Login

सकीना... भाग २

एक सामाजिक कथा
सकीना...

भाग: २

वडिलांच्या हट्टापुढे सकीनाचे काहीच चालले नाही. परिणामी तिला आपले शिक्षण अर्धवट सोडून मनात नसताना निकाह करावा लागला.

तिचे लग्न तिच्याच आत्याच्या एका नातेवाईकासोबत झाले. मुंबईत स्थायिक असलेला तिचा नवरा इरफान, तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता.
निकाहानंतर सकीनाचे आयुष्य पुर्णपणे बदलले. मुंबईतल्याच एका छोट्याशा खोलीत ती आपल्या नवऱ्यासोबत राहू लागली. दारु, सिगरेट, ड्रग्ज, जुगार अश्या व्यसनात बुडालेल्या इरफानने सुरुवातीपासूनच सकीनाचा शारीरीक छळ करण्यास सुरुवात केली होती. कमी वयातच या अत्याचाराला समोर जाताना सकीनाला खूप मानसिक त्रास होत असे. त्यातच एका वर्षाच्या आत सकीनाला गर्भधारणा होऊन एक मुलगी झाली आणि इथेच तिच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाले.

प्रसुतीनंतर सकीनाला हॉस्पिटलमधून डीस्चार्ज मिळाला होता. इरफान तिला परत आपल्या खोलीत घेऊन आला. मुलीच्या जन्मानंतर इरफान सकीनाशी एकही शब्द बोलला नव्हता.

सकीना आपल्या मुलीला घेऊन बसली होती. तिलाही इरफानचे वागणे जरा खटकू लागले होते.

" बघा ना, आपली मुलगी किती सुंदर दिसत आहे." सकीनाने आपल्या मुलीकडे पाहत म्हटले.

"आपली मुलगी? ही तुझी मुलगी आहे, माझी नाही." इरफान तिरस्काराने भरलेल्या शब्दात म्हणाला.

" तुम्ही हे काय बोलत आहात?" सकीनाला जरा धक्काच बसला.

" मी काय खोटे बोलत आहे? ही माझी मुलगी नाही. हे नक्कीच दुसऱ्या कोणाचे तरी पाप आहे. जे तू माझ्या माथी मारत आहे." हे ऐकताच सकीनाच्या पायाखालची जमीन सरकली.

"ऐसे मत बोलिए. ही तुमचीच मुलगी आहे." सकीना रडत म्हणाली.

"ए गप्प बस. अल्लाही जाने, माझ्यामागे तू किती वेळा किती जणांबरोबर काय काय केले असेल. तू कितना भी कह दे, मी या मुलीचा बाप नाही." हे ऐकताच सकीनाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

या दिवसापासून इरफान आणि सकीनात खूप वाद होऊ लागले. तो तिला खूप मारत असे. सकीना मात्र सगळे मुकाट्याने सहन करत होती. काही दिवसांपूर्वी कॉलेजमधली सर्वात हुशार, निडर असलेली सकीना, आता पायपुसण्यासारखे जीवन जगू लागली होती.

हळूहळू सकीनाची मुलगी दोन वर्षांची झाली, पण इरफानच्या वागण्यात मात्र जराही बदल झाला नाही. उलट आता तो सकीनाबरोबरच त्या छोट्याश्या मुलीला सुद्धा मारत असे. इतकेच नव्हे तर त्या मुलीसमोरच तिच्यावर लैगिंक अत्याचार पण करत असे.

एक दिवस त्यांच्या भांडणाने उग्र रूप घेतले आणि त्या रागाच्या भरात इरफानने सकीनाला 'तीन तलाक' दिला.

सकीनाच्या जीवनात जणू भुकंप आला होता. तिला काय करावे ते सुचत नव्हते. तिने इरफानला समजविण्याचा खूप प्रयत्न केला, पण इरफान मानला नाही. त्याने तिला आपल्या खोलीतून हाकलून लावले.

सकीना आपल्या छोट्याश्या मुलीला घेऊन आपल्या वडीलापाशी आली. त्यांना सकीनाच्या तलाकाची माहिती आधीच मिळाली होती. त्यांनी पण तिला आपल्या घरात घेतले नाही.

" सकीना, अब तुम्हारा इस घर पे कोई हक नही है. इरफानने तुला तलाक दिला, याचा अर्थ तू नक्कीच काहीतरी चूक केली असावी. मी तुला माझ्या घरी ठेवणार नाही." वडीलांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

शेवटी सकीनाने आपल्याला कोणाचाच आसरा नाही, हे जाणून एका अनाथाश्रमाचा आश्रय घेतला.

अनाथाश्रमात दिवस सारत असतानाच एके दिवशी अचानक तिथे इरफान आला. त्याला तिथे पाहून ती अचंबित झाली. इरफानला आपली चूक समजली होती.

" सकीना मुझे माफ कर दो. मुझे मेरी गलती का एहसास हो गया है."

" नाही इरफान, आता त्याला खूप उशीर झाला आहे."

" काहीच उशीर झाला नाही सकीना. मी तुला परत घरी घेऊन जायला आलो आहे."

"खरंच?"

" हो, आपण पुन्हा निकाह करूया."

"खरंच तुम्ही मला न्यायला आहात? तुम्ही आपल्या मुलीचा स्वीकार करायला तयार आहात?"

"हो, पण आता आपल्या समोर एक मोठा प्रश्न आहे."

" कोणता प्रश्न?"

" मी तुझ्याशी आता सरळ निकाह करू शकणार नाही. तुला त्याआधी कोणा दुसऱ्याशी निकाह करावा लागेल."

" म्हणजे? निकाह हलाला?"

"हो. निकाह हलाला. हे केल्याशिवाय आपण पुन्हा शादी नाही करू शकत."

" पण आता असे करायला कोण तयार होईल?"

"माझा एक मित्र आहे. तो तयार होणार. त्याच्याशी निकाह झाल्यानंतर तो तुला लगेच तलाक देणार आणि तू पुन्हा माझ्याशी शादी करु शकणार."