होती. दिवसागणिक सागराला किनाऱ्याची नि किनाऱ्याला सागराची असलेली ओढ अधिकच गहिरी होत चालली होती.

बोलणे आटोपते घेवून दोघेही झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न कितीतरी वेळ करतच राहिले. पण अथक प्रयत्नाने भावी आयुष्याची ती गोड गुलाबी स्वप्न रंगवता रंगवता दोघेही मग निद्रेच्या अधीन झाले.

श्रीला तर पहाटे लवकरच जाग आली. शरयू देखील काकुंसोबतच लवकर उठली होती. आंघोळ,चहा ,नाश्ता सगळं आवरुन ती लवकरच तयार झाली.
सकाळी दहा वाजेपर्यंत तिला परीक्षा केंद्रावर पोहोचायचे होते. तिला केंद्रावर सोडायची जबाबदारी मात्र काकांनी श्री वर सोपवली होती.
तोही मग शक्य तितक्या लवकर आवरुन काकांच्या घरी पोहोचला.

"नाश्ता करून मगच जा" असा काकूंचा आग्रह श्रीला काही मोडवेना.
"शरयू जा ती पोह्यांची प्लेट श्री ला नेवून दे." काकू म्हणाल्या.

तशी शरयू उठली नि पोह्यांची प्लेट श्रीच्या हातात देताना पुन्हा एकदा दोघांनाही ती पहिली भेट आठवली. नजरेतूनच प्रेमाच्या गावी झालेली ती दोन मनाची सुंदर भेट दोघांनाही क्षणभर जुन्या आठवणीत घेवून गेली.
पण आताची नजरभेट हक्काच्या प्रेमाची आणि विश्वासाची ग्वाही देत होती.

"चला दुसऱ्यांदा कांदा पोहे कार्यक्रम पार पडला असे म्हणायला हरकत नाही." मधेच काका बोलले.
तसे सर्वांच्याच ओठी हसू उमटले. वातावरण थोडे हलके फुलके झाले त्यामुळे.

देवाला नमस्कार करुन तसेच काका काकूंचा आशीर्वाद घेवून शरयू श्रीसोबत घराबाहेर पडली.

श्री बाईक वरून आला होता. क्षणभर शरयूला अवघडल्यासारखे झाले. पण आता किती दिवस स्वतःला असं मर्यादेच्या बंधनात अडकून ठेवणार होती ती.
आपण थोडीच ना काही चुकीचे वागत आहोत ह्या विचाराने आपसूकच मग लाजेची लाली तिच्या त्या गोऱ्यापान चेहऱ्याला स्पर्शून गेली.

नि:संकोचपणे मग शरयू देखील बाईकवर श्रीच्या मागे बसली. प्रेमाचा तो सुखद स्पर्श आज पहिल्यांदा दोघेही अनुभवत होते. मनातील भावना मात्र मुक होवून त्या प्रेमळ स्पर्शाची प्रत्यक्ष अनुभूती घेत होते.

न बोलताही आज खूप काही बोलत होते दोघेही. शरयू मात्र पाठमोऱ्या श्रीला एकटक फक्त न्याहाळत होती.
तिच्या मनातील भावनांची मात्र एकच गर्दी झाली होती.

त्याची ती पाठमोरी आकृतीही तिला मर्यादेची सारी बंधने तोडण्यासाठी उद्युक्त करू पाहत होती.
बंधनांचे सारे पाश तोडून घट्ट बिलगावे श्रीला नि त्याच्या पाठीवर अलगद डोके ठेवून सामावून घ्यावे त्याला आपल्या बाहुपाशात असे खूपदा मनात आले शरयूच्या.

श्री देखील तिच्या त्या नकळतपणे होणाऱ्या स्पर्शानेदेखील शहारत होता. शब्दही जणू आज कुठेतरी दडी मारुन बसले होते. प्रेमाची ती मुक भाषा स्पर्शातून व्यक्त होत होती.

एका वळणावर आलेल्या गतीरोधकमुळे दोघांमधील ते मर्यादेचे अंतर आणखीच कमी झाले. आपसूकच मग शरयूच्या हाताने श्रीच्या खांद्याचा आधार घेतला.

"हळू ना श्री.. म्हणत लागलीच तिने त्याच्या खांद्यावरील तिचा हात काढूनही घेतला."

"राहू दे ग. आता तो फक्त तुझाच अधिकार आहे", म्हणत श्रीने पुन्हा एकदा तिच्या काळजाचा ठोका चुकवला.

तिच्याही ओठावर मग लाजेची हास्यकळी खुलली.

अर्ध्या तासाचा तो प्रवास पण कधी संपला ते दोघांनाही समजले नाही.

"अशावेळी खरंच वेळ कित्ती भरभर संपतो नाही,"
श्री बोलला तशी शरयुने नजर झुकवली.

"बरं बाय द वे, तुला पेपर साठी खूप खूप शुभेच्छा. छान सोडव पेपर. काही काळासाठी विसरून जा की, तुझ्या आयुष्यात श्री नावाची कुणीतरी व्यक्ती आहे."

"फोकस फक्त पेपरवर असू दे. ह्या वेड्या श्रीला विसर थोड्या वेळासाठी."..

श्रीसाठी आणलेल्या नारळाच्या वड्यांचा डबा त्याच्या हातात देत नजरेतूनच तिने मग होकार दर्शवला. आणि तिची पावले परीक्षा केंद्राच्या दिशेने वळली.

तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे स्तब्ध होवून श्री ती नजरेआड होईपर्यंत तिला बघतच राहिला.

हातातील डब्यातून एक वडी काढून श्रीने तोंडात टाकली आणि शरयू सोबतचा तो अर्ध्या तासातील प्रवास आठवत 55

इकडे माधवरावांनी शरयू आणि श्रीच्या लग्नाची पुढची बोलणी करण्यासाठी नाना आणि सुनिता ताईंना फोन करुन लागलीच बोलावून घेतले.
आप्पांनाही सर्व गोष्टींची कल्पना दिली.

काहीही झाले तरी येत्या दोन दिवसांत लग्नाची तारीख फायनल झालीच पाहिजे ह्या विचाराने नाना क्षणाचाही विलंब न लावता मुंबईला यायला निघाले.

दुपारी पेपर सुटल्यावर माधव काकांच्या सांगण्यावरून श्री पुन्हा शरयूला पिक करण्यासाठी वेळेआधीच हजर झाला.

का कोण जाणे पण, काकांनी श्री आणि शरयूची आजची ही भेट मुद्दाम ठरवून घडवून आणली असावी, असे श्री ला मनोमन वाटत होते.
खरंच माधव सरांमुळेच आज माझे आयुष्य ह्या वळणावर येवून पोहोचले आहे. त्यांच्याचमुळे शरयू आता माझ्या आयुष्याचा एक भाग बनणार आहे.
एव्हाना ती माझ्या आयुष्याचा भाग बनलीही आहे. नुसत्या विचारानेही श्रीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

तितक्यात, पेपर सुटला नि त्या गर्दीत श्रीची नजर शरयूला शोधू लागली. दूरवरूनच तिला येताना त्याने पाहिले नि पुन्हा एकदा त्या स्पर्शाची जाणीव त्याच्या मनाला आनंद देवून गेली.

समोर श्रीला पाहताच शरयूची कळी खुलली. कारण काका येणार होते पण श्रीला असं अचानक समोर पाहून पुन्हा एकदा तिच्या काळजाचा ठोका मात्र चुकला होता.

का कोण जाणे पण तो सहवास, ती ओढ मनाला वेगळ्याच विश्वात घेवून जात होती दोघांनाही

"अरे काका येणार होते ना? मग तू कसा आलास?"

"का.. येवू शकत नाही का मी?"

"असं म्हटलं का मी?"

"बरं चल, निघुयात? उशीर होईल पुन्हा. मलाही खूप काम आहे."

तिनेही मग होकारार्थी मान डोलावली.

हक्काने मग श्रीच्या खांद्यावर हात ठेवत अलगद ती बाईक वर बसली.

तसा श्री थोडा बावरलाच.

"अरे इतकंच महत्त्वाचं काम होतं तर मग कशाला उगीच धावपळ करत आलास? मी आले असते बसने."

"पण तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं नव्हतं ना ते. आणि माधव सरांचा शब्द माझ्यासाठी अंतिम असतो. मला घडविण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे."
"त्यांना नाही म्हणण्यासाठी मन तयारच होत नाही कधी."
पण त्यांना मात्र माझे मन कसे काय समजते देवच जाणे.

आता कुठे अबोल प्रीतीला शब्दांचा साज चढायला सुरुवात झाली होती. एका अनोख्या नात्याची वीण अधिकच घट्ट होवू पाहत होती.
सकाळी सोबत असूनही शब्द हरवले होते पण आता मात्र त्याच शब्दांची ओठांवर जणू गर्दी झाली होती. हक्काने मनातील भावना ओठांवर येतं होत्या.

शरयूनेदेखील तितक्याच हक्काने मग श्रीच्या खांद्याचा आधार घेत नात्याला नवा अर्थ प्राप्त करुन दिला होता.

बोलता बोलता घर कधी आले ते दोघांनाही समजलेच नाही.

कसं असतं नाही प्रेमाचं हे नातं, कधी कधी भावनांना फक्त स्पर्श पुरेसा असतो, शब्दांची काही गरजच नसते. तर कधी त्या व्यक्त करताना शब्दही अपुरे पडतात. तसंच काहीसं झालं होतं आज श्री आणि शरयू सोबत.

आजचा दिवस म्हणजे दोघांच्याही आयुष्याला कलाटणी देणारा दिवस ठरला. इतक्या दिवसाची भेटीची ओढ आज पूर्ण झाली होती. एकमेकांना जवळून जाणून घेण्याची इच्छा आज माधव काकांमुळे पूर्णत्वास गेली होती.

आता लवकरच सागर आणि किनारा कायमस्वरुपी एकरूप होणार का? की कथा काही वेगळेच वळण घेणार? जाणून घ्या पुढील भागात.