दिवस सरत होते. राजेश आपला व्यवसाय परत मिळवण्यासाठी धडपडत होता. दिगू मामा ऐकत नाही म्हणून राजेशने आपल्या कामगारांना एकत्र केले आणि कामगारांनी आपल्याच कचेरीवर संप पुकारला. मामाला कामकाजाच्या बाबतीत फारशी काही माहिती नव्हतीच. त्यामुळे त्याची परिस्थिती विचित्र झाली. आता कामगारांनीही मूळ मालक परत येत नाही, तोवर काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामकाज बंद पडले. परिणामी मामाला मिळणारा नफाही बंद झाला आणि दिगू मामाची धुसफूस वाढली.
तसेच राजेशने एक प्रख्यात वकील हाताशी धरून व्यवसाय पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
गीताला सातवा महिना लागला. लताबाई आता डोहाळ जेवणाच्या तयारीत गुंतून गेल्या. होणारा 'बाप' म्हणून राजेशची जबाबदारी वाढली होती. त्याला आपल्या होणाऱ्या बाळासाठी आणि गीतासाठी काय करू आणि काय नको, असे झाले होते. सुख गवसल्याचा आनंद झाला होता त्याला.
"गीता मी खूप खुश आहे गं. तू 'आई 'होणार, या कल्पनेनेच तुला किती छान वाटत असेल नाही? तसाच बाप होण्याचा आनंद मलाही झाला आहे. माझी जबाबदारी खूप वाढल्यासारखी वाटते. मला जे मिळालं नाही ते सारं काही आपल्या बाळाला देण्याचा मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मी हा बाप बनण्याचा प्रवास अगदी मनापासून अनुभवतो आहे. जेव्हा ते चिमुकलं बाळ आपल्या हातात येईल ना.. तेव्हाचा तो क्षण किती अविस्मरणीय असेल! ही कल्पनाच मला खूप सुखावते आहे. खरंच या आनंदापुढे मला साऱ्या जुन्या गोष्टी विसरायच्या आहेत."
राजेशला आनंदात पाहून गीताही खूप सुखावली होती.
'एका स्त्रीची जशी विविध रूपं असतात, तसेच पुरुषाचीही अनेक रूपं असतात. तो कुणाचा मुलगा, नवरा, बाप असतो. तसेच आजोबा, काका, मामा, भाऊजी, मित्र अशी विविध नात्याची आभूषणे मिरवित असतो. अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतो. त्यांना प्रत्येक गोष्टीत स्थितप्रज्ञ राहण्याचा 'वर' मिळाला आहे की काय जणू? तसेच त्यांच्या मनाचा थांग कधीच लागत नाही. पुरुषही इतके भावनिक असू शकतात हे राजेशकडे पाहून कळले मला.' गीता आपल्याच विचारात हरवली होती.
"माफ करा आई. लहान तोंडी मोठा घास घेते, पण राजेश खूप हळवे आहेत हो. त्यांना तुमच्या मायेची, प्रेमाची गरज आहे." गीता आपल्या सासुबाईंना म्हणाली.
"माणसाची किंमत काहीतरी गमावल्यानंतरच कळते. तसं झालंय माझं. माझ्या पोटी मूल-बाळ नाही. मात्र राजेशला आपलं मानायचं सोडून मी सावत्रपणाला जवळ केलं. 'आई 'असण्याचा आनंद गमावला मी. आता तो माझ्याशी धड बोलतही नाही. मग माफ करणं तर दूरची गोष्ट आहे. म्हणतात ना, आपण दुसऱ्याला जशी वागणूक देऊ, तशीच आपल्याला परत मिळते. आपलं माणूस म्हणून दिगूला अर्धा व्यवसाय देऊन टाकला मी. पण त्याने सगळचं ओरबाडून घेण्याचा घाट घातला. ते पण राजेशच निस्तरतो आहे." लताबाई गीताला म्हणाल्या.
गीताचं डोहाळ जेवण पार पडलं आणि गीता आपल्या माहेरी जाण्यास निघाली. राजेशला गीता इथेच राहायला हवी होती. पण पहिले बाळंतपण माहेरीच होणार म्हणून गीताची आई तिला आग्रहाने माहेरी घेऊन गेली.
इकडे दिगू मामा अस्वस्थ होता. कारण व्यवसायातून आयता मिळणारा नफा बंद झाला होता. राजेशने त्याला वकिलांच्या मार्फत नोटीस पाठवली होती. आता कोर्टकचेऱ्या करण्याइतपत मामाकडे पैसा नव्हता की त्याची तशी मनस्थितीही नव्हती. लताबाई आपल्या भावाला गोड बोलून समजावत होत्या.
आता या प्रकरणात आबांनी लक्ष घातले. आबांच्या आजारपणाचा फायदा घेऊन त्यांचे काही खरे नाही, असे वाटून मामाने बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवसाय आपल्या नावावर करून घेतला. पण आता आबा ठीक झाले होते. त्यामुळे मामाला काही सुचत नव्हतं. लताबाईंना भेटायला जावं म्हंटल तर आबांना काय तोंड दाखवणार? आबांचा स्वभाव त्याला पुरता माहित होता. ते सहजासहजी आपल्याला माफ करायचे नाहीत, हे त्याला ठाऊक होते.
एक दिवस घरात कोणी नाही हे पाहून दिगू मामा घरात आला आणि जे काही केलं त्याबद्दल लताबाईंची माफी मागू लागला. 'आबांना आणि राजेशला मला माफ करायला सांग' म्हणून त्यांना विनवू लागला. पण या साऱ्याला लताबाई कारणीभूत होत्या. त्यामुळे 'माझ्या भावाला माफ करा' असे त्या कोणत्या तोंडाने सांगणार होत्या? त्यांचे त्यांनाच समजत नव्हते. राजेश त्यांच्यासोबत बोलत नव्हता. आबाही केवळ कामापुरतेच बोलत होते. गीता झालं गेलं विसरून नीट वागत होती. आता ती इथे नाही. पण दिगूला उपरती झाली ते ठीक झालं. राजेशने हा अबोला सोडावा, असं लताबाईंना मनापासून वाटत होतं.
रात्री राजेश घरी आला. जेवणं आटोपल्यावर न राहवून लताबाईनी विषय काढला. "हा अबोला सोड रे राजेश. हे मी काय करून बसले? हा विचार करून माझं मन मला खात राहतं. आबांच्या भीतीने दिगू सगळं परत करायला तयार आहे."
"मामाला सगळं परत करावं लागेलच. पण मी त्याला कसं माफ करू? माणसावर एकदा ना एकदा अशी वेळ येतेच, केव्हातरी त्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप होतोच. एक मात्र लक्षात ठेवा पुरुष आहे म्हणून तो सगळी वादळं झेलेलच असे होत नाही. त्यालाही मन आहे. इच्छा, भाव-भावना आहेत. त्याच्या सहन शक्तीला मर्यादा आहेत.
पण लताबाई तुम्ही एक आई म्हणून मला समजवायला आला असता, तर गोष्ट वेगळी होती. कदाचित मी ऐकलेही असते. पण एका भावाची बहीण म्हणून तुम्ही मला समजावता आहात. तसंही तुमच्यातली आई मी कधीच पाहिलीच नाही. पाहिले ते केवळ एक कर्तव्य. असो, आता आबांच्या सल्ल्यानुसार पुढच्या गोष्टी ठरवता येतील."- राजेश
"असे बोलू नको रे राजेश. मी चुकले. खरचं चुकले.." लताबाईंचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजेश तिथून निघून गेला.
___________________
शालेय स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्यानंतर राजेश धावतच घरी आला. "आई एक गंमत आहे" असे म्हणत आनंदाने त्याने ते बक्षीस लताबाईंपुढे धरले. पण लताबाईंच्या तोंडून कौतुकाचा एक शब्दही बाहेर पडला नाही. त्यांची कोरडी नजर मात्र राजेशला खूप दिवस सलत राहिली. आपल्या लहानपणीच्या आठवणीत राजेश रात्रभर तळमळत राहिला. झोप येईना म्हणून तो काम हाती घेऊन बसला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा