Login

साहवेना अनुराग (भाग 4)

मैत्रीतल्या प्रेमाची कथा
दुसऱ्यादिवशी सकाळी लवकरच घरात लगबग सुरु झाली होती... युक्ता परत आपल्या गावी जायला निघाली होती... एकाच दिवसात तिने घरातल्यांना लळा लावला होता...

"अजून एक दिवस थांबली असतीस...", अभीची आई तिला डब्बा देत म्हणाल्या...

"तुम्ही म्हणालात म्हणून काल थांबले ना मी आता जावं लागेल...", अस म्हणत तिने अभीच्या आईला मिठी मारली...

"परत ये बाळा फार बरं वाटलं तू आलीस तर...", अस म्हणत अभीच्या आईने युक्ताच्या चेहऱ्यावरून हात फिरवला...

युक्ता पुढे अभीच्या बाबांकडे गेली आणि तिने त्यांना नमस्कार केला...

"परत ये गं बाळा नक्की छान वाटलं तुला भेटून... सुखी रहा..."असे म्हणत त्यांनीही तिला आशीर्वाद दिला...

अभीही आपलं आवरून आला होता...

"निघूया तुला उशीर होईल बसायला जागा नाही मिळणार..."असे म्हणत अभी त्याच्या अभी त्याच्या बाईकची चावी घेतो...

"मावशी...", असं म्हणत आणि डोळे चोळतच ऋचा बाहेर येते...

"हे बघ आल आमचं शेंडेफळ..."

"चला ऋचा बाई मी निघते हा...", युक्ता ऋचाला जवळ घेत म्हणते...

"थांब न गं...", ऋचा डोळ्यात पाणी आणत तिला म्हणते...

"ए बाळा असं डोळ्यात पाणी नको आणू... बरं मी तर नाही थांबू शकत पण आता उन्हाळ्याच्या सुट्टीत तू आमच्या गावी ये... मी सांगते तुझ्याश बाबाला चालेल?..."

"तुझ्याकडे?", ऋचा निरागसपणे विचारते....

"हो माझ्याकडे...", असं म्हणून युक्ता परत ऋचाला जवळ घेते...

आणि थोड्याचवेळात सर्वांचा निरोप घेऊन ती गावी जायला निघते... अभी आणि युक्ता दोघेही काहीच वेळात स्टेशनला पोहोचतात... ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली होती... अभीने आधी जाऊन युक्तासाठी जागा पकडली आणि तिला खिडकीपाशी बसवलं आणि स्वतः बाहेर आला... आणि खिडकीपाशी उभा राहिला... ट्रेन सुटायला अजून थोडा वेळ होता...

"अभी तुला जायचं असेल तर जा तू..."

"अगं नाही थांबतो मी... ",असं म्हणून तो खिडकीला धरून उभा राहतो...

काही काळ तो तसाच इकडे तिकडे बघत शांत उभा होता...

"बरं वाटलं इथे येऊन... काका काकू आणि ऋचाला भेटून..."

"त्यांनाही तुला भेटून छानच वाटतंय बघितलंस न कसे अडवत होते तुला..."

"तुला नाही आवडलं?..."

"माझं काय?..."

"तुझं काय म्हणजे?..."

"तू परत तसंच..."

"आता मी नाही जाणार आहे कुठेच लांब..."

"ट्रेन मध्ये बसून हे म्हणतेय... "

"तू थांबवून तर बघ थांबते की नाही..."
दोघेही एकमेकांकडे बघून हसतात... तितक्यातच ट्रेन निघण्याची घोषणा...

"बाय... भेटू पुन्हा...", अभी युक्ताला म्हणतो...

"हो नक्कीच... या उन्हाळ्याच्या सुट्टीत मगाशी म्हंटल तसं ऋचाला घेऊन या सगळे आमच्याकडे...", ऋचा अभीला म्हणते...

तशी ट्रेन सुटते... दोघांच्याही चेहऱ्यावर एक काहीतरी सापडल्याच हास्य होतं पण सोबतच पुन्हाचा हा दुरावा किती काळ याचं मनात प्रश्नचिन्हही...


❇️❇️✳️✳️✳️✳️✳️✳️✴️✴️✴️✴️✴️✴️❇️❇️

आजचा दिवस:-

"युक्ता मला तुझ्याशी बोलायचंय...", अभी...

"प्लीज अभी मला आता काहीच बोलायचं नाहीये मला सकाळी लवकर निघायचंय... "अस म्हणून ती डोळे मिटते...

"आई बाबांचा तरी विचार कर...", अभी शांतपणे बोलतो...

"सॉरी अभी यावेळी नाही जमणार आहे मला.... खरंच सॉरी..."

"युक्ता प्लीज..."

अभी बोलत असतो पण ती आता काहीच उत्तर देत नसते... ती डोळे मिटून शांत झोपली होती... अभी तिच्यापाशी गेला... त्याने तिचं पांघरून नीट केलं... आणि "पुन्हा एकदा सॉरी..."असं म्हणून तो रूममधून बाहेर निघून जातो...

अभी जातो तसं युक्ताच्या अश्रुंचा बांध फुटतो... ती पूर्ण रात्र रडत होती... इथे अभीही ऋचाच्या खोलीत अंजलीचा फोटो उराशी कवटाळून बसला होता...

"काय चुकलंय माझं?... तिला योग्य तो मान दिला, तिला हवं ते सगळं काही देऊ केलं मला जमेल तसं तरीही ती सुद्धा आज ही अशी जायची भाषा करतेय... तू सुद्धा असंच मला सोडून गेलीस आणि आता युक्ता... आजवर कधीच तिला गमवायची भीती नाही वाटली पण आज वाटतेय... तू मला शिस्त लावलीस... पण तिने माझ्या आयुष्याला वळण लावलं... ती माझ्या लेकीची आई झाली माझ्या आईबाबांची लेक झाली... मीच तिच्यासाठी कमी पडलो यार..."

असं म्हणत तो फोटो घेऊनच बेडवर बसला होता... ऋचाच्या रूमची लाईट दिसली म्हणून अभीची आई रूममध्ये आली...

"अभी तू इथे?..."

अभीने त्याचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला... पण आईच्या नजरेतून ते सुटलं नाही...

"अभी तू रडतोयस?..."
आईसमोर तो अश्रू लपवू शकला नव्हता... शेवटी त्यानेही प्रयत्न सोडून दिला आणि आईच्या मांडीवर डोकं टेकवून रडू लागला...

"ए बाळा अभि काय झालं?... ऋचाची आठवण येतेय का? किंवा अंजलीची...? काय होतंय?.."त्याची आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवतच विचारते...

"बोल ना रे... मला आता काळजी वाटायला लागलीय हा..."

"आई युक्ता जायचं म्हणतेय..."

"कुठे?..."

"आई ती मला सोडून चाललीय गं... ती म्हणतेय मी इथे ऋचाची आई म्हणून आले होते ऋचाच लग्न झालं आता मी मोकळी झाले... पण आई..."

"काय?... अरे बोल..."

"मलाच सवय झालीय गं तीची... तिच्या आजूबाजूला असण्याची... तिच्या सल्ल्यांची, काळजीची..."

"यालाच प्रेम म्हणतात अभी..."

"माझं युक्तावर?..."

"हो... तिने तुझ्यावर नितांत प्रेम केलं अगदी ती पहिल्यांदा आली होती तेव्हापासून किंवा कदाचित त्या आधीपासूनच... तिला होणारा हा त्रास त्याचा आहे अभी... इतकी वर्ष आम्ही तुमच्यात कधीच बोललो नाही कारण तिला खात्री होती तुला तिचं प्रेम कळेल... पण नाहीच... तू तिला फक्त तुझ्या मुलीची आई मानत राहिलास आणि ती तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत राहिली...आणि तिला तेच आता सहन होत नाहीये अभी..."

"आई मी खरंच चुकलोय गं... इतक्या वर्षांनी मला हे आज जाणवतंय... "

"किती वेळ हे पाहू नकोस कळलंय हे महत्वाचं आहे अभी... जा तुमच्या खोलीत बोल तिच्याशी...थांबव तिला..."

अभी पुन्हा त्याच्या खोलीत आला...

"युक्ता...युक्ता..."

युक्ता रडून झोपी गेली होती... अभीही तिच्या शेजारी येऊन झोपी जातो...
दुसऱ्या दिवशीची सकाळ फार वेगळी होती... अगदीच सामसूम... सकाळी लवकरच्याच गाडीने युक्ता कोणालाही न सांगता निघून गेली होती... मागे होती फक्त एक चिट्ठी... 'माझ्या कुटुंबाला सॉरी... मी यावेळी स्वतःचा विचार करतेय... ' असं लिहिलेली...

0

🎭 Series Post

View all