भाग १ला
हर्षा आपल्या खोलीत सुन्नपणे बसून असते. दोन दिवस ती जेवलेली नसते. हर्षा शुन्यात बघत बसलेली असते. तिच्या खोलीचा दरवाजा लोटलेला असतो. दरवाज्यावर थरथरत्या हाताने कोणीतरी थाप मारतं. हर्षा आपल्याच तंद्रीत असते.तो थरथरता हात हळूच दरवाजा ऊघडतो. त्या हर्षाच्या आजी असतात.
आजी नव्वदीच्या असल्याने त्या हळूहळू चालत हर्षाच्या जवळ आल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. हर्षा त्या स्पर्शाने भानावर आली. आजीला बघून हर्चषाने चटकन आजीला मिठी मारली.आजी त्यांच्या पायाला पडलेली हर्षाच्या हाताची मिठी हळूच सोडवून पलंगावर बसल्या आणि ह ळूच हर्षाला मिठीत घेतलं तसा हर्षाचा बांध फुटला आणि ती ढसाढसा रडायला लागली.
" बाळा रडून घे. रडली नाहीस तर मनावर ताण येईल" आजी म्हणाल्या.
"आजी असं कसं झालं? विपूल असा कसा मला टाकून निघुन गेला. जिथून कूणी कधीच परत येत नाही." आणि रडायला लागली.
" बाळा विपूल हे जग सोडून गेला हे फार वाईट झालं. पण आपल्या हातात काहीच नसतं. तो आता नाही हे मान्य करण्यापलीकडे आपल्या हातात काही नाही बेटा." आजी हर्षाला थोपटत समजावतात.
"आजी अगं त्याचं वय होतं का जाण्याचं? कितीतरी माणसं अंथरूणावर खिळलेली असतात. मरण्याची वाट बघत असतात. त्यांना सोडून देवांनी विपूलला का नेलं?"
हर्षाचं रडणं थांबतच नव्हतं. थांबणार कसं? ज्याच्यावर तिनं जिवापाड प्रेम केलं तो एका क्षणात या जगातून गेला. काहीही कल्पना न देता गेला.
तिला थोपटत आजी म्हणाल्या,
" माझी छकुली शहाणी आहे नं? तुला खूप दु:ख झालंय हे कळतंय ग आम्हाला. पण त्या नियतीपुढे आपलं काही चालत नाही. तिनी जसं लिहीलय तसंच घडतं. माझं ऐकशील तू? जरा चार घास खाऊन घे. बरं वाटेल. नाहीतर तू आजारी पडशील."
हर्षानी नकारार्थी मान डोलावली आणि म्हणाली
"आजी माझी अजीबात इच्छा नाही जेवायची. सगळं संपल्यासारखं वाटतंय. फक्त चारमहिन्यांचाच झाला आमचा संसार. नवीन आयुष्याची चूलबोळकी आम्ही दोघांनी किती हौसेनी मांडली होती. सगळं विस्कटून गेलं ग." एवढं बोलतानाही तिला हुंदका आवरला नाही.
"देवाची लिला अशीच असते ग हर्षू. ती कधी कोणाला कळतच नाही. कोणाला चार दिवस चूलबोळकी मांडू देतो तर कुणाला तीही संधी देत नाही. तुला चार महिने संसार करता आला. खूप कमी काळ आहे हा तुमच्या सहवासाचा पण आता अशी सतत उदास राहू नको. विपूलला जे आवडायचं ते कर. त्याचं शरीर नष्ट झालय. तुझ्या मनात तो आहेच नं आणि राहणार आहे. तू अशी दु:खात बसलीस तर विपूलच्या आत्म्याला दु:ख होईल.चलतेस नं बेटा जेवायला?"
हर्षानी आजीच्या कुशीतून बाहेर येत अचानक आजीला विचारलं,
"आजी आजोबा गेल्यानंतर तुलाही असंच वाटलं होतं का? तुला पण जगू नाही असं वाटलं?"
"आजी आजोबा गेल्यानंतर तुलाही असंच वाटलं होतं का? तुला पण जगू नाही असं वाटलं?"
आजी विषण्णपणे हसत म्हणाल्या,
"हं. मला मरण्याचा विचार करायला वेळ नव्हता. माझ्या कुशीत तीन निष्पाप जीव टाकून तुझे आजोबा पण काही कळायच्या आत जग सोडून गेले. ते गेले तेव्हा तुझे बाबा श्रीकांत फक्त दहा वर्षांचा होता, रमाकांत दोन वर्षांनी लहान आणि विणा त्याच्याहून लहान. मला पुढे मुलांना कसं वाढवायचं हा प्रश्नं होता. त्या प्रश्नापुढे आपलं आयुष्य संपवाव हा विचार डोक्यात यायला वेळच नव्हता." आजीच्या डोळ्यातून घळघळअश्रू वाहू लागले.
"आजी तुला त्रास होत असेल तर नको बोलू काही." हर्षा आजीला बिलगून म्हणाली.यावर आजी मनातच बोलली,
"मला त्रास होतो बेटा पण तुला माझी परीस्थिती सांगायलाच हवी. तुझ्याहून दोन वर्षांनी लहान असताना तीन मुलं पदरात असताना मी विधवा झाले. तू तर मोठी आहेस. ढीगभर पगाराची नोकरी आहे तुला. तुझ्यापेक्षा माझा काळ पूर्वीचा होता अश्या काळात नवरा गेल्यानंतर माझ्यापुढे खूप प्रश्न होते. हे सगळं तुला सांगायलाच हवं. तरच तू पुन्हा उठून उभी राहशील." आजीनी एक मोठा नि:श्वास सोडत आपल्या डोळ्यातलं पाणी पुसले.
आजीच्या मनात चाललेल्या खळबळीचा हर्षाला पत्ता नव्हता. दोन समदु:खी जीव एकमेकांना बिलगून आधार शोधत होते.
जरा वेळानी आजी म्हणाल्या,
"हर्षा आज तू विधवा झालीस पण तुझ्या पदरात मुलाची जबाबदारी नाही हे तुझं भाग्य आहे. आणि मोठ्या पगाराची नोकरी तुझ्याकडे आहे ही पण जमेची बाजू आहे. तुझे आजोबा गेले तेव्हा माझ्याजवळ यापैकी काही नव्हतं. फक्त मुलांची जबाबदारी होती. त्यांच्या भविष्याचा विचार डोक्यात होता. माझ्या सासू सास-यांचीही माझ्यावर जबाबदारी होती. त्याकाळी सगळ्यांचीच परीस्थिती बेतासबात असायची. कोण कुणाला एकदम पैशांची मदत करणार?"
"आजी आजोबा कोणतं काम करायचे? त्यांनी पैसे साठवले नाही?" हर्षानी विचारलं. आजी हलकसं हसत म्हणाल्या.
"अगं आजोबांना फक्त ८० रूपये पगार होता त्यात आई, वडील, बायको,तीन मुलं एवढ्यांचं जेवण खाण, कपडेलत्ते करायचं असायचं. माझे सासु सासरे म्हणजे तुझे पणजी आणि पणजोबा तब्येतीनी काटक असल्याने त्यांच्यासाठी कधी दवाखान्याची पायरी नाही चढावी लागली. खूप काटकसरीने राह्यलो आम्ही. त्यावेळी सगळेच असेच रहात त्यामुळे मुलांना कधी जाणवलं नाही की आपल्याकडे पैसा कमी आहे हे."
आजीच्या बोलण्यातून हर्षाला आजीवर आलेला तो कठीण काळ जाणवू लागला होता. आज तीही एक विधवा म्हणून ओळखली जाणार पण तिच्या आणि आजीच्या ओळखीत महद अंतर होतं.आजी प्रमाणे आपल्याकडे काहीच नाही असं नाही. आपल्याकडे मोठ्या पगाराची नोकरी आहे, आईबाबांचा पाठींबा आहे, तरी आपण एवढं खचलो? खरंतर आजींनी हातपाय गाळायला हवे होते आजोबा गेल्यानंतर. पण ती कशी ठाम उभी राहिली.
आपणही असंच ठाम उभं राहायला हवं. आजीचे अनुभव ऐकायला हवे. त्यातून खूप शिकायला मिळेल. हे ठरवल्यावर हर्षाच्या चेह-यावर जरा हसू झळकलं.आजी तिच्या चेह-यावर बारकाईनी निरीक्षण करत होत्या.
तेवढ्यात हर्षाचं आजीकडे लक्षं जातं.,
"अशी का बघतेस आजी माझ्याकडे?"
" अगं माझं शोनुलं सावरलं का बघतेय.."
"आजी तुझे अनुभव सांगताना त्रास होत असेल तर नको सांगू." हर्षा म्हणाली.
"हर्षा तुझं आणि माझं दुःख सारखं आहे पण काळ वेगळा आहे. माझ्यावर तो वैधव्याचा आघात होऊन बरीच वर्ष लोटली. तुझ्यावर आज आघात झाला आहे. काळ वेगळा असला तरी दु:खाची धार तीच आहे \"धारदार\". माझ्याभोवती खूप जबाबदा-यांचं भलंमोठं रिंगण होतं.
पाच माणसं माझ्यावर अवलंबून होती. सासूसासरे आणि तीन मुलं. म्हणून माझ्या वैधव्याची धार जरा जास्तच धारदार झाली. तुझ्या भोवतीची परीस्थिती माझ्या पेक्षा वेगळी आहे पण म्हणून तुझ्या दु:खाची धार कमी नाही होत.
"वैधव्य हा शब्दच धारदार आहे हर्षू. या शब्दाबरोबरच जगायला शिकावं लागतं आपण. तुझं एखादं दोन वर्षांनी दुसरं लग्न करू शकतो." आजीचे हे वाक्य ऐकून हर्षा जवळजवळ ओरडतच म्हणाली.
"आजी मी दुसरं लग्नं करूच शकणार नाही. विपूलला मी नाही विसरू शकत."
"हर्षू काळ खूप मोठं औषध आहे यावर. तूच ठरवशील काय करायचं ते. आता फार वाद न चालता जेवायला चल.अन्नावर राग काढू नये.चल बेटा."
" जेवावसं नाही वाटत गं." हर्षा रडवेल्या स्वरात म्हणाली.
" जेवढं इच्छा असेल तेवढं खा. ऊद्याचा विचार करायचा आहे तर तुला आज जेवावं लागेल. अंगात त्राण कसं येईल? चल बाळा." आजी हळूहळू पलंगावरून उठतात नि दाराकडे जाऊ लागतात.
"आजी तू कसं सहन केलं असशील हे सगळं?"अजूनही हर्षाचा आवाज रडवेलाच असतो.
" तुला ऐकायचय?" आजी चालता चालता थांबून मागे वळून बघतात आणि विचारतात.
" हो. तू जशी लढलीस या स्थितीशी तसं मला लढायचं आहे." हर्षाचं बोलणं ऐकून आजी म्हणाली,
"एका अटीवर सांगीन.जेवलीस तर सांगेन."
" हो आजी जेवीनं. तुझ्यासारखं धाडस मला अंगात बांधायचं आहे. विपूल नाही तर मी कशी जगेन? हा विचार मला झोपच लागू देत नाही. सगळीकडे अंधार दाटलाय असं वाटतं. आजी या या अंधारपोकळीत मला नाही अडकायचं."हर्षा म्हणाली.
"नाही अडकणार तू या अंधारपोकळीत.कारण तू ठरवलय नं मनाशी मग नाही अडकणार. आपलं मन खंबीर असलं की कुठल्याच डोहात आपण अडकत नाही." आजींनी हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं.
"आजी लग्नाआधीच्या आयुष्यात जगताना जितकी भीती वाटत नाही तेवढी जास्त भीती विधवा म्हणून जगण्यात आहे का ग?" हर्षानी तिच्या मनात खळबळ माजवणारा प्रश्न विचारला.
" अगं आयुष्य हा एक भलामोठा रस्ता आहे. त्यावर खूप खाचखळगे आहेत. आयुष्याच्या कुठल्याच टप्प्यावर खाचखळगा नाही असं होत नाही. कधी तो खड्डा खूप जीवघेणा असतो तर कधी बारीकसा असतो. माणूस बारीकसा खड्डा सहज ओलांडून जातो पण जर जगताना खड्डा म्हणून दरी लागली तर मात्र माणूस हवालदील होतो."
बोलता बोलता आजींना स्वतःच्या आयुष्यातील खाचखळगे आठवू लागले.
"आजी विधवा होणं हा खूप मोठा खड्डा आहे नं स्त्रीच्या आयुष्यात!"
"काही काही पुरूषांच्या आयुष्यात सुद्धा हा खड्डा येतो बाळा. त्यांनासुद्धा हा खड्डा पार करणं कठीण जातं. लहान कच्ची बच्ची बरोबर घेऊन जगणं पुरूषांनाही कठीण होतं. आई असल्यामुळे स्त्रीला मुलांना समजून घेणं त्यांना जगवणं खूपसं सोपं जातं पण पुरूषांना ते इतकं सोपं नसतं.आईचा गाभा हा हळूवार असतो तर वडलांचा गाभा कणखर असतो. त्यात हळूवारपणा आला तरी आईसारखा नसतो. स्त्री आणि पुरूष दोघांच्या आयुष्यात ही अवस्था कठीणच आहे."
आजींना एवढं बोलल्यामुळे जरा धाप लागली. ते बघताच हर्षा म्हणाली,
"आजी नको बोलूस. तुला त्रास होईल असं मला काही करायचं नाही." हर्षा आजीला कवटाळून रडवेल्या स्वरात बोलली.
" ऐ वेडे अशी रडू नकोस. मला त्रास होतो पण इतका नाही. या गोष्टींवर काळानी भलंमोठं पांघरूण घातलय. त्या गोष्टीची बोच हळूहळू कमी झाली आहे. आतातर मुलांच्या हसत्या खेळत्या आयुष्यातील क्षणांनी माझ्या आयुष्याच्या अंगणात खूप छान आनंदाचं झाड लावलय. हळुहळू त्यांचं बहरणं बघत कधी वयाची नव्वदी गाठली माझं मलाच कळलं नाही."
आजींनी हलकसं हसून हर्षा कडे बघीतले तशी पुन्हा आजीला मिठी मारत हर्षा बोलली,
" माझी स्ट्राॅंग आणि स्वीट आजी" तिच्या या बोलण्यावर आजींना हसायला आलं तशी हर्षा पण हसू लागली.
" चला जेवायला. ही लाडीगोडी थांबवा आता." आजी म्हणाल्या. तश्या दोघी हसत जेवायला गेल्या.
-------------------------------------------------------------
क्रमशः पुढे काय झालं? बघू पुढच्या भागात.
\"सख्या तू पैलतिरी.\" भाग १ला
लेखिका... मीनाक्षी वैद्य.
-------------------------------------------------------------
क्रमशः पुढे काय झालं? बघू पुढच्या भागात.
\"सख्या तू पैलतिरी.\" भाग १ला
लेखिका... मीनाक्षी वैद्य.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा