Login

सामंजस्य भाग 1 (थोरलेपण)

गोष्ट समजून घेणाऱ्या सासूची

कथा - सामंजस्य
स्पर्धा -जलदकथा लेखन


"आपलं लग्न होऊ शकत नाही." स्वप्नाली आणि आदित्य एका हॉटेलमध्ये बसले होते.

"का?" आदित्यच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
"आपलं अरेंज मॅरेज आहे. ठरवून केलेलं लग्न! आणि मॅडम आपला साखरपुडा नुकताच पार पडलाय. हे लक्षात आहे ना?" त्याला धक्का बसला होता.

"का म्हणशील तर ते तुझ्या आईमुळे." स्वप्नाली आपल्या पांढऱ्या शर्टाची कॉलर ताठ करत म्हणाली. "मला वाटतं, त्या खूप देवभोळ्या, जुन्या परंपरा, रीतीरिवाज सांभाळणाऱ्या आहेत.

"मग त्याचा आपल्या लग्नाशी काय संबंध?" आदित्य.

"तुझ्या आईची अपेक्षा असणार ना? त्यांनी जसं घर सांभाळलं तसंच मीही सांभाळावं? तर..मला ते जमणार नाही." स्वप्नाली स्पष्टच म्हणाली.

"सगळ्या सासवांची हीच अपेक्षा असते. त्यात गैर काय आहे?" आदित्यला आता टेन्शन आलं होतं. पण चेहऱ्यावर तसं न दाखवता त्याने थंडगार सरबत मागवलं.

"सी, माझा व्यवसाय माझं पॅशन आहे. ते मी सोडू शकत नाही आणि ते सांभाळून घरच्या रीतिभाती सांभाळणं मला शक्य होणार नाही. आत्ता मी या कपड्यात कम्फर्टेबल आहे. उद्या लग्न झाल्यावर साडी नेसून, नटून -थटून ते सणवार साजरे करणं मला जमणार नाही.
दिवाळीचा फराळ करा. पाहुण्यांना बोलवा. नंतर संक्रांत आली, काळी साडी नेसून हळदी -कुंकूचा समारंभ साजरा करा. असं करत गणपती आले, मग मोदक करा. सकाळ - संध्याकाळी आरतीची तयारी, दुर्वा, नैवेद्य.." स्वप्नाली भराभर बोलत होती.

आदित्यला हसायला आलं. "तू समजतेस तसा हा विषय इतका काही सिरियस नाहीय आणि आत्ता तू जे वर्णन करतेस ना त्यावरून तुला सणवार कसे साजरे करायचे हे सगळंच माहिती आहे. मग कृती करायला असा कितीसा वेळ लागतो?"

पांढरा शर्ट, डार्क ब्लू रंगाची जीन्स, हलक्याशा ब्राऊन रंगाने कलर केलेले केस अन् हातात उंची घड्याळ. स्वप्नाली चारचौघांत उठून दिसणारी होती. फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेऊन तिने दोन वर्षांपूर्वी स्वतःचं बुटिक सुरू केलं होतं. ते मस्त चालत होतं.

"माझी आई घरी हे सगळं सांभाळते हं. पण मला असा वेळ वाया गेलेला आवडत नाही. त्यापेक्षा माणसाने कामात राहावं. त्यालाच देव मानावं आणि त्याचीच पूजा करावी." ती काहीशी उर्मटपणे म्हणाली.

"हे मला सांगतेस? जगात तू एकटीच बिझनेस करत नाहीयस. माझाही बिझनेस चांगला चालतो. मी त्यातून बक्कळ कमावतो." आदित्य चिडून म्हणाला.
"मगाचपासून ऐकून घेतोय म्हणून तोंडाला येईल ते बोलतेस! माझं एकदा ठरलं म्हणजे ठरलं. मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे."

"आदि, मला आत्ता भांडायला अजिबात वेळ नाहीय. पाच वाजता माझी महत्त्वाची मीटिंग आहे आणि वेळ ही पाळायलाच हवी. हो ना? मी निघते. आपण रात्री बोलू." स्वप्नाली निघून गेली सुद्धा. आदित्य मात्र टेबलावर मूठ आपटत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रागाने बघत राहिला.
' ही समजते कोण स्वतःला? जणू एकटीच बिझनेस माईंडेड आहे! आणि आम्ही साले..'

"सर, तुमची वेळ संपलीय. हे टेबल बुक झालंय." एवढ्यात वेटर येऊन सांगून गेला.

"तूही बिझनेस करतोस काय रे?" राग, चीड व्यक्त करत आदित्य वेटरच्या अंगावर ओरडत बाहेर पडला.

"कसले, कसले लोक येतात ना!" त्याला पाहून आजूबाजूचे लोक कुजबूज करत राहिले.


क्रमशः
0

🎭 Series Post

View all