समर्पण-एक प्रेमकथा भाग १००

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग १००

मागील भागाचा सारांश: स्नेहा व गौरवची खास मैत्री झाली असल्याची कल्पना नीरजाने नीरवला दिली. गौरवने नीरवला स्टाफ ट्रेन करण्यासाठी वर्कशॉपची आयडिया दिली. गौरवला नीरव सोबत मैत्री करायची होती, पण नीरव सतत टाळत असल्याने गौरवला त्याचा राग आला. नीरव प्रेमाबद्दल सतत निगेटिव्ह बोलत असल्याने त्याबद्दलही त्याने त्याला स्पष्ट सांगितले.

आता बघूया पुढे….

गौरव बोलून गेल्यावर नीरव त्याच्या बोलण्याचा विचार करत बसला होता, तेवढ्यात नीरजा दरवाजावर नॉक करून केबिनमध्ये आली,

“डॉ गौरव, इतक्या रागात केबिनबाहेर का पडले? तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झालं का?” नीरजाने खुर्चीत बसत विचारले.

नीरवने नीरजाला घडलेली सर्व इतमभूत हकीकत सांगितली.

“नीरजा, माझं नेमकं काय चुकत आहे, हेच कळत नाहीये. मला मान्य आहे की, मी प्रेमाबद्दल चुकीचा विचार करत असेल. प्रेमाची व्याख्या अजूनही मला कळत नसेल, पण गौरव करतो तेही चुकीचेच आहे ना?” नीरव बोलण्यावरून गोंधळलेला वाटत होता.

“कसं आहे ना नीरव, तुम्ही प्रेमाबद्दल आपलं एक ठाम मत बनवून घेतलं आहे. तुम्हाला स्वतःला प्रेमाचा अनुभव तसा आला असता तर तुमची प्रतिक्रिया मी समजू शकले असते, पण कुणाचं तरी बघून असा समज करून घेणे चुकीचे आहे.

आता मला एक सांगा, एखादं ऑपरेशन करताना डॉ गौरवला त्या पेशंटला वाचवण्यात यश आले नाही, तर तुम्ही ते ऑपरेशन करणार नाहीत का?” नीरजाने विचारले.

“गौरव कडून ऑपरेशन यशस्वी झाले नाही म्हटल्यावर माझ्याकडून होणार नाही असं तर होणार नाही. प्रत्येक वेळी डॉक्टर चुकीचा असतोच असं नाही, त्यावेळची पेशंटची कंडिशन कशी आहे यावर सुद्धा ते अवलंबून आहे.” नीरवने स्पष्टीकरण दिले.

नीरजा हसून म्हणाली,
“मग प्रेमाच्या बाबतीतही तेच असू शकेल. आता राहिला प्रश्न डॉ गौरवला तुमचा राग का आला असेल? तर इतरवेळी ते तुमचं बोलणं एक मित्र म्हणून ऐकून, समजून घेत होते, पण तुम्हाला मैत्री करायचीच नाहीये हे ऐकून ते चिडले असतील आणि ते स्वाभाविक आहे.”

“बरोबर, म्हणूनच त्याला माझा राग आला असेल. बरं मला एक सांग, सकाळी अचानक तुला काय झालं होतं. तू शांत का झाली होती?” नीरवने त्याला पडलेला प्रश्न विचारला.

“नीरव, आपलं मन ना वेड असत, नको त्या अपेक्षा करत असतं. माझ्या मेंदूला हे चांगलं माहीत आहे की, मी ज्या व्यक्तीवर प्रेम करते तो माझ्यावर इतक्यात तरी प्रेम करणार नाही, तरी मनाला वाटतच.

चहाच्या टपरीवर एक कपल चहा पित होते. ते दोघे एकाच कपमधून चहा पित होते. वॉक करताना ते एकमेकांच्या हातात हात घालून वॉक करत होते. आपल्याही आयुष्यात असं कोणीतरी असावं असं त्या क्षणी वाटून गेलं आणि मन नाराज झालं.

बोलत बसले, तर सगळी कामं राहून जातील. मी येते.” नीरजा आपल्या केबिन मध्ये निघून गेली.

नीरजाचं बोलणं ऐकून नीरव विचार करू लागला,
‘खरंच नीरजाला या सगळ्याच्या किती त्रास होत असेल ना, मी कधी तिच्या बाजूने विचारच केला नाहीये. मला तिचा एकदा विचार करावा लागेलच. जर समजा माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच भावना नसतील, तर तिला तिचा मार्ग मोकळा करून द्यावा लागेल, किती वेळ त्या बिचारीला माझ्या बंधनात अडकून ठेवू.’

हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी केस आली म्हणून वॉर्डबॉय नीरवला बोलवायला आला व नीरवच्या विचारांची तंद्री तुटली.

दररोज रुटीन प्रमाणे नीरजा हॉस्पिटल मधून घरी जाण्यासाठी बाहेर पडली. शिवानी गाडी जवळ तिची वाट बघत उभी होती. नेमकं त्याच वेळेस नीरव सुद्धा घरी जाण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर पडला.
त्याची आणि नीरजाची नजरानजर झाली व नीरवच्या डोक्यात काहीतरी आले, म्हणून तो शिवानीला म्हणाला,

“शिवानी, गाडी घेऊन तू घरी जा. जाताना ड्रायव्हर काकांना त्यांच्या घरी सोडव. मला आणि नीरजाला एका ठिकाणी जायचं आहे. आम्ही तिकडून घरी जातो.”

नीरवच्या या बोलण्यावर नीरजा त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती, कारण नीरजाला नीरवचा हा प्लॅन काहीच माहित नव्हता. नीरव शिवानी समोर बोलल्याने नीरजाला त्याला नाही म्हणता आले नाही. शिवानी ड्रायव्हर काकांना घेऊन निघून गेली. नीरजा नीरवच्या गाडीत जाऊन बसली.

गाडी हॉस्पिटलच्या बाहेर पडल्यावर नीरजा म्हणाली,
“आपण कुठे चाललो आहोत?”

“सेंट्रल मॉल.” नीरवने गाडी चालवता चालवता उत्तर दिले.

“का?” नीरजाचा पुढील प्रश्न.

“मला कपडे खरेदी करायचे आहे.” नीरवचे उत्तर.

“तिथे माझे काय काम आहे?” नीरजाचा प्रश्न.

“तुझी मला कपडे चॉईस करायला मदत होईल.” नीरवचे उत्तर.

हा प्रश्नोत्तराचा खेळ चालू असेपर्यंत ते मॉलला पोहचलेत. गाडी पार्कींग मध्ये पार्क करून नीरव व नीरजाने मॉल मध्ये प्रवेश केला. नीरव तिला एका जेन्ट्स कपड्याच्या शॉप मध्ये घेऊन गेला. दोन-तीन शर्ट हातात घेऊन नीरव चेंजिंग रूममध्ये गेला. नीरजा त्याची वाट बघत बाहेर उभी होती.

नीरव एक शर्ट घालून बाहेर आला.

“कसा आहे?”

“छान.”

नीरव पुन्हा दुसरा शर्ट घालून बाहेर आला, तेव्हाही त्यांच्यात तेच बोलणं झालं. नीरव तिसरा शर्ट घालून आल्यावर म्हणाला,
“तिन्ही शर्ट पैकी कोणता शर्ट माझ्यावर छान दिसतो?”

“तिन्ही छान दिसतात.” नीरजाने उत्तर दिले.

डोक्याला हात मारून घेत नीरव म्हणाला,
“नीरजा, तुला मी कपडे चॉईस करण्यासाठी मला मदत होईल म्हणून घेऊन आलो होतो. तर तू मलाच कन्फ्युज करत आहेस.”

“नीरव, एकतर मला जेन्ट्सच्या कपड्यांबद्दल फारसं कळत नाही. दुसरी गोष्ट मी मॉल मध्ये येऊन कधीच शॉपिंग केली नाही, त्यामुळे हे सगळेच कपडे मला महाग वाटत आहेत. तिसरी गोष्ट हे तिन्ही शर्ट तुम्हाला खरंच खूप छान दिसत आहेत.” नीरजाने एका दमात पूर्ण स्पष्टीकरण दिले.

नीरवने तिन्ही शर्ट विकत घेतले. त्या शॉपच्या बाहेर पडल्यावर नीरव म्हणाला,
“नीरजा, तुलाही कपडे घेऊयात.”

“नीरव, मला मॉल मध्ये शॉपिंग करणे आवडत नाही. मला काही घ्यायचं नाहीये.” नीरजाने उत्तर दिले.

“मी माझ्याकडून गिफ्ट म्हणून देणार होतो.” नीरव.

“तरीही नको.” नीरजा.

“बरं ठीक आहे. आपण फूड झोनमध्ये जाऊयात.” नीरव व नीरजा दोघे फूड झोनमध्ये गेले. नीरजाला विचारून नीरवने ऑर्डर दिली.

“नीरजा, आपण वरचेवर बाहेर फिरायला म्हणा किंवा जेवायला येत जाऊयात.” नीरव म्हणाला.

“का?” नीरजाला प्रश्न पडला होता.

“नीरजा, आपली भेट, बोलणं घरी किंवा हॉस्पिटलमध्ये होते. बाहेर आल्यावर आपल्या दोघांना एकमेकांसोबत क्वालिटी टाईम मिळेल. आपल्यात थोड्या वेगळ्या विषयांवर बोलणं होत जाईल, त्यामुळे आपल्यात वेगळा बॉण्ड निर्माण होईल.” नीरव चेहऱ्यावर हसू आणून म्हणाला.

वेटरने ऑर्डर केलेले फूड आणून दिले.

“तुला मूव्ही बघायला आवडतो का?” नीरवने खाता खाता विचारले.

“हो.” नीरजा.

“आता शो असेल तर मूव्ही बघून घरी जाऊयात.” नीरव नीरजाच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला.

“आज नको. मी आधीच खूप दमली आहे. शिवाय आपल्याला घरी जायला उशीर होईल. पुढच्या वेळी प्रॉपर प्लॅन करून येऊयात.” नीरजा.

“ओके.” नीरव थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला.

“नीरव, यात नाराज होण्यासारखं काय आहे. मलाही तुमच्या सोबत मुव्ही बघायला आवडलंच असतं, पण मुक्ताही घरी एकटी आहे, तिच्या सोबत सरस्वती ताई आहेत, पण तिच्याप्रती आपलीही काही जबाबदारी आहे. आपण येत्या रविवारी मुव्ही प्लॅन करू.” नीरजा म्हणाली.

“हो चालेल. मुक्ताशी तुझं काही बोलणं झालं का? तिला क्लासला जाताना येताना काही अडचण आली नाही ना?” नीरवने विचारले.

“घरी पोहोचल्याचा तिचा मॅसेज आला होता.” नीरजाने सांगितले.

मॉल मधून निघण्याआधी त्यांनी आईस्क्रीम खाल्ले व ते घरी जाण्यासाठी निघाले. पार्किंग मधून बाहेर पडत असताना नीरवला त्याचा जुना एक मित्र भेटला.

“नीरव, भावा लग्न केलंस, इतकी छान बायको मिळाली आणि तू साधं मला कळवलं देखील नाही.”

मित्र नीरजा समोर असं बोलल्यावर नीरव थोडा लाजला होता. नीरजाच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती.

“अंकुश, लग्न खूप घाईत झालं, सो सगळ्यांना बोलवायला जमलं नाही.” नीरव म्हणाला.

“आता तू काही बोलशील आणि ते मला मानावचं लागेल. ते काही नाही मला मोठी पार्टी पाहिजे.” अंकुश म्हणाला.

“हो बाबा, तुला मोठी पार्टी देतो, मग तर खुश ना. आता घरी जायला उशीर झाला आहे. आपण लवकरच पार्टी प्लॅन करूयात.” नीरवने अंकुशला मिठी मारली व त्याचा निरोप घेतला.

गाडीत बसल्यावर नीरव नीरजाला म्हणाला,
“तू अंकुशचं बोलणं मनावर घेऊ नकोस बरं, त्याला कुठे काय बोलावं हेच कळत नाही.”

नीरजा गालातल्या गालात हसत होती.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all