समर्पण-एक प्रेमकथा भाग १०७

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग १०७

मागील भागाचा सारांश: नीरव व नीरजाने केतकीकडे जाऊन तिला सरप्राईज दिले. नीरवने नीरजाला सांगितले की, कॉन्फरन्स नाहीये. तुला केतकीला भेटायला यायचे होते, पण तू खर्चाचा विचार करून नाही म्हणत होतीस, म्हणून हा प्लॅन मी केला. हे सगळं ऐकून नीरजाच्या डोळ्यात पाणी आले होते.

आता बघूया पुढे….

“तू काय खाणार आहेस?” केतकीने किचन मधून बाहेर येऊन नीरजाला विचारले.

“मला आधी तुझी लव्हस्टोरी ऐकायची आहे.” नीरजाने मोबाईल मध्ये बघता बघता उत्तर दिले.

“तुला भूक लागली नसेल तरी मला भूक लागली आहे. तसही आता तुझं पोट नीरवच्या प्रेमाने भरलं असेल.” केतकी नीरजाला चिडवत होती.

नीरजाही कमी नव्हती, ती पुढे म्हणाली,
“हो, मग. आता इतकं प्रेम करणारा मिळाला आहे, तर माझं पोट भरणारच ना. आता तुझा हिरो तुझ्यावर एवढं प्रेम करत नसेल, तर मग मी काय बोलणार.”

केतकी चिडून म्हणाली,
“ए, हॅलो. माझ्या कुणालला काही म्हणायचं नाही बरं. त्याच माझ्यावर खूप प्रेम आहे.”

“ओह! त्याच नाव कुणाल आहे तर… चला नाव तरी कळलं.” नीरजा गालातल्या गालात हसून म्हणाली.

“ओह, शीट. मी बोलता बोलता तुला नाव सांगून दिलं.” आपल्या कपाळावर हात मारत केतकी म्हणाली.

“बरं आता गुपचूप इथं बस आणि मला कुणाल बद्दल सगळं सांग.” नीरजा केतकीचा हात धरत म्हणाली.

“मी दीदीला काय स्वयंपाक करायचा ते सांगून आले.” केतकी किचन मध्ये निघून गेली.

नीरजा मोबाईल वर टाईमपास करत बसलेली होती. तेवढ्यात तिला नीरवचा मॅसेज आला.

“ मी मित्राकडे पोहोचलो आहे. तुमच्या गप्पा झाल्या की मला फोन कर, मग मी तुला घ्यायला येतो.”

नीरजाने लगेच रिप्लाय केला,
“आमच्या गप्पा होतीलच, पण तुम्ही लवकर या.”

“मला भेटायची खूपच घाई झालेली दिसतेय.” नीरव.

“हो, मला तुमच्याशी बोलायचं आहे.” नीरजा.

“ मलाही तुझ्याशी खूप बोलायचं आहे.” नीरव.

“आता धीर धरवत नाहीये.” नीरजा.

“एवढया दिवस धरला, आता काही तास धीर धर.” नीरव.

“प्लिज लवकर या.” नीरजा.

“हो, येतो.” नीरव.

“तुमचं चॅटिंग झालं असेल, तर आपण बोलूयात का?” केतकीला आपल्या समोर बसलेल पाहून नीरजा दचकली.

“दचकायला काय झालंय? केतकी.

“काही नाही. तू बोल.” आपल्या हातातील मोबाईल बाजूला ठेवत नीरजा म्हणाली.

केतकी हसली.

“मी जेव्हा बंगलोरला आले, तेव्हा कोणत्या मनस्थितीत होते, ते तर तुला ठाऊक आहेच. इथे आल्यावर कुणाल सोबत माझी ओळख झाली. कुणाल महाराष्ट्रीयन असल्याने त्याच्याशी विचार पटकन जुळले. सुरुवातीला तो खूप बोलायचा आणि मी शांत बसायचे. हळूहळू त्यानेच मला बोलत केलं.

प्रत्येक विकेंडला तो मला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जायचा. आमच्यात मैत्री खूप छान झाली होती. मी त्याच्या प्रेमात पडेल अस मला कधीच वाटलं नव्हतं. आम्ही जवळपास दररोजच भेटत होतो. हळूहळू आम्ही एकमेकांसोबत दिवसातील जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवू लागलो होतो.

एक दिवस तो खूप वैतागलेला होता, तर मी त्याला त्यामागील कारण विचारले, तर त्याने सांगितले की, “त्याच्या आईने त्याच्यासाठी एक मुलगी शोधली आहे.”

“मग त्यात वैतागण्या सारखं काय आहे?” मी विचारले.

“मला त्या मुलीसोबत लग्न करायचं नाहीये.” त्याने उत्तर दिले.

“तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का?” मी पुढील प्रश्न विचारला.

“हो.” तो म्हणाला.

“सिरियसली, तू प्रेमात पडला आहेस आणि याबद्दल तू मला एकदाही सांगितलं नाहीस. हीच आपली मैत्री आहे का?” तेव्हा मला थोडं वाईट वाटल होत.

“मी अजून त्या मुलीला सुद्धा मी तिच्या प्रेमात आहे, हे सांगितलं नाहीये.” तो म्हणाला.

“का?” मला प्रश्न पडला होता.

“मला भीती वाटत आहे.” तो.

“कसली, तिच्या नकाराची?” मी.

“तिने माझ्याशी असलेली मैत्री तोडली तर…” तो.

“तुमच्यात जर निर्मळ मैत्री असेल, तर ती तोडणार नाही. एकदा तिच्याकडे तुझ्या मनातील भावना बोलून तर दाखव.” मी.

“हिंमत होत नाहीये.” तो.

हिंमत तर करावी लागेलच. किती दिवस असा तळ्यात मळ्यात राहशील.” मी.

“केतू, आय लव्ह यू सो मच. माझ्याशी लग्न करशील का?” तो माझ्या समोर बसून माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. मी त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते.

मी हसून म्हणाले,
“कुणाल, तू प्रॅक्टिस करतो आहेस ना?”

“नाही.” त्याच्या डोळ्यात माझ्यावर असणारे प्रेम स्पष्ट दिसत होते.

“कुणाल, मी घटस्फोटीत आहे.” मी.

“मग.” तो माझ्याकडे एकटक बघत होता.

“अरे…पण.” मी.

“तुला मी आवडतो का? एवढ्याच प्रश्नाचं उत्तर दे.” तो.

“मला विचार करायला वेळ हवा आहे.” मला काय बोलाव तेच सुचत नव्हते.

“हवा तेवढा वेळ घे, पण माझ्याशी मैत्री तोडू नकोस.” तो एवढं बोलून माझ्या घरातून निघून गेला.

मी काही दिवस विचार केल्यावर त्याला होकार दिला. कुणालने आमच्या दोघांबद्दल त्याच्या घरी कल्पना दिली आहे. त्याच्या घरच्यांनी मी घटस्फोटीत असल्याने सुरुवातीला नकार दिला, पण त्याने त्यांना खूप कँविन्स केले. आता तेही आमचं लग्न करून द्यायला तयार आहेत.

माझ्या आई-बाबांना हे सांगण्यात काहीच अर्थ नाहीये. माझ्याकडे तू एकमेव अशी आहेस की, जिला माझ्यासाठी आनंद होईल. उद्या कुणालचे आई-वडील इकडे येणार आहेत, मला भेटायला. तेव्हा तू माझ्यासोबत असशील तर मला अजून आनंद होईल.”

नीरजाने केतकीला मिठी मारली,
“आय एम वेरी हॅपी फॉर यु.” नीरजा म्हणाली.

दोघींच्या डोळ्यात पाणी होते.

“केतकी, मेरा काम हो गया हैं. दरवाजा बंद कर लो.” कामवाली बाई बाहेर पडता पडता म्हणाली.

“केतकी, एकदा काका-काकूंना तू कुणाल बद्दल सांगावं अस मला वाटत.” नीरजा म्हणाली.

यावर केतकी म्हणाली,
“नीरजा, त्यांना याने काही फरक पडेल का? एकतर त्यांनी माझ्याशी सगळे संबंध तोडून टाकले आहेत. जेव्हा मला त्यांच्या आधाराची गरज होती, तेव्हा माझ्यासोबत उभे राहिले नाहीत. आताही मी जिवंत आहे की नाही याची सुद्धा ते चौकशी करत नाहीत.”

“केतकी, ते काही असेल, पण एकदा तू शांतपणे विचार कर. काहीही झालं तरी ते तुझे आई वडील आहेत. त्यांना तुला सपोर्ट करायचा असेलही पण ते ज्या समाजात राहतात, तेथील रूढी परंपरा मुळे ते तुला अडवत होते आणि तुझ्यासोबत ते उभे राहिले नसतील.

आपली मुलगी सुखी रहावी अस त्यांनाही वाटत असेलच की.” नीरजा तिला समजावत होती.

“बरं बाई. तुझ्या मनासारखं होऊन जाऊदेत.” केतकी मोबाईल वर नंबर टाईप करत म्हणाली.

केतकीने नंबर डायल करून फोन स्पिकरवर टाकला. दोन ते तीन रिंग वाजल्यावर फोन उचलला गेला.

“हॅलो, कोण बोलतंय?” समोरून विचारणा झाली.

“हॅलो, आई मी केतकी बोलतेय.” केतकीला आईचा आवाज ऐकून भरून आले होते.

“कोण केतकी?”

केतकीला हे ऐकून जास्त भरून आले होते.

“काकू, मी नीरजा बोलतेय. तुम्ही अस काय बोलताय?” नीरजा म्हणाली.

“नीरजा, तुझ्या मैत्रिणीला सांगून ठेव. पुन्हा मला फोन करू नकोस. तुझ्या काकांनी मला त्यांची शपथ घातली आहे. हिच्याशी बोलून मी त्यांची शपथ मोडू शकत नाही. ही महिन्यातून एकतरी फोन करत असते. प्लिज हिला फोन करायला सांगू नकोस.” फोन कट झाल्यावर केतकी म्हणाली,

“आता बोल.”

नीरजाला पुढे काय बोलावं काही कळत नव्हतं.

“मलाही माझ्या आईसोबत बोलावं वाटत ग, पण माझा आवाज ऐकून फोन कट होतो.” केतकीला रडायला येत होते.

नीरजा तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली,
“माझंच चुकलं. मीच तुझा चांगला मूड खराब केला.”

क्रमशः

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all