Login

समांतर रेखा भाग 5 (अंतिम भाग)

नात्यांच्या अगतिकतेमध्ये होरपळणाऱ्या प्रेमाची अनोखी कथा....

समांतर रेखा : भाग 5 (अंतिम भाग)
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025.

काही दिवसांनी राधिका बऱ्यापैकी सावरली. आजारपणातून उठून चांगली झाली. आता सगळ्यात आधी तिने आपला संसार आपल्या स्वतःच्या ताब्यात घ्यायचा निर्णय घेतला. राधिकाने सगळ्यात आधी बाळाचा ताबा घेतला. सुरुवातीला बाळ रडायचं. काकूकडे झेपवायचं पण राधिकानं त्याच्या रडण्याकडे जराही लक्ष दिलं नाही. म्हणायची,

"चार आठ दिवसांत काकूचा लळा कमी होईल. शेवटी आई ती आईचं असते हो!"

तिचा हा अविर्भाव पाहून अर्चनाला वेड लागायची वेळ आली होती. बाळाला घेण्यासाठी अर्चना वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढत असायची. कधी तरी ती सफलसुद्धा होत असे. एक दिवस दुपारच्या वेळी अर्चना बाळाला कडेवर घेऊन नवऱ्याशी हितगुज करावं अशी बाळासोबत बोलत होती,

"बरं झालं अहो तुम्ही मला ह्या बाळाच्या रूपात भेटायला आलात पण तुम्हाला सांगू का, राधिकेला कळत नाही ओ कि तुम्ही माझेचं आहात ते. माझा तुमच्यावर हक्क आहे ना? मी फक्त तुमची आहे ना? सांगा ना?"

राधिकाने हे सगळं ऐकलं आणि त्याचं पाऊली नवऱ्यापाशी जाऊन घडलेलं सगळं तिने कथन केलं. त्याचं खुमखुमीत अर्चनापाशी जाऊन तिने बाळाला अर्चनाच्या कडेवरून जवळपास ओढून घेतलं आणि म्हणाली,

"वहिनी आजपर्येंत तुमचा मान ठेवला पण आता नाही! इथून पुढं जर तुम्ही माझ्या बाळाला हात लावला तर माझ्याहून वाईट कोणी नसेल बघा!"

घडल्या प्रकारानंतर अर्चनाने राधिकाकडे किती विनवण्या केल्या पण राधिकाने आपल्या बाळाला तिच्यापासून लांबच ठेवलं. शेवटी अर्चनाने कळवळून सांगितलं,

"पहा ना एकदा सगळे, बाळाच्या गालावरचा तो तीळ, ह्यांच्या गालावरही तसाचं आणि तिथंच तीळ होता. तेच आले आहेत गं राधिके तुझ्या पोटी परत जन्माला. नको ना गं आमची ताटातूट करुस!"

हे सगळं अर्चना बोलली खरी पण राधिकाने काही ऐकून घेतलं नाही. राधिकाची नवऱ्यानं समजूत घातली तर म्हणाली,

"अहो तुम्ही ह्यात पडू नका. चांगली म्हणून घरी आणली पण ही बाई तर अगदी वेडी निघाली. काहीही बरळत सुटली आहे. ह्याचं वेडाच्या भरात तिने बाळाला काही केलं म्हणजे मग?"

राधिका आपल्या मतावर ठाम होती. नवऱ्याला तिचं बोलणं पूर्णपणे पटलं नाही पण प्रकरण अजून चिघळू नये म्हणून तो गप्प राहिला. अर्चनाला बाळाचा विरह सहन होईना. शेवटी एक दिवस रात्रीच्या वेळी तिने आईच्या पुढ्यात झोपलेल्या बाळाला अलगद उचललं. पोटाशी धरलं आणि कोणाला काही कळायच्या आत घरातून बाहेर पडली. पहाटेच्या सुमारास राधिकाला जाग आली. बघते तो बाळ पुढयात नाही. तिने आरडाओरडा करून घर जागं केलं. शेजारपाजारची माणसं गोळा झाली. सगळीकडे शोध घ्यायला सुरुवात झाली. दरम्यान अर्चना घरी नाही हे सग्ळ्यांना लक्षात आलं आणि राधिकाला तर राग अनावर झाला.

काही वेळातचं लोकांना अर्चना सापडली. बाळ तिच्या मांडीवर शांतपणे निजलं होतं. अर्चनाला पहिल्या बरोबर धावत जाऊन राधिकानं बाळाला उचलून घेतलं. बाळाने टाहो फोडला. अर्चना कळवळली पण ती काहीच करू शकली नाही. राधिकानं अर्चनाला हाताला धरून घराबाहेर काढलं आणि तिच्या तोंडावर धाडकन दार लावून घेतलं.
तिच्या दोन्ही मुलींनी "काकू ssss " म्हणून टाहो फोडला. बाळानंही बंद दरवाज्याकडे हात पसरले. त्या दिशेनं बाळ झेपावू लागलं पण दार बंदचं राहीलं.

अर्चना कुठे गेली?

तिचं काय झालं?

कोणास ठाऊक....

संपूर्ण.
©️®️सायली पराड कुलकर्णी
0

🎭 Series Post

View all