Login

सामंजस्य भाग 2

गोष्ट समजून घेणाऱ्या सासूची
"आदि, काय झालंय? आल्यापासून चिडचिड करतोयस." मीरा काकू स्वयंपाक करत होत्या. "स्वप्नाली काही बोलली का?" हे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. बराच वेळ तो अस्वस्थ होत फेऱ्या मारत राहिला.

"आई.." तिला हे लग्न करायचं नाहीय."

"का?" मीरा काकूंचे स्वयंपाक करणारे हात अचानक थांबले.

"तिला वाटतं, तू तिच्याकडून जास्त अपेक्षा ठेवशील. आपल्या घरच्या रीतीभाती कंपल्सरी पाळायला लावशील. तू जसं घर सांभाळलंस तसंच तिनेही करावं.."

"अरे, प्रत्येक सासूची हीच अपेक्षा असते."

"मीही हेच म्हणत होतो. पण तिला संसारापेक्षा तिचा व्यवसाय जास्त महत्त्वाचा वाटतोय. आई, मला तिच्याशीचं लग्न करायचंय. मला मनापासून आवडते ती." आदित्य मोकळेपणाने म्हणाला.

"एवढंच ना? उद्या मी भेटून बोलेन तिच्याशी. तू काळजी करू नको. सगळं व्यवस्थित होईल." मीरा काकू आणि आदित्यचं बाँडींग चांगलं होतं. केवळ आई आणि लेक नव्हे तर एक पिढी दुसऱ्या पिढीला समजून घेत होती.

दुसऱ्या दिवशी काकू स्वप्नाच्या बुटिकमध्ये आल्या. स्वप्नाली बिझी असल्याने थोडा वेळ थांबावं लागलं त्यांना.
"काकू, तुम्ही आलात हे कळवायचं ना! हातातलं काम बाजूला ठेवलं असतं." स्वप्नाली गडबडीने बाहेर येत म्हणाली.

"अग, मला वेळ आहे म्हणून मी आले. आधी तुमची कामं महत्त्वाची." मीरा काकू आजूबाजूला पाहत म्हणाल्या. होणाऱ्या सुनेने आपल्याला काकू म्हणावं हे त्यांना खटकलं होतं.
तिचं बुटिक छानच होतं. एक से एक डिझायनर ड्रेसेस अडकवून ठेवले होते. ' कल्पना शक्ती छान आहे हिची! पोरीच्या हातात कला आहे.' काकू.

स्वप्नालीने कॉफी मागवली.

"मी थेट मुद्द्यावर येते. काल तुम्हा दोघांत जे बोलणं झालं ते मला अजिबात पटलं नाही. एवढ्याशा कारणावरून लग्न मोडणं बरं नव्हे. एकमेकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तो नीट सोडवला पाहिजे. हो ना? तुझ्या आई -वडीलांना तुझ्या निर्णयाची कल्पना आहे का?"

"त्यांना काय विचारायचं? लग्न मला करायचं आहे." स्वप्नाली आपल्या मतावर ठाम होती.

"हे बघ. मी लग्नानंतर तुझ्यावर काहीही थोपवणार नाही. जसा आदित्य व्यवसाय करतो तसाच तुझाही व्यवसाय आहे, याची कल्पना आहे मला. तू तुझ्या परीने संसार करायचास. मला जितके दिवस जमेल तितके दिवस मी सगळं करेन. तुम्ही आज कालची पोरं.. देवधर्म, कुळाचार सांभाळायचे कंपल्शन मी तुला करणार नाही. आता काळजी मिटली ना?" स्वप्नालीचे डोळे चमकले.

"सॉरी, चुकलं माझं. तडकाफडकी निर्णय घ्यायची सवय लागली आहे. काकू, तुम्ही कॉफी घ्या ना. गार होतेय."

"पुन्हा अशी चूक करायची नाही." मीरा काकूंनी स्वप्नालीचा कान हळूच ओढला. आवडत नसतानाही त्यांनी कॉफी संपवली.
'पोर जरा अल्लड आहे. प्रेमाने तर कधी धाकाने तिला समजवावं लागेल, पण छान, सुंदर आहे. माझ्या आदित्यसाठी अशी मुलगी मिळणं फार अवघड आहे.' काकू विचार करत राहिल्या.


लवकरच आदित्य आणि स्वप्नालीचं लग्न पार पडलं. दोघे फिरायला जाणार म्हणून काकूंनी त्यांच्या हातावर पैसे ठेवले.
"हे कशाला? आम्ही आत्ता फिरायला जाणार नाही आहोत. बुटीकमध्ये खूप कामं आहेत. लग्नामुळे सुट्टी पडली, आता लगेच सुट्टी घेणं अवघड आहे." स्वप्नाली पट्कन म्हणाली. आदित्यला वाईट वाटलं. 'बाकीचे कपल्स हनिमूनला जाण्यासाठी कित्ती आतुर असतात! आणि हिचं काही वेगळंच.' मीरा काकूंनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. "थोडं थांब. सगळं ठीक होईल."

स्वप्नाली माहेरी जशी वावरत होती तशीच सासरी वागत होती. काकूंनी तिला कशाचीही सक्ती केली नव्हती. घरात तिघेजण, त्यात हे दोघं कामासाठी दिवसभर बाहेर. मग अशी काय कामं असणार? मीरा काकू सगळं करायच्या. स्वप्नालीची आवड - निवड लक्षात घेऊन तिचं मत विचारात घ्यायच्या. बऱ्याचदा तिला मदतीला बोलवायच्या. ती घरी आली की थकलेली असायची. तिच्या आवडीची कॉफी सुद्धा हातात मिळायची.

सासू म्हणून काकूंनी आपलंच खरं केलं नाही तर मुलाचा संसार कसा मार्गी लागेल हेच त्या पाहत आल्या. काकूंनी स्वप्नालीवर कपड्यांची सक्ती कधी केली नाही की यायला उशीर झाला तर बोल लावले नाहीत. लेक तशी सून या उक्तनुसार त्यांनी तिला आपलं मानलं होतं.