#जलद लेखन स्पर्धा:- ऑक्टोबर-२०२५
विषय:- थोरलेपण
शीर्षक:- समजूतदार
भाग:-१
"लग्न झाल्यापासून भावजी खूपच बदललेत. जरा काही त्यांना किंवा कांचनला बोलले तर लगेच उलट उत्तर देतात." रेखा तिचा छोटा दिर अनिलची तक्रार तिचा नवरा हरीजवळ करत होती.
हरी काही बोलणार तोच अनिल तिरमिरीत येत म्हणाला,"छान वहिनी ! झाली का माझी चुगली करून? दादाचे चांगले कान भरत आहेस तू? "
"अरे अन्या, ही कुठली पद्धत झाली वहिनीशी बोलण्याची?" हरीही चिडत म्हणाला.
"अहो भावजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी फक्त त्यांना सांगत होते. बाकी काही नाही." रेखा अनिलला समजावत म्हणाली.
"ऐकलं ना मी, तुम्ही सांगत होता की चाड्या करत होतात ते. उगीच चांगुलपणा आणि समजूतदारपणा कशाला ओ दाखावा करता. सरळ समोर बोला की माझ्या तोंडावर." अनिल पुन्हा उद्धटपणे तिच्या समोर बोट नाचवत म्हणाला.
"अन्या, तोंड आवर. कसा उद्धटपणे बोलतोस तू? ती शांतपणे समजावून सांगतेय ना. का तिला असं बोलतोस?" त्याचे नाचवणारे बोट झटकत हरी रागात म्हणाला.
"तिलाच विचार ना, ती काय म्हणाली माझ्या बायकोला? " अनिल तिच्याकडे मोठे डोळे करत म्हणाला.
"अहो भावजी, मी तर फक्त तिला संध्याकाळचा स्वयंपाक करशील का म्हणून विचारले होते. तिला अभ्यास करायचा आहे म्हटल्यावर मग मी राहू दे म्हटलं होतं. नंतर मी तिला जेवायला चल म्हणून बोलवायला गेले तर ती रिल्स बघत होती. तेव्हा मी म्हणाले की हाच अभ्यास करायचा होता तुला? तर तिनेच उलट कांगावा केला. अरेरावीने बोलली मला, तरीही मी तिला काही बोलले नाही. आणि तिला काही बोलले की तुम्ही नेहमीच मला बोलता." आज रेखाचाही सहनशक्तीचा बांध फुटला, तिनेही त्याला अनिलची बायको कांचनची अरेरावी सांगितली.
"ऐकलेस ना तुझे बायकोचे प्रताप! अजून काही बोलायचे आहे का तुला?" हरी हाताची घडी घालून त्याच्याकडे पाहत म्हणाला.
"ती अभ्यासाचं करत होती, वहिनी. तिला कंटाळा आला म्हणून ती नुकतेच रिल्स पाहायला आणि तू बघायला गाठ पडली. पण तू तर काहीही विचार न करता सरळ तिला टोमणा मारलास. कसं वाटलं असेल तिला? याचा थोडा तरी विचार केलास तू, वहिनी?" अनिल कांचनची बाजू घेऊन रेखाशी हुज्जत घालत होता.
"ठीक आहे भावजी, तुम्हाला तर तिने सांगितलेलेच खरे वाटेल आता. मला काय वाटलं त्याच्याशी तुम्हाला काय ना! जा आता, काही बोलणार नाही तुमच्या बायकोला." डोळ्यांत पाणी आणत शेवटी माघार घेत रेखा म्हणाली.
"तेच बरं राहिलं, वहिनी." असे म्हणून अनिल तिच्याकडे न पाहताच निघून गेला.
क्रमशः
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा