युक्ता कपडे बदलून अभिराजच्या आईला मदत करायला म्हणून थेट किचनमध्येच येते.
"अगं युक्ता... अगदी तुझेच कपडे असल्यासारखे एकदम बरोबर झालेत तुला कपडे..."
"हो ना...", युक्ता...
"बरं पण तू इथे काय करतेयस जा बाहेर जाऊन बस... मीही येतेच आवरून...", अभीच्या आई तिला बाहेर जायला सांगतात...
"असं कसं तुम्ही काम करत असताना मी बसून राहीन का?... काही करायचं असेल तर मी करते ना... तसं पण मला बसून राहायला जमत नाही..."
"बरं काय करशील?... कांदा कापशील?..."
अभीच्या आईच्या या वाक्यानंतर ती जरा थांबतेच...
"काय झालं?... अगं बाकी सगळं होतंच आलंय आता फक्त कोशिंबीर..."
"हो हो काकू कापते ना...", असं म्हणून युक्ता कांदा कापायला घेते...तिचे डोळे हळूहळू लाल व्हायला लागलेले अभीची आई तिच्या तिच्या कामात व्यस्त होती... इतक्यातच बाहेरून अभीने आवाज दिला...
"काकू मी बघते..."असं म्हणतच युक्ता हात पुसत बाहेर गेली...
"अगं तू...", अभीने तिच्याकडे बघितलं...
"दे ना मी ठेवते आत काकू कामात आहेत...", असं म्हणत तिने त्याच्या हातातल्या पिशव्या घेतल्या आणि ती किचनमध्ये आली... थोड्यावेळाने जेवण आवरलं... आता त्यांच्यात अभीचे बाबाही सामील झाले होते... तरी अभीची बहीण सहलीला गेल्यामुळे ती त्यांच्यात नव्हती... त्यांची नुसती धमाल सुरु होती... खूप दिवसांनी अभी थोडं का होईना पण हसत होता... त्याची फार जवळची मैत्रीण त्याला आज खूप दिवसांनी भेटली होती... ती त्याच्या आजूबाजूला वावरत होती... त्याच्या मनाला जणू कसलासा आधार मिळाल्यासारखं वाटत होतं...
"मावशी तू कायमची इथेच रहा ना...", छोटी ऋचा युक्ताला बोलते...
"अम्म... त्यापेक्षा तू चल माझ्यासोबत मस्त मज्जा करू कोकणात...", युक्ता ऋचाला बोलते...
"नाही ना येऊ शकत... हा बाबा ना त्याचं काहीच होत नाही माझ्याशिवाय... किती काम असतं...",
"वाह गं शहाणी...", असं म्हणून सगळे हसू लागतात...
"अगं पण तू तर येऊ शकतेस ना?..."
"अगं बाळा मला पण तर आईबाबा आहेतच ना.... मी त्यांना सोडून कसं येऊ?..."
"तू त्यांना पण घेऊन ये ना... नाहीतर माझ्याकडे एक आयडिया आहे..."
"काय बरं?..."
"आमच्या आतुचं लग्न करणार आहोत आम्ही म्हणजे ती पण आमच्या ऋषीं काकांकडे जाणार... तसंच तूपण लग्न करून इथे ये..."
त्या छोटया ऋचाच्या बोलण्याने थोडी शांतताच पसरली होती... युक्ताने हळूच अभिकडे बघितलं... हे त्याला आवडल नाही हे तिला लक्षात आलं...
"अगं पण तुमच्याघरात नवरा मुलगाच नाही मग मी लग्न कोणाशी करू?... कोणाशी करू बरं?...", ती मस्करीच्या सुरात बोलते...
"बाबाशी...", ऋचा...
हलकं फुलकं झालेल वातावरण आता परत थोडं थोडं सिरीयस होऊ लागलं होतं...
"बरं विचार करू हा... पण तुझ्यासाठी मी काहीतरी आणलंय ते खाशील का?... चल देते...", असं म्हणत युक्ता ऋचाला आतल्या खोलीत घेऊन जाते...
"आई मीही आहेच हा बाहेर..."असं म्हणून अभीही बाहेर निघून जातो...
खूप वेळ होतो... सगळे झोपी जातात पण अभी अजून परत आला नव्हता... युक्तालाही झोप लागत नव्हती ती सतत दरवाजाकडे पाहत होती...
"काही नाही इथेच बाहेर कृष्णमंदिरात बसला असेल...", अभीच्या आई तिला बोलतात...
"तुम्ही जाग्या आहात...", युक्ता उठतच बोलते...
"जे तुझ्या मनात सुरूय ना तेच गेले कित्येक वर्ष मी अनुभवतेय..."
"म्हणजे?..."
"अगं असंच बाहेर निघून जातो... एकट्यात बसून असतो तिथे कृष्णमंदिराजवळ... सगळं माहित आहे पण तरीही कधी हिम्मत नाही झाली त्याच्यासोबत जाऊन बसायची..."
"एकटं वाटत असेल त्याला..."
"अगं पण तो एकटेपणा दूर करायचा प्रयत्न तर करावा ना..."
"काही जागा नसतात भरण्यासारख्या..."
"हम्म तेही खरंच... तू झोप...", अभीच्या आई युक्ताला म्हणतात...
"इथून लांब आहे का ते मंदिर?..."
"नाही गं... आपल्या घरापासून पाच मिनिटावर आहे..."
"मी जाऊ?..."
"आता?..."
"हो... म्हणजे साडेअकराच वाजलेत..."
त्यांच्या आवाजाने अभिचे बाबा उठतात...
"मी सोडतो तुला... तू आल्यापासून अभिमध्ये बदल बघतोय आम्ही त्याला काही क्षण जरी चांगले देऊ शकत असशील तर..."
"काका प्रयत्न करेन मी..."
असं म्हणून दोघेही बाहेर पडतात... अभी तिथे आभाळाकडे बघत एकटाच बसला होता...
"अजूनही विश्वास आहे यावर?...", युक्ता त्याच्या बाजूला बसतच बोलते...
"अं... तू इथे...", तो जरा नीट बसत बोलतो...
"हो खूप वेळ झाला आला नाहीस म्हंटल शोधू कुठे गेलास ते..."
"इतक्या रात्री...?"
"मुंबईत राहून तुला साडेअकरा म्हणजे रात्र वाटते आश्चर्य आहे..."
"मला नाही गं घरात आईला वगैरे वाटते..."
"अच्छा... पण तू इथे काय करतोयस?... अजून तारे मोजण सोडलं नाहीयेस का?...", ती थोडं मिश्किलपणेच बोलते...
"नाही माहित का पण वर बघितलं की बरं वाटत... तुला आठवतंय हॉस्टेलला असताना आपण तिघे काय बोलायचो..."
"हो... त्या टेरेसवरून तीन तारे दिसायचे आणि ते आपण होतो... किती वेडे होतो ना आपण...", ती जबरदस्ती हसत म्हणते...
"अंजलीचा विश्वास होता यावर... आणि ते बघ ते तीन तारे त्यातला एक लांब चाललाय या दोन्ही ताऱ्यांपासून आणि हे दोन तारे अजून जवळ येतायत आधी होते त्यापेक्षा..."
"अरे तारे आहेत ते फक्त... किती विचार करतोस...वेडा... आता चल घरी जाऊन झोप..."
"अरे हो तुझी सकाळी ट्रेन आहे ना आणि तू इथे माझ्यासोबत येऊन बसलीय..."
"अरे हो... म्हंटल आपल्या मित्रासोबत वेळ घालवू जरा परत कधी मिळेल न मिळेल..."
"तू परत दूर जाणार आहेस?..."
"नाही रे..."
"म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाहीये पण सांगून जा... अचानक मिळालेले धक्के सहन होत नाहीत..."
"अभी... आता मी नेहमी तुझ्या संपर्कात राहीन... तुला कधीच एकटं पडू देणार नाही..."
"हम्म... निघूया सकाळी लवकर उठायचंय..."
असं म्हणत ते दोघेही तिथून जायला निघतात...
"बरं ते मगाशी तू कांदा का कापलास तुला त्रास होतो तर..."
"तुला अजून लक्षात आहे?..."
"खास मैत्रीण होतीस तू..."
"चेहरा विसरलेलास आले तेव्हा...", ती मिश्किलपणे बोलते.
"विसरलो नव्हतो जस्ट आठवायला वेळ लागला... पण त्रास होत असेल तर करू नयेत गोष्टी..."
"तुलाही वर आकाशात बघितल्यावर त्रास होतो ना?..."
"मला आता कशाचाच त्रास होत नाही... चल निघू..."
ते दोघेही पाचच मिनिटात घरी येतात आणि आपापल्या जागी झोपी जातात...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा