समन्वयता भाग -२

समन्वयतेचा अर्थ सांगणारी दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची कथा.
समन्वयता भाग - २

दुसऱ्यादिवशी निर्मिती पुन्हा मुलाखतीसाठी गेली.

"ये इकडे. ह्या बाजूला.हळू." एक श्यामलवर्णीय मुलगी हळू हळू चालत आली.

"मी थेट गाऊन दाखवते. तुम्हाला पटलं तरच आपण पुढे बोलू." त्या मुलीने मुद्द्याचे बोलल्यावर निर्मितीला आनंद तर झालाच शिवाय वेळ जाणार नाही, म्हणूनही बरे वाटले.

त्या मुलीने गायनास सुरुवात केली. खूप सुंदर आणि अवघड गीत गायनासाठी तिने निवडले होते. आपसूकच निर्मितीने जोर जोरात टाळ्या वाजवल्या.

"तुला अभंग गाता येतो?" निर्मितीने विचारले.

"हो." नाजूक आवाजात ती म्हणाली.

अभंग आणि नंतर पोवडाही तिने गायला.

"तू उद्यापासून येवू शकशील? कारण काय आहे ना तुला सरावाला खूप कमी वेळ आहे."

"हो मी येईन." कळी खुलल्यासारखी ती हसत म्हणाली.

ती गात असताना तिचा व्हिडिओ काढलेला. तो तिने निलयला पाठवला.

दुसऱ्या दिवशीपासून तिचा सराव सुरू होणार होता. तिला पेटीही वाजवता येत होती. पण कार्यक्रम नीट व्हावा म्हणून तिला फक्त गाण्यासाठी सांगितले होते.

सरावाच्या पहिल्यादिवशी ती लवकर आली. तिला दिलेल्या खोलीत ती सराव करत असताना तिला ओळखीचा असलेला आवाज कानी पडला आणि ती शांत झाली.


"वृंदा आपल्याला पेटी वादकही मिळाला." निर्मितीने खुश होऊन सांगितले.

" नाव काय त्यांचे?"

"नैनिश..." निलयने सांगितले.

"मग मी तुमच्यासोबत काम करू शकत नाही." असे म्हणत ती तिची पांढरी काठी घेवून अंदाज घेत बाहेर जात होती.

"काय झालं?" निर्मितीने नैनिशकडे पाहून विचारले.

"तिचा आवाज आणि माझ्या पेटीमधून निघणारे सूर ह्यात समन्वयता नसते. पुढे-मागे होते."

"तुम्ही ओळखता एकमेकांना?" दोघांनी आश्चर्याने विचारले.

तो "हो."

ती "नाही."

"हे पाहा काहीही असले तरी. तुम्हाला एकमेकांना समजून घ्यावे लागेल. नैनिश तुला जास्तच समजून घ्यावे लागेल. आधीच आमचे काही कार्यक्रम रद्द झालेत. आता तुम्ही असे वागलात तर कसे होणार?" निर्मिती समजावत म्हणाली.

"मी करेन प्रयत्न." त्याने सांगितले.

"वृंदा????" निलयने विचारले.

ती बाहेर जात असताना थांबली आणि मानेनेच हो म्हणाली.

त्यांचा सराव सुरू झाला. कार्यक्रमाला फक्त पाच दिवस राहिले होते.

"मला नाही वाटत आपण कार्यक्रम नीट करू शकू."

निलय "काय झालं?"

"दोघं एकत्र मिळून फक्त भांडतात. ना तो ऐकायला तयार आहे ना ती." वैतागून त्याची बायको म्हणाली.

दोघेही त्यांची भांडणे सोडवून थकले. आता जे होईल ते होईल. असे मानून कार्यक्रमादिवशी ते थोडे तणावातच तयार झाले.

कार्यक्रमाला सुरुवात झाली. वृंदा आणि नैनिशचे नाव पुकारण्यात आले.

वृंदा जेव्हा व्यासपीठावर आली तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले आणि लक्ष वेधले ते तिच्या पांढऱ्या काठीने.

हो कारण वृंदा जन्मत: आंधळी होती. मध्येच थोडी ती अडखळली आणि तिला सावरले तिला साथ देणाऱ्या पेटीवादकाने.

"ठीक आहेस?" तिचा हात पकडताच त्याने विचारले.

"हो." तिच्या नाजूक आवाजात ती म्हणाली.

त्याने पेटीला पहिले हात जोडून वंदन केले आणि तिनेसुध्दा माईकला नमस्कार केला.

पेटीतून सूर उमटू लागले आणि तिच्या गळ्यातून मधुरवाणी बाहेर पडत सर्वांना त्यांच्याकडे पाहण्यास जणू त्यांनी त्यांच्या कौशल्याने भाग पाडले.

निलय आणि निर्मितीसुद्धा डोळे मोठे करून पाहत होते. कारण सरावा दरम्यान त्यांचे न जुळणारे सूर आज जुळले होते.

मध्येच एका ठिकाणी त्याच्या पेटी जवळचा माईकचा आवाज बंद झाल्याने पेटीचा आवाज तिच्या कानी पडला नाही. पण ती अगदी भान विसरून गात होती. कारण आज तिला रोखणारे कोणीच नव्हते. आयुष्यभर तिला मिळालेली बिचारी पणाची आणि तिच्या व्यंगामुळे सहानुभूती , जी दृष्टी नसतानाही समोरच्याच्या बोलण्यातून ती अनुभवत होती.

"तुला त्या अभंगाची चाल माहीत आहे ना?" खूप गाणी गायल्यावर तिने विचारले.

"हो." नैनिशने हसून सांगितले.

दोघांनी मिळून अभंग सादर केला आणि पूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते की, कोणाला तो अभंग संपला हे लक्षातच आले नाही.

सर्वांनी दोघांचे भरभरून कौतुक केले. तसेच निलय आणि निर्मितीला तिथेच खूप जणांनी पुढच्या कार्यक्रमांसाठी विचारले.

वृंदा आणि नैनिशचे आता 'सूर जुळले तुझे नि माझे' असेच झाले होते आणि त्यामुळे त्यांच्या समजुतीने तो कार्यक्रम यशस्वी झाला होता.

तात्पर्य:- समंजस्याचे सूर जुळण्यास इच्छाशक्तीचा ताल धरावा लागतो.

समाप्त.

© विद्या कुंभार.

सदर कथेचे संपूर्ण कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.


🎭 Series Post

View all