चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
समज
" देवाच्या नावाने दोन रुपये द्या ओ, देव तुमचं भले करेल."
दरवाजात उभा असलेला गरीब, फाटकी कपडे घातलेला लहान मुलगा राजेशकडे हात पुढे करून मागणी करू लागला.
त्याला बघून राजेश त्याला म्हणाला," काय रे बाबा? तू इथे आत सरळ दारात कसा आलास? कोणी थांबवलं नाही का तुला?"
त्याच्या प्रश्नावर त्या मुलाने काही प्रतिक्रिया दिली नाही. काही क्षण त्याला नीट पाहिल्यावर राजेशच्या लक्षात आले की, तो त्याचाच दहा वर्षाचा मुलगा सोनू आहे. त्याने दरवाजाच्या बाहेर डोकावून आजूबाजूला पाहिले आणि लगेच सोनूला आत ओढून घेतलं आणि दरवाजा धाडकन बंद केला.
आत येऊन त्याला समोर उभा करून राजेश खाली बसला आणि बोलू लागला,
" सोनू, हा काय प्रकार? हा कसला नवीन खेळ?"
" सोनू, हा काय प्रकार? हा कसला नवीन खेळ?"
पुन्हा त्याच्या प्रश्नाला दुर्लक्षित करून सोनू एक हात पुढे करून बोलू लागला," काही तरी द्या ना ओ, खूप भूक लागली आहे."
आपल्या मुलाचे खुळ राजेशला समजेना झाले. आज रविवारची सुट्टी, म्हणून दुपारच्या वेळेस तो सोफ्यावर निवांत पडून पेपर वाचत बसला होता. सोनूची आई आत स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. त्यांचा मुलगा सोनू बाहेर मुलांसोबत खेळत आहे असं त्यांना वाटले. तेव्हा अचानक दरवाजा वाजला आणि समोर त्याला सोनू दिसला.
बाबांकडून काही न मिळाल्यामुळे सोनू तसाच चालत आत स्वयंपाकघरात आई जवळ गेला. आईकडे जाऊन देखील तो तेच बोलू लागला. आईने जेवण बनवतानाच मागे वळून त्याच्याकडे बघितले आणि ती त्याचा अवतार बघून चक्रावून गेली. फाटलेली बनियान, फाटकी चड्डी, विस्कटलेले केस आणि अंगाला जागोजागी मातीचे डाग.
त्याचा तो अवतार बघून तिला चिड आली. ती ओरडूनच त्याला बोलू लागली," सोनू, ही काय अवस्था केली आहेस ? काय चाललं आहे तुझं?"
तिच्या प्रश्नाला देखील सोनूने दुर्लक्षित केलं आणि तो पुन्हा तिच्याकडे तशीच मागणी करू लागला.
ते बघून तिचा राग आता अनावर झाला. तिने धपकन त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. ते दिसताच मागे उभा असलेला राजेश पुढे येऊन तिला थांबवून बोलू लागला,
" अगं थांब, मारतेस काय? त्यांचा काही खेळ असेल नाही तर तो वेशभूषा स्पर्धेचा सराव करत असेल ."
ते ऐकून त्याची बायको चिडूनच त्याला बोलू लागली," अहो, पण असली कसली वेशभूषा? भिकारी?"
ते ऐकून राजेश तिला म्हणाला," आता ते आपल्याला सोनूच सांगेल काय ते. हो ना सोनू?"
इतकं बोलून त्याने बाजूला पाहिले पण सोनू तिथे नव्हता. ती गॅस बंद करून बाहेर हॉलमध्ये आली, तर बाहेर त्यांना एका कोपऱ्यात सोनू मान खाली घालून रडताना दिसला. ते बघून दोघे लगेच त्याच्या शेजारी जाऊन बसले. त्याला अशी का अवस्था केली हे विचारू लागले. त्याच्या आईने त्याला मारलं, म्हणून तो रडत आहे असं त्यांना वाटले.
त्याचं रडणं आता इतकं वाढलं की, रडता रडता त्याला दम लागला. त्याच्या आईने धावत जाऊन लगेच पाणी आणले आणि त्याला पाणी पाजले. पाणी पिऊन तो थोडा शांत झाला.
शांत झाल्यावर राजेशने पुन्हा त्याला काय झाल्याचे विचारले. तेव्हा तो हलकासा रडत त्यांना हळूहळू बोलू लागला," आई - बाबा, तुम्ही दोघे मला सोडून गेल्यावर मला हेच करावं लागणार ना? मग आधीपासूनच त्याची सवय मला करून घ्यायला नको का?"
त्याच्या तोंडून ते वाक्य ऐकून त्या दोघांना धक्काच बसला.
त्याच्या तोंडून ते वाक्य ऐकून त्या दोघांना धक्काच बसला.
त्याचं बोलणं ऐकून त्याच्या आईच्या डोळ्यातून तिच्या नकळतच अश्रू वाहू लागले. ती तशीच त्याला बोलू लागली," बाळा काय बोलतो आहेस तू हे? तू आमचा जीव आहेस? आम्ही नाही तुला कधी सोडून जाणार कुठेच."
तिचं बोलणं ऐकून सोनू पुढे पुन्हा रडत बोलू लागला," नाही आई, तुम्ही जाणार मला माहीत आहे. काल खाली खेळताना आम्हाला एक गेट जवळ एक गरीब मुलगा दिसला. आम्ही आमच्याकडचे चॉकलेट त्याला दिले. तो खुश होऊन ते खाऊ लागला. तेव्हा ते खाताना मी त्याला विचारले,' तुला तुझे आई बाबा चॉकलेट नाही देत का?'
त्यावर तो म्हणाला, 'माझे आई बाबा ह्या जगात नाही आहेत. ते मला आणि माझ्या छोट्या बहिणीला सोडून गेले.' मग ते त्याला सोडून कुठे, कसे आणि का गेल्याचं? आम्ही विचारले. त्यावर तो सांगू लागला,' आमचे सुद्धा छान कुटुंब होते. आई, बाबा, मी आणि माझी लहान बहिण. मी शाळेत जात होतो. सगळ छान चालू होतं, पण अचानक आई आणि बाबा अचानक आजारी पडले. त्यांच्या आजाराचे कारण आम्हा लहान भाऊ बहिणीला समजले नाही, पण डॉक्टर म्हणाले की त्यांच्या वाईट सवयीमुळे त्यांना तो आजार झाला. बघता बघता त्यांचा आजार इतका वाढला की, ते आम्हाला सोडून गेले ते कायमचे.'
त्याचं ते बोलणं ऐकून आम्हाला सगळ्यांना वाईट वाटलं. त्याने काही चॉकलेट त्याच्या बहिणीसाठी खिश्यात भरून घेतले. तेव्हाच मी त्याला त्याच्या आई वडीलांना नक्की कोणत्या वाईट सवयी होत्या ते विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं,' माझे बाबा खूप दारू प्यायचे आणि आईला दिवसातून बऱ्याच वेळा तंबाखू खायची सवय होती आणि त्यांच्या त्याचं सवयींमुळे आम्ही भाऊ बहीण अनाथ झालो आणि रस्त्यावर आलो.'
त्याचं ते बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला लगेच तुमच्या दोघांची आठवण झाली.
आई बाबा, तुम्हाला दोघांनाही त्या सवयी आहेत. तुम्ही दोघे माझं जग आहात, माझं सर्वस्व आहात. तुम्हीच जर मला सोडून गेलात, तर मी काय करणार? कसं जगणार? जर तुम्हाला काही झालं तर मी सुद्धा तसाच रस्त्यावर येणार ना? खाण्यासाठी भीक मागत फिरावं लागणार ना मला?"
सोनूच्या तोंडून ते सगळं ऐकून त्याचे आई बाबा अगदी थक्क आणि निशब्द झाले. दोघांच्या डोळ्यांमधून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी काही न बोलता रडतच सोनूला उराशी कवटाळले.
काही क्षण तसेच गेल्यावर त्यांनी दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि तसेच उठून आत गेले आणि काही क्षणातच बाहेर आले. त्यांच्या हातात त्यांच्या व्यसनाचं सामान होते आणि राजेशच्या दुसऱ्या हातात कचऱ्याचा डब्बा होता.
त्यांनी दोघांनी सोनू समोर त्यांच्या हातातले त्या डब्यात टाकले आणि एकत्रच त्याला बोलू लागले," बाळा ह्यापुढे आम्ही कधीच ह्या गोष्टींना हात लावणार नाही आणि तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही."
त्यांच्या तोंडून ते वाक्य ऐकून सोनूला आनंद झाला आणि तो हसतच उठून त्या दोघांना येऊन बिलगला.
आज सोनूने त्याच्या आई बाबांना चांगलीच समज दिली आणि व्यसनामुळे उध्वस्त होण्यापासून एक कुटुंब वाचले.
समाप्त.
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा