Login

सखा...

मैत्री
लघुकथा

सखा

©® सौ.हेमा पाटील.

तिच्या हातात महारथी कर्ण हे बंद केलेले पुस्तक होते. वाचलेल्या त्यातील एका घटनेचा ती विचार करत होती; कृष्ण व द्रौपदी यांच्यामधील नात्याचा. सकाळीच तिच्याकडे तिची सखी सुशा आली होती. दुपारी जेवण झाल्यावर सुशा झोपली होती व ती वाचनात गढून गेली होती.

"समा, कुठे हरवली आहेस? येतेस ना?" विचारात हरवलेल्या समाला सुशाने हलवले.

"अं... हो. चल जाऊया." असे म्हणत ती उठली. तिच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद दिसत नव्हता. संध्याकाळी शाॅपिंगला जाण्याचा त्यांचा बेत ठरला होता. दोघीजणी शाॅपिंगसाठी बाहेर पडल्या.
बाजारात विंडो शॉपिंग करताना तिच्या मनातील विचार थोडावेळ बाजूला पडला.

रात्री दोघी जेवूनच घरी आल्या. तिला सोडून सुशा निघून गेली. ती कपडे चेंज करण्यासाठी बेडरूममध्ये आली आणि समीरचा तिच्या मोबाईलवर विडिओ काॅल आला. ती खरं तर दमली होती, पण तीन महिन्यांच्या प्रोजेक्टसाठी परदेशात गेलेल्या नवऱ्याशी बोलणे क्रमप्राप्त होते.

थोडेसे इकडचे तिकडचे बोलणे झाले आणि समीर तिला म्हणाला,
"हा पिंक ड्रेस तुला खूप छान दिसतो. यात तू काय दिसतेस यार. तुला पाहून मला असे वाटतेय, हे सगळे सोडून आत्ता या क्षणी तुझ्या मिठीत यावे आणि तुला कच्चे खाऊन टाकावे." हे ऐकून कुठल्याही बायकोला आनंदच झाला असता. परदेशात असलेल्या आपल्या नवऱ्याला असलेली आपली ओढ पाहून बायकोने नवऱ्याने प्रेमळ कटाक्ष टाकून डोळ्यांच्या पापण्या फडफडवत म्हटले असते,

"खरंच शोनू? इतके प्रेम करतोस माझ्यावर?"

समीरला ही तिच्याकडून याच वाक्याची अपेक्षा असल्याचे तिला त्याच्या डोळ्यात दिसले. त्यामुळे तिने डोळ्यांच्या पापण्या फडफडवत ते वाक्य आपल्या तोंडातून उच्चारले खरे, पण त्यात भावनेचा अजिबात ओलावा नाही हे तिचे तिलाच जाणवले. प्रेमाच्या भावनेत वाहवत गेलेल्या समीरला मात्र तिच्या स्वरांतला कोरडेपणा जाणवला नाही. तो दोघांबद्दल, तिच्या शरीराबद्दल, दोघांमधील प्रेमाबद्दल बोलत राहिला. ते बोलणे ऐकून ती अधिकच उद्विग्न झाली, मात्र तिचा थंडपणा समीरला जाणवला नाही इतका तो प्रेमात वाहावत गेला होता.
आपला नवरा आपल्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? हा तिला नेहमी पडणारा प्रश्न आत्ताही तिच्या मनात उफाळून आला. स्त्री म्हणजे केवळ हे गोलाई असलेले आकर्षक शरीरच असते? या शरीरातील मनाचे काय? त्याचा विचार का कधी याच्या मनात येत नाही?असे तिला आजही प्रकर्षाने वाटले.

थोड्यावेळाने त्याने फोन ठेवला तेव्हा आपण फारच दमलोय हे तिच्या ध्यानी आले. चेंज न करताच ती बेडवर आडवी झाली. खूप वेळ निद्रादेवीची आराधना करूनही झोप येईना तसे तिने मोबाईल हातात घेतला व फेसबुक ओपन केले. तसे धडाधडा इनबॉक्समध्ये मेसेज येऊन पडल्याचा तिला आवाज आला. तिने तिकडे दुरून फक्त एक नजर टाकली तर "मॅडम, अजूनही जाग्या आहात?" अशा अर्थाचे मेसेजेस दिसले.

तिला खूप राग आला. मी कधी जागायचे कधी झोपायचे याचे यांना काय पडलेय? तिने फेसबुकवर एक कथा वाचायला घेतली. तिच्या आवडत्या लेखकाच्या कथेत ती गुंतून गेली. वाचतानाच कधीतरी तिची झोप लागली.

सकाळी कामं आटपून ती ऑफीसमध्ये पोहोचली तर तिचा कलिग राघव आज गैरहजर होता. त्याचा मेसेज आला होता,
"प्लीज माझ्या फाईलवर एक नजर टाकून बाॅसकडे पाठव. मी आज डेटवर आहे." तिने त्याचीच फाईल आधी हातात घेतली व काही चूक नसल्याचे पडताळून पाहून फाईल पुढे पाठवली.

राघव दर महिन्याला किमान एकदोनदा तरी डेटवर जातो हे तिला माहीत होते. हे डेटवर जाणे एकाच मुलीबरोबर नसे हेही तिला ठाऊक होते. तिने एकदा त्याला याबाबत विचारले होते,

"असे फुलपाखरासारखे स्वच्छंदीपणे फिरत असतोस, खरं प्रेम कसं असतं याचा अनुभव घ्यावा असे वाटत नाही तुला?"

"प्रेम? असं काही नसतं मॅडम. शरीराचीच ओढ असते, त्याला मुलायम आवरणात झाकतात माणसं आणि प्रेम असं गोंडस नाव देतात. खरी ओढ देहाचीच असते." त्याचे हे उत्तर ऐकून ती अवाक झाली होती. पुरूषजातीबद्दल एक पुरूषच असं बोलला होता!

स्त्री आणि पुरूष यांच्यात फक्त एवढेच नाते असते? वडील, भाऊ, मित्र अशी नातीही आयुष्यात असतातच की. बालपणीचा तिचा मित्र शैलेश तिला आठवला. चिमणीच्या दातांनी एका चाॅकलेटचे दोन तुकडे करून खाण्याइतकी त्यांची मैत्री घनदाट होती. लहान असतानाच काळाच्या ओघात दोघे दोन दिशांना निघून गेले. तरूणपणी सुध्दा आपल्यात अशीच निर्भेळ , निर्हेतूक मैत्री राहिली असती का?असा प्रश्न तिला अलिकडे पडत असे.

तिचा आणि समीरचा प्रेमविवाह झाला होता. काॅलेजमध्ये असताना समीरने तिला मागणी घातली होती. त्याच्या नजरेत आपल्याबद्दल दिसणाऱ्या विश्वास, आपुलकी, मैत्रीच्या भावनेत वाहवत जात तिने होकार दिला होता. दोघांचे लग्न झाले, सुरवातीचा काळ दोघांच्या परस्पर आकर्षणाचा आनंद घेण्यात गेला आणि त्यानंतर समाला प्रश्न पडू लागला, 'असे असते प्रेम?'

स्त्री आणि पुरुष यांच्यात फक्त देहाचेच आकर्षण का? भिन्नलिंगी आहे म्हणून? आपण समीरवर प्रेम करतो म्हणजे नेमकं काय? याबाबत विचार करताना तिच्या लक्षात आले, आपण तन आणि मनाने समीरप्रती पूर्ण समर्पित झालो आहोत. समीर आपल्या बाबतीत पूर्ण समर्पित आहे का? माझ्या मनाचा, माझ्या एक स्वतंत्र व्यक्ती असण्याचा विचार तो करतो का? देहाच्या आकर्षणापलिकडे जाऊन तो दोघांमधील मैत्रीचे बंध जपतो का? खूप विचार करून ही तिला याबाबत सकारात्मक उत्तर मिळाले नाही तशी ती अस्वस्थ झाली.

