Login

सक्तीची भाषा

सक्तीची भाषा भाग १
प्राची आज खूप दमली होती. आज सकाळी नविन मुलगी मॅनेजर म्हणून जॉईन झाली होती. तिला इंग्लिश अगदी पक्क येत होत. एकदम इंग्रज असल्या प्रमाणे.प्राचीला पण इंग्रजी भाषा बोलायला येते.पण जुजबी तिच्या नव्या मॅनेजर इतकी अस्कलित नाही बोलता येत. त्यात आज घरी दिव्याची अमावस्या करायची होती. त्याची तयारी करायची होती.

आता श्रावण महिना सुरू होणार आहे. तर आषाड महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावस्येला साजरी करायची असते. त्या दिवशी घरातील सगळे दिवे स्वच्छ धुवून पुसून उजळवायचे आहे. तिच्या घरी पुजा आहे.

तर तिला परवाच्या दिवशी अर्ध्या दिवसाची रजा हवी होती. म्हणून ती तिच्या मॅनेजरला त्या बद्दल सांगत होती. ती मॅनेजर उत्तर भारतीय असल्याने तिला ते समजत नव्हत. तिने दिवाळी सेलिब्रेट करायला सुट्टी हवी का विचारलं ? मग दिवाळीच्या वेळी सुट्टी घे म्हणून सुनावलं. जास्तीच काम करायला सांगितलं ते वेगळंच.

प्राची तिच्या नव्या मॅनेजरला दिवाळी आणि दिव्यांची आवस हे दोन वेगवेगळे उत्सव आहेत हे कस समजावून सांगु या विचारात होती. तरी बरं ही मॅनेजर गेली सहा सात वर्ष महाराष्ट्रात राहीली आहे. अगदी खुद्द पुण्यात राहीली आहे. तरी देखील या बयेला समजेना दिवाळी आणि दिव्यांची अमावस्या हे दोन वेगवेगळे उत्सव आहेत.

तिच्या कडून त्या दिवशी सुट्टी कशी मंजूर करून घ्यावी या विचारात ती घरी जात होती. आज ट्रॅफिक काही कमी होण्याची चिन्हं दिसत नव्हती. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात ती तिच्या सहनशक्तीची परीक्षा देत तो ट्रॅफिक पार करण्याचा प्रयत्न करत होती.

त्या ट्रॅफिक मुळे तिने दोन वेळा रेड सिग्नल ग्रीन झालेला पाहिला. पण त्या लांब रांगा ओलांडून तिला पुढं जाता येत नव्हत.

आता ती सिग्नल वर थांबली होती. तिच्या एका बाजूला एका टु व्हिलरवर दोन सिनअर सिटिझनच्या वयाची माणसं उभी होती. त्यातल्या त्या मागच्या काकांनी गाडी चालवणाऱ्या काकांना सांगितलं,

" अरे चंद्या, पांढऱ्या पट्ट्याच्या माग थांब. त्यो बघ समोरं शिपूर्ड उभ हाय !"

" कुठंय ते शिपुर्ड ?"

" त्ये बघ की झाडाखाली गळ लावून बसलाय "

" हां.."

ते दोघं एकमेकांच्या सोबत बोलतं होते. त्यांचं बोलणं ऐकून प्राचीला भसकन हसू आलं. खरंच किती गंमत आहे ना मराठी भाषेची !

ते काका म्हणत होते त्या चौकात झाडाखाली पोलिस उभा राहिला आहे. तेव्हां डोळ्यासमोर एक अधिकारी व्यक्ती तिथं उभी राहिली आहे असं चित्रं डोळ्यासमोर उभे राहत. पोलिस या शब्दाला एक वजन आहे. आता पोलीस म्हणजे सोप्या मराठी भाषेत शिपाई असाच म्हणतो.
पोलिस नावातच सारं काही एकवटल आहे. पण जेव्हा पोलिसाला शिपाई म्हणून म्हणलं जातं तेव्हां विचित्र वाटतं. पोलिस या शब्दाचा मान धुळीस मिळवला जातो.असं काहीसं झालं होतं.शिपूर्ड म्हणजे तृतीय वचनी सर्वनाम वापरल जात.

ज्याला मराठी भाषा वाचता येते त्याला त्याच्या मधला विनोद नाही समजणार पण मराठी भाषा समजणाऱ्या जाणकार व्यक्तीच्या चेहऱ्यावर शिपूर्डा शब्द ऐकल्यावर आपसूकच हसू येणारचं ! खरं आहे ना.

असो.

याचं विचारात तिने तो सिग्नल आणि तो पोलिस यशस्वी पणे पार केला. तिला तिच्या सोसायटी मध्ये पोहोचायला चांगलाच उशीर झाला होता. ती घरी आली तेव्हा घरचं वातावरण गरम झालं होतं . तिची सात वर्षांची मुलगी नव्या समोर बोलणाऱ्या दोघींना समजावण्याचा प्रयत्न करत होती. एका बाजूला तिची सासू व दुसऱ्या बाजुला कामवाली बाई उभ्या होत्या. त्या दोघी एकमेकांशी तावातावाने भांडत होत्या. ते बघून प्राची घाई घाई ने घरात आली.

तिने त्या दोघींना आधी शांत केलं.

" हे बघा अस भांडू नका जे काही झालं ते नीट सांगा." प्राची

" मॅडम, इंनको समझावो, कुच भी बोलती हे "

" प्राची अग ही बघ काय बडबड करते. कसले कसले इशारे करते." सासू बाई म्हणाल्या.

" कसले इशारे करते ?"

" हे असले, मी अशी आहे का ?"

अस म्हणून त्यांनी डोक्याला अनामिका लावली. ती गोल गोल फिरवत, त्या कामवाल्या मावशींनी केलेला इशारा करून दाखवला.

" तुमने मम्मी को ऐसा इशारा क्यु किया ?"

" उन्होंने कहा मेरा आटा ढिला है , क्या में आपको ऐसा दिखती हू ? अगर ऐसी बात है तो मे कल से काम पे नही आऊगी, पेहेले ही बोल देती हु."

क्रमशः

🎭 Series Post

View all