Login

सागराला ओढ किनाऱ्याची!!(भाग ९)

बायकोच्या करिअरसाठी दुरावा सहन करण्याची मनाची तयारी ठेवून श्रीने शरयूची समजूत घातली नि स्वतःच्या करिअरवर फोकस करण्यासाठी कशा पद्धतीने तिला साथ दिली याचे उत्तम वर्णन या भागात केले आहे.


शरयू आणि श्रीचा मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. सगळं काही अगदी त्यांच्या मनासारखं सुरु होतं. दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता.

त्यातच आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे शरयूची इतक्या दिवसांची मेहनत फळाला आली होती. तिची स्टेट बँकेच्या मॅनेजर पदी नियुक्ती झाली होती.
पण ही जरी आनंदाची गोष्ट असली तरी पुन्हा एकदा ती त्यांच्या विरहाला कारणीभूत ठरणार होती. त्यामुळे एकत्र येण्याच्या आधीच पुन्हा एकदा एकमेकांपासून दूर होण्याची भीती दोघांनाही सतावत होती.

त्यातच आज दोघांच्याही आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण. आज खऱ्या अर्थाने सागर आणि किनारा एक झाले होते. पण पुन्हा एकदा विरहाच्या भीतीने दोघेही व्याकूळ झाले.

घरातील सर्वांनाच शरयूचा खूप अभिमान वाटत होता. सर्वांनी तिचे खूप कौतुक केले.

मालती ताईंनाही सुनेचे इतके कौतुक वाटले की काही विचारूच नका. शरयू बद्दलचा त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.

"अगं माझ्या सुनेची स्टेट बँकेच्या मॅनेजर पदी नियुक्ती झाली."
हे एव्हाना दोन चार मैत्रिणींना फोन करून सांगितले देखील त्यांनी.
"इतकी मोठी पोस्ट मिळवली सुनेने माझ्या" हे सांगतानाचा त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

सुरुवातच खूप छान झाली शरयूची तिच्या सासरी.

"ही पोरगी खरंच आनंद घेवूनच आली आहे."
"कोणाचीही दृष्ट नको लागायला आमच्या या आनंदाला."
मालती ताईंनी मनोमन देवाला प्रार्थना केली.

शरयूने सर्वांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. आप्पांनी मग श्रीला पेढे आणि केक घेवून यायला सांगितले.
शरयूच्या यशाचे छोटेसे घरगुती सेलिब्रेशन करण्यात आले.

जेवणं आटोपली. शरयूने बनवलेल्या खिरीचे अजूनही कौतुक सुरुच होते. सर्वांच्या प्रेमाने शरयूदेखील अगदी भारावून गेली होती. एकंदरीतच घरात आनंदाचे वातावरण होते.

सगळंकाही आवरुन सर्वांची झोपायची तयारी झाली. नव्या नात्यांना समजून घेण्यासाठी शरयूदेखील आतुर होती. म्हणूनच थोडावेळ नणंदांसोबत गप्पा मारत बसली ती हॉलमध्ये.

तेवढ्यात श्रीने शरयूला केलेला नजरेचा इशारा मोठ्या ताईने पाहिला.

आता पुन्हा एकदा तो तिच्या तावडीत सापडला होता. मग काय, पुन्हा एकदा तिने त्याची खेचायला सुरुवात केली.

"काय रे श्री?? जा की जावून झोप. इथे काय घुटमळतोयेस?? तूझ्या बायकोला काही ठेवून नाही घेणार आम्ही इथे. येईल ती थोड्या वेळात. तू झोप जा पळ."
"झालं अजून दोन दिवस, मग आम्ही गेल्यावर कोणी नाही त्रास देणार तुम्हाला."

"तुम्ही गेल्यावर ती देखील जाणारच आहे ना ट्रेनिंगसाठी."
श्री थोडा नाराजीच्या स्वरातच बोलला आणि त्याच्या रुम मध्ये निघून गेला."

ताई क्षणभर विसरलीच होती एक होण्याच्या आधीच ह्या दोघांना वेगळे व्हावे लागणार होते. नव्या प्रेमाची ती नवी नवलाई मनाप्रमाणे जगता येणार नव्हती दोघांनाही.

"शरयू जा, समजाव त्याला. खूप हळवा आहे ग तो." ताई म्हणाली.

"आम्ही लग्न करुन सासरी गेलो तेव्हाही खूप रडला होता तो. जवळची माणसे दूर जाणार या कल्पनेनेच तो हळवा होतो.

"इथे तर आता त्याच्या किनाऱ्याचाच प्रश्न आहे."

"तुमच्या दोघांच्याही भावना मी अगदीच समजू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुढे काय होणार हा विचार करत बसण्यापेक्षा जेव्हढा वेळ एकमेकांसोबत मिळेल तेव्हढा भरभरून जगून घ्या.
कोणत्याही नात्यात एकमेकांना समजून घेण्याची खूप गरज असते हे कधीही विसरु नकोस."

शरयूला देखील ताईंचे म्हणणे पटले. नात्यात खरंच एकमेकांना समजून घेण्याची खूप गरज असते.

तीही मग लगेचच गेली. श्री शून्यात नजर लावून बसला होता. खूप उदास वाटत होता तो.
शरयूने जावून हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

श्रीने नजर वर करुन तिच्याकडे पाहिले. आणि हलकेच स्मित केले.

"पुन्हा एकदा तुझे खूप खूप अभिनंदन." श्री म्हणाला.

"श्री मला थोडे बोलायचे आहे तुझ्यासोबत." बोलू का??

"बोल ना, परवानगी कसली मागतियेस.

"अरे, मी ठरवलंय मी नाही जाणार आहे ट्रेनिंग साठी."

"वेडी आहेस का तु शरयू?"
"यासाठीच हा सर्व अट्टाहास केला होतास का?"

"तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे ही नोकरी. माहित नाही का मला??"

"माझ्यासाठी नोकरीइतकाच तूही इंपॉर्टन्ट आहेस श्री."
"आणि तसंही ही नाहीतर पुढची परीक्षा मी सुटेलच. अशी खात्री वाटते."

"ओव्हर कॉन्फिडन्स बरा नव्हे राणी."
"पुढची बात पुढे. काहीही होवू दे तेव्हा, पण ही संधी तू सोडणार नाहीयेस."
"क्षणिक सुखासाठी हा इतका मोठा त्याग अजिबात योग्य नाही."

"आणि तसंही हा सागर आणि किनारा आयुष्यभर सोबतच असणार आहे. त्यांना कधीही आणि कुणीही वेगळे करूच शकत नाही."

"अरे, पण हा दोन वर्षाचा प्रोबेशन पिरेड( स्टेट बँकेच्या एका शाखेत प्रोबेशन ऑफिसर म्हणून काम पाहणे,थोडक्यात हा ट्रेनिंगचाच एक भाग असतो.)
त्यानंतर पुढे एकवीस दिवसांचे फायनल ट्रेनिंग.

"ट्रेनिंगचे ठीक आहे ते होईल कसेही पूर्ण. पण दोन वर्ष हा सारा अट्टाहास करुन त्यानंतर मात्र नोकरी जर दुसऱ्या शहरात किंवा इतर ठिकाणी कुठेही, घरापासून लांब मिळाली तर??"
"मग तो विरह नाही मी सहन करु शकणार."

"एकंदरीतच काय ट्रेनिंग, त्यानंतर नोकरी यातच आपल्या आयुष्यातील सगळा अमूल्य वेळ निघून जाणार. असंच दिसतंय. मग आपलं आयुष्य आपण जगायचं तरी कधी श्री??"

"आजच्या ह्या दिवसाची आपण दोघेही कित्ती आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज तो क्षण आलाही. पण त्यातही हे असे. दूर जाण्याचा विचार मनाला पटतच नाही रे. म्हणून वाटतं ही नाही तर पुढे अजून दोन संधी आहेतच ना."

"सुरुवातीचे हे सोनेरी दिवस तरी मनाप्रमाणे जगावेसे वाटतात रे श्री."

"हे बघ पुन्हा तेच नको बोलुस आता. तू तो विचार मनातून काढून टाक बरं आधी. पुढची संधी मिळेल तेव्हा मिळेल. पण हातात आलेली ही संधी तू नाही सोडायची."

