Login

समर्पण-एक प्रेमकथा भाग १०९

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग १०९

मागील भागाचा सारांश: नीरवने नीरजाकडे आपलं प्रेम व्यक्त केलं.

आता बघूया पुढे….

“नीरव, डॉ कामिनी आपल्याला भेटायला येणार आहे, तर आपल्याला हा सगळा पसारा आवरावा लागेल.” रूममध्ये चौफेर नजर फिरवून नीरजा म्हणाली.

“त्याची काही गरज नाहीये. आपण तिला खाली रेस्टॉरंट मध्ये भेटुयात. आजच्या रात्री पुरत हे रोमँटिक वातावरण असलेलं बरंच आहे.” नीरव नीरजाच्या जवळ जात म्हणाला.

“नीरव, आपण दोघेही फ्रेश होऊयात. डॉ कामिनी समोर अश्या अवतारात जाणार आहोत का?” नीरजा बाथरूममध्ये जात म्हणाली.

डॉ कामिनीची वाट बघत नीरव व नीरजा तयार होऊन बसले होते. डॉ कामिनीचा फोन आल्यावर नीरव व नीरजा दोघेही खाली रेस्टॉरंट मध्ये गेले. डॉ कामिनीला विचारून नीरवने कॉफी व स्नॅक्सची ऑर्डर दिली.

“तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसतात.” कामिनी नीरव व नीरजाकडे बघून म्हणाली.

“थँक् यू.” नीरव.

“डॉ गौरव बद्दल तुम्ही काही सांगणार होता ना?” नीरजाने विचारले.

“गौरव बद्दल ऐकण्यासाठी तुम्ही एवढया उत्सुक का आहात?” कामिनीने प्रतिप्रश्न केला.

“कारण सध्या ते माझ्या मैत्रिणी सोबत आहेत, त्यांच्यात नक्की काय सुरू आहे याचा अंदाज मला नाहीये, पण माझी मैत्रीण चुकीच्या नात्यात अडकू नये हीच इच्छा आहे.” नीरजाने उत्तर दिले.

कामिनीने बोलायला सुरुवात केली,

“बेसिकली गौरव हा वाईट माणूस नाहीये, पण त्याचा जो छंद आहे तो वाईट आहे. गौरवचा प्रॉब्लेम एक आहे की, त्याला जर एखादी मुलगी आवडली ना तो सतत तिच्या मागे मागे असतो. त्याला त्याच्या सोबत एकतरी मुलगी हवीच असते.

नीरवला याची कल्पना असेलच की, गौरवला मित्र खूप कमी आहेत. त्याला मैत्रिणीच जास्त आहेत. गौरव आपल्या गोड बोलण्यात समोरच्या माणसाला गुंडाळत असतो.

आमच्या कॉलेज मध्ये गौरव लेक्चर द्यायला होता. तो शिकवायचा असा की, कोणीही त्याच्या शिकवण्याचे फॅन होऊन जायचे. मी पण झाले होते. मी त्याला ‘लेक्चर छान होते.’ अशी कमेंट दिली होती. त्या दिवशी संध्याकाळ होईपर्यंत त्याने मला सोशल मीडियावर रिक्वेस्ट सेंड केली.

मी अगदी सहज म्हणून त्याची रिक्वेस्ट स्विकारली. गौरवने पुढच्या क्षणाला माझ्या सोबत चॅटींग सुरू केली. त्याच्या पुढच्या आठवड्यात तो आमच्या कॉलेजला येणार असल्याने त्याने माझा फोन नंबर मागितला व आपण भेटुयात अस तो बोलला.

मी एक मित्र म्हणून गौरवला भेटायचे ठरवले. आम्ही कॉलेज जवळील एका कॅफेत भेटलो. गौरव सोबत बोललं की टेन्शन हलकं होऊन जायचं. नेमकं त्याच काळात माझ्या व माझ्या नवऱ्यामध्ये थोडे मतभेद सुरू होते.

आमचं लग्न होण्याआधीच तो भारतात शिफ्ट व्हायला तयार होता, पण लग्नानंतर त्याने भारतात यायला नकार दिला. मला दुसऱ्या देशात जाऊन प्रॅक्टिस करायची नसल्याने मी भारतात व तो फॉरेनमध्ये राहणार आणि वर्षातून काही महिने आम्ही दोघे एकत्र राहणार असे ठरले.

लग्न झाल्यावर लॉंग डिस्टन्स मध्ये राहणं इतकं सोपं नसतं, त्यात आमचे वाद होत रहायचे. मग मी माझं मन गौरवकडे मोकळं करायचे. गौरव माझ्यासाठी त्या काळात आधारस्तंभ बनला होता. गौरव आणि मी वरचेवर भेटायला लागलो होतो. कितीही नाही म्हटलं तरी त्याच्याबद्दल माझ्या मनात थोड्या भावना निर्माण झाल्या होत्या.

गौरवने एक दिवस मला प्रपोज केलं. मी मॅरीड असल्याची आठवण त्याला करून दिली, तेव्हा तो बोलला की,

“तुझा नवरा तिकडे राहून काय करतो याची तुला गॅरंटी आहे का? मी कुठे तुला आपण लग्न करूयात बोललो आहे. सध्या तुला माझी व मला तुझी गरज आहे. आपलं रिलेशनशिप हे कॅज्युअल असणार आहे. आपल्याला एकमेकांच्या भावनिक व शारिरीक गरजा पूर्ण करायच्या आहेत.”

गौरवने मला त्याच्या बोलण्यात इतकं अडकवलं की, मला त्याचं म्हणणं पटलं होतं. आमचं दोघांचं अफेअर सुरू झालं होतं. माझ्या नवऱ्याला मात्र याची भणक मी लागू दिली नव्हती. गौरव आणि मी बऱ्याचदा फिजिकल झालो होतो.

घरच्यांच्या फोर्समुळे मला माझ्या नवऱ्याकडे काही दिवसांसाठी का होईना जावं लागणार होतं. आमचं आधीच ठरल्याप्रमाणे मी तिकडे जाणार होतेच. गौरवला या सगळ्याची कल्पना आधीपासूनच असल्याने त्यानेही मला अडवलं नव्हतं.”

कामिनीचं बोलणं अर्धवट तोडत नीरव म्हणाला,
“एक मिनिटं, त्याला जर सगळं आधीपासूनच माहीत होतं, तर मग तुम्ही निघून गेल्यावर तो डिप्रेशन मध्ये कसा गेला?”

“तो असा माणूस आहे की, तो कधीच डिप्रेशन मध्ये जाऊ शकत नाही. त्याला सिपंथी मिळावी म्हणून त्याने तसं ते चित्र सगळ्यांसमोर उभं केलं होतं. आम्ही दोघे रिलेशनशिप मध्ये असतानाच एका कॉन्फरन्स दरम्यान गौरवची ओळख एका लेडी डॉक्टर सोबत झाली होती. तिचं नाव मला माहित नाही. तिने दुबईच्या मेडिकल असोसिएशनची परीक्षा पास केल्याने ती तिकडे प्रॅक्टिस करणार होती.

गौरवने तिला गोड बोलून पटवले होतेच. मी माझ्या नवऱ्याकडे निघून गेल्यावर तो त्या मुलीकडे दुबईला निघून गेला होता. आता त्याने तिकडे जाऊन काय केले आणि आता तो परत का आला आहे याबद्दल मला काहीच ठाऊक नाही.” कामिनीने सांगितले.

“मग डॉ गौरव स्नेहाला फसवत आहेत का?” नीरजा म्हणाली.

“आता ते तोच सांगू शकेल.” कामिनी.

“ते सगळं ठीक आहे, पण तो माझ्या हॉस्पिटलमध्ये का परतून आला असेल? त्याचा या सगळ्या मागील काय हेतू असेल?” नीरवला प्रश्न पडत होते.

“याबद्दल तुला तोच सांगू शकेल.” कामिनी.

“तुम्ही पुण्याला आलात तर आपण डॉ गौरवचा खरा चेहरा समोर आणू शकतो.” नीरजा.

यावर कामिनी म्हणाली,
“नीरजा, तुझं म्हणणं जरी खरं असलं तरी मी तिथे येऊन फार काही साध्य होणार नाही. मी गौरव मध्ये आधी इमोशनली इंव्हॉल्व्ह असल्याने कदाचित मी त्याच्या समोर आले तर पुन्हा त्याच्यात अडकेल.”

“तो माझ्या हॉस्पिटलमध्ये का आला आहे? हे मला शोधून काढायचं आहे. पुण्याला गेल्यावर पहिले तो शोध लावतो.” नीरव विचार करत होता.

“ऑल द बेस्ट. मी निघते आता. नाईस टू मिट बोथ ऑफ यू.” कामिनी तेथून निघून गेली.

नीरव विचार करत तिथेच बसल्याने नीरजा म्हणाली,
“नीरव, आपण रूममध्ये जाऊयात.”

नीरवने होकारार्थी मान हलवली. दोघेजण आपल्या रूममध्ये गेले. रूमचा दरवाजा उघडून आत गेल्यावर नीरव म्हणाला,

“नीरजा, डॉ कामिनी आता गौरव बद्दल जे काही बोलली व आपल्या मनात त्याबद्दल सध्या जे काही सुरू आहे ते आजच्या रात्रीपुरत बाजूला ठेवूयात. आजची रात्र ही आपल्या दोघांसाठी खास असणार आहे.” नीरवच्या चेहऱ्यावर स्माईल होती.

नीरजाने त्याला मिठी मारली व डोक्यातील सर्व विचार तिचे शांत झाले होते. नीरवने नीरजाला उचलून बेडवर ठेवले. आता पुढे काय घडणार या विचाराने नीरजा लाजून चुर झाली होती.

बेडवर ठेवल्यावर नीरवने नीरजाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, त्याच्या स्पर्शाने ती मोहरून निघाली होती. नीरव हळूहळू नीरजाच्या जवळ जात होता. नीरजाने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले होते. नीरवने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. नीरजाही त्याला प्रतिसाद देत होती. काही वेळातच नीरव व नीरजा एक झाले होते. नीरजाच्या चेहऱ्यावरील समाधान युक्त भाव बघून नीरव मनातून खुश झाला होता.

नीरव व नीरजाने त्यांच्यातील खास नाजूक क्षण अतिशय छान पद्धतीने हाताळला होता.

“आय लव्ह यू.” नीरजा त्याच्या कानात पुटपुटली.

“आय लव्ह यू टू.” नीरवने तिच्या गालावर आपले ओठ टेकवले.

नीरजा नीरवच्या मिठीत गाढ झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे करत नीरव स्वतःशीच म्हणाला,
‘नीरजा, तुझ्या चेहऱ्यावर हे हसू टिकून राहील यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेल. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला पदोपदी माझ्या कृतीतून जाणवत राहील.’