Login

साक्षीदार... भाग - २ (अंतिम भाग)

३:१७ ला येणारी हाक दार उघडायला नाही, सत्य उघडायला सांगते. एकदा ऐकली की… ती आयुष्यभर पाठ सोडत नाही.
साक्षीदार... भाग - २ (अंतिम भाग)


अर्जुनचा श्वास तुटक होता. डोळे उघडेच होते… पण शरीर हलत नव्हतं. खिडकीतून पहाटेचा फिकट उजेड आत शिरत होता. पक्ष्यांचा आवाज नव्हता.

गाव अजूनही मृतासारखंच शांत. तो हळूहळू उठला.
पलंगाजवळ जमिनीवर, ओले पावलांचे ठसे. ते ठसे थांबले नव्हते. ते पलंगाच्या बाजूने… भिंतीकडे.. आणि मग थेट भिंतीतच गायब झाले होते.

“हे स्वप्न नाही,” अर्जुन कुजबुजला. तो वाड्याबाहेर पडला. जे गाव लपवत होतं. गावातली लोकं आता दिसत होती. पण कुणीही डोळ्यांत डोळे घालून बोलत नव्हतं.

अर्जुन तात्यांकडे गेला. “काल रात्री… ती आली होती,” अर्जुन म्हणाला. तात्यांनी काही क्षण डोळे मिटले.
“म्हणजे तू जिवंत आहेस,” ते हळूच म्हणाले.
“ती कोण आहे?” अर्जुनने थरथरत्या आवाजात विचारलं.

तात्या बसले. जणू वर्षानुवर्षांचं ओझं उतरवायला. ३:१७ चं सत्य “तीचं नाव होतं, मुक्ता,” तात्या बोलू लागले.
ती या गावातलीच होती. खूप वर्षांपूर्वी, रोज रात्री ३:१७ ला ती उठायची.

कारण त्या वेळी तिचा नवरा दारू पिऊन घरी यायचा…
आणि तिला मारायचा. एक रात्री, तो तिला ओढत जंगलाकडे घेऊन गेला.

गाव ऐकत होतं. पण कुणीच बाहेर आलं नाही. ३:१७ वाजता तिचा आवाज थांबला. दुसऱ्या दिवशी तिचं शरीर सापडलं नाही.

पण त्याच रात्री, पहिल्यांदा दारावर ठोसे पडले. नियम का पाळले जातात “ती सूड घेण्यासाठी नाही येत,” तात्या म्हणाले.

“ती फक्त… दार उघडायला सांगते.” जे दार उघडतात…
ते सकाळ पाहत नाहीत. काहींची शरीरं सापडतात.
काहींची नाहीच.

पण एक गोष्ट सगळ्यांना माहीत आहे, ती एकटी येत नाही. अर्जुन हादरला. “मग मी?” “मी कसा वाचलो?”
तात्या अर्जुनकडे रोखून पाहिलं. “कारण… तू अजून पूर्णपणे जागा नव्हतास.”

दुसरी रात्र... अर्जुन गाव सोडू शकत होता. पण तो थांबला. पत्रकार नव्हे… आता तो साक्षीदार होता.
रात्री पुन्हा अंधार दाटला.

३:१६ AM, हवा पुन्हा थंड झाली. यावेळी ठोसे नव्हते.
थेट आवाज, त्याच्या कानाजवळ. “काल तू दार उघडलं नाहीस…” “आज उघडशील का?” अर्जुनने डोळे बंद केले.

“मुक्ता,” तो म्हणाला. “तुला न्याय हवा असेल… तर घे.
पण मला घेऊ नकोस.” खोली थंडगार झाली. समोरचा आरसा धूसर झाला.

त्यात अर्जुन नव्हता. त्यात होती… मुक्ता. चेहरा शांत, डोळे खोल, दुःखाने भरलेले, “मी न्याय मागत नाही,”
ती म्हणाली. “मी फक्त… साक्षीदार शोधते.” आरशात दृश्य बदललं.

गाव, तो नवरा, तो गुन्हा आणि मग, नवरा आरशातून ओढला गेला. आरसा फुटला.

सकाळ झाली. गावात पहिल्यांदा पक्षी ओरडत होते.
तात्या धावत आले. “काल… दारावर काही आलं का?”
अर्जुन शांतपणे म्हणाला, “ती गेली.” तात्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.

गावात पहिल्यांदा ३:१७ ला घंटा वाजली नाही. अर्जुन निघून गेला. पण, पुण्यात, त्याच्या घरात…
पहिल्याच रात्री, ३:१७ AM दारावर हलके ठोसे पडले.
आणि एक ओळ, “तू आता साक्षीदार आहेस.”


समाप्त
0

🎭 Series Post

View all