"बँक मॅनेजर होणं इतकी सोपी गोष्ट नाहीये ग. लोकांना प्रयत्न करूनही मिळत नाही आणि तू हातात आलेली इतकी मोठी पोस्ट सोडायचा विचार तरी कसा करु शकतेस..?"

"आणि राहिला प्रश्न आपल्यातील सोनेरी क्षणांचा तर ते आपण त्यानंतर आयुष्यभर उपभोगणारच आहोत. हा आता नव्याची नवलाई काही वेगळीच असते सगळं मान्य आहे पण काहीतरी मिळवायचे असेल तर कशाचा तरी त्याग तर करावाच लागणार ना."

शरयूला देखील श्रीचे म्हणणे पटले होते.

" मॅडम तुम्हाला असं वाटत नाही का आपण विनाकारण हा वेळ वाया घालवतोय चर्चेत?"

"आणि तू असं अजिबात वाटून घेवू नकोस की तुझ्या सिलेवशन मुळे मी नाराज झालोय. उलट मला माझ्या बायकोचा खूप अभिमान आणि कौतुक आहे."

"फक्त भावना असतात ग. इतक्यातच आपण एक व्हावं आणि आजच पुन्हा एकदा दूर होण्यासाठी मनाची तयारी करावी लागणार."
"नुसत्या विचारानेच मन हळवे झाले ग."

"खूप विचार केला मी, पण आता आपल्याला मनाची तयारी तर करावीच लागणार आहे. आणि होईल ती हळूहळू. तू काळजी करु नकोस."

"तुझ्या प्रत्येक सुख दुःखात, आनंदात मी कायम तुझ्या पाठीशी असेल. हा सागर कधीच किनाऱ्याची साथ सोडणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. त्यासाठी असा विरह सहन करण्याची माझी पूर्ण तयारी आहे."

श्रीचे हे शब्द ऐकून शरयूच्या डोळ्यात नकळतपणे पाणी तरळले.

"ये वेडाबाई, तुला काय झालं आता रडायला."श्री म्हणाला.

श्रीने मग अलगद तिचे डोळे पुसले नि हलकेच तिला आपल्या बाहुपाशात ओढले.
आपले ओठ हलकेच मग त्याने तिच्या कपाळावर टेकवले. त्याचा श्वास तिच्या कपाळावर पडताच प्रेमाची ती मिठी आणखीच घट्ट झाली. मनातील इतक्या दिवसांपासून अडवलेल्या भावनांना हळुवारपणे वाट मोकळी झाली.

दोन्ही मने एकमेकांच्या बाहुपाशात शांतपणे विसावली.
आज इतक्या दिवसांची एकमेकांची ती ओढ हक्काच्या आणि अमर्याद अशा प्रेममिठीत भिजली होती.

एकमेकांच्या हृदयाची धडधड त्यांच्या मनाचा ठाव घेत होती. आता कुठलीही मर्यादा नाही की कुठली बंधने नाहीत. आणि ती तोडण्याची भीती किंवा मनात कुठलेही गिल्ट नाही.

फक्त आणि फक्त सागराच्या पाण्याचा किनाऱ्याला वारंवार होणारा तो प्रेमळ स्पर्श नि त्या स्पर्शाने किनाऱ्याचे भिजलेले ते मनमोहक रूप वारंवार किनाऱ्याला बिलगण्यासाठी त्याला भुरळ घालत होते.

आता ना जगाची लुडबुड ना लोकांच्या खिळलेल्या नजरांचा प्रश्न. आता फक्त तो समुद्र आणि त्याचा जन्मभराचा सोबती असलेला किनारा. दोघेच होते त्या प्रेमाच्या गावी.

प्रेमाच्या प्रत्येक लाटेबरोबर सागराच्या प्रेमात न्हावून निघालेला किनारा आज स्वतःहुन सागराच्या स्वाधीन झाला होता. कुठलीही आडकाठी नाही की कुठली सबब नाही.
"नाही" या शब्दाला दोघांच्याही लेखी आजतरी किंमत नव्हती.

स्वत:च्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आज दोघांनाही होते. एक एक करत प्रेमाच्या लाटा किनाऱ्याला आपल्या मिठीच्या त्या उबदार स्पर्शाने भिजवत होत्या. किनाराही सागराच्या प्रेमात मनसोक्त डुंबत होता.

मर्यादांची बंधने तर केव्हाच गळून पडली होती. दोन्ही श्वास एक झाले होते. मनाबरोबरच तनेही आज प्रेमाच्या त्या अखंड प्रवाहात वाहत गेली आणि दोन तनू जणू एक जीव झाले.
प्रणय सुखाने ओढीची आस आज खऱ्या अर्थाने तृप्त झाली होती. मिलनाचा तो सुखद काळ दोघेही मनसोक्त जगत होते.

एकमेकांची आतापर्यंतची साथ, सोबत, आधीची ओळख आज खऱ्या अर्थाने दोघांनाही एक होण्यासाठी खूप कामी आली होती.

का कोण जाणे पण दोन्हीही मने आज पहिल्या मिलनाने, प्रेमाच्या त्या पहिल्या स्पर्शाने तृप्त झाली होती. समाधान पावली होती.
यालाच तर खरे प्रेम म्हणावे.
एकमेकांच्या मनाची परिभाषा न बोलताही समजायला हवी.

समोरच्याला काय हवे नि किती द्यावे याचाही अचूक अंदाज आला की मग प्रेम आपोआपच फुलत जाते, बहरत जाते. शांतपणे, संयमाने प्रेमावर कसा विजय मिळवता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा सागर नि किनारा होते.

दोन मने, दोन तने कधी एक झाली ते दोघांनाही समजले नाही. मिलनानंतरचा तो सुखद काळ शब्दरूप होवून खूप वेळ तसाच एकमेकांच्या मिठीत शांतपणे विसावला होता.

खूप साऱ्या गप्पांना मग उधाण आले. आजची ही तृप्तता पुढील विरहासाठी बळ देवून गेली.
एकमेकांच्या मिठीतच मग सागर आणि किनारा दोघेही निद्रेच्या कधी अधीन झाले ते दोघांनाही समजले नाही.
खरंच प्रेमाची ती नवी नवलाई दोघांच्याही नात्याला पुन्हा एकदा ओढ लावून गेली होती.

सकाळी जाग आली तेव्हा, प्रेमाची ती मिठी सोडवताना दोघांच्याही अगदी जिवावर आले होते. पण ती पहिली रात्र दोघांनाही अगदी समाधान देवून गेली होती. समाधानाचे ते गोड गुपित दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते.

पण तरीही श्रीच्या मिठीतून स्वतःची सुटका करुन घेत, त्याच्या लाडीगोडीला थोडे समजावत, नजरेतूनच खूप काही बोलत होते दोघेही.
सोबतीतील प्रत्येक क्षण दोघेही हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवत होते.

शरयू मग तिचे आवरून किचनमध्ये आली.
तिला पाहून मालती ताई इतक्या काही खुश झाल्या नाहीत.

पण तरीही जास्त काही न बोलता किचन मधील वस्तूंची जागा, डब्यांची जागा सारं काही त्यांनी शरयूला समजावून सांगितले.

बाहेर गॅलरीत श्री एकटा आहे हे पाहून त्या श्रीला म्हणाल्या,
"श्री रागावणार नसशील तर एक सुचवू का रे..??"

"हो आई बोल ना, अशी परवानगी काय मागतेस?"

"अरे शरयूसाठी थोडे नवीन ड्रेस खरेदी करशील?"
"आजही तिने जुनाच ड्रेस घातला आहे. पण मला नाही आवडला तो ड्रेस. इतकाही काही वाईट नाही पण मला तरी नाही आवडला."

"थोडे नवीन फॅशनचे ड्रेस घे तिच्यासाठी. आणि तसंही आता इतक्या मोठ्या पोस्टवर ती काम करणार म्हटल्यावर कपडेही तसेच हवेत ना?"

"अगं आई, तेव्हा घालेल की ती तसे ड्रेस. पण आता घरात काय होतंय? किचनमध्ये कामच तर करायचे आहे ना?

"हे बघ श्री घरात असो वा बाहेर पण कोणीही येतं जातं रे. म्हणून म्हटलं."

