Login

सकींना

Sakina
©®विवेक चंद्रकांत....

त्यादिवशी खुशबू माझ्याकडे आली तेव्हा तिच्याबरोबर एक लहान चणीची मुलगी होती. चेहरा ओढणीने झाकलेला होता. त्यामुळे ती कोण मला समजले नाही. खुशबू बंगाली. इथे देहविक्रय करते. दिसायला ठीकठाक. पण स्वभाव मनमोकळा. गप्पा मारायला लागली की आवरावे लागायचे. बरेचदा इथे नव्या मुली येतात. त्यांना घेऊन या ओळखीच्या बाया येतात. त्यामुळे हीही कोणी नवी मुलगी असेल असे वाटले. (, नवी मुलगी म्हणजे धंद्यातली नवी नाही तर गावातली नवी.)

" क्या हुआ? कौन है ये? "

" सर्दीखासी हुआ है बैद बाबू .ये तुम्हारी पोती है. "

" पोती? "

"मेरी लडकी है."

आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. खुशबू स्वतःला माझी मुलगी म्हणवून घेते किंवा तसे नाते मानते. म्हणजे ही खरोखरच खुशबूची मुलगी असावी. मी थोडा हादरलोच. कारण खुशबू जिथे धंदा करते तो भाग माझ्या माहितीतला आहे. अरुंद बोळ. दहा बाय दहाच्या खोल्या. येणारे जाणारे गिर्हाईक.. दारुडे गर्दूले. त्यात गिर्हाईकावरून बायांच्यात होणारी भांडणे, अधूनमधून पडणारा पोलिसांचा छापा.एकंदर भयंकरच वातावरण. त्यात ही कशाला मुलीला घेऊन आली?

मी मुलीला चेहऱ्यावरून बांधलेला रुमाल काढायला लावला. मुलगी लहान होती. चेहरा बांधलेला असल्याने लक्षात आले नव्हते.निरागस चेहरा, नुकतीच यौवन्नात पाऊल टाकत असलेली.मी तिला उपचाराचा भाग म्हणून वय विचारले. तिला फारसे हिंदी येत नसावे.तिच्याऐवजी खुशबूनेच उत्तर दिले.
"चौदा सालकी है. पढती है अभी. नववी मे है."

मी तपासून उपचार केले. पण माझा अस्वस्थ पणा मी विसरू शकलो नाही. शेवटी जातांना मी तिला विचारलेच.
"क्यू लेके आयी लाडकीको?"

"उसको ये गाव देखनेका था ना डाक्टरबाबू. इसलिये लाये."

हे उत्तर मला अजिबात पटले नाही. आमचे गाव काय मुंबई दिल्ली नाही की इथे दाखवण्यासारखे काही आहे. शिवाय आपली आई इथे देहविक्रय करते हे तिला माहित होईल त्याचे काय? ( बहुतेक बायांच्या नातेवाईकांना ह्या बाया धंदा करतात हे माहित असते पण ते पैसे देतं असल्याने ते बोलत नाहीत. बहुतेकांचे नातेवाईक दूरच्या राज्यात अथवा दूर असलेल्या गावी राहतात.)
काहीका असेना पण एवढ्या कोवळ्या मुलीला खुशबूने ह्या ठिकाणी आणावे हे मला काही पटेना. पण आपण काय करू शकतो? माझ्या हातात काय आहे?

त्याच दिवशी संध्याकाळी सकींना आली. हीही त्याच गल्लीतली. निघतांना मला म्हणाली

"खुशबू आयी थी क्या लडकीको लेके?"

"हा " मी मन डोलावली.

"बेवकूफ औरत. इतनी छोटी लाडकीको लेके आयी है."

मी काहीच बोललो नाही. मुलगी तिची, मर्जी तिची.

"मै भोत बोला उसको. बोली लडकीको गावं दिखाने लाई.
पागल."
ती तण तण करतच गेली.

दोनचार दिवस गेले असतील.आज पुन्हा सकींना आली आज तिच्याबरोबर बेबी आणि कमला पण होती.
"मेरेको एक इंजेकशन देना तो. भोत सिर दुख राहा. खुशबुके साथ झगडा करके आयी. बोली लडकीको गावं छोडके आ.
उसकी नानी है उदर. ये माहोलमे क्या बच्चीको रखना?"

"'तेरी बात सही है सकींना. पर वो सुननेको होना. लडकी उसकी. कोन बोलेगा उसको?"

"डॉक्टर बाबू आप बोलके देखना. आपकी सुनेगी वो."

मी एकदम गडबडलो. मी तिला काय सांगणार? आणि कोणत्या अधिकाराने? फक्त रुग्ण आणि डॉक्टर एवढेच संबंध आमचे. ती स्वतःच माझी मुलगी असे म्हणून घ्यायची.. पण असे नाते बरेच जण जोडतात डॉक्टरांशी. काका, मामा, आजोबा, भाऊ. त्यात आपलेपणा असतो पण अधिकार नसतो. अधिकार असतो तो पथ्या विषयी, वाईट सवयी सोडण्याविषयी. तोही रुग्ण ऐकेल याची शास्वती नसते. इथे तर खुशबुच्या मुलींविषयी तिला सांगायचंय. ती ऐकेल?

मी दुविधेत पडलो. पण सकींना ठाम होती.
"फोन लगाओ सर."

"तू लगाना.मै बात करता."

"नही. आपही लगाओ. मै लगाऊंगी तो बोलेगी तुनेही. डॉक्टरबाबुको बोला."

"मेरे पास नंबर नही है."

"मै देती हू."
तिने झटक्यात मोबाइलमधून एक नंबर काढून माझ्यापुढे केला. आता माझ्याकडे पर्याय राहिला नाही.

मी तिला फोन लावला. कोणजाणे उचलते की नाही की ग्राहकांबरोबर असेल?

है इश्क तो है इश्क तो
गलेसे लगाले
रिंगटोन वाजत होती.
माझी छाती उगाच धड धडत होती. ती काही उलटे तर बोलणार नाही ना? तुमचा काय संबंध अशी बोलली तर?

समोरून फोन उचलला गेला.
" हॅलो कौन? "

"खुशबू, मै डॉक्टर बैद बोल राहा हू."

"अरे आप. क्या हुआ सर? आज लडकीको कैसे याद किया?"

"बेटा वो 'तेरी लडकीको तू लेके आयी है. उसको वापस कब ले जायेगी?"

"क्यू सर?"

"अरे अपने एरियामे माहोल कितना खराब है. बच्ची है डर जायेगी. तू जल्दीसे जल्दी घर भेज उसको."

"किसके साथ भेजू? अभी तो देश जानेवालेभी कोई नही."

"तो तू खुद चली जा. ऐसे माहोलमे मत रख उसको. कल परसो चली जाना."

"देखती हू सर. तिकीटभी मिलनेको होना." तिने फोन बंद केला. फोन मी स्पीकर वर टाकला असल्याने सगळ्यांना ऐकू येत होते.

"थँक यू सरजी." एवढे म्हणून त्या सगळ्या गेल्या.

त्यानंतर तिसऱयाच दिवशी सकींना घाईघाईत दवाखान्यात आली. मी रुग्ण तपासत होतो. ती आत येताच मी म्हणालो
"रुक जा पाच मिनिट. नंबर है "

"नई. मै दवा लेने नही आयी. बोलनेको आयी. खुशबू ले गयी बच्चीको वापस गावं."
", चलो अच्छा हुआ." मी म्हणालो. ती आली तशी निघून गेली.

खुशबू नंतर परत आली. सकीनानें मुलगी तिच्या नानीकडे व्यवस्थित गावी पोहचल्याची खात्री करून घेतली.

आज तरी हे प्रकरण संपले. माझ्या एका फोनने हे झाले असेल असे मला अजिबात वाटत नाही. त्या सगळ्या बायांनी तिच्यावर दबाव टाकला असेल त्यात माझाही एक रोल टाकला. मी समजलो नाही पण त्या सगळ्या समजल्या होत्या की खुशबुने मुलीला धंदा करायलाच इथे आणले असावे. पण एवढ्या कोवळ्या मुलीला ह्यात टाकू नये असे वाटल्याने त्यांनी जोरदार विरोध केला.

आजतरी ती मुलगी तिच्या आजीकडे सुखरूप शाळा शिकत आहे. भविष्याचे माहित नाही. पण सकीना, कमला, बेबी आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या पोरींचे बायांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

त्या बायांची हीही एक वेगळी चांगली बाजू त्यानिमित्ताने पुढे आली.