Login

समर्पण-एक प्रेमकथा भाग १०२

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण - एक प्रेमकथा भाग १०२

मागील भागाचा सारांश: संगिता व शालिनी आईने न सांगता घरी येऊन नीरजा व नीरवला सरप्राईज दिले. केतकी प्रेमात पडली होती, पण कोणाच्या प्रेमात पडली हे जाणून घेण्यासाठी तिने नीरजाला बंगलोरला बोलावले होते. नीरवने नीरजाला बंगलोरला जाण्याची परवानगी दिली, पण खर्चाचा विचार करून नीरजाला जाणे योग्य वाटत नव्हते.

आता बघूया पुढे….

नीरजा आपल्या केबिनमध्ये काम करत बसलेली असताना तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर बघून तिने साशंकपणे फोन उचलला.

“हॅलो, इज धिस डॉ नीरजा.” समोरून विचारणा करण्यात आली.

“यस.” नीरजा म्हणाली.

“हॅलो मॅम, मी सुशील मेहता बोलतोय.”

“सॉरी, पण मी तुम्हाला ओळखत नाही.”

“मॅम, मी कॉन्फरन्स कोऑर्डीनेटर टीम मधून बोलतोय.” सुशीलने त्याची ओळख करून दिली.

“बोला. माझ्याकडे आपलं काय काम आहे?” नीरजाने विचारले.

“मॅम, पुढच्या आठवड्यात बंगलोरला नॅशनल मेडिकल कॉन्फरन्स आहे. तुम्हाला व नीरव सरांना इन्व्हाईट केलं आहे. मी सरांना सगळ्या डिटेल्स पाठवल्या आहेत. तुमच्या येण्या-जाण्याचा, राहण्याचा व जेवणाचा सगळा खर्च आमची टीम करणार आहे. आपण दोघांनी या कॉन्फरन्सला आपली हजेरी लावावी, अशी आमच्या सर्व टीमची इच्छा आहे.” सुशीलने सांगितले.

“ओके. मी याबद्दल नीरव सरांसोबत बोलते. पुढील कम्युनिकेशन तेच तुमच्याशी करतील.” नीरजा.

“चालेल मॅम, हॅव अ गुड डे मॅम.” सुशीलने फोन कट केला.

नीरजा आपल्या हातातील फाईल खाली ठेवून नीरवच्या केबिनमध्ये गेली. नीरव नेटकाच राऊंड घेऊन आला असल्याने तो पेशंटचे रिपोर्ट्स बघून फोनवर ज्युनिअर डॉक्टर्सला सूचना देत होता. नीरजाला त्याने खुणेनेच आपल्या समोरील खुर्चीत बसायला सांगितले. नीरवचा फोन झाल्यावर नीरजाने त्याला विचारले,

“तुम्ही बिजी आहात का?”

“नाही, बोल ना.” नीरवने तिच्याकडे बघून उत्तर दिले.

“सुशील मेहताचा फोन आला होता.” नीरजा.

“कॉन्फरन्सचं आमंत्रण द्यायला फोन केला असेल.” नीरव आपल्या समोरील फाईल मध्ये बघत म्हणाला.

“हो, तुम्हाला सगळ्या डिटेल्स माहीत आहेत असं तो म्हणत होता.” नीरजा.

“हो. त्याने मला तसा मेल केला आहे.” नीरव आपल्या कामात गुंग होता.

“मग तुम्ही काय ठरवलं आहे, कॉन्फरन्सला जायचं की नाही?” नीरजाने विचारले.

आपल्या हातातील फाईल बाजूला ठेवत नीरव तिच्याकडे बघत म्हणाला,
“मी तर कॉन्फरन्सला जाणार आहे. तुला यायचं की नाही ते तुझं तू ठरव. तुझ्यावर हॉस्पिटल व घराच्या जबाबदाऱ्या आहेत. त्या सोडून तू येऊ शकणार आहे का?”

“एरवी मी कॉन्फरन्सला जाण्याबद्दल विचार केला असता, पण केतकीनेही बंगलोरला येण्याचा आग्रह केला आहे, तिला भेटणेही होऊन जाईल आणि कॉन्फरन्स पण. शिवाय सगळा खर्च कॉन्फरन्स टीम करणार आहे.” नीरजा आपल्या मनातील बोलून गेली.

“ओके, चालेल. मी सुशीलला फोन करून आपण दोघेही कॉन्फरन्सला जाणार असल्याचे सांगतो. मी कालच शॉपिंग केली असल्याने कॉन्फरन्सला जाण्यासाठी आवश्यक कपडे माझ्याकडे आहे. तुला मात्र शॉपिंग करणे गरजेचे आहे. कोणालातरी सोबत घेऊन शॉपिंग करून ये.” नीरव म्हणाला.

“मुक्ताला फोन करून बघते, ती लवकर फ्री झाली तर तिला घेऊन जाते, नाहीतर केतकीला व्हिडीओ कॉल करून शॉपिंग करते.” नीरजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

यावर नीरव म्हणाला,
“तू बंगलोरला जाणार असल्याचे केतकीला लगेच सांगू नकोस. प्रत्यक्षात समोर जाऊन तिला सरप्राईज दे.”

“ही आयडिया मस्त आहे, पण माझ्याकडे तिचा पत्ता नाहीये.” नीरजाने आपल्या मनातील शंका बोलून दाखवली.

“ते मी बघतो.” नीरव बोलल्यावर नीरजा केबिन मधून निघून गेली.

केतकीला भेटायला मिळणार या कल्पनेनेच नीरजा किती खुश झाली होती. तिच्या चेहऱ्यावरील हा आनंद बघून नीरवच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आली होती. नीरजा केबिन मधून बाहेर पडल्यावर नीरव गालातल्या गालात हसत स्वतःशीच पुटपुटला,
‘वेडी कुठली.’

नीरजा नीरवच्या केबिन बाहेर पडली तर तिथे डॉ गौरव आणि स्नेहा तिच्या नजरेस पडले. स्नेहाने नीरजाकडे बघून स्माईल दिली, पण नीरजाने तिच्याकडे बघून स्माईल दिली नाही व आपल्या केबिनमध्ये निघून गेली.

डॉ गौरवने स्नेहाला खुणेनेच नीरजाची प्रतिक्रिया अशी का आहे हे विचारले, तर स्नेहाने खुणेनेच ‘मी जाऊन बघते.’ अस सांगितलं.

नीरजा आपल्या केबिनमध्ये जाऊन खुर्चीत बसत होती, तोच स्नेहाने केबिनच्या दरवाजावर नॉक करून, “मे आय कम इन मॅडम.” विचारलं.

“यस कम इन.” नीरजा रुक्षपणे म्हणाली.

स्नेहा केबिनमध्ये आल्यावर नीरजा तिच्याकडे बघून म्हणाली,
“डॉ स्नेहा, माझ्याकडे आपलं काही काम होत का?”

“नीरजा, इतकं फॉर्मल बोलण्याची गरज नाहीये. मी डॉ नीरजा मॅडमला नाही, तर माझ्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आले आहे.” स्नेहाला नीरजाने बसायला न सांगितल्याने ती उभी राहूनच बोलत होती.

“इथे तुमची मैत्रीण नाहीये.” नीरजाच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते.

“नीरजा, यार अस काय करतेय. तुला राग आला असेल तर तो सरळ सरळ व्यक्त कर, अस तुटक वागू नकोस. माझा पाय अजून पूर्णपणे बरा झाला नाहीये आणि तू मला बसायला सुद्धा सांगितलं नाहीस.” स्नेहा.

“सॉरी, प्लिज तुम्ही बसा.” नीरजा आपल्या समोरील खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाली.

स्नेहा खुर्चीत बसून म्हणाली,
“नीरजा, तुला माझा राग का आला आहे?”

“काल आलेल्या डॉ गौरव सोबत तू एवढी घट्ट मैत्री केलीस आणि मला सांगितले सुद्धा नाहीस. अस का?” नीरजाने हाताची घडी घालून स्नेहाच्या डोळ्यात डोळे घालून विचारले.

“नीरजा, आता मैत्री काय अशी विचार करून होत असते का? आता आमचे वाईब्स मॅच झाले आणि आमच्यात अतिशय कमी काळात खूप चांगली मैत्री झाली. तुला सांगायचं नव्हतं, अस काही नव्हतं. तू अचानक मला भेटायला आलीस आणि त्या दिवशी डॉ गौरव नेमके त्याचवेळी तिथे आले, म्हणून तुझा जास्त गैरसमज झाला.” स्नेहाने नीरजाला स्पष्टीकरण दिले.

“तुमच्या दोघांमध्ये फक्त मैत्रीच आहे का?” नीरजाने मैत्रीच या शब्दावर जास्त जोर दिला.

“सध्यातरी आमच्यात फक्त मैत्रीच आहे.” स्नेहाने उत्तर दिले.

“म्हणजे पुढे जाऊन मैत्री पलीकडे तुम्ही जाऊ शकता?” नीरजाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.

“हो.” स्नेहाच्या बोलण्यात आत्मविश्वास होता.

“डॉ गौरवचा भूतकाळ तुला ठाऊक आहे का?” नीरजाचा पुढील प्रश्न.

“हो.” स्नेहाचे उत्तर.

यावर नीरजा मिश्किल हसून म्हणाली,
“मैत्री पलीकडे जाताना जरा विचार करून निर्णय घेशील.”

“नीरजा, डॉ गौरव हे व्यक्ती म्हणून खूप छान आहेत. तुला जर काही चुकीचं कळलं असेल तर ते मनातून काढून टाक. मी माणसांना ओळखण्यात सहसा चुकत नाही.” स्नेहा.

“होप सो.” नीरजा.

“तू अस का बोलतेय?” स्नेहाने विचारले.

“स्नेहा, तू एक समजदार मुलगी आहेस. तुझ्या आयुष्याचे निर्णय तू घेऊ शकतेस, पण काही निर्णय घेताना खूप विचार करावा लागतो. एक चुकीचा निर्णय तुझं आयुष्य बदलवून टाकू शकेल. देव न करो पण तू अश्या चक्रव्यूहात अडकशील, जेथून तुला माघारी फिरणं जमणार नाही. जे करशील ते विचारपूर्वक कर. बाकी तुझी मर्जी.” नीरजा बोलत असतानाच दरवाजावर नॉक करून डॉ गौरव केबिनमध्ये आले.

“स्नेहा, तुझं बोलणं झालं असेल तर आपण निघुयात का?”

यावर नीरजा स्नेहाकडे बघून गालातल्या गालात हसत म्हणाली,
“डॉ स्नेहा, आपण येऊ शकता. तुमच्या मित्राला तुमच्याशिवाय करमत नाही वाटत.”

स्नेहाला नीरजाचा टोमणा समजला होता, ती आपल्या जागेवरुन उठत म्हणाली,
“ आम्ही दोघे मिळून ट्रेनिंग प्रोग्रामवर काम करत आहोत, त्यासंबंधी बोलण्यासाठी ते नीरव सरांकडे गेले होते. वर्किंग हवर्स मध्ये मैत्रिणी सोबत गप्पा मारून वेळ वाया घालवणे मला आवडत नाही.”

नीरजा पुढे काहीच बोलली नाही. डॉ गौरव व स्नेहा केबिन मधून बाहेर निघून गेले.