Login

समर्पण-एक प्रेमकथा भाग १०४

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण - एक प्रेमकथा भाग १०४

मागील भागाचा सारांश: स्नेहाला आपल्या भूतकाळा बद्दल सगळं काही कळू नये म्हणून गौरव स्नेहा व नीरजामध्ये दुरावा वाढवत होता. नीरजा सोबत शॉपिंग करायला कोणीच नसल्याने ती नीरवला घेऊन गेली होती. नीरवने त्याच्या पसंतीने नीरजाला कपडे व इतर सामान घेऊन दिले. नीरजाने हेअरकट केल्यावर तिचा लूक बदलला होता, नीरव तिच्याकडे आकर्षित झाला होता.

आता बघूया पुढे….

“नीरजा, पॅकिंग झाली का?” नीरव नीरजाच्या रूममध्ये येऊन म्हणाला.

नीरजा बॅग मधील कपडे चेक करत होती, तिच्या हातात एक यादी होती.

“हो, काही राहील का ते चेक करत होते.” नीरजा आपल्या हातातील कागदाकडे बघून बोलत होती.

“अग, काही इकडे विसरल तरी तिकडे आपण नवीन घेऊ शकतो.” नीरव बाजूला असलेल्या खुर्चीत बसत म्हणाला.

“मला फुकटचे पैसे घालवायला आवडत नाही.” नीरजा आपले काम करत असताना म्हणाली.

“एनिवेज, तुला हा हेअरकट शोभून दिसतोय. तू एक वेगळीच नीरजा वाटतेय. मस्त दिसतेस.” नीरव तिच्याकडे बघत म्हणाला.

नीरवच बोलणं ऐकल्यावर तिच्या हातातील कागद गळून पडला. ती गालातल्या गालात लाजली, तिने हळूच वर मान करून नीरवकडे बघितले, तर तो तिच्याकडे एकटक बघत होता. नीरवच्या त्या नजरेने नीरजाला कसेतरीच होत होते.

“प्लिज माझ्याकडे अस बघू नका. मला कसंतरी होतंय.” नीरजा खाली मान घालून बोलत होती.

“कसंतरीच म्हणजे नेमकं तुला काय होतंय?” नीरव नीरजाची खेचत होता.

“जे होतंय ते एक्सप्लेन करता येत नाहीये.” नीरजाचे गाल लाजून लाल झाले होते.

“म्हणजे मी तुझ्याकडे अस एकटक बघणं तुला आवडत नाही ना?” नीरव गालातल्या गालात हसत होता.

“मी अस कुठे म्हटलंय.” नीरजा नीरवकडे बघून म्हणाली, तर नीरव हसत होता.

“नीरव, तुम्ही माझी खेचताय.” नीरवकडे उशी भिरकावून ती म्हणाली.

नीरवने ती उशी झेलली व आपल्या उराशी कवटाळून धरली. नीरजाला आता जास्त लाजल्यासारखे झाले होते. नीरव आपल्या जवळ उशी घट्ट पकडून नीरजाकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात आपल्या बद्दलचे प्रेम नीरजाला स्पष्ट दिसत होते. आता नीरजाही त्याच्याकडे एकटक बघत होती. दोघांच्याही नजरेत नितळ प्रेम दिसत होते. रूममध्ये नीरव शांतता पसरली होती. टाचणी पडली असती तरी आवाज झाला असता एवढी शांतता होती.

मोबाईलची नोटिफिकेशन टोन वाजल्यावर दोघांची तंद्री भंग पावली. नीरव मोबाईल मध्ये बघून म्हणाला,

“नीरजा, आपल्याला पंधरा मिनिटात एअरपोर्टला जाण्यासाठी निघावं लागेल.”

“हो, मी पटकन कपडे बदलून खाली होते.” नीरजा आपल्या जागेवरून उठत म्हणाली.

आपल्या कपड्यांकडे बघत नीरव म्हणाला,
“मलाही शर्ट बदलायचा राहिलाय.” तो आपल्या रुममध्ये निघून गेला.

नीरजाने पटकन कपडे बदलले. आरशात बघत असताना नीरवची नजर तिला आठवली आणि तिचे गाल लाजेने लाल झाले. एअरपोर्टला जायला उशीर नको म्हणून ती पटकन आवरून आपली बॅग घेऊन खाली आली. हॉलमध्ये शालिनी व संगिता आई बसलेल्या होत्या, तर मुक्ताही तिच्या रूममधून बाहेर आली होती.

नीरजाने स्काय ब्लू कलरचा टॉप व त्यावर ब्लॅक कलरची जीन्स घातलेली होती. केस मोकळे सोडलेले होते. गळ्यात नाजूक मंगळसूत्र घातलेले होते, तर हाताला स्लिंग पर्स अडकवलेली होती. पायात ब्लॅक कलरचे शूज घातलेले होते.

“ओहो नीरजा वहिनी, आज तर सॉलिड दिसताय.” मुक्ता हसून म्हणाली.

शालिनी आई नीरजा जवळ आल्या, त्यांनी आपल्या डोळ्यातून काजळ काढून नीरजाच्या कानामागे लावले.

“माझ्या पोरीला कोणाची नजर न लागो.”

नीरजा शालिनी आईच्या पाया पडली. संगिता आई तिथेच बाजूला बसलेल्या होत्या, तर त्यांच्याही ती पाया पडली.

“नीरव दादा, पण आज एकदम तयार होऊन आलाय.” पायऱ्यांकडे बघत मुक्ता म्हणाली.

नीरजाने लगेच त्या दिशेने बघितले. नीरवने फुल बाह्यांचा टी शर्ट व त्यावर ब्ल्यू कलरची जीन्स घातली होती. शर्टची बाही त्याने थोडी फोल्ड केली होती. पायात ब्लॅक कलरचे शूज त्याने घातले होते. नीरव व नीरजाची नजरानजर झाल्यावर ते एकमेकांकडे एकटक बघतच होते. नीरव नीरजा जवळ येईपर्यंत ते दोघे एकमेकांकडेच बघत होते.

“गाईज, तुम्ही जर एकमेकांच्या नजरेत अडकलात तर तुमची फ्लाईट मिस होईल.” मुक्ता हसून म्हणाली, तसं दोघांची नजरबंदी तुटली. दोघांनी इकडे तिकडे बघितले.

“आई, आम्ही येतो.” नीरव व नीरजाने सगळ्यांचा निरोप घेतला. ड्रायव्हरने गाडीत दोघांच्या बॅग ठेवल्या.

“हॅपी जर्नी अँड एन्जॉय.” मुक्ता म्हणाली.

नीरव व नीरजा गाडीत बसून एअरपोर्टच्या दिशेने मार्गस्थ झाले. मागच्या सीटवर नीरव नीरजाच्या शेजारी बसला होता. नीरवच्या नकळत होणाऱ्या स्पर्शाने नीरजा मोहरून गेली होती. स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवण्यासाठी तिने आपली पर्स दोघांच्या मध्ये ठेवली.

नीरजा खिडकीकडे बघून गालातल्या गालात हसत होती. नीरवला नीरजाच्या वागण्याचा अर्थ कळत असल्याने तोही हसत होता. एअरपोर्ट आल्यावर दोघेही गाडीतून खाली उतरले. नीरजा पहिल्यांदाच एअरपोर्टवर आल्याने ती आजूबाजूला बघत होती. नीरव ट्रॉली घेऊन आला. त्याने दोघांच्या बॅग ट्रॉलीवर ठेवल्या.

नीरव व नीरजा एअरपोर्टच्या आत गेले. बेसिक फॉर्मलिटी पूर्ण झाल्यावर दोघेजण वेटींग एरियात जाऊन बसले. नीरजा एअरपोर्ट असणाऱ्या एकेक गोष्टीचं निरीक्षण करत होती.

“तू एअरपोर्ट पहिल्यांदाच बघते आहेस ना?” नीरव म्हणाला.

“हो.” नीरजाने उत्तर दिले.

“आपण एक सेल्फी घेऊयात का? आपला पहिला सोबतचा विमान प्रवास.” नीरव नीरजाकडे बघत म्हणाला.

नीरजाने मान हलवून होकार दर्शवला. नीरवने नीरजा सोबत सेल्फी घेतला.

“हाय डॉ नीरव, ओळखलं का?” नीरव व नीरजाने आवाजाच्या दिशेने बघितले, तर एक मुलगी त्यांच्याकडे चालत आली.

“हाय, तू इकडे कशी?” नीरवने विचारले.

“पुण्यात माझी एक मैत्रीण राहते, तिलाच भेटायला आले होते.”

नीरजा तिच्याकडे अनोळखी नजरेने बघत असल्याने नीरव म्हणाला,
“नीरजा, ही डॉ कामिनी आणि कामिनी, ही डॉ नीरजा, माय वाईफ.”

नीरजा व कामिनीने एकमेकींकडे बघून स्माईल दिली. कामिनी हे नाव ऐकल्यावर हीच गौरवची गर्लफ्रेंड असेन हे नीरजाला क्लिक झाले.

“ओह! नीरव, तू लग्न केलेस आणि मला बोलावलं सुद्धा नाहीस. दॅट्स नॉट फेअर.” कामिनी.

“लग्नाचे आमंत्रण द्यायला कॉन्टॅक्ट मध्ये रहायचं असतं.” नीरव म्हणाला.

“तू आता पुन्हा त्या टॉपिकवर येऊ नकोस. एनिवेज, तू कुठे चालला आहेस?” कामिनीने विषय बदलला होता.

“बंगलोर.” नीरवने उत्तर दिले.

“ग्रेट, मी पण बंगलोरलाच चालले आहे. सध्या तिकडेच एक हॉस्पिटल जॉईन केले आहे.” कामिनी म्हणाली.

“तुम्ही उभ्या का? बसा ना.” नीरजा अस बोलल्यावर कामिनी नीरजाच्या शेजारी बसली.

“तू मागे सिंगापूरला शिफ्ट झाली होतीस ना?” नीरवने विचारले.

“हो. पण मी आपला देश सोडून जास्त दिवस तिकडे राहू शकत नाही. माझ्या नवऱ्याला भारतात यायचं नाहीये आणि मला भारत सोडायचं नाहीये, सो वर्षातील काही महिने आम्ही सोबत राहणार आणि बाकीचे दिवस वेगवेगळे अस आमच्यात ठरलं आहे.” कामिनीने सांगितले.

“पुन्हा एखादा डॉ गौरव जाळ्यात अडकवला तर नाही ना?” नीरवने कुश्चितपणे विचारले.

यावर कामिनी हसून म्हणाली,
“तू तुझ्या मित्राला जितकं साधं सरळ समजतोस, तेवढा तो नाहीये. त्याचा खरा चेहरा फक्त मला माहित आहे.”

“कामिनी, मला तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय झालं होतं? ते ऐकायचं आहे. गौरव गेले काही महिने कोणाच्याच संपर्कात नव्हता. तू त्याला सोडून गेल्याने तो डिप्रेशन मध्ये गेला होता.” नीरव म्हणाला.

कामिनी हसून म्हणाली,
“ तो दुसऱ्यांना डिप्रेशन मध्ये घालवेल, पण स्वतः जाणार नाही. तो एक नंबरचा नाटकी माणूस आहे. मी तुला त्याच्या बद्दल सगळं सांगेल, पण आता नाही. आपल्या फ्लाईटची वेळ झाली आहे. आपण बंगलोरला भेटून याबद्दल बोलूयात.”

तेवढ्यात बंगलोरला जाणाऱ्या फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली. कामिनी आपली हॅन्डबॅग घेऊन सांगितलेल्या गेट मधून निघून गेली. नीरव व नीरजाही त्या दिशेने गेले.