स्त्रीला जाणून घेणारा, तिच्या भावना अलवारपणे जपणारा पुरूष हवा असतो. जो मैत्रीचे नाते जपेल, तिचे भावविश्व जाणून घेईल असे स्त्री आणि पुरूषाचे वासनारहीत मैत्रीचे बंधही तिला समीरकडून अपेक्षित होते. याबाबत तिने समीरकडून अपेक्षा केली, की कधीकधी त्याच्या नजरेत मैत्रीचे बंध दिसावेत, पण ती व्यर्थ ठरली. त्याच्यासाठी बायको म्हणजे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे साधन होते. यावर सुशा तिला खूप हसायची.

"अगं, असं काही नसतं. शेवटी ओढ देहाचीच असते."

अशातच ती शार्दुलच्या संपर्कात आली. शार्दुल हा तबलावादक होता. तिच्या कंपनीच्या वार्षिक संमेलनात त्याचा कार्यक्रम होता. त्याचे अभिनंदन करण्यासाठी ती जवळ गेली असता त्याचा मोबाईल नंबर घेतला. अधूनमधून दोघे बोलू लागले. बोलताना शार्दुलमधील वेगळेपणा तिला जाणवू लागला. आज दोघांनी समोरासमोर भेटायचे ठरवले होते म्हणून ती खुश होती.

दोघे वैशालीमध्ये भेटले. दोघांमध्ये चांगल्या तासभर गप्पा झाल्या. तिच्याबद्दल त्याने आत्मियतेने जाणून घेतले, स्वतःबद्दल सांगितले. अजूनपर्यंत तरी त्याच्या नजरेत वासनेचा रंग चढलेला तिला दिसला नाही. तिने स्पष्टपणे त्याला प्रश्न विचारला,

"आपण फ्रेंड्स आहोत, माझ्या देहाची ओढ वाटली नाही तुला? ही समोर बसलेली बाई माझ्या मिठीत यावी असे वाटले नाही तुला?"

शार्दुलच्या उत्तराची ती वाट पाहत होती. तो म्हणाला,

"नाही. माझ्यासाठी तू कृष्णा आहेस, सखी आहेस. तुझ्याकडे वासनेच्या नजरेने मी कधीच पाहू शकत नाही. तुझी जर माझ्याकडून तशी अपेक्षा असेल तर आपण या क्षणीच थांबलेले बरे!" हे उत्तर ऐकले आणि ती हर्षभरीत झाली. त्याचा हात प्रेमभराने हातात घेत ती म्हणाली,

"कृष्णा! याच हाकेची मी वाट पाहत होते. स्त्रीकडे कायम वासनेच्या नजरेतून पाहणाऱ्या या दुनियेत तुझ्यासारखा कृष्ण सखा कधीतरी नक्की सापडेल अशी माझी अपेक्षा होती. तो माझा शोध आज पूर्ण झालाय. बरं झालं तू मला भेटलास, नाही तर या समग्र पुरूषजातीबाबत माझ्या मनात घृणा निर्माण होऊ लागली होती." तिचा हात तसाच हातात राहू देत शार्दुल म्हणाला,

"मलाही देहापलिकडील मैत्रीची अपेक्षा आहे तुझ्याकडून. आपल्यात तेच बंध कायम असतील जे द्रौपदी व कृष्णात होते. कधीही मला हाक मार मी तुझ्यासोबतच असेन. आपली ही अलौकिक व शुध्द मैत्री एकमेकांना कायमच सहाय्यक ठरेल. आजपासून मी तुला सखी म्हणून संबोधेन. चालेल तुला?"

हे ऐकून ती म्हणाली,

"होय सख्या. मैत्रीचे हे पवित्र नाते मी आयुष्यभर निर्मळपणे जपेन."
एका पुरूषाच्या वासनारहीत स्पर्शातील आपुलकीने ती आश्वस्त झाली होती. आज तिला तिचा कृष्ण सखा गवसला होता.
समाप्त.©® सौ.हेमा पाटील.
0