समर्पण- एक प्रेमकथा भाग १०६

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग १०६

मागील भागाचा सारांश : नीरजाचा पहिला विमान प्रवास असल्याने ती जरा जास्तच एक्सायटेड होती. नीरवला वेगवेगळे प्रश्न विचारून ती हैराण करून सोडत होती. एका रूममध्ये रहायला लागणार असल्याने नीरजाला थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं.

आता बघूया पुढे….

नीरजा व नीरव कॅब मध्ये बसून केतकीच्या घराच्या दिशेने निघाले होते.

“केतकी मला बघून सरप्राईज होईल. मला तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघायचा आहे.” नीरजा खिडकीतून बाहेर बघत बोलत होती.

“केतकीला किती आनंद होईल ते मला माहित नाही, पण तुला किती आनंद होत आहे, हे तुझ्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत आहे आणि मला तुझा आनंद जास्त महत्त्वाचा आहे.” नीरव अस बोलल्यावर नीरजाने त्याच्या कडे बघितले व दोघेजण एकमेकांच्या नजरेत हरवून गेले.

“साहब, आपका स्टॉप आ गया हैं.” ड्रायव्हर अस बोलल्यावर नीरव व नीरजाची तंद्री तुटली.

“हा ड्रायव्हर पण ना. चुकीच्या वेळी डिस्टर्ब केलं.” नीरव कॅब मधून खाली उतरताना पुटपुटला. नीरजा त्याच बोलणं ऐकून गालातल्या गालात हसली.

नीरवने कॅबचे पैसे दिल्यावर ड्रायव्हर निघून गेला.

“केतकी या बिल्डिंग मध्ये राहते तर…. किती मोठी बिल्डिंग आहे.” बिल्डिंग कडे बघत नीरजा म्हणाली.

“चल आत जाऊया.” नीरव पुढे जात म्हणाला.

नीरजा त्याच्या पाठीमागे जात होती.

“नीरव, तुम्हाला केतकीचा पत्ता कसा मिळाला?” नीरजाला प्रश्न पडला होता.

“तू हे केतकीलाच विचार.” नीरव पुढे चालत चालत म्हणाला.

एव्हाना हे दोघे लिफ्टजवळ जाऊन पोहचले. लिफ्टचे बटण दाबल्यावर तीन मिनिटात लिफ्ट खाली आली, तोपर्यंत नीरजा आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करत होती. लिफ्टमध्ये गेल्यावर नीरवने ५ नंबरवर क्लिक केले. लिफ्ट पाचव्या मजल्यावर जाऊन थांबली.

नीरव पुढे व नीरजा मागे असे ते दोघे लिफ्ट मधून बाहेर पडले.

“मी बेल दाबतो, तू दरवाजा समोर जाऊन उभी रहा.” नीरव बोलल्यावर नीरजा दरवाजात जाऊन उभी राहिली.

नीरवने दरवाजा शेजारील बेल दाबली. जरावेळ झाला तरी दरवाजा न उघडला गेल्याने नीरवने पुन्हा बेल दाबली.

“ दीदी, आपण छुट्टी के दिन भी सोने नही देते. मैने बोला था ना, आज देर से आओ.” डोळे चोळत केतकी दरवाजा उघडून बडबड करत होती. केतकीच्या अवतारावरून ती झोपेतून उठून आलेली आहे, हे कळत होते.

“सॉरी झोप डिस्टर्ब केल्याबद्दल. तुला झोपायचं असेल तर मी परत जाऊ का?” नीरजा चेहऱ्यावर हसू आणून म्हणाली.

नीरजाचा आवाज ऐकल्यावर केतकीने मोठे डोळे करून बघितले.

“नीरजा, शीट यार. पुन्हा स्वप्न पडलं.”

“स्वप्न नाही तर सत्य आहे.” नीरजा केतकीच्या हाताला चिमटा घेत म्हणाली.

“आई ग!” केतकी हाताला चोळत म्हणाली.

“ये तू खरच आली आहे का?” केतकी अस बोलल्यावर नीरजा तिला मिठी मारून म्हणाली,
“हो.”

केतकीच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

“बरं तुमच्या मैत्रिणींचा मिलाप झाला असेल तर आपण आत जाऊया का?” बाजूला असलेला नीरव म्हणाला.

केतकी नीरवकडे बघून म्हणाली,
“सर, तुम्हीपण आला आहात का? या ना आत.” केतकी दरवाजातून आत गेली.

नीरव व नीरजा दोघेही घरात गेले. केतकी दरवाजा लावत म्हणाली,
“तुम्ही बसा मी दोन मिनिटात अवतार नीट करून आले.”

केतकीने घर छान नीट नेटके ठेवलेले होते. हॉल मध्ये एक सोफा व दोन लाकडी खुर्च्या होत्या. बाजूला एक टीपॉय होता. टीपॉय वर लॅपटॉप होता. भिंतीवर दोन निसर्गाच्या फ्रेम होत्या. बाकी हॉल रिकामा होता.

केतकी पाण्याचे दोन ग्लास घेऊन आली.

“नीरजा, अरे आधी फोन करायचा ना. मला वाटलं, कामवाली दीदी असेल म्हणून मी बघण्याआधी बडबड करत होते.” केतकीने दोघांना पाणी दिले.

“आधी सांगितलं असत तर तुला सरप्राईज कस देता आलं असत.” नीरजा म्हणाली.

“तुम्ही दोघे अचानक बंगलोरला कसे?” केतकीला प्रश्न पडला होता.

“कॉन्फरन्स आहे.” नीरजाने उत्तर दिले.

“ओके, पण मला तुमचं हे सरप्राईज खूप आवडल. तू बंगलोरला येऊन मला अस सरप्राईज देशील, हे मला कधीच वाटलं नव्हतं.” केतकीने पाण्याचे रिकामे ग्लास आत नेऊन ठेवले.

“तू रुसली होती, तर मला यावं लागेलच ना.” नीरजा म्हणाली.

“तुम्ही चहा घेणार ना?” नीरवकडे बघत केतकीने विचारले.

“नाही. आम्ही चहा नाश्ता हॉटेल वरून करून आलो आहोत. तुम्ही दोघी मैत्रिणी गप्पा मारा, एन्जॉय करा. मी माझ्या मित्राच्या हॉस्पिटलला भेट देऊन येतो. मी तुमच्यात कबाब मे हड्डी नको.” नीरव खुर्चीतून उठत म्हणाला.

“नीरव, पण आपल्याला कॉन्फरन्सला जायचं आहे ना?” नीरजाने विचारले.

“कॉन्फरन्स नाहीये.”

“म्हणजे?”

यावर नीरव म्हणाला,
“नीरजा, तुला केतकीला भेटायला इकडे यायचं होत, पण तू खर्चामुळे नाही म्हणत होतीस, तर मीच खोट्या कॉन्फरन्सचा प्लॅन केला. तसही इकडे माझ्या मित्राचं मोठं हॉस्पिटल आहे, ते बघायला मला यायचं होत. तर आपल्या दोघांचंही काम होईल या विचाराने मी हा प्लॅन केला.

तुला मी असच आपण बंगलोरला जाऊया बोलले असते तर तू तयार झाली नसती.”

“नीरव, म्हणजे तुम्ही सगळं हे माझ्यासाठी प्लॅन केलं.” नीरजाचे डोळे भरून आले होते.

“चला मी निघतो. मी दुपारी तुला घ्यायला येईल मग बाकीच बोलू. माझा मित्र खूप बिजी असतो, त्याची अपॉइंटमेंट घेतली आहे. वेळेत जावं लागेल.” नीरव हे बोलून घराबाहेर पडला. नीरजा व केतकी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसल्या.

“केतकी, नीरवने हे सगळं माझ्या इच्छेसाठी केलं. मी पैशांचा विचार करून बंगलोरला येणं टाळत आहे, हे त्यांना बोललेही नव्हते, तरी त्यांना कसं कळलं असेल.” नीरजाला भरून आलं होत.

“डॉ नीरव, तुझ्या प्रेमात पडलेत आणि आपण ज्याच्या प्रेमात पडतो, त्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय सुरू असत हे बरोबर आपल्याला कळत.” केतकी म्हणाली.

नीरजा डोळे पुसत म्हणाली,
“माझ्या प्रेमाचं सोड. तुझ्या प्रेमाबद्दल ऐकण्यासाठी मी एवढ्या लांब आले आहे. ते आधी सांग.”

“मी अंघोळ करून येते, मग आपण बोलूया का?” केतकीने विचारले.

“हो. तशीही तुझी अंघोळ पाच मिनिटांची असते.” नीरजा हसून म्हणाली.

केतकी अंघोळीला गेल्यावर नीरजा नीरवचा विचार करत होती,
‘कॉन्फरन्स नव्हती म्हणजे सगळा खर्च नीरवने केला आहे. नीरवने मुद्दाम स्वतः हून आमच्या दोघांसाठी एक रूम बुक केली होती. नीरवला माझ्यासोबत एका रूममध्ये राहिलेलं चालणार असेल हे यावरुन दिसतंय. नीरव, लवकर मित्राला भेटून या. मला तुमच्या सोबत बोलायचं आहे. मी तुमच्यासाठी काय आहे, हे तुम्ही बोलून नाही तर कृतीतून दाखवून दिलं आहे.

आता या क्षणाला मला केतकीच्या प्रेमाबद्दल ऐकण्यापेक्षा मला आपल्या प्रेमाबद्दल बोलायच आहे. नीरव बस झाला हा दुरावा. आता मला काही दिवस पण थांबायच नाहीये. तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे स्पष्टपणे मला जाणवलं आहे.’

“नीरव बद्दल विचार करून झाला का?” केतकी अस बोलल्यावर नीरजा खाली मान घालून लाजली.

“ओहो! नीरजा मॅडमला लाजताही येतं.” केतकी तिच्याजवळ येऊन बसली.

“केतकी, फायनली.”

“फायनली, डॉ नीरव या गोड नीरजाच्या प्रेमात पडले. फायनली, नीरजाला तिचं प्रेम मिळणार. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू.” केतकी नीरजाला मिठी मारत म्हणाली.

नीरजाचे डोळे सारखे सारखे भरून येत होते.

“ओ मॅडम, आता रडायचे नाही, तर हसायचे दिवस आहेत.” केतकी म्हणाली.

“आनंदाश्रू आहेत हे.” नीरजा.

“तू या हेअरकट मध्ये एकदम भारी दिसत आहेस. आपल्याला ही नीरजा आवडली बर का?” केतकी हसून म्हणाली.

केतकी व नीरजा बोलत असतानाच दरवाजावरील बेल वाजली. केतकी कडील कामवाली बाई आलेली होती.

केतकीची लव्हस्टोरी व नीरव नीरजाकडे त्याच प्रेम व्यक्त करेल का? हे बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all