समर्पण-एक प्रेमकथा भाग ८६

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ८६

मागील भागाचा सारांश: नीरवने इतका महागडा मोबाईल घेऊन दिल्याने नीरजाला ते योग्य वाटत नव्हते. नीरवने तिला तो मोबाईल का घेऊन दिला आहे? यामागील कारण पटवून दिले. गौरवने नीरवला माझ्या अनुभवामुळे प्रेमात पडायला मागे पुढे बघू नकोस हे सांगितले.

आता बघूया पुढे…..

"मुक्ता, नीरव व नीरजा वहिनी मध्ये खरंच नवरा-बायकोचे नाते नाहीये का?" ज्योतीला प्रश्न पडला होता.

"नीरजा वहिनीच्या मनात दादाबद्दल प्रेम आहे, पण दादाच्या मनात नेमकं काय आहे, हे मलाही सांगता येणार नाही. दोघेजण जोपर्यंत वेगवेगळ्या रूममध्ये राहतात तोपर्यंत त्यांच्यात तसं काही नसेलच हे आपल्याला समजून जातेच ना.

हा प्रश्न त्या दोघांचा असल्याने आपल्याला याबद्दल बोलणेही योग्य वाटत नाही. तसं बघायला गेलं तर दादाला वहिनीची काळजी आहे हे तर स्पष्टपणे दिसून येतं." मुक्ताने सांगितले.

"नीरजा वहिनी बद्दल माझ्या मनात आदर वाढला आहे. जो व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नाही, त्या व्यक्तीच्या फॅमिली साठी एवढं सगळं करणं म्हणजे ग्रेटच ग." ज्योतीच्या डोळयात नीरजा बद्दल कौतुक दिसत होतं.

"ज्योती ताई, आई समोर असताना मी कधी बोलले नाही, पण मला एक गोष्ट जाणवली आहे. नीरजा वहिनी जेवढं आपुलकीने बोलते तेवढ्या आपुलकीने दादा कधीच बोलत नाही. दादा त्याच कर्तव्य करतो आहे, पण त्याच्या डोळ्यात ते प्रेम दिसत नाही." मुक्ता म्हणाली.

यावर ज्योती म्हणाली,
"तू म्हणते ते बरोबरही असेल, पण एकदा नीरवचा विचार करून बघ. तुला आईचं, मावशीच, माझं आपल्या सगळ्यांचं प्रेम, सहवास तुला लाभला आहे. तसं त्याला ते प्रेम मिळालं का? नातेवाईक कशासाठी असतात हेही त्याला माहित नाहीये.

तो आज जे काही करत आहे तेही खूप झालंय. आता राहिला प्रश्न नीरजाचा, ती अनाथ असल्याने तिला नात्यांची किंमत आहे. शिवाय ती एक मुलगी असल्याने ती थोडी हळवी आहे."

"हो ना, मी तर या सगळ्याचा विचार केलाच नव्हता." मुक्ता म्हणाली.

"तुला नीरजाने जे सुचवलं आहे, ते मलाही बरोबर वाटत आहे. तुला घराबाहेर पडणे आवश्यक आहे. काहीतरी करशील तर तुझं डोकं बिजी राहील. काळानुसार अपडेट होशील. मलातरी वाटतंय की, तू एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा कोर्स कर, तो कोर्स केल्याने तुझ्यात स्किल डेव्हलप होईल आणि तुला एखादा मस्त जॉब मिळेल." ज्योतीने सांगितले.

"ताई, पण मला हे सगळं जमेल का?" मुक्ताने विचारले.

"त्यात न जमायला काय झालं आहे? मुक्ता तुला नशिबाने पुन्हा एकदा उभं राहण्याची संधी दिली आहे आणि या संधीचे सोने करण्याचे तुझ्या हातात आहे. स्वतःपुरत कमवत असली तर तुला कोणासमोर हात पसरावे लागणार नाही. स्वतःच्या गरजा स्वतः भागवू शकशील. लग्न झाल्यावर तर ते जास्त कामी येत. मान त्याच मुलीला मिळतो जी मुलगी दोन पैसे कमवत असते, हे नेहमी लक्षात ठेव." ज्योतीने मुक्ताला असलेल्या शंकेचे निरसन केले.

"ताई, तू लग्न कधी करणार आहेस? मावशी कधीची मागे लागली आहे, पण तू ऐकतच नाहीये." मुक्ताला प्रश्न पडला होता.

"माझा किस्सा वेगळाच आहे. माझा एवढा विचार करू नकोस. तू तुझ्या आयुष्यावर लक्ष केंद्रित कर." ज्योतीने टाळाटाळ केली.

