Login

समजूतदार (भाग-२)

समजूतदारणा नातं टिकवण्याची ताकत आहे हे सांगणाऱ्या एका कुटुंबाची कथा

#जलद लेखन स्पर्धा:- ऑक्टोबर -२०२५

विषय:- थोरलेपण

शीर्षक:- समजूतदार

भाग:-२

हा सगळा तमाशा दाराआड लपून कांचन ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पसरला होता.

अनिल जसा त्यांच्या रूमकडे जायला वळला तशी तिने पटकन त्याच्या आधीच रूम गाठून पुस्तक उघडून अभ्यास करण्याचे नाटक करू लागली.

"स्वतःला समजते कोण ही? तिला थोरलेपण आहे म्हणजे ती कशीही वागेल, बोलेल काय? " रूममध्ये आल्या आल्या तो येरझाऱ्या घालत बडबडत होता.

"अहो, जाऊ द्या ना. मी नाही काही मनावर घेत. असतो हो एखाद्याचा स्वभाव, नेहमी त्यांना थोरलेपणाचा टेंबा मिळवायचा असतो." ती समजूतदारपणाचा आव आणत म्हणाली.

"किती समजूतदार आहेस तू! आणि तरी वहिनी तुलाच बोलते. पण उद्यापासून ती तुला काहीच बोलणार नाही. चांगला खडसावून आलोय मी तिला." तो खूप मोठा तीर मारून आल्यासारखा तिला म्हणाला.

इकडे हरी रेखाची समजूत काढत म्हणाला,"अन्याच बोलणं मनावर घेऊ नकोस, रेखा. मी उद्या पुन्हा त्याला समजावून सांगतो."

"छे हो, मी नाही काही मनावर घेतलं. मुलगा मानलं आहे त्याला. तो ऐकून न घेता बोलतो याच वाईट वाटत ओ. बाकी काही नाही." नेहमी प्रमाणे रेखाने समजून घेत समजूतदारपणा दाखवला.

हरीला तिच्या या समजूतदारपणाचं कौतुक वाटलं. तो कौतुकाच्या नजरेने पाहत तिला म्हणाला,"एक वेळ अशी येईल त्याला त्याची उपरती होईल."

"देव करो, ती वेळ लवकर येवो." ती वर छताकडे पाहत म्हणाली.

हरी व अनिल लहान असतानाच त्यांच्यावरील आईवडीलांचे छत्र नियतीने हिरावून घेतले.

हरीचे रेखाशी लग्न झाल्यावर त्यांनी स्वतःचे मूल होऊ न देण्याचा कठोर निर्णय घेऊन अनिललाच मुलगा म्हणून त्याचे पालनपोषण खूप छान केले. अनिलही त्यांच्यावर तितकीच माया करत होता.

पण सहा महिन्यांपूर्वी अनिलचे कांचनशी लग्न झालं आणि सगळे चित्रच बदलून गेले.

सुरूवातीला सगळं काही छान होतं. रेखा कांचनला तिच्या छोट्या बहिणी प्रमाणे वागणूक देत होती. घरातील सर्व कामे ती एकटीच करायची. कधी तिने तक्रार केली नाही. रेखा मुळातच समजूतदार होती त्यामुळे ती नेहमी तिला समजून घेत होती.

अनिलचे दादा वहिनींना मान देणे, त्यांचे ऐकणे कांचनला रूचल नाही. तिचं पदवी पर्यंतचे शिक्षण झाले होते. पदवी उत्तर शिक्षण घेण्याची तिने इच्छा व्यक्त केली. जास्त आढेवेढे न घेता हरी आणि रेखा यांनी त्याला हसत संमती दिली.

त्याच शिकण्याचं भांडवल करून तिने बरोबर रेखावर निशाना साधला. अनिल असताना ती रेखाचे सर्व काही ऐकायची पण तो नसल्यावर ती तिला उद्धटपणे बोलायची. ऐकून न ऐकल्यासारखी करायची. काही काम सांगितले की अभ्यासाचा बहाणा सांगायची.

संध्याकाळी अनिल आणि हरी घरी आले की त्यांच्या पुढे काम करून थकल्यासारखे नाटकं करायची.

रूममध्ये गेल्यावर रेखाने खूप काम सांगितले म्हणून तिचा अभ्यास तसाच राहिला असे सांगत असायची. खरं तर त्याला ते सुरूवातीला खरं वाटत नव्हतं; पण ती अभिनय करण्यात खूप पटाईत होती. ती असा काही अभिनय करायची की त्याला ते सर्व खरे वाटू लागले.

क्रमशः

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all