समर्पण-एक प्रेमकथा भाग १०३

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण - एक प्रेमकथा भाग १०३

मागील भागाचा सारांश: नीरजा नीरव सोबत कॉन्फरन्सला जायला तयार झाली होती. कॉन्फरन्सच्या निमित्ताने केतकीलाही भेटता येणार असल्याचा आनंद नीरजाला जास्त झाला होता. स्नेहाने नीरजाचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. नीरजानेही तिला निर्णय घेताना विचारपूर्वक घे असा सल्ला दिला.

आता बघूया पुढे…..

“गौरव सर, तुम्हाला आताच तिथे येण्याची काही गरज होती का?” स्नेहा त्याच्यावर वैतागली होती.

“सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं.” गौरवच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होतं.

“नीरजाचा राग दूर करणे यावेळी माझ्यासाठी कठीण जाणार आहे. आमच्यात नॉर्मल बोलणं व्हायला लागत होतं आणि तुम्ही एन्ट्री घेऊन पुन्हा तिचा मूड खराब केला.” स्नेहाच्या चेहऱ्यावर राग दिसत होता.

“अग बाई, सॉरी बोललोय ना.” गौरवच्या चेहऱ्यावर गूढ हसू होते.

“मी सिरीयस होऊन बोलतेय आणि तुम्ही हसताय.” स्नेहा चिडून म्हणाली.

“स्नेहा, मी मुद्दाम आत आलो होतो. नीरजा तुला माझ्यापासून दूर करेल, ही भीती माझ्या मनात होती.” गौरव.

“ती मला तुमच्यापासून दूर का करेल? मी कोणाशी मैत्री करेल आणि नाही करेल, हे माझं मी ठरवेल. नीरजा यात काहीच बोलू शकत नाही. तुम्ही उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊन नका.” स्नेहा पुढे चालता चालता म्हणाली.

“स्नेहा, तू पुढे जा. मी आलोच.” गौरव बोलून जागीच थांबला. स्नेहा पुढे निघून गेली.

‘स्नेहा, नीरवने नीरजाला माझ्याबद्दल सगळंच सांगितलं असेल. कामिनी व माझ्या भूतकाळाबद्दल नीरजाला सगळं ठाऊक असेल. तिने जर ते तुला सांगितलं, तर तू माझा तिरस्कार करशील आणि माझ्यापासून दूर जाशील. मला तसं झालेलं आवडणार नाही. बेटर वे तुच नीरजा पासून दूर राहिलेलं बरं. तुमची मैत्री पूर्ववत कशी होणार नाही, हाच माझा प्रयत्न असेल.’ गौरवच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य होते.
—---------------------------------------------------

“हॅलो मुक्ता, बिजी आहेस का?” नीरजाने मुक्ताला फोन केला.

“लंच ब्रेक आहे. बोला ना.” मुक्ता म्हणाली.

“मला शॉपिंग करायला जायचं आहे. माझ्यासोबत यायला जमेल का?” नीरजाने विचारले.

“आज संध्याकाळी एक्स्ट्रा लेक्चर आहे, तर मला नाही येता येणार.” मुक्ताने उत्तर दिले.

“आता मी सोबत कोणाला घेऊन जाऊ?” नीरजा विचारात होती.

“नीरव दादाला घेऊन जा.” मुक्ताने सुचवले.

“बरं, बघते.” नीरजाने फोन कट केला.

थोड्यावेळ विचार करून नीरजा नीरवच्या केबिनमध्ये गेली.

“मुक्ताला माझ्यासोबत शॉपिंग करायला यायला जमणार नाहीये. केतकीला सरप्राईज द्यायचे असल्याने मी शॉपिंग करण्यासाठी तिची मदत करू शकत नाहीये, तर तुम्हीच माझ्या बरोबर शॉपिंग करायला चला.” नीरजा एका दमात सगळं काही बोलून गेली.

नीरव तिच्याकडे बघून हसला.

“अग तू हे शांतपणे पण बोलूच शकली असती. मी तुझ्यासोबत येईल. आपण काल ज्या मॉलमध्ये गेलो होतो, तिथेच जाऊयात. चालेल ना?”

“हो चालेल. मला केतकी साठी पण काहीतरी गिफ्ट घ्यायच आहे.” नीरजा.

“नीरजा, तू केतकीला भेटण्यासाठी किती एक्सायटेड झाली आहेस.” नीरव.

“मला असं झालंय, कधी एकदा मी केतकीला जाऊन भेटतेय.”

“तू तुझ्या केबिनमध्ये जाऊन बस. माझं काम अर्ध्या तासात संपेल. मग आपण शॉपिंग करायला जाऊयात.” नीरव म्हणाला.

नीरजा होकारार्थी मान हलवून आपल्या केबिनमध्ये निघून गेली. अर्ध्या तासाने नीरवच काम उरकल्यावर दोघेजण शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये गेले. कोणते कपडे घ्यायचे हे नीरजाला समजत नव्हते. नीरजा कुर्त्याच्या सेक्शनकडे वळल्यावर नीरव म्हणाला,

“तू कॉन्फरन्सला कुर्ता आणि लेगीन घालणार आहेस का?”

“मग कोणते कपडे घेऊ, मला काहीच कळत नाहीये?” नीरजा गोंधळली होती.

“फॉर्मल शर्ट, ट्राऊजर, जीन्स आणि टॉप घे.” नीरव शांतपणे म्हणाला.

नीरवने सांगितल्याप्रमाणे नीरजाने त्याला विचारून, त्याच्या पसंतीने कपडे घेतले. नीरवला नीरजाची आवड माहीत असल्याने त्याने तिला एक फॉर्मल पंजाबी ड्रेस घ्यायला सांगितला.

“आता शूज, गॉगल घ्यावा लागेल.” नीरव मॉलमध्ये इकडे तिकडे बघत असताना म्हणाला.

“ते कशाला?” नीरजा त्याच्याकडे बघून म्हणाली.

“नीरजा, तुला खरंच काही कळत नाहीये का? की तू माझी खेचत आहेस?” नीरवला प्रश्न पडला होता.

“यापैकी मी काहीच करत नाहीये. माझ्याकडे जुने शूज आहेत आणि गॉगल घालण्याची मला सवय नाहीये.” नीरजा म्हणाली.

“आपण नवीन शूज आणि गॉगल घेणार आहोत.” नीरव शूजच्या दुकानाकडे वळला.

शूज व गॉगल घेऊन झाल्यावर नीरवने तिला परफ्युम घेऊन दिला. नीरजाने केतकीसाठी पर्स घेतली. सगळी शॉपिंग झाल्यावर नीरव व नीरजा गाडीत बसले.

“नीरव, खूपच खर्च झाला. इतकं सगळं घेण्याची काय गरज होती.” नीरजा अस बोलल्यावर नीरवने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला,

“हे बघ नीरजा, माणसाच्या राहणीमानावरून त्याची पारख केली जाते. तू छानच राहते, त्यात काहीच वाद नाही. पण आपण जर बाहेर कुठेतरी जाणार आहोत, तर त्या रीतीने आपण आपलं राहणीमान, कपडे थोडं बदलायला हवं.

कपडे, आपला लूक थोडा बदलला तरी आपल्याला बरं वाटत. आपल्या मनात एक वेगळीच सकारात्मकता निर्माण होते. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. आता देवाच्या कृपेने आपल्या कडे पैसे आहेत, म्हणून थोडेफार आपण आपल्यासाठी खर्च केले तर काही बिघडत नाही. केतकी जेव्हा तुला नवीन लुकमध्ये बघेल तेव्हा ती सुद्धा खूप खुश होईल.”

“हो, ते आहेच. केस कट करण्यासाठी ती माझ्या कधीपासून मागे लागली होती. आता तिने सांगितलेला हेअरकट करून मी तिला सरप्राईजच देते.” नीरजा बोलल्यावर नीरव गालातल्या गालात हसला.

बंगलोरला जाण्यासाठी नीरजा फुल्ल जोशमध्ये तयारी करत होती. नीरजा मुद्दाम केतकीला दररोज ‘सॉरी, मला बंगलोरला यायला जमणार नाही. प्लिज फोनवरच तुझ्या आयुष्यात कोण आलंय सांग ना.’ या आशयाचे मॅसेज करत होती.

नीरजा पार्लरमध्ये जाऊन हेअरकट करून आली होती. नवीन हेअरकट केल्याने नीरजाचा लूक बदलला होता. नीरव तिच्या बदललेल्या लुककडे आ वासूनच बघत राहिला होता. नीरजा पार्लर मधून आली, त्यावेळी नीरव, शालिनी व संगिता आई हॉलमध्ये बसलेले होते.

“नीरजा, हा हेअरकट तुला अगदी शोभून दिसतोय.” शालिनी आई म्हणाल्या.

“थँक् यू.” नीरजा गालातल्या गालात लाजत म्हणाली.

“नीरजा, खरंच खूप भारी दिसतेय. केस बांधण्यापेक्षा असेच मोकळे सोडत जा.” संगिता आई म्हणाल्या.

नीरजाने नीरवकडे बघितले, तर तो तिच्याकडे एकटक बघत होता. शालिनी आई नीरवकडे बघून म्हणाल्या,
“नीरव, नीरजाने अशी हेअरस्टाईल नेहमी केलेली तुला चालेल ना?”

शालिनी आई गालातल्या गालात हसत होत्या.

“हो.” नीरव नीरजाकडे बघत उत्तरला.

नीरवचं आपल्याकडे एकटक बघण्याने नीरजाच्या पोटात फुलपाखरं नाचायला लागली होती.
“आई मी आलेच.” अस म्हणून नीरजा लाजून आपल्या रूममध्ये गेली.

“नीरव, ती गेली बर का?” शालिनी आई मुद्दाम म्हणाल्या.

नीरवने त्यांच्याकडे बघितले, तर त्या गालात हसत होत्या. नीरव हातात मोबाईल घेऊन म्हणाला,
“मला हॉस्पिटलमध्ये एक कॉल करायचा आहे.” अस म्हणून तो तेथून उठून गेला.

“यांची जोडी लवकरच जुळेल अस दिसतंय.” संगिता आई म्हणाल्या.

“देव करो नी असच होवो.” शालिनी आईने दुजोरा दिला.

नीरव हातात मोबाईल घेऊन घराबाहेर लॉनवर गेला, तेथील खुर्चीत बसून तो विचारात पडला,
‘मी नीरजाकडे खेचला जातोय का? आज तिच्याकडे बघून मनात काहीतरी झालं. तिच्यासमोर जाऊन तिचा चेहरा ओंजळीत घ्यावा वाटत होता. तिच्या केसांमधून हात फिरवण्याची इच्छा होत होती. तिला जवळ घ्यावेसे वाटत होते. हे मला काय होतंय, मला तिच्याबद्दल प्रेम वाटतेय की हे फक्त आकर्षण आहे?’
नीरवच्या मनात आपल्याच वागण्याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. नीरवने डोळे झाकले तर काही वेळापूर्वी बघितलेला नीरजाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला आणि त्याने खाडकन डोळे उघडले.

नीरव आणि नीरजाचं नात आता पुढे जाईल का? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all