"अथर्व, उठ रे बाबा ! त्या पौड रोडचा ट्रॅफिक माहितीये ना तुला ? एकदा का नऊचे सव्वा नऊ झाले की चांदणी चौकातच तुझ्या आयुष्याची बफरिंग सुरू होईल." सियाने आरशासमोर उभं राहून घाईघाईत आपली ओढणी सावरत ओरडून सांगितलं.
"अगं सिया, आज माझी वर्क फ्रॉम होमची रिक्वेस्ट रिजेक्ट झालीये ग ! त्या हिंजवडीच्या फेज-३ मध्ये जाईपर्यंत माझं निम्म क्रिएटीव्ह डोकं तर फक्त सिग्नलवरच खर्च होतं. तू बरंय, तुझं हॉस्पिटल पुणे स्टेशनला आहे, उलट दिशेला ट्रॅफिक कमी लागतं तुला." अथर्व बेडवर लोळतच म्हणाला.
दोघांचीही सकाळ अशीच पुण्याच्या घड्याळावर धावत असायची. सिया कोथरूडच्या आपल्या फ्लॅटमधून पुणे स्टेशनच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये डाएटिशियन म्हणून जायची, तर अथर्व आपल्या कारने हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये जाहिरात कंपनीचं क्रिएटिव्ह साम्राज्य सांभाळायला जायचा. दिवसभर दोघेही आपापल्या कॉल्स, रिपोर्ट्स आणि डेडलाईन्समध्ये पिळून निघायचे.
रात्रीचे साडे आठ वाजले होते. कोथरूडच्या स्काय-हाई सोसायटीच्या पार्किंगमध्ये अथर्वची कार लागली. बरोबर त्याच वेळी सिया सुद्धा रिक्षातून उतरली. दोघेही लिफ्टमध्ये भेटले. दोघांच्याही चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता.
घराची बेल वाजली. माईंनी हसत दार उघडलं. आत पाऊल टाकताच अथर्वने आपली लॅपटॉप बॅग सोफ्यावर अक्षरशः भिरकावली आणि स्वतः सोफ्यात विसावला.
घराची बेल वाजली. माईंनी हसत दार उघडलं. आत पाऊल टाकताच अथर्वने आपली लॅपटॉप बॅग सोफ्यावर अक्षरशः भिरकावली आणि स्वतः सोफ्यात विसावला.
" आह्ह ! माई, आज काय भयंकर ट्रॅफिक होतं ग ! चांदणी चौकापासून ते थेट पाषाणपर्यंत नुसत्या गाड्याच गाड्या. डोकं अगदी सुन्न झालंय. जरा कडक आल्याचा चहा मिळेल का ग ? आणि सोबत ते चितळ्यांचे बाकरवडी आहेत का ? भुक लागली आहे. काहितरी तोंडात टाकायला दे." अथर्वने डोळे मिटून विचारलं.
माई प्रेमाने किचनकडे वळल्या,
" हो रे सोन्या, तू बस... मी आणते. सिया, अगं तू पण आलीस ना ? जरा चहाचं बघतेस का गं ? मला आज गुढघे खूप दुखतायत, गॅसपाशी उभं राहवत नाहीये."
सियाने आपली बॅग कोपऱ्यात ठेवली. तिला प्रचंड भूक लागली होती. दिवसभर हॉस्पिटल मध्ये वर खाली करून पायही दुखत होते. पण तिला माहिती होतं की जर ती किचनमध्ये गेली नाही, तर रात्रीच्या जेवणाचे बारा वाजतील. ती निमूटपणे किचनमध्ये शिरली. स्वयंपाक करायची जबाबदारी तिचीच आहे ना !
रात्रीचे साडे आठ वाजुन गेले होते. सिया एका बाजूला कुकर लावत होती आणि दुसऱ्या बाजूला उद्याच्या डब्यासाठी भेंडी चिरत होती. तिचा वेग एखाद्या पॅसेंजर ट्रेनसारखा नसून डेक्कन क्वीनसारखा होता. अथर्व हॉलमध्ये बसून मोबाईलवर रिल्स बघत मोठमोठ्याने हसत होता.
" अथर्व ! "
सियाने किचनमधूनच मोठ्या आवाजात हाक मारली.
" काय गं ? बोल ना, मोबाईल बघतोय एक भारी रील आहे बघ." अथर्वने नजर न हटवता उत्तर दिलं. पुन्हा हसू लागला. रील जास्त मेजेदार होत.
" जरा इकडे येतोस का ? मला खूप उशीर होतोय. उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये लवकर राऊंड्स आहेत. जरा ही भेंडी चिरून देतोस का ? म्हणजे माझं काम लवकर आटोपेल."
अथर्व उठणारच होता, तितक्यात माई मध्येच आल्या आणि त्यांनी सियाच्या हातातून सुरी घेतली.
" अगं सिया, राहू दे गं ! तो दिवसभर त्या तिकडे हिंजवडीला जातो. जाता येताना ट्रॅफिकमध्ये अडकला होता. दमला आहे. तिथं ऑफिसच्या कामात डोका फोडून आलाय. त्याला कुठे सवय आहे या कामाची ? मी करते ना हळूहळू... तू जा, फ्रेश हो जा."
सियाचा संयम आता सहन शक्तीच्या पलिकडे गेला होता. माईंच्या बोलण्याने तर तो संपला. शेवटी राग अनावर होऊन ती रागाने फुटलीच.
तिने शांतपणे सुरी खाली ठेवली. मनातल्या मनात दहा अंक मोजले. मग शांत पणे चालत हॉल मध्ये आली.
तिने शांतपणे सुरी खाली ठेवली. मनातल्या मनात दहा अंक मोजले. मग शांत पणे चालत हॉल मध्ये आली.
"माई, एक विचारू ?
अथर्व हिंजवडीला गेला होता, मान्य आहे. पण मी काय तिथे पुणे स्टेशनच्या गार्डनमध्ये बसून आले आहे का ?
मी पण तेवढ्याच पेशंट्सचे डाएट चार्ट्स बनवलेत, तेवढाच प्रवास केलाय ना ?
मग थकवा फक्त अथर्वलाच कसा येतो ?
मला टायर्ड व्हायचा हक्क नाहीये का ? " तिने माईंकडे वळून विचारलं.
घरात अचानक स्मशानशांतता पसरली. रिलचा आवाज बंद झाला. अथर्व सोफ्यावरून ताडकन उठला.
" आणि बरं का अथर्व." सिया आता त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली,
" जेव्हा तू आई चहा दे म्हणतोस, तेव्हा तुला हे दिसत नाही का की माईंच्या गुडघ्याला सूज आलीये ? तुझा हात काय फक्त लॅपटॉपच्या की-बोर्डवरच चालतो का ? की चहाचं आधण ठेवायला वेगळा सॉफ्टवेअर इंजिनिअर बोलवावा लागतो ? "
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा