समर्पण-एक प्रेमकथा भाग १०५

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग १०५

मागील भागाचा सारांश: नीरव नीरजाकडे खेचला जात होता. बंगलोरला जाण्यासाठी नीरव व नीरजा एअरपोर्ट वर गेले असताना तिथे त्यांना डॉ कामिनी भेटते. गौरवचा विषय निघाल्यावर तो खरा कसा आहे हे मी तुम्हाला निवांत सांगते, अस कामिनीने नीरवला सांगितले.

आता बघूया पुढे….

नीरजाचा पहिला विमान प्रवास असल्याने ती खूपच एक्सायटेड होती.

“मी खिडकीच्या बाजूला बसू का?” नीरव आधीच सीटवर बसला असल्याने नीरजाने विचारले.

“हो, बस ना.” नीरव उठून बाजूला झाला.

नीरजा खिडकीच्या बाजूला बसली. नीरजा खिडकीतून बाहेर बघत होती.

“दिवसाची फ्लाईट असती, तर तुला आकाश बघायला मिळालं असतं.” नीरव म्हणाला.

“हो ना. मलाही बघायला आवडलं असतं. आपली येतानाची फ्लाईट पण रात्रीच आहे का?” नीरजाने विचारले.

“संध्याकाळी पाचची आहे.” नीरवने उत्तर दिले.

तेवढ्यात एअर होस्टेसने बेल्ट बांधण्याची सूचना दिली. नीरजाला बेल्ट बांधायला जमत नसल्याने नीरवने तिची मदत केली.

“विमानाने टेक ऑफ केल्यावर काही त्रास होतो का?” नीरजाने अस विचारल्यावर नीरव हसून म्हणाला,

“नाही.”

“तुम्ही माझी उडवताय ना.” नीरजा राग आल्याच नाटक करत म्हणाली.

“नाही ग. तू लहान मुलांसारखा प्रश्न विचारला ना म्हणून हसायला आलं.” नीरव म्हणाला.

“नीरव, मी पहिल्यांदा विमानात बसलेय म्हणून मला असे प्रश्न पडत आहेत.” नीरजा म्हणाली.

विमान टेक ऑफ झाल्यावर नीरजा डोळे मिटून बसली होती, पण तिला काहीच त्रास झाला नाही. नीरजा डोळे उघडून म्हणाली,
“मला काहीच त्रास झाला नाही.” तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं.

“ज्यांना मोशन सिकनेसचा त्रास असतो त्यांनाच विमान टेक ऑफ होताना त्रास होत असतो.” नीरव.

“आता बेल्ट सोडला तर चालेल ना.” नीरजाचा प्रश्न.

नीरवने होकारार्थी मान हलवली.

“केतकी, मला बघून किती खुश होईल ना.” नीरजा बेल्ट सोडत असताना म्हणाली.

“आपण उद्या सकाळीच तिच्या घरी जाऊयात.” नीरव.

“ती घरी असेल ना.” नीरजाला प्रश्न पडला होता.

“उद्या शनिवार आहे. तिला शनिवार, रविवार सुट्टी असते ना. विसरलीस की काय?” नीरव एक भुवई उंचवून म्हणाला.

“अरे हो. मी विसरलेच होते. आपल्याला कॉन्फरन्सला पण जायचं आहे. सगळं कसं मॅनेज करणार.” नीरजा.

“नीरजा, मी सगळं काही प्रॉपर प्लॅन केलं आहे. सगळे गाणे वाजतील. तू काळजी करू नकोस. या प्रवासाचा आणि या ट्रीपचा आनंद घे.” नीरव.

“हो. एक प्रश्न विचारु.” नीरजा.

“एकच ना?” नीरव हसून म्हणाला.

“डॉ कामिनीला कधी भेटायचं?” नीरजाने तिला पडलेला प्रश्न विचारला.

“उद्या संध्याकाळी भेटू. उद्या सकाळी तिला तसं विचारून घेतो. तुला तिला भेटायची एवढी घाई का झाली आहे?” नीरव म्हणाला.

नीरजा पुढे म्हणाली,
“डॉ गौरव जर चुकीचा व्यक्ती असेल, तर स्नेहाला त्याच्या पासून दूर करावे लागेल. स्नेहाला तो स्वतःमध्ये अडकवत आहे. स्नेहा माझ्याशी अशी कधीच बोलत नव्हती.”

“हो तेही आहेच. गौरव जर अस काही करत असेल, तर त्याला जॉब देऊन मी सर्वांत मोठी चूक केली आहे.” नीरवच्या डोळ्यात गिल्ट दिसत होता.

“आपण विचार करतोय, त्यापेक्षा परिस्थिती काही वेगळीही असू शकते.” नीरजा.

“माहीत नाही, आता ते कामिनी सोबत बोलल्यावरच कळेल.” नीरव म्हणाला.

नीरव व नीरजाच्या गप्पा सुरु असताना ते बंगलोरला कधी पोहोचले हे त्यांना कळलेही नाही. दीड तासात ते पुण्याहून बंगलोरला पोहोचले होते. एअरपोर्ट वर उतरल्यावर कामिनीने नीरवला तिचा फोन नंबर दिला.

नीरव व नीरजा कॅबने एअरपोर्ट वरून हॉटेलला गेले. तिथे गेल्यावर नीरवने रिसेप्शनवर जाऊन आपले नाव सांगितले व रूमची चावी घेतली. हॉटेल मधील सर्वंट त्यांच्या बॅग घेऊन पुढे गेला. नीरजा हॉटेलचे भव्यदिव्य रूप न्याहाळत होती. नीरव व नीरजा लिफ्टने आपल्या रूमपर्यंत गेले. त्यांच्या बॅग आधीच रुममध्ये पोहोच झाल्या होत्या. सर्वंट जाईपर्यंत नीरजा काहीच बोलली नाही. तो गेल्यावर ती म्हणाली,

“नीरव, आपण दोघे एकाच रूममध्ये राहणार आहोत का?”

नीरजा दरवाजातच उभी राहून बोलत होती, तर नीरव रूममध्ये जाऊन इकडे तिकडे बघत होता. नीरजा बोलल्यावर नीरव तिच्याकडे बघून म्हणाला,

“नीरजा, आपल्याला डॉक्टर कपल म्हणून कॉन्फरन्स साठी इन्व्हाईट करण्यात आले आहे. मग ते आपल्यासाठी दोन रूम कश्या काय बुक करतील.”

“नीरव, पण आपण दोघे एका रूममध्ये कसे राहू शकतो?” नीरजा दोन पाऊल पुढे टाकत म्हणाली.

नीरव कंबरेवर हात ठेवून म्हणाला,
“डोन्ट वरी, मी तुझ्या अंगाला थोडासाही स्पर्श करणार नाही.”

हे ऐकल्यावर नीरजा खाली मान घालून म्हणाली,
“नीरव, मला तसं नव्हतं म्हणायचं. एकाच बेडवर झोपणं आपल्या दोघांसाठी अनकम्फर्टेबल होईल असं मला म्हणायचं होत.”

“तू एकदा पुढे येऊन रूम तर बघ. बेड किती मोठा आहे. आपण दोघांमध्ये उश्या ठेवून झोपूच शकतो. आता तुझ्या मनातील शंका दूर झाल्या असतील तर तू फ्रेश होऊन ये. त्याआधी जेवणासाठी काय ऑर्डर करू सांग.” नीरव बोलल्यावर नीरजा रूममध्ये आली.

तिने आजूबाजूला बघितलं तर मोठा बेड होता, त्याच्या शेजारी एक छोटासा टेबल होता, त्यावर टेबल लॅम्प होता. रूममध्ये साईडलाच दोन खुर्च्या आणि एक टीपॉय होता. एका बाजूला कोपऱ्यात ड्रेसिंग टेबल होता. रूमला मोठी गॅलरी होती.

“ओ मॅडम, रूमचे निरीक्षण नंतर करा. मला भूक लागली आहे.”

“हलकं काहीतरी ऑर्डर करा.” नीरजा म्हणाली.

“मी फ्राईड राईस मागवतोय. तुझ्यासाठी दालखिचडी मागवू का? दोन्ही थोडं थोडं खाता येईल.” नीरवने मेन्यू कार्डमध्ये बघत विचारले.

“चालेल.” नीरजाने होकारार्थी मान हलवली.

नीरवने फोन करून जेवणाची ऑर्डर दिली. नीरजाने आपली बॅग उघडून त्यातून कपडे काढले व ती फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. थोड्याच वेळात ती बाहेर आली, मग नीरव फ्रेश होऊन आला. काही वेळात त्यांचे जेवण रूममध्ये आले होते.

नीरव व नीरजाने गप्पा मारता मारता जेवण केले. बराच उशीर झाल्याने नीरजाने दोघांच्या मध्ये उश्या लावल्या व ती झोपली. नीरव जरावेळ मोबाईल मध्ये टाईमपास करत गॅलरीत जाऊन बसला होता. तो रूममध्ये आल्यावर त्याने नीरजाने लावलेल्या उश्या बघितल्या व तो गालातल्या गालात हसला. तो बेडवर जाऊन बसला, तेव्हा त्याचे लक्ष झोपलेल्या नीरजावर गेले.

‘झोपेत तर तुझं सौंदर्य अजून खुलून दिसत आहेस. तुझं रूप किती निरागस आहे. मी कधी तुला नोटीसच केलं नाही ग. अगदी थोड्याच दिवसात आपल्यात या उश्या राहणार नाही. तुला माझ्यासोबत एका रूममध्ये राहणं अनकम्फर्टेबल वाटणार नाही. मी लवकरच माझ्या तुझ्यावरची प्रेमाची कबुली तुला देणार आहे.’

नीरव नीरजाकडे बघत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी नीरजाला जाग आली, तर डोळे उघडल्या बरोबर तिला बाजूला झोपलेला नीरव नजरेस पडला.

‘एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचा भार सांभाळणारा माणूस झोपल्यावर किती शांत दिसतो. दिवसभर डोक्यात सतत चक्र फिरत राहतात. नीरव, तुम्ही माझ्या प्रेमात पडले आहात, हे न समजण्याइतकी मी लहान नाहीये, पण मला हे तुमच्या तोंडून ऐकायचं आहे.’

नीरजा नीरवकडे बघत असतानाच त्याने डोळे उघडले. नीरजाने आपली नजर दुसऱ्या दिशेला वळवली.

“गुड मॉर्निंग नीरजा.” नीरव आळस देत उठून बसला.

“गुड मॉर्निंग.” नीरजा बेडवरून खाली उतरली.

“नीट झोप लागली ना?” नीरवने विचारले.

“हो. आपल्याला किती वाजता निघायचे आहे?” नीरजाने गॅलरीचा दरवाजा ढकलत विचारले.

घड्याळात बघत नीरव म्हणाला,
“नऊ वाजता नाश्ता करून निघूयात.”

“चालेल.” म्हणत नीरजा गॅलरीमध्ये गेली व बाहेरील दृश्य बघण्यात मग्न झाली.

“तुला गॅलरी आवडलेली दिसतेय.” नीरव गॅलरीत जाऊन म्हणाला.

“हो. इथून व्ह्यू किती छान दिसत आहे. मस्त वाटतंय.” नीरजाच्या चेहऱ्यावर आनंद होता.

नीरव पुढे म्हणाला,
“आपल्याला लवकर आवराव लागेल. मी चहा-नाश्ता रूममध्येच मागवतो. बंगलोरच्या ट्रॅफिकचा आपल्याला अंदाज नाहीये. पुढचे सगळे प्लॅनमध्ये गोंधळ व्हायला नको.”

“मी पटकन अंघोळ करून येते.” नीरजा बाथरूम मध्ये गेली.

नीरव व नीरजाने रूममध्ये नाश्ता केला व ते नऊ वाजता केतकी कडे जाण्यासाठी कॅबमध्ये बसले.

नीरजाला बघून केतकीची काय रिऍक्शन असेल? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all