सकीना
भाग एक
मशिदीतून येणाऱ्या अजानचे शेवटचे बोल कानावर पडत होते. सकीना आपल्या घरीच नमाज अदा करत होती. तेव्हाच तिच्या घरातल्या एका खिडकीतून' शुऽक.. शूऽऽक' असा आवाज आला. नमाज संपेपर्यंत तिने त्याकडे लक्ष दिले नाही आणि नमाज पूर्ण होताच तिने खिडकीच्या दिशेने पाहिले. खिडकीत मुकुंद तिला दोन्ही हात तोंडावर धरुन हाक मारत होता.
" सकीना...ए.. सकीना. इकडे ये ना." मुकुंदला पाहताच ती भयभीत झाली. आपल्या डोक्यावरची ओढणी नीट करत ती धावत धावत खिडकीपाशी गेली.
"मुकुंद, तू इथे काय करतोस? वेडा झाला आहेस का? अरे निघ इथून. तुला इथे कुणी पाहिले तर, खूप गडबड होईल."
"तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस. मी तुला काल काय विचारले होते?" मुकुंदच्या मनात जराही भीती दिसत नव्हती.
"ते आपण उद्या कॉलेजमध्ये बोलू. इथे माझ्या अब्बूनी तुला पाहिले, तर तुला आणि मला दोघांनाही ते जिवंत सोडणार नाहीत."
"प्यार किया तो डरना क्या. मी कोणालाच घाबरत नाही. ज्यांना बघायचे आहे त्यांना बघू दे."
" पैर पडती हू. जल्दी जा."
"सकीना, मला माहित आहे, तुझे अब्बू सध्या इथे नाहीत. ते तर मशिदीत गेले आहेत."
"अरे पण नमाज संपला आहे. ते परतण्याची वेळ झाली आहे. तू जा इथून." सकीनाने गयावया करत म्हटले.
"तुझ्या तोंडून माझ्या प्रश्नाचे उत्तर ऐकल्याशिवाय मी इथून जाणार नाही."
"असा हट्ट धरू नकोस. प्लीज, तुला माहित आहे ते शक्य नाही. आम्हा दोघांचाही धर्म वेगळा आहे. दोन्ही बाजूंनी अशा प्रेमाचा स्वीकार होणार नाही. तेव्हा आपण हे विचार इथेच थांबवलेले बरे."
"सकीना, प्लीज नाही म्हणू नकोस. मी तुझ्या प्रेमात वेडा झालो आहे. मनात दिवस-रात्र तुझेच विचार येत आहेत. अभ्यासात पण लक्ष लागत नाही. तेव्हा पुन्हा एकदा विचार कर. पाहिजे तर आपण पळून जाऊन लग्न करू, तुझ्यासाठी कोणाशीही लढू शकतो मी. नाही म्हणू नकोस."
" मुकुंद, मी तुला कशी समजावू? तू जा इथून. माझे अब्बू येण्याची वेळ झाली आहे."
सकीनाचे वडील मशिदीतून परतत होते, तेव्हाच त्यांचे लक्ष खिडकीत उभा असलेल्या मुकुंदवर गेले.
" ए.. कौन बे तू? क्या कर रहा है उधर?" सकीनाच्या वडिलांनी ओरडत मुकुंदला विचारले.
तो धावत मुकुंदपाशी जाऊ लागला. मुकुंदला हे समजताच त्याने तिथून पळ काढला. सकीनाच्या मनात धडकी भरली.
"सकीना... दरवाजा खोल." वडिल मोठ्या आवाजात म्हणाले.
सकीनाने जराही उशिर न करता धावत जाऊन दरवाजा उघडला.
" कोण होता तो? इथे काय करत होता?" वडीलांनी रागाने विचारले.
"अब्बू, तो माझ्या कॉलेजमधला मुलगा होता. पुस्तक देण्यासाठी आला होता." सकीनाने थाप मारली.
"मग असा खिडकीतून का झाकत होता? सकीना, एक बात कान खोल के सून ले. तुझी ती पढाई वगैरे काही असेल ते कॉलेजपर्यंतच असू दे. त्यांना घराच्या दरवाजापर्यंत आणू नकोस." वडिलांनी दात दात ओठ खात म्हटले.
" जी अब्बू.." असे म्हणत सकीनाने मान खाली घातली.
"अम्मी कुठे आहे?"
" जी बाहेर बाजारात गेली आहे. आलिया आणि मेहताबला कपडे खरेदी करायचे होते. त्यांच्यासोबत गेली आहे. " सकिनाने मान वर न करताच उत्तर दिले.
" हे बघ सकीना, आज शाम तुम्हे देखने के लिये झुबैदा बुआके रिश्तेदार आ रहे है." वडिलांनी जरा शांत होत म्हटले.
" देखने के लिए मतलब अब्बू ? म्हणजे माझा रिश्ता..?" सकीनाला धक्काच बसला.
"हा बरोबर."
"पण माझे कॉलेज अब्बू? पुढच्या महिन्यात परीक्षा आहे माझी."
"खूप शिकलीस, आणखी शिकायची गरज नाही."
" अब्बू, जरा समजून घ्या ना. मी कॉलेजमध्ये टॉप करत आहे. तुम्ही असे कसे मला न सांगता ..."
"सकिना, मला आणखी काहीच ऐकायचे नाही. माझा निर्णय झाला आहे. तुझा निकाह झुबेदा बुआच्या रिश्तेदारशीच होणार. यात काहीही बदल होणार नाही. "
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा