समर्पण-एक प्रेमकथा भाग १०१

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग १०१

मागील भागाचा सारांश: गौरवच्या बोलण्याचा नीरव विचार करत असताना त्यांच्या बोलण्याचा व्यवस्थित अर्थ नीरजाने त्याला समजावून सांगितला. नीरव नीरजाला घेऊन मॉलमध्ये गेला होता. त्याने तिला कपडे घेण्याचा आग्रह केला, पण तिने नकार दिला.

आता बघूया पुढे…

नीरव व नीरजा घरी आल्यावर त्यांना हॉलमध्ये शालिनी व संगिता आई नजरेस पडल्या. दोघींना अचानक घरी बघून ते दोघेही शॉक झाले होते.

“तुम्ही दोघी अचानक कशा आल्या?” नीरवने त्यांना बघून विचारले.

“तुम्हाला सरप्राईज द्यायला.” शालिनी आई स्माईल देऊन म्हणाली.

नीरव व नीरजा त्यांच्या शेजारी सोप्यावर जाऊन बसले.

“शालिनी आई, अंजली कशी आहे? ती सावरली का?” नीरजाने विचारले.

“ती पहिल्यापेक्षा बरी आहे. आश्रमातील वातावरणात हळूहळू मिसळते आहे. तुझी आठवण काढत असते. आताही आम्ही निघत असताना तिने सांगितले, “ नीरजा ताईला मला भेटायला पाठवून द्या.”
ती सावरते आहे हे बघून मनाला छान वाटलं.” शालिनी आईने उत्तर दिले.

“मी गीताताईच्या फोनवर फोन करून तिच्याशी बोलून घेईल.” नीरजा.

“नीरव, नीरजा, तुम्ही दोघे फ्रेश होऊन या. मी सरस्वतीला जेवायला वाढायला सांगते. आपण सगळे एकत्र जेवायला बसूयात.” शालिनी आई म्हणाली.

“आई, आम्ही बाहेरुन खाऊन आलो आहोत. मला हॉस्पिटलचे काही मेल्स चेक करायचे आहेत, तर मी माझ्या रूममध्ये जातो.” नीरव आपल्या रूममध्ये निघून गेला.

“संगिता ताई, हे दोघे तर जेवणार नाहीत. मुक्ताला बोलावून घ्या, आपण तिघी एकत्र जेवण करूयात. मला जरा आश्रमात फोन करून चौकशी करायची आहे. मी दहा मिनिटात येतेच, मग आपण जेवण करू.” हे बोलून शालिनी आई तेथून निघून गेल्या.

संगिता आईंनी मान हलवून होकार दिला. त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी बघून नीरजा म्हणाली,
“आई, तुम्ही नाराज का दिसत आहात?”

“नीरवने माझी चौकशी पण केली नाही ग.” त्यांच्या आवाजातून त्या किती दुखावल्या गेल्या हे जाणवत होते.

“आई, त्यांनी मुद्दाम नसेल केलं. नीरवच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाहीत. शालिनी आई बोलत होत्या म्हणून ते त्यांच्याशी बोलले.” नीरजा संगिता आईला समजावत म्हणाली.

“तू म्हणतेय म्हटल्यावर असच असेल मग.” संगिता आई चेहऱ्यावर बळजबरी हसू आणत म्हणाल्या.

“तुम्हाला आश्रम आवडलं का?” नीरजाने विषय बदलला.

“हो. मला तिथे खूप प्रसन्न वाटले. मी शालिनी ताईंसोबत आता वरचेवर तिकडे जात जाणार आहे.” संगिता आईंनी सांगितले.

“तुम्हाला आश्रम आवडलं ना बस झालं. मुक्ताचा क्लासचा आज पहिला दिवस होता. मी तिची चौकशी करते आणि रूममध्ये जाऊन फ्रेश होते.” नीरजा मुक्ताच्या रूमकडे गेली.

मुक्ताच्या चेहऱ्यावरील स्माईल बघून मुक्ता क्लासच्या वातावरणात चांगलीच रुळली असेल हे नीरजाला लक्षात आले. तिच्यासोबत क्लासबद्दल गप्पा मारून नीरजा आपल्या रूममध्ये गेली. फ्रेश झाल्यावर ती बेडवर पडली. सकाळपासून पाठ न टेकवल्याने तिला जरा बरं वाटत होतं. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला, मोबाईलच्या स्क्रीनवर केतकीचे नाव बघून तिला जरा आश्चर्य वाटले.

‘यावेळेला केतकीचा फोन कसा आला.’ हा विचार करतच तिने फोन उचलला,

“हॅलो नीरजा.” केतकी आवाजावरूनच खूप खुश वाटत होती.

“काय मॅडम, खूप खुश दिसत आहात.” नीरजा.

“मी खुश आहेच, पण तू इतकी लो साऊंड का करते आहेस?” केतकीने विचारले.

“दिवसभर घराबाहेर होते ना, तर कंटाळा आला होता. आता जस्ट पाठ बेडवर टेकवायला वेळ मिळाला आहे.” नीरजाने स्पष्टीकरण दिले.

“मॅडम बऱ्याच बिजी झाल्या आहेत. आता तुला आराम करायचा असेल तर मी नंतर फोन करते.” केतकी.

“तुझ्याशी बोलल्यावर थकवा दूर होतो बघ. तुला काय सांगायचं आहे ते सांग. तुझ्या आवाजावरून तुझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं घडलं असेल असं दिसतंय.” नीरजा.

केतकी पुढे म्हणाली,
“नीरजा, आय एम इन लव्ह.”

“काय? कोण आहे तो?” नीरजा आश्चर्याने जोरात बोलत बेडवर उठून बसली.

“नीरजा, इतकं जोरात ओरडू नकोस.” केतकी म्हणाली.

“केतकी, यार तू इतक्या लवकर प्रेमात पडशील असं वाटलं नव्हतं. तूच बोलायचीस ना की, मी प्रेम मानत नाही. मी कधीच प्रेमात पडणार नाही असं. आश्चर्य तर वाटणारच ना.” नीरजाने तिच्या मनातील विचार बोलून दाखवले.

“आता ती व्यक्ती आहेच इतकी चांगली मी आपोआप त्याच्याकडे ओढल्या गेले. मला कधी तो आवडायला लागला हेही कळले नाही. तो खूप भारी आहे यार. माझ्या आयुष्यात असं कोणीतरी येईल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. एका लहान मुलीप्रमाणे तो माझी काळजी घेतो, मला जपतो. तो सोबत असला की मला कोणाचीच आठवण येत नाही. ही इज अ परफेक्ट लाईफ पार्टनर.” केतकी खुश होऊन बोलतच होती.

नीरजा तिला अडवत म्हणाली,
“केतकी, त्याचं कौतुक करताना तुझे शब्द थांबतच नाहीयेत. असा तो आहे तरी कोण? कुठे असतो? काय करतो? तुमची भेट कशी व कुठे झाली?”

“नीरजा, किती प्रश्न विचारशील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील, पण फोनवर नाही. तू मला भेटायला आल्यावरच मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला देईल.” केतकीने सांगितले.

“केतू, असं काय करतेस. आता लगेच मला बंगलोरला यायला जमणार नाही. हवंतर मी तुला व्हिडीओ कॉल करते, त्यावर बोलूयात.” नीरजा.

“तुझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात एक चांगला क्षण आला आहे, त्यावेळी तुला तिच्यासोबत असणे गरजेचे वाटत नाही का? मला तू याक्षणी माझ्यासोबत हवी आहेस. मला माझा आनंद तुझ्यासोबत साजरा करायचा आहे. मला कुठलीही कारणे चालणार नाही. तुझं बंगलोरला यायचं ठरल्यावर मॅसेज कर, तेव्हाच मी तुला फोन करेल, तोपर्यंत मी तुझ्याशी फोनवर बोलणार नाही.” केतकीने बोलून फोन कट केला.

नीरजाला पुढे बोलायला संधीच तिने दिली नाही.

‘ही केतकी पण ना. हिला सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्याच वाटतात. असं अचानक मी बंगलोरला कशी जाऊ शकेल? आता ही प्रेमात पडलीये हे सरळ सरळ ती फोनवर त्याच्याबद्दल सांगू शकतेच ना.’ नीरजा विचारात असतानाच तिच्या रूमचा दरवाजावर नॉक करण्याचा आवाज आला. तिने बेडवरून उठून दरवाजा उघडला. नीरवला दरवाजात बघून तिला आश्चर्य वाटले, ते तिच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होते.

“मी आत येऊ शकतो का?” नीरजा दारातच उभी राहून त्याच्याकडे एकटक बघत असल्याने नीरवने विचारले.

“हो या ना.” दारातून बाजूला होत नीरजा म्हणाली.

नीरव बेडवर जाऊन बसला. नीरजा बेडजवळ उभी होती. हे बघून नीरव म्हणाला,
“ नीरजा, रूम तुझीच आहे. तू बसू शकतेस.”

नीरव असं बोलल्यावर नीरजा नीरवच्या समोर बेडवर जाऊन बसली.

“नीरव, तुम्हाला माझ्याकडे काही काम होत का?” नीरजाने विचारले.

“काही काम असतानाच मी तुझ्या रुममध्ये येऊ शकतो का? सहज गप्पा मारायला आलो तर चालणार नाही का?” नीरवने नीरजाला प्रतिप्रश्न केला.

“तुम्ही सहज म्हणून गप्पा मारायला येऊच शकतात, पण आजवर अचानक तुम्ही रूममध्ये सहज येऊन बसला नाहीत म्हणून मला जरा आश्चर्य वाटले.” नीरजाने तिच्या मनातील शंका बोलून दाखवली.

यावर नीरव म्हणाला,
“आजवर जे केलं नाही ते करायचं नाहीच असं काही नसतं ना.”

नीरजा थोडी चिडून म्हणाली,
“आज तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी परीक्षा घेण्याचं ठरवलं आहे का?”

“ मी तर तुझी परीक्षा घेत नाहीये. अजून कोण तुझी परीक्षा घेत आहे?” नीरवने विचारले.

“केतकी.” नीरजाने उत्तर दिले.

“आता केतकीने असं काय केलं आहे?” नीरवला प्रश्न पडला होता.

“केतकीने मला लवकरात लवकर बंगलोरला बोलावलं आहे.” नीरजा.

“लवकरात लवकर, कशासाठी?” नीरवने विचारले.

“केतकी प्रेमात पडली आहे आणि ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे त्या व्यक्तीबद्दल सांगण्यासाठी आणि त्या व्यक्तीला भेटण्यासाठी तिने मला बेंगलोरला बोलावलं आहे.” नीरजा.

“मग जा ना.” नीरव सहजपणे म्हणाला.

“नीरव, असं अचानक मी बंगलोरला कशी जाऊ शकते? माझ्यावर हॉस्पिटलची आणि ह्या घराची थोडीफार का होईना जबाबदारी आहे.” नीरजा.

“हॉस्पिटल आणि या घरातून तुला कोणीही बेंगलोरला जाण्यासाठी अडवणार नाही. माझी फुल परमिशन आहे.” नीरव.

“नीरव, मी एकटी एवढ्या लांब कधीही गेले नाही. त्या अनोखी शहरामध्ये एकटी कशी जाऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मनाचीच तयारी नाहीये की असं लगेचच्या लगेच बंगलोरला जायची.” नीरजाने तिच्या मनातील अडचण बोलून दाखवली.

“नीरजा दोन-तीन दिवसांचा प्रश्न आहे. दोन ते तीन दिवस तिथे राहून परत ये. तेवढाच तुलाही चेंज मिळेल आणि केतकीलाही बरं वाटेल.” नीरव तिला बंगलोरला जाण्यासाठी आग्रह करत होता.

“नीरव, तुम्ही पण तिच्यासारखाच विचार करतात. मला तुमच्या दोघांसारखा विचार करता येत नाही. बघू केतकीचा काही दिवसांनी राग जाईल आणि ती मला फोन करेल. मी लगेच बंगलोरला जाणार नाही.” नीरजा तिच्या म्हणण्यावर ठाम होती.

“बर बाई, तुला जे करायचं कर. मी तुझ्याशी गप्पा मारायला आलो होतो, पण तुझं डोकं आधीच तापलेल आहे. मी माझ्या रूममध्ये जातो.” नीरव नीरजाच्या रूममधून निघून गेला.

‘अरे यार, आता नीरव पण माझ्यावर रागावले. बंगलोरला न जाण्याचं माझं खर कारण आहे की, विमानाने जायला तिकीट भरपूर लागेल. नीरव पैश्यांचा विचार न करता लगेच तिकीट काढतील पण मला पैश्यांचा विचार करावा लागणार आहे. इकडे तिकडे जाण्याच्या नादात हॉस्पिटल मधून मी बऱ्याचदा सुट्टी घेत नाहीये. हॉस्पिटल जरी नीरवचं असलं तरी या सगळ्याचा विचार मला करावाच लागणार आहे.’

नीरजा बंगलोरला जाईल का? केतकी कोणाच्या प्रेमात पडली असेल? बघूया पुढील भागात….

©® Dr Supriya Dighe

( या कथेचे भाग नियमित येत नसल्याने तुम्ही सगळेच नाराज आहात याची कल्पना मला आहे, पण माझ्या आयुष्यात असं काही सुरू आहे की त्यातून लिखाणाला वेळच मिळत नाहीये. एप्रिल महिन्यात लग्न झालं. मे महिन्यात भावाचं लग्न झालं. मागच्या महिन्यात सासरे एक्सपायर झाले. या सगळ्या घटना एका मागे एक घडत असल्याने लिखाणाचा आणि मनस्थितीचा मेळ बसत नाहीये.
आता तुमच्यातील काहीजण म्हणत आहेत की, लिहायला जमत नसेल तर कथा संपवा.
पण या कथेचं कथानक माझ्या सगळ्यात आवडत आहे, ते असं अर्धवट मी संपवणार नाहीये. आता नियमितपणे कथा लिहिण्याचा प्रयत्न माझा असेल. आता वाटेत काही अडचणी येऊ नये ही ईश्वराकडे प्रार्थना करते.)

🎭 Series Post

View all