"मग एक काम कर आई, तूच जा ना तिला घेवून बाहेर. ताईलाही ने सोबत. तुम्हाला हवे तसे ड्रेस घ्या तिच्यासाठी."
"म्हणजे मला काय कळतं नाही ग त्यातलं."

"हो का? मग काय रे, तिच्यासाठी साड्या तर तूच चॉईस केल्या होत्यास ना. तुझी चॉईस तर एकदम भारी आहे. आणि असं का बोलतोस आता?"

"अगं आई, ड्रेस मधले माझ्यापेक्षा जास्त तुला कळते की नाही. मग जा की ग तू."

"अरे पण तिला आवडेल का ते?"

"का नाही आवडणार? उलट खूप आनंद होईल तिला."

मालती ताईंना देखील हे ऐकून बरे वाटले.
त्यांनी मग शरयूला या गोष्टीची कल्पना दिली. दुपारी मग गेल्या सगळ्याजणी खरेदीला.

मालती ताईंनी मग मुलींच्या मदतीने शरयूसाठी काही ड्रेस, ऑफीशियल साड्या एवढेच नाही तर जीन्स टॉप देखील खरेदी केले.

शरयूला तसा खूपच आनंद झाला. पण एका गोष्टीचे वाईटही वाटले.
"मी उगीचच आईंबद्दल उलट विचार करत होते. त्या तर खूपच वेगळ्या निघाल्या."
"खरंच एखाद्याला जवळून अनुभवल्या शिवाय त्याच्या स्वभावाचा कधीही अंदाज बांधू नये हे अगदी खरे."
शरयूला ही गोष्ट आता कळून चुकली होती.

आज श्रीमुळेच सासू सुनेच्या नात्याला प्रेमाचे वळण मिळाले होते.

आप्पांनी आणि मालती ताईंनी दोघांनाही दोन तीन दिवसांसाठी मग कुठेतरी फिरून यायला सांगितले.
अगदी श्रीच्या मनातील गोष्ट ओळखली होती जणू आप्पा आणि मालती ताईंनी.

श्रीने मग गोव्याला जाणे पसंत केले. आणि दुसऱ्याच दिवशी मग दोघेही पोहोचलेदेखील गोव्याला.
गोव्याच्या त्या समुद्र किनारी मग हा सागर आणि किनारा मनसोक्त एकमेकांच्या प्रेमात अगदी न्हावून निघाले. सर्वात सोनेरी क्षण होते ते दोघांच्याही आयुष्यातील.

एकमेकांच्या सहवासात पुढचे दोन दिवस कसे सरले
ते समजलेच नाही. प्रेमाचा प्रत्येक क्षण हृदयाच्या कप्प्यात मग दोघांनीही साठवला.
खूप साऱ्या आठवणी सोबत घेवून मग या सागर आणि किनाऱ्याने पुन्हा मुंबईचा रस्ता धरला.

सर्वांच्या प्रेमळ वागणुकीमुळे शरयू लवकरच घरात रुळली.

पुढच्या आठवड्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकलची प्रोसेस व्यवस्थित पार पडली.
प्रत्येक ठिकाणी श्री शरयूच्या सोबतच होता. तिचा भक्कम आधार बनुन.

पुढे काही दिवसांतच शरयूला मुंबईच्याच एका स्टेट बँकेच्या शाखेत प्रोबेशन ऑफिसर म्हणून दोन वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागणार होता. हा सिलेक्शन नंतरचा ट्रेनिंगचाच एक भाग असतो.
त्यावरच तिचे फायनल सिलेक्शन अवलंबून असणार होते. कारण हा कालावधी खूप महत्त्वाचा असतो. कामातील बारकावे अचूक पाहिले जातात.

एखादी छोटीशी चूक देखील तुम्हाला धेय्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा ठरू शकते.
त्यामुळे कामावर तितकाच फोकस असणे गरजेचे असते.

त्यानंतर मग पुढे बडोदा येथे एकवीस दिवसाचे फायनल ट्रेनिंग आणि शेवटी असिस्टंट मॅनेजर म्हणून महाराष्ट्रात कोणत्याही एका स्टेट बँकेच्या शाखेत नियुक्ती ही अशी काहीशी आव्हाने शरयूला तिच्या धेय्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून पार करावी लागणार होती.

परंतु हे सर्व करत असताना तिला श्रीपासून दूर राहावे लागणार यात शंकाच नव्हती.

पुढचे दोन वर्ष एकाच शहरात राहून देखील दोघांनाही एकमेकांपासून दूर राहावे लागले. महिन्यातून एक दोनदा भेट व्हायची दोघांचीही.
कारण शरयूला देखील पूर्णपणे कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचेच होते. त्यामुळे भेटीगाठी व्हायच्या पण तशा कमीच

दरम्यानच्या काळात श्री देखील त्याच्या कामात व्यस्त होवून गेला. कारण स्वतःला कामात गुंतवून ठेवण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. बिझनेस मध्ये त्याचीही घोडदौड सुरूच होती.

वेळ मिळेल तसे दोघेही फोनवर बोलत असत.
कधीकधी शरयूला वाटायचे, द्यावे हे सगळे सोडून निघून जावं श्रीकडे.

दिवसभराचा कामाचा ताण विसरण्यासाठी शिरावं अलगद श्री च्या कुशीत. पण दुसऱ्याच क्षणी तिची मेहनत आता कुठे फळाला आली होती आणि ह्या स्टेजला येवून असं माघार घेणं म्हणजे मूर्खपणाचे लक्षणच म्हणावे लागेल. असेही विचार मनात लगेचच यायचे.

कधी कधी तर भावनांना आवर घालणे कठीण होवून बसायचे दोघांनाही. अशावेळी एकमेकांचा मानसिक आधार बनून काही काळ तरी सोबत घालवायचे दोघेही. तो काळ म्हणजे त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा काळ असायचा. महिन्यातून एखादा दिवस, एखादी रात्र मनाप्रमाणे जगायचे मग दोघेही. आणि पुढील काही दिवसांसाठी पुन्हा एकदा सज्ज व्हायचे कामासाठी.

हे असे पुढचे दोन वर्ष सुरू राहिले. पण त्याकाळात एकमेकांबद्दलची ती ओढ आधीप्रमाणेच कायम होती अजूनही.

दुराव्यातूनच दिवसागणिक प्रेम बहरत होते. दोघेही दूर राहून एकमेकांना सपोर्ट करत होते. मानसिक आधार देत होते.
न बोलताही एका मनाच्या भावना दुसऱ्या मनाला समजत होत्या.

एक एक दिवस सरत होता. बघता बघता दोन वर्षांचा कालावधी संपला आणि आता फायनल ट्रेनिंग तेवढे बाकी होते. त्यासाठी शरयूला इंदोरला जावे लागणार होते.

श्री आणि शरयूच्या लग्नाला दोन वर्षे होत आली. पण अजूनही दोघांना एकमेकांचा मनासारखा सहवास लाभला नव्हता. अजूनही सागराला किनाऱ्याची लागलेली ओढ आधीसारखीच कायम होती.

दोन दिवसांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यावर मध्ये एक आठवड्याची सुट्टी होती. त्यानंतर मग पुढचे ट्रेनिंग सुरू होणार होते.

दरम्यानच्या काळातील ते आठ दिवस पुन्हा एकदा दोघांनीही अविस्मरणीय केले. सोबतीतील ते सोनेरी क्षण पुन्हा एकदा दोघांनीही मग भरभरून जगून घेतले.

एकमेकांची हीच सोबत, प्रेमाच्या गप्पा, प्रेमाची मिठी, प्रेमाचे ते गोड गुलाबी क्षण सारे काही पुन्हा पुढील काही दिवसांसाठी दोघांनाही एनर्जी देवून गेले.

एक एक टप्पा पार करत शरयू तिच्या ध्येयापासून अगदी काहीच अंतरावर आता उभी होती.
पण फायनल ट्रेनिंगनंतर तिचे फायनल पोस्टिंग कुठे होणार? यावर सागर नि किनार्याचे भविष्य अवलंबून होते.

मिळेल का शरयूला तिच्या मनासारखी पोस्टिंग?? मिटेल का आतातरी सागर आणि किनाऱ्यातील हा दुरावा आयुष्यभरासाठी??
सारे काही जाणून घ्या पुढील आणि अंतिम भागात.