समन्वयता भाग -१

समन्वयतेचा अर्थ सांगणारी दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची कथा.
समन्वयता भाग - १


"अगं, कसे होणार आता? " निलय विचारत करत म्हणाला.

"काय झालं?" त्याची बायको निर्मिती विचारत होती.

"आपल्या ' गाण्याच्या मैफिली' ह्या कार्यक्रमांत आपल्याला एक गायक आणि पेटी वाजवणारी व्यक्ती हवीय. दोन्ही गायक आणि गायिका त्यांचे कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे पुढे ते इथे काम करणार नाही असे म्हणत आहेत." त्याने माहिती पुरवत सांगितलं.

"मग आता?" तिला पण काळजी वाटायला लागली.

निलय आणि निर्मिती ह्यांनी गायनाचे कार्यक्रम चालवणारी संस्था स्थापन केली होती. नवोदित गायकांना, गीतकारांना तसेच संगीतकारांना त्यांनी संधी दिली होती.

कोरोना काळात तर त्यांनी सर्वांचे मनोबल वाढवण्यासाठी ऑनलाईन गाण्याच्या मैफिली आयोजित केल्या होत्या; त्याही विनामोबदला. त्यांची मदत करण्याची वृत्ती ह्यामुळे त्यांचा एवढा नफा व्हायचा नाही. पर्यायाने मानधन कमी मिळत असल्याने त्यांच्या संस्थेसोबत जास्त दिवस कोणी काम करत नसायचे.

"मी जाहिरात देते. पाहू काही होते का." तिने त्याला दिलासा दिला.

दुसऱ्या दिवशी तिने ओळखीच्या लोकांना तर सांगितलच,पण सोशल मीडियावरही तिने पोस्ट टाकली.


"हॅलो, मिस्टर निलय?"

"हो, मी बोलतोय."

"तुम्ही जी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. ती खरी आहे का? तुम्हाला गायक किंवा गायिका ह्यांची गरज आहे?" पलीकडून त्या व्यक्तीने त्याला विचारले.

"हो खरी आहे. " त्याने पलीकडच्या व्यक्तीला उत्तर दिले.

"ठीक आहे." असे म्हणून त्याने फोन ठेवला.

'काय लोक असतात ना. फक्त विचारण्यासाठी फोन करतात.' त्याने वैतागून आपला फोन पाहिला.

थोड्यावेळानंतर त्याला ईमेलचे नोटिफिकेशन आले. त्यात एक कार्यक्रम रद्द करण्याबद्दल सांगितले. ते पाहून त्याला सर्व समजले.

काही वेळापूर्वी आलेला फोन हा खात्री करण्यासाठी होता. त्यांच्याकडे गायकच नाहीत तर कार्यक्रम नीट होईल की नाही म्हणून ज्यांनी ॲडवान्स दिलेले पैसे होते ते पण मागून घेतले होते.

"निर्मिती...."

"हा बोल. काय झालं? " तिला काही जणांनी प्रतिसाद दिलेला म्हणून ती त्यांना भेटण्यासाठी पुढचे वेळेचे नियोजन करत होती.


"एक कार्यक्रम रद्द झाला." तो थोडा रागातच म्हणाला.

"कसे काय?" तिला सुद्धा ऐकून धक्का बसला.

कारण त्यांचे पैसे परत द्यावे लागणार होते.


"तू दिलेल्या जाहिरातीमुळे त्यांना समजले की आपल्याकडे गायक नाहीत." थोडा मोठ्या आवाजात तो म्हणाला.

"अरे पण गायक नाहीत तर शोधत आहोत ना आपण. जाहिरात नाही देणार तर कसे होणार?"

तेवढ्यात तिला पण एक ईमेल आला त्यात पण असेच कार्यक्रम रद्द करण्याचे लिहिले होते.

"आता तूच शोधून काढ. नाहीतर आपल्याला हे सर्व बंद करावे लागेल." असे बोलून तो रागात निघून गेला.

तिला त्याचे बोलण्याचे वाईट वाटले होतेच, परंतु सध्या तो रागात असल्याने असा बोलला असेल असे वाटून तिने उद्या होणाऱ्या मुलाखतीचे नियोजन करून सर्वांना वेळ सांगून संपर्क साधला.

"पाहिलस ना, असेच आहेत तुझे बाबा. लगेच चिडतात. मागच्याच महिन्यात बोलले होते ना की, तू येईपर्यंत एवढे चिडणार नाही. असू दे आपलेच आहेत ते. आपण समजून घेवू." पोटावर हात ठेवत ती त्या दोघांच्या अंशाला सांगत होती.

मागच्याच महिन्यात ती गरोदर असल्याचे समजल्यावर त्याने न रागवण्याचे सांगितले होते, पण त्याचा स्वभाव माहीत असल्याने तिने ते मनावर घेतले नाही.

दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली. मनात फक्त सकारात्मक विचार आणायचे असेच पक्के करून ती त्यांच्या स्टुडिओमध्ये जिथे आज गायक निवडणार तिथे आली होती.

"काही खाल्लेस का?" त्याने मेसेज केला.

"हो. तू येणार आहेस आज मुलाखत घ्यायला?" थोडी आशा होती म्हणून निर्मितीने विचारले.

"नाही." असे म्हणून त्याने मेसेज केला.

तिनेही दुर्लक्ष केलं. एक एक करत सर्व गायक येत होते. त्यांचे अनुभव सांगत होते, पण तिला काही त्यांनी गाऊन दाखवा म्हंटल्यावर पटत नव्हते.

सकाळची दुपार झाली पण एकही गायक किंवा गायिका तिला हवी तशी भेटतच नव्हती. काही लोक अनुभव म्हणून यूट्यब किंवा इंस्टाग्राम वरती किती लाईक्स आणि फॉलोवरस् आहेत ह्याची माहिती देत होते. सरळ तिने त्या लोकांना नकार दर्शवला.

रात्र होत आली तरी तिला एकही गायक त्यातून शोधता आला नाही.

"पेटी वाजवणे आता कोणी शिकत नाही. त्यामुळे आता पेटी वादक कार्यक्रमासाठी भेटणे म्हणजे दुर्मिळच आहे." त्याच्या ओळखीच्या एका काकांनी सांगितले.

"ठीक आहे काका. मदतीसाठी धन्यवाद." निराश होऊन तोही घरी आला.

ती सुद्धा तिच्या मैत्रिणीसोबत फोन वर बोलत होती. त्याने पाहिले आणि जेवण बनवण्यासाठी तो स्वयंपाक घरात गेला. कारण तिने बनवले नसेल हे तिच्या सकाळच्या कपड्यांवरूनच त्याला समजले.

"काय सांगतेस ? तुझ्याकडे गायिका कोणी आहे का?"
तिने खूप उत्सुक होत मैत्रिणीला विचारले.

"हो आहे...पण एक समस्या आहे."

"कोणती?" तिच्या कपाळावर लगेच आट्या जमा झाल्या.

" एक गायिका आहे पण ती...." तिच्या मैत्रिणीने सर्व सांगितले.

© विद्या कुंभार.

सदर कथेचे संपूर्ण कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.


🎭 Series Post

View all