Login

सल भाग =4

Katha eka purushachya manat sachlelya asha, apekshanchi

आता गीता आणि लताबाईंनी एकाच घरात वेगवेगळी चूल मांडली. गीताने आपल्या परीने सासुबाईंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. घरी लताबाईंच्या माहेरच्या लोकांचे येणे -जाणे फार वाढले, त्यांची खलबत सुरू झाली. आबांनी या साऱ्याचा धसका घेतला. त्यांना आपल्या इस्टेटीचे भविष्य डोळ्यासमोर दिसू लागले. त्यातच त्यांची प्रकृती बिघडली.

पण लताबाईंना आता त्याची पर्वा होती कुठे? त्यांना सारी मालमत्ता आपल्या नावावर करून हवी होती. त्यांचे पुन्हा बदलेले रूप राजेशसाठी नवीन नव्हते. पण या साऱ्या प्रकाराने गीता मात्र धास्तावली होती. तिने आबांना विनंती केली की, "माझ्या नावे घेतलेली जमीन राजेशच्या नावे करा." पण आबांनी ती जमीन तिच्याच नावे ठेवली. प्रकृती बिघडल्यापासून आबा, गीता आणि राजेशकडेच राहत होते. लताबाईंचा भाऊ, दिगू मामा हा येऊन -जाऊन लताबाईंना सोबत करत होता. घरात पडलेली ही फूट आबांचा जीव खात होती.

एके दिवशी त्यांनी लताबाईंना बोलावून घेतलं. "हा हट्ट सोडा. आता पुरे झालं. जे आमचं ते सारं काही तुमचंच आहे लता. राजेश हा एकुलता एक मुलगा आहे आपला."
"आपला मुलगा नव्हे. तुमचा म्हणा." लताबाई कितीतरी मोठ्यांनी म्हणाल्या.

"ते बरोबरच आहे म्हणा. म्हणून तुम्ही राजेशला सावत्र वागणूक दिलीत इतकी वर्षे. सारे काही उमजत होते आम्हाला. पण आम्ही तुमच्या विरोधात राजेशच्या मनात काही भरवले नाही. कारण त्याचा हा समज पक्का झाला असता की, सावत्र आई वाईटच वागते. आम्ही तुमच्या मागण्यांकडे, वागण्याकडे दुर्लक्ष केलं. या साऱ्याचा मनस्ताप नको म्हणून कामाचा व्याप वाढवत राहिलो. पण ती चूक ठरली आमची.
या साऱ्या मालमत्तेच्या हव्यासापायी तुम्ही वेगळी वाट निवडाल असं वाटल नव्हतं आम्हाला.

घरात नवी सून आली. तुमचे तिच्याशी चांगले बंध जुळले. पण एका जमिनीपायी तुम्ही आपल्याच सुनेशी असं वागाल, असंही वाटलं नव्हतं. अहो ती जमीन म्हणजे आमच्या नातवंडांची केलेली सोय होती." इतकं बोलून आबांना दम लागला. त्याबरोबर गीता धावत आली.
"आबा हे औषध घ्या आणि स्वस्थ पडा बघू. जास्त बोललं की ताण येतो. " गीताने बळेबळेच आबांना औषध दिलं.

तशा लताबाई तिथून उठून निघून गेल्या.

"काही दिवसांपूर्वी आम्हाला यायला उशीर झाला, तेव्हा डोळ्यात पाणी आणून आमची वाट पाहणाऱ्या याच का त्या लता? सुनबाई, राजेशच्या पहिल्या आई आम्हाला अचानक सोडून गेल्या. ते दुःख आम्ही कसं सहन केलं आमचं आम्हालाच माहित. राजेशला आई हवी म्हणून आम्ही पुन्हा लग्न केलं. पण यांनी आईची माया दिलीच नाही त्याला. राजेशला आई होती ती केवळ नावापुरतीच. आता वाटतं आम्ही सारी इस्टेट जर यांच्या नावावर केली असती तर यांनी कदाचित राजेशला आईची माया दिली असती. अगदी तसचं करायला हवं होत आम्ही." बोलता बोलता आबांना ठसका लागला.

इतक्यात राजेश आला. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. नाही म्हंटल तरी आबांनी ती हेरलीच. त्याने गीताला जरा बाजूला येण्याची खूण केली.

"जे व्हायला नको होतं तेच झालंय." आबांनी आपल्या व्यवसायातला जो अर्धा हिस्सा आईच्या नावे केला, तो तिने तिच्या भावाच्या म्हणजेच दिगू मामाच्या नावे केला आहे." राजेश घाईघाईने म्हणाला.

"काय?"  गीता एकदम ओरडली.

"हे आबांना कसं सांगायचं हाच मोठा प्रश्न आहे. पण सांगावं तर लागेलच. उद्या उलट -सुलट काही झालंच तर? मला कल्पनाही करवत नाही गीता." राजेश काळजीने म्हणाला.
"आता मामाच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. तो सहज सोडणार नाही हे. असं वागण्याआधी आईने निदान आबांचा तरी विचार करायला हवा होता."

"अहो. काळजी नका करू. सारं ठीक होईल ." गीता राजेशचा हात हातात घेत म्हणाली.

दुसऱ्या दिवशी गीता लताबाईंकडे आली. "आई ही कागदपत्र घ्या. माझ्या नावची जमीन मला नको. पण मामांच्या नावे केलेला हिस्सा तुमच्या नावावर असू द्या. वेळ काही सांगून येत नाही. हीच बाब उद्या अडचण ठरायला नको."

"आता तू मला शिकवणार? माझ्या माहेरची माणसं आहेत ती. त्यांना बोल लावलेले मला अजिबात खपणार नाही. घे ती कागदपत्र आणि निघ इथून." लताबाई रागारागाने म्हणाल्या.
___________________________

"ताई, अर्धा हिस्सा माझा म्हणजे अर्धा नफाही माझाच ना?" दिगू मामा लताबाईंना म्हणाला.

"हो रे. किती वर्ष धडपडत होते मी यासाठी! खरं तर ही गोष्ट आमच्या गीतामुळे साध्य झाली म्हणायची. तुझी पुढची सोय करून ठेवली मी. तुला ना धड नोकरी, ना काय.. तुझं घर चालायचं कसं? पोरांची शिक्षण कशी व्हायची? म्हणून हा सारा खटाटोप. पण ही जबाबदारी नीट सांभाळ म्हणजे झालं." लताबाई आपल्या भावाला समजावणीच्या सुरात म्हणाल्या.

हे ऐकून दिगू मामा निश्चिंत झाला. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. आपल्या मनातले भाव चेहऱ्यावर दिसू नयेत, म्हणून तो झटकन उठून बाहेर निघून गेला.

आता राजेश व्यवसायातला अर्धा नफा नाईलाजाने दिगू मामाला देऊ लागला. दिगू मामाचे प्रकरण आबांनी मनाला लावून घेतले होते. त्यामुळे आबांची स्थिती दिवसेंदिवस नाजूक बनत होती. आबांनी लताबाईंशी बोलणे टाकले होते. गीता राजेश त्यांची काळजी घेत होते, तर लताबाई आपल्या परीने आबांसाठी सारं काही करत होत्या.

एक दिवस दिगू मामा राजेशकडे आला. त्याने खोट्या कागदपत्रांद्वारे सारा व्यवसाय आपल्या नावावर करून घेतला होता.
"उद्यापासून व्यवसायातला सारा मिळणारा नफा हा माझा असेल. ही कागदपत्र आणि ह्या त्यावरच्या सह्या." असे म्हणत दिगूमामाने कागदपत्र राजेश समोर टाकली.

"हे सारं काय आहे? पण आबांनी तर कुठल्याही कागदपत्रावर सह्या केलेल्या नाहीत. त्यांची परिस्थिती आणि मनस्थितीही नाही कुठल्या कागदपत्रांवर सह्या करायची. ही अशी खोटी कागदपत्र दाखवून व्यवसाय तुझ्या नावावर होत नसतो मामा. त्याला आधी शिक्षण, मग अनुभव असावा लागतो आणि हे हाताखाली काम करणारे कामगार आहेत ना, त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असावे लागतात." राजेश तावातावाने बोलत होता खरा. पण आपण काय गमावले आहे, याचे त्याला भानही आले होते.

तशाच परिस्थितीत त्याने घर गाठले.

"वा लताबाई. शेवटी झालं तर तुमच्या मनासारखं!" आपल्या हातातली कागदपत्र पुढं करत तो म्हणाला, "तुम्ही जितक्या विश्वासानं व्यवसायातला अर्धा नफा आपल्या भावाच्या नावावर केला, तितक्याच विश्वासाने त्यांना सारा व्यवसाय आपल्या नावावर करून घेतला आहे. ही त्याची कागदपत्र.
लताबाई, तुम्हाला सारी इस्टेट हवी होती, तर गोड बोलूनही हे काम झाले असते. असा डाव खेळायची काहीच गरज नव्हती. आज सारा व्यवसाय त्याने आपल्या घशात घातला. उद्या हे घरही स्वतःच्या नावावर करून घ्यायला कमी करणार नाही. अशाने रस्त्यावर येऊ आम्ही. आबांनी कष्टाने मिळवलेली सारी ही इस्टेट अशीच धुळीला मिळेल. आजपर्यंत मी सारं काही सहन केलं. पण आता नाही.." राजेश मटकन खालीच बसला.

क्रमशः


 

0

🎭 Series Post

View all