Login

सल ..

मोकळेपणी बोलणं गरजेचे .संवादाचे महत्व पटवून देणारी कथा
“काश्मिर ट्रीपला जाणं कॅन्सल केलं तर चालेल ना. पैसे परत मिळतील का? आशाताई स्वयंपाक घरात येत जयश्रीला म्हणाल्या.

त्याचं बोलणं ऐकून पोळ्या करणारा तिचा हात तसाच थबकला.

“काय झालं? बरं वाटत नाही का?”

“जावंस नाही वाटत. इच्छा होत नाही” पुटपुटत आशाताई बाहेर आल्या.

‘आठ दिवसांनी निघायचंय आणि ह्या नाही का म्हणतायत? अचानक काय झालं?’ गॅस बंद करत जयश्री आशाताईंच्या मागोमाग हॉलमध्ये आली.

“डॉक्टर कडे जाऊया का?” जयश्रीच्या सूरातून काळजी डोकावत होती.

“ट्रॅव्हल्सवाले पैसे परत देतील ना?” आशाताईंना भरलेल्या पैश्याची चिंता वाटत होती.

खूप खोदून खोदून विचारलं तरी अशाताई काही सांगायला तयार नव्हत्या. त्याचं आपलं एकच जावंस वाटत नाही. अचानक जाणं रद्द का करतायत सासूबाई जयश्रीला काही केल्या कळेना.

साधारण दोन महिन्यांपूर्वी जयश्रीचे आईवडील, आत्या, बिल्डिंग मधील शेजारी सगळ्यांचा मिळून काश्मिरला जायचा प्लॅन चालू होता. “तुझ्या सासूबाईंना विचार, पाठव आमच्या बरोबर. मंदाआत्या आणि त्या एक रूम शेअर करतील, दोघींचे छान जमते, एकमेकिंची सोबत होईल” एकदा बोलता बोलता जयश्रीची आई सहज तिला म्हणाली.

“एकदा तरी बघायचा आहे हा पृथ्वीवरील स्वर्ग” कुठली तरी सिरियल बघताना आशाताईंचे चमकलेले डोळे, त्यांनी बोलून दाखवलेली इच्छा जयश्रीला आठवली. तिने नवऱ्याला केदारला काश्मिर टूर बद्दल सांगितले. त्याला देखील ही कल्पना फार आवडली. सुरवातीला आशाताईंनी एकटी कुठे जाऊ वगैरे आढेवेढे घेतले, सुनेने मुलाने फोर्स केल्यावर त्या पण तयार झाल्या.

गरम कपडे, शूज, नवीन पर्स, प्रवासात सोयीचे पडतील म्हणून ड्रेस सगळी खरेदी झाली. पॅकिंग सुरू झाली होती. “तरुणपणी कधी ड्रेस घातले नाही आता म्हातारपणी हौस भागवते” म्हणत घरी आल्यावर आरश्यात बघत आशाताईंनी ड्रेस ट्राय देखील करून पहिले होते. बीपी, डायबेटिस कसलाच त्रास नव्हता तरी लांबचा प्रवास म्हणून रूटीन चेकअप दोन दिवसांपूर्वीच करून झालं होतं. “बिनधास्त जा, प्रवास एन्जॉय करा” डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिला होता. गेल्या काही दिवसांचा घटनाक्रम चटकन जयश्रीच्या डोळ्यासमोर आला. सगळं काही ठरल्या प्रमाणे चालू असताना माशी कुठे शिंकली याचा उलगडा होत नव्हता. आशाताई काही सांगायला तयार नव्हत्या.

“मी जाऊ ना. मुलांच्या चाचणी परीक्षा चालू आहेत त्यामुळे सुट्टी मिळणार नाही. जावंच लागेल” चाचरत जयश्रीने आशाताईंना विचारले.

“खुशाल जा, उगाच कशाला सुट्टी घेतेस. मी ठणठणीत आहे.” आपण अचानक ट्रीपला जायचं नाही म्हणल्यामुळे जयश्री गोंधळून गेली आहे हे आशाताईंच्या लक्षात आलं होतं पण त्यांना विषय वाढवायचा नव्हता, सूनेतली शिक्षिका जागी झाली तर का जात नाही? कारण सांगा म्हणत मुलांच्या ऐवजी आपली शाळा घेईल त्यामुळे त्यांनी तिला शाळेत पिटाळलं.

सासूची आज्ञा पळत जयश्री शाळेत निघाली, घरातून बाहेर पडल्या पडल्या लगेचच तिने केदारला फोन लावत सगळी हकीकत सांगितली. लास्ट मूव्हमेंटला आई नाही म्हणते कळल्यावर तो ही शॉक झाला.

“मी बोलतो आईशी घरी आल्यावर, तू टेन्शन घेऊ नकोस आणि लगेच तुझ्या आईबाबांना काही सांगू नकोस. सगळे मिळून जात आहेत, त्यांचा मूड नको जायला. आपण कन्व्हेअन्स करू आईला.”

केदारशी बोलून जयश्री रिलॅक्स झाली तो आईला समजवेल खात्री पटल्यावर तिने फोन ठेवला.

आशाताईंच्या माहेरची परिस्तिथी अगदी बेताची. वडील भिक्षुकी करत त्यावरच उदरनिर्वाह चाले. माधवरावांशी लग्न होऊन सासरी आल्यावर फारसा फरक पडला नव्हता. माधवराव सगळ्यात मोठे, भावाचे शिक्षण, बहिणींची लग्न, संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी होती त्यांच्यावर. नोकरी निमित्त माधवराव कल्याणला स्थायिक झाले असले तरी नियमित गावी पैसे पाठवावे लागत होते. पोटाला चिमटा घेऊन संसार चालला होता दोघांचा. दोघांचं शिक्षण जेमतेमच, शिक्षणाच्या अभावामुळे आपल्यावर ही वेळ आली दोघांना कळून चुकले होते म्हणूनच मुलांना शिकवायचे, काहीही झालं तरी त्यांच्या शिक्षणात खंड पडू द्यायचा नाही त्यांनी ठरवले होते. मुलांचं शिक्षण आणि स्वतःच हक्काचं घर ही ध्येय पूर्ण करण्यासाठी दोघे झटत होते. माधवरावांना शिफ्ट डुटी असत, ते आपली नोकरी सांभाळून फावल्या वेळात रिक्षा चालवायचे तर आशाताई पाळणाघर. परिस्थिती नसताना मोठ्या मुश्किलीने त्यांनी केदारला इंजिनिअर आणि लेकीला एम.ए. बीएड केले.

कधी बोनस, जास्तीचे पैसे मिळाले तर आशाताई बाजूला ठेवत, चला फीची सोय झाली म्हणत. फिरणं, मौजमजा असा कोणताच विचार त्यांच्या मनात येत नसे. तशी माधवरावांना फारशी प्रवासाची आवड नव्हती, आशाताईंना फार आवडायचा फिरायला पण विशेष कधी कुठे जायला जमलंच नाही. माहेरी, कुलदेवीदर्शन, नात्यागोत्यातील लग्नकार्य यापुढे त्यांची गाडी कधीच गेली नाही. प्रायव्हेट कंपनीत नोकरी असल्यामुळे पेन्शनचा प्रश्नच नव्हता. पीएफ मधील बरीच रक्कम मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न यासाठी काढून झाली होती. त्यामुळे रिटायर्ड झाल्यावर फिरायला जाणं हा विचार त्यांच्या खिशाला परवडणारा नव्हता.

“किती वर्ष कष्टच करणार आहात, आता जरा आराम करा. आठ दहा दिवस फिरून या कुठेतरी, मी बुकिंग करतो” नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर केदार आई, अण्णांना म्हणाला होता.

“ताई यायची आहे डिलिव्हरी साठी. आता कुठे फिरायच काढतो आहेस. एकदा तुमचं सगळं मार्गी लागलं की मग आम्ही जाऊ टूरला” आशाताईंनी हसून केदारचे म्हणणे फेटाळून लावले होते.

नेहमी असंच काहीतरी घडत गेलं आणि जायचं राहून गेलं ते गेलंच. पुढे वर्ष दोन वर्षात माधवरावांना कॅन्सरने ग्रासले मग कुठलं आलंय फिरणं…त्यांच पथ्यपाणी, केमो आशाताईंनी स्वतःला त्याच्या सेवेत वाहून घेतले.

आई वडिलांच्या कष्टाची मुलांना जाण होती. अण्णांसाठी काही करता आलं नाही आईच्या आयुष्यात तरी आनंदाचे क्षण यावेत यासाठीच त्यांनी काश्मिर ट्रीपचा घाट घातला होता पण ऐनवेळी आशाताईंनी नंन्हाचा पाठा लावला होता.

“पैसे परत मिळणार नसतील तर मग जाते.” रात्री घरी आल्यावर केदारने विचारल्यावर आशाताई म्हणाल्या.

“असं नको आई, मनापासून जायचं असेल तरच जा. पैश्याचे टेन्शन घेऊ नकोस. ते मी बघून घेईन.” केदारने आईला निक्षून सांगितलं.

“मी येत नाही कळवून टाक तुझ्या आईबाबांना” जयश्रीला सांगत आशाताई त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या.

“तिच्या मनात नसेल तर जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे. अजून जायला अवकाश आहे. काहीतरी मार्ग निघेल. इतक्यात कोणाला काही सांगू नकोस. काही झाले का सकाळी.”

“नाही रे, काहीच नाही. मी शाळेत जायच्या गडबडीत होते, अचानक आईने येऊन सांगितले.” जयश्रीने परत एकदा सगळे केदारला सविस्तर सांगितले.

“जितका जास्त फोर्स करू तितका विरोध वाढेल. आईच्या मनात काही सलत असेल तर ती स्वतःहून सांगेल. ”

जयश्रीला केदारचे म्हणणे पटले, तिने देखील सारखं सारखं या विषयावर बोलणे बंद केले. सगळे नॉर्मल वागायचा प्रयत्न करत होते.

“कुठपर्यंत आली तयारी?” सोमवारी निघायचे आहे ना आशाताईंना” शेजाऱ्याच्या जोशीकाकूंनी जयश्रीला रस्त्यात गाठून विचारले.

“सासूबाईंनी जाणं कॅन्सल झालंय” अचानक समोर येऊन विचारलेल्या काकूंच्या प्रश्नाने गडबडलेली जयश्री पटकन बोलून गेली.

“काय झालं? प्रकृती बरी आहे ना!”

ट्रीपला जात नाहीत म्हंटल्यावर कोणाच्याही मनात हेच येणार. जोशीकाकूंपासून लपवण्यासारखे काही नव्हते. बरेच वर्ष शेजारी शेजारी रहात असल्याने दोन्ही कुटुंबांचा चांगला घरोबा होता. जयश्रीने काकूंना सगळा प्रकार सांगितला.

“किती उत्साहात होत्या आशाताई, लेकीने स्वेटर कुरिअर केला. सूनेबरोबर जाऊन खरेदी केली उत्साहात सांगत होत्या मला” बोलत बोलत काकू आणि जयश्री घरी आल्या.

त्या दोघींना एकत्र बघून आशाताईं काय समजायचं ते बरोबर समजल्या. जयश्री आसपास नाही हे पाहून स्वतःच जोशी काकूंशी बोलू लागल्या.

“लोक काय म्हणतील, ह्यांना जाऊन दोन वर्ष सुद्धा झाली नाहीत. म्हातारचळ लागलेत म्हणतील या बाईला, त्यापेक्षा नको. ह्या वयात तिर्थस्थळ एखादी यात्रा वैगरे ठीक आहे, हे काश्मीर वैगरे खरंच नको” बऱ्याच दिवसापासूनची बोचनारी सल बाहेर पडत होती. समवयस्क असल्याने जोशीबाईंशी आशाताई मनमोकळेपणाने बोलत होत्या.

“तुम्हाला विचारूनच तर घाट घातला ना मुलांनी. आधी तयार होतात मग आता अचानक काय झाले? कोणी काही बोललं का?” काकूंनी मनात घोळणारे प्रश्न विचारले.

“प्रत्यक्ष नाही पण अपरोक्षपणे कुजबूज कानावर आली आणि मी बिथरले. माझे मन मला खाऊ लागले. नवऱ्याच्या पश्चात असं…”

“लोकांचा विचार करू नका. ती दोन्ही बाजूने बोलतात. तुमचा नेटाने केलेला संसार, कष्टमय आयुष्य, माधवभाऊंच्या आजारपणात शेवटपर्यंत दिलेली साथ, सेवा सगळं मी जवळून पाहिलं आहे त्यामुळे कुठलेच भलते सलते विचार मनात आणू नका. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपल्या स्वर्गीय जोडीदाराची जागा कोणीच घेवू शकत नाही, त्यांची वाटणारी उणीव भरूनही काढता नाही पण म्हणून आयुष्य थांबवता येत नाही ना. कोणीतरी एक जण आधी जाणार कोणीतरी मागे रहाणार. दुःखाचे प्रदर्शन मांडले म्हणजेच उरात दुःख आहे असं थोडीच असतं. तुमच्या पश्चात माधवराव अश्रू गाळत बसले असते तर तुम्हाला चाललं असतं का? संधी चालून आली आहे ती सोडू नका. हातपाय धडधाकट आहेत तोवर फिरून या. तुमची सून, मुलं गुणी आहेत, आईवडिलांच्या कष्टाची जाणं आहे त्यांना. त्यांच्या प्रेमाचा अनादर करू नका. त्यांच्या आनंदवर पाणी फिरवू नका” जोशीकाकू आशाताईंना समजवून सांगत होत्या.

“तुमच्याशी बोलून बरं वाटलं. आधी उत्साहात होते, मग माझं मन मला खायला लागलं.”

“उगचं कुढत बसलात. मुलाशी, जयश्रीशी बोलला असतात तर त्यांनी देखील हेच सांगितलं असतं.”

“समजूतदार आहेत दोघं, मला मेलीला मनातलं सांगता येत नव्हतं” ओलावलेल्या कडा पुसत आशाताई म्हणाल्या.

“तयार झाली ग तुझी सासू काश्मिरला जायला” चहा घेऊन येत असलेल्या जयश्रीकडे पहात काकू म्हणाल्या.

“तुम्ही त्यांना तयार करणार, खात्री होती. समजून घेणार, सांगणारं कोणी असलं की बरेच प्रश्न सुटतात. फक्त मोकळेपणाने बोलले पाहिजे.” जयश्री काकूंचे आभार मानत म्हणाली.

जोशीकाकूंनी आशाताईंच्या मनातील सल अलगद दूर केल्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण परत पूर्ववत झाले. सगळे कुटुंबीय आनंदात काश्मिर टूरच्या तयारीला लागले.