जनाबाई व राकेशची चाहूल लागताच ती व्यक्ती हळूहळू डोळे उघडते व त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून बोलायला सुरुवात करते.
“नमस्कार, मी शूलपाणि! बरेच लोक मला देवाचा माणूस म्हणून ओळखतात. मी इथे भगवंताने सोपवलेल्या एका विशिष्ट कार्यासाठी आलो आहे. तुमच्या नातीचा हा पुनर्जन्म आहे. गेल्याजन्मीही तिला खंडोबाचे वरदान होते आणि ते या जन्मातही आहे. तिची काळजी करू नका, खुद्द खंडोबाच तिचा राखणदार आहे. तिच्यासोबतच तिच्या गतजन्मातील जोडीदाराचाही जन्म झाला आहे पण त्यांच्या मिलनाला अजून वेळ आहे. त्या दोघांची पत्रिका मीच बनवेन तेव्हा तुम्ही काळजी नका करू आणि अजून एक तुम्ही हिचे नाव भैरवी ठेवा. मार्तंडची भैरवी!” असे म्हणत शूलपाणि खूश होतात.
“मला एक प्रश्न पडला आहे, विचारू का?” राकेश
“हो, विचारा ना!” शूलपाणि
“तिला धोका तर नाही ना कसला?” राकेश
“अहो, ती स्वतःच देवाचा अंश आहे तिला कसला धोका येणार आहे? त्यात मी आणि माझ्यासारखे अनेक आहेत की तिच्या सुरक्षेसाठी! आणि हो, तुम्हाला सांगायचे राहून गेले तुमच्या नातीला पाहायला उद्या आणखी एक देवाचा माणूस येणार आहे. त्यांनी तुमच्या नातीला तिच्या गतजन्मात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. ” शूलपाणि
“माझा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे. त्याने जे भैरवीसाठी योजले आहे त्यात आम्ही ढवळाढवळ करणार नाही. तुम्हाला हवी ती मदत करायला आम्ही तयार आहोत. माझ्या नातीच्या गतजन्माबद्दल तुम्ही सांगू शकाल का?” जनाबाई
“हो, तुम्हाला तिचा गतजन्म पूर्ण माहिती असायला हवा आणि ते सर्व सत्य तुम्हाला सांगणार आहे पण तुमचे सासरे नाहीत का इथे त्यांच्याही कानावर घालायचे होते.” शूलपाणि
“ते सध्या कामानिमित्त दुसऱ्या गावात गेले आहेत आणि त्यांचापर्यंत रुक्मिणी बाळंत झाल्याचा निरोप पोहोचता केला आहे तर ते उद्या घरी येतील.” जनाबाई
“रुक्मिणीलाही, या सर्वांची कल्पना द्यावी लागेल. मी तिच्यापासून हे एवढे मोठे सत्य लपवू शकणार नाही.” राकेश
“भैरवीची आई या नात्याने तिला हे सत्य मीच सांगेन. भैरवीला घडवण्यात रुक्मिणी आणि जनाबाईंचा सिंहाचा वाटा असणार आहे.” शूलपाणि
“देवाच्या कार्याला हातभार लागतो आहे यातच समाधान आहे मला. माझ्या नातीच्या पायाशी सर्व सुखे लोळण घालू देत हीच अंबाबाई चरणी प्रार्थना!” जनाबाई
“शुभम भवतू! बर आता मी भैरवीचा गतजन्म म्हणजेच म्हाळसाविषयी काय सांगतो ते नीट ऐका. काही शंका असेल तर विचारा.” शूलपाणि
म्हाळसा कोण होती आणि तिच्याजवळ असलेल्या शक्तींविषयी, तिच्या सदाशिववरच्या प्रेमाविषयी व खंडोबावरच्या अगाध भक्तीविषयीची माहिती शूलपाणि यांच्याकडून ऐकताना जनाबाईंचे डोळे पाणावतात व यावेळी आपल्या नातीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे ठरवतात. जोवर ती आणि मार्तंड एक होत नाही तोवर जिवंत ठेवण्याचे साकडे मनोमन त्या अंबेमातेला घालतात. नेमके त्याचवेळी “एवढ्यात तुमचे प्रस्थान होणार नाही आजीबाई, अजून खूप काही करायचे आहे तुम्हाला! त्यामुळे निर्धास्त रहा.” असे शूलपाणि यांनी आश्वस्त करताच त्या चकित होतात. हा माणूस काही साधासुधा नाही हे याची खात्री त्यांना त्याक्षणी झाली.
त्याचदरम्यान, जगतापांच्या घरात पिंगलाक्ष त्यांना दिलेल्या खोलीत ध्यानाला बसलेले असतानाच त्यांच्या डोळ्यांसमोर दिसलेल्या दृष्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरते आणि ते हळूहळू डोळे उघडतात. “अखेर तू आलीस, माफ कर यावेळी मात्र मी सदाशिवसोबत असणार आहे पण तुला भेटायला येत राहीन मी. कायम अशीच हसत आणि सुखी रहा!” असा मनोमन विचार ते करतात.
गतजन्मात नुकत्याच सुरु झालेल्या संसाराची अनुभूती घेण्याआधीच म्हाळसा आणि सदाशिवचा मृत्यू झाला. मात्र त्यांचा हा शेवट सूर्यभानने कपटाने घडवून आणला होता. त्यावेळी त्याची म्हाळसाला मिळवण्याची महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिल्याने तोही म्हाळसा व सदाशिवप्रमाणे जन्म घेणार आहे. या जन्मात सुर्यभानचा सूड पूर्ण व्हावा यासाठी त्याचा तथाकथित गुरु कृपालदेव प्रयत्नशील असणार आहे.
अंगात सफेद सदरा आणि धोतर,डोक्यावर बांधलेला फेटा व कपाळावर लावलेला भंडारा, अंगावर घोंगडी आणि हातात काठी अशा पेहरावातला पण पिळदार शरीरयष्टीचा व्यक्ती एका डोंगरावर उभा राहून जेजुरीच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळत होता. “बहुतेक पिंगलाक्ष यांना माझी लवकरच गरज पडेल. मार्तंड आणि भैरवीच्या जन्माविषयी एव्हाना कृपालदेवला समजल्याने मार्तंडच्या जीवाला जास्त धोका निर्माण झाला आहे. मला तातडीने निघावंच लागेल.” असे मनाशी पक्के करून तो व्यक्ती तिथून घाईने निघतो.