बोधकथा
सकारात्मकता
काका कालेलकर उच्च कोटीचे चिंतक व लेखक होते. त्यांची विचारक्षमता प्रत्येक विषयात खोल व व्यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्यांच्या आजारपणाची वार्ता ऐकताच अनेक मित्रमंडळी, शुभचिंतक त्यांना भेटायला आले.
एके दिवशी त्यांना भेटायला काही मित्र आले असताना चर्चेदरम्यान त्यांना दुसऱ्या एका मित्राचा फोन आला. त्या मित्राने काकांना विचारले ,आपण आजारी असल्याचे कळले. आता कसे वाटत आहे. काका म्हणाले, होय थोडा आजारी पडलो होतो. मात्र जेव्हापासून मी नव्याने तपासणी केली आहे तेव्हापासून मला बरे वाटायला लागले आहे. तेव्हा त्या मित्रांनी त्यांच्या नव्या तपासणी विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर काका म्हणाले, मी आजारपणाबाबत विचार करणेच सोडून दिले आहे. आणि हा पर्याय माझ्या आजारावरचा उपाय म्हणून सिद्ध झाला आहे.
एखाद्या पाहुण्याला चांगला पाहूणचार जर करत राहिलो तर तो जास्त दिवस मुक्काम करतो.पण तेच त्याला तुम्ही साधी वागणूक दिली. विशेष पाहूणचार त्याला मिळाला नाही. तर तो आपल्या घराचा रस्ता धरतो. आजारपणाबाबतही माझा हाच विचार आहे. काकांच्या या नव्या उपचार पद्धती वर मित्रांसह सर्वजण सहमत झाले.
तात्पर्य,
आजारापेक्षा त्याची चिंताच जास्त तणाव वाढवते. त्यामुळे शारीरिक अस्वास्थ्याला सकारात्मक विचाराने घ्या. शारीरिक दुखण्यांकडे अति दुर्लक्षही करू नका आणि त्याला जास्त कुरवाळूही नका. सतत तेच ते विचार मनात आणले तर ते शारीरिक दुखणे मनाचे आजार वाढविण्याला कारणीभूत ठरते.
सौ. रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा