समर्पण-एक प्रेमकथा भाग ८५

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ८५

मागील भागाचा सारांश: शिवानीला स्नेहाच्या फ्लॅटवर राहण्याची कल्पना नीरजाने सुचवली. नीरजा व स्नेहामध्ये गौरव वरून चर्चा झाली. जास्त चहा पिण्यावरून व बाहेरील खाण्यावरून नीरजा नीरवला रागावली. संगिता आईसाठी नीरवने मोबाईल घेतला, तसेच नीरजाने मुक्तासाठी हेडफोन घेतले. नीरजा नाही म्हणत असताना नीरवने तिच्यासाठी सुद्धा मोबाईल घेतला.

आता बघूया पुढे….

नीरजा तिच्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाली. बेडवर असलेला मोबाईलचा बॉक्स बघून ती मनातल्या मनात म्हणाली,
'इतका महाग मोबाईल घ्यायची काय गरज होती. हे नीरव पण ना, हट्टी आहेत. अजिबात ऐकून घेत नाहीत. आता त्या दुकानात सगळ्यांसमोर नाही तरी कितीवेळ बोलू शकत होते.'

"मोबाईलच्या बॉक्सकडे अस एकटक बघून तो आपोआप सुरू होणार नाहीये." नीरव दरवाजात उभा राहून मिश्किल हसून म्हणाला.

नीरजा त्याच्याकडे बघत म्हणाली,
"दरवाजात उभे का, आत या ना."

नीरव आतमध्ये येऊन बेडवर बसला.
"डोक्यात काय विचार सुरू आहेत?"

"मला इतका महागडा मोबाईल वापरण्याची सवय नाहीये. थोड्या कमी किंमतीचा मोबाईल घेतला असता तरी चाललं असतं. तिथे मोबाईल शॉपमध्ये मला फारसं काही बोलताही आलं नाही. मला असे विनाकारण पैसे खर्च केलेले आवडत नाही." नीरजाने स्पष्टपणे सांगितले.

"नीरजा, चिल. पहिली गोष्ट मी तुला मोबाईल गिफ्ट केला आहे आणि गिफ्ट मिळालेल्या वस्तूची किंमत करू नये असं म्हणतात, हे तुला तर माहीत असेलच. तुला मी दिलेलं हे पहिलं गिफ्ट आहे. सो ते किती महाग आहे, हा विचार मनातून काढून टाक.

मी किंमत बघून मोबाईल घेतला नाहीये, तर त्याचे फिचर्स बघून घेतला आहे. मी तुझ्या मोबाईलमध्ये आपल्या हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज ऍड करून देणार आहे. तुला हवं तिथे बसून हॉस्पिटलमध्ये काय सुरू आहे हे बघता येईल. हॉस्पिटल मध्ये दररोज होणारे आर्थिक व्यवहार तुला मोबाईल वर बघता येतील.

आता हे सगळं व्यवस्थित दिसावे, मोबाईल हँग होऊ नये या दृष्टीने मी जास्त रॅमचा मोबाईल घेतला. मला वाटलंच होत की, तू असा काहीतरी विचार करत असशील, म्हणून स्पष्टीकरण देण्यासाठी आलो होतो. तुला माझं गिफ्ट नको असेल तर मी परत घेऊन जातो." मोबाईलचा बॉक्स हातात घेत नीरव म्हणाला.

नीरवच्या डोळयात उदास भाव दिसून आले होते. नीरजा त्याच्या हातातून बॉक्स घेत म्हणाली,
"कोणी दिलेलं गिफ्ट मी परत देत नाही. ते माझं स्पेशल गिफ्ट आहे."

"हो का. इतकं काय स्पेशल आहे त्यात." नीरव हाताची घडी घालून तिच्याकडे बघत म्हणाला.

"डॉ नीरव जोशींनी पहिल्यांदा मला काहीतरी दिलं आहे, मग ते स्पेशल असणारच ना." नीरजा हसून म्हणाली.

"मग आता या बदल्यात मलाही काहीतरी स्पेशल रिटर्न गिफ्ट मिळायला हवे." नीरव तिच्याकडे एकटक बघत म्हणाला.

"तुम्हाला रिटर्न गिफ्ट काय हवं आहे?" नीरवचे डोळे नीरजाला वेगळच काहीतरी सांगत होते. आज पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात तिला तिच्याबद्दल काहीतरी दिसत होतं. पहिल्यांदा ती नीरवच्या डोळयात डोळे घालून स्वतःला शोधत होती.

"रिटर्न गिफ्ट वेळ आल्यावर मागेल. सध्यातरी आज रात्री जेवण झाल्यावर वॉक करायला सोबत जाऊ आणि मसाला दूध पिऊन येऊ." नीरवने सांगितले.

नीरवच्या बोलण्यावर नीरजाने मनातल्या मनात स्वतःला चार शिव्या घातल्या. ती वेगळच काहीतरी समजत होती.

"हो चालेल." नीरजाने बोलून आपली नजर वळवली.

"चल मी माझ्या रूममध्ये आहे. मोबाईल सेट करताना काही प्रॉब्लेम आला तर सांग. सीसीटीव्ही आणि अकाऊंट रिलेटेड अँप मी नंतर डाऊनलोड करून देतो." नीरव बोलून रुमच्या बाहेर पडला.

' नीरजा, वेडी आहेस का? नको ते विचार मनात आणत बसतेस. ' डोक्यावर टपली मारून नीरजा म्हणाली.

बॉक्स मधून नवीन मोबाईल काढून ती सेट करत बसली.

आपल्या रूममध्ये गेल्यावर नीरव विचारात पडला,
'आज नीरजाचे डोळे वेगळेच काहीतरी सांगत होते. माझ्याबद्दल असणार प्रेम तिच्या डोळयात आज मला जाणवत होतं. खरतर मला तिथे बसून तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या, पण काय कारण देऊन थांबणार होतो. हल्ली नीरजा सोबत कितीही बोललो तरी अजून बोलावसं वाटत राहतं.'

नीरव नीरजाच्या विचारात रममाण असताना त्याचा मोबाईल वाजला.

स्क्रीनवर गौरवचे नाव दिसले.

"हं बोल गौरव." नीरव फोन उचलून म्हणाला.

"थँक्स." गौरव.

"कशासाठी?" नीरवने विचारले.

"जॉब देण्यासाठी, माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी." गौरवने उत्तर दिले.

"मी जो तुझ्यावर विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करायचे तुझ्या हातात आहे." नीरव म्हणाला.

"मी माझे शंभर टक्के देणार आहे. मी तुझा विश्वास कमी होऊ देणार नाही." गौरव.

"अजून एक गोष्ट पहिले जी चूक करून बसला आहेस, ती पुन्हा इथे करू नकोस." नीरव.

"नीरव, ती चूक नव्हतीच. प्रेम करणं ही चूक नव्हती, ते चुकीच्या व्यक्तीवर करणं ही चूक होती. चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करून ती चूक मी परत करणार नाहीये." गौरव म्हणाला.

"आयुष्यात इतकी सगळी उलथापालथ होऊनही प्रेम करणं ही चूक नाही असं तू कस म्हणू शकतो?" नीरवला गौरवच्या बोलण्याचे आश्चर्य वाटत होते.

यावर गौरव मिश्किल हसून म्हणाला,
"प्रेम ही भावना काय आहे, हे कळण्यासाठी प्रेमात पडावं लागतं. तू जेव्हा प्रेमात पडशील तेव्हा तुला प्रेमाचे महत्व कळेल. प्रेमात पडण्यासाठी डॉ नीरजा एक उत्तम व्यक्ती आहे."

"गौरव, आपण या विषयावर न बोललेलं बरं." नीरव विषय टाळत होता.

"नीरव, तू मला तुझा मित्र मानत नसला तरी मी तुला माझा मित्र मानतो, म्हणून एक सल्ला देतो. माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे, त्यामुळे जर तू प्रेमात पडायला मागेपुढे पाहत असशील, तर तू मोठी चूक करतो आहेस हे लक्षात ठेव. प्रत्येकाची लव्हस्टोरी वेगळी असते." गौरव म्हणाला.

"गौरव, मला एक सांग, तुला कस कळलं की मी प्रेमात पडायला मागेपुढे बघत आहे?" नीरवला प्रश्न पडला होता.

"अरे मित्रा, मी तुला आज ओळखत नाहीये. तुझे विचार, तू मला सगळंच ठाऊक आहे. तुझे डोळे माझ्याशी कधीच खोट बोलू शकत नाही." गौरवने सांगितले.

"मला या विषयावर काही बोलायचं नाहीये. हॉस्पिटलमध्ये काम करताना काही अडचण आली, तर येऊन भेटू शकतोस, बाय." नीरवने बोलून फोन कट केला.

'गौरव एकदम अचूक बोलत होता. प्रेमात पडल्याची त्याला जी काही शिक्षा मिळाली होती, त्याची झालेली ती अवस्था बघूनच मी आपण कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडायच नाही हे ठरवलं होतं. गौरव मला अजूनही ओळखतो. तो कितीही गोड बोलला तरी मी इतक्यात पिघळणार नाहीये.' नीरव मनातल्या मनात बोलत होता.
—------------–-------–----------------------------

नवीन मोबाईल सेट झाल्यावर नीरजा खाली गेली तर हॉलमध्ये ज्योती व मुक्ता सोप्यावर गप्पा मारत बसलेल्या होत्या.

"ज्योती ताई, तुम्ही कधी आल्या?" नीरजाने जिन्यावरून उतरत असतानाच विचारले.

"पंधरा मिनिटे झाले असतील." ज्योतीने स्माईल देऊन उत्तर दिले.

"तुम्ही चहा, कॉफी काही घेतलं का?" नीरजाने तिच्या समोर जाऊन विचारले.

"नाही." ज्योतीने नकारार्थी मान हलवली.

"वहिनी, ते माझ्याच लक्षात आलं नाही. ताई आल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो. तिला चहा, कॉफी विचारावं हे डोक्यातच आलं नाही." मुक्ता म्हणाली.

"मी घेऊन येते." अस बोलून नीरजा किचनकडे जायला निघाली.

"वहिनी, काहीच नका आणू. आता थोड्या वेळेत जेवण करायचंच आहे ना. तुम्ही बसा इथे, आपण मस्त गप्पा मारू." ज्योती म्हणाली.

"तुम्ही दोघी बहिणी गप्पा मारत बसा. मी सरस्वती ताई काय स्वयंपाक करत आहेत, ते बघून आलेच. शालिनी आई येईपर्यंत मलाच या सगळ्याकडे लक्ष द्यावे लागेल." नीरजा बडबड करत किचनकडे निघून गेली.

शालिनी मॅडम घरात नसल्याने बऱ्यापैकी जबाबदारी नीरजावर येऊन पडली होती. तिला या सगळ्याची सवय नसल्याने तिची चिडचिड होत होती.

स्वयंपाक झाल्यावर नीरव, नीरजा, संगिता आई, मुक्ता व ज्योती हे चौघेजण एकत्र जेवायला बसले. त्यांच्यात इकडच्या तिकडच्या गप्पा मारत जेवण झाले. जेवण झाल्यावर नीरजा व नीरव बाहेर वॉक करायला निघून गेले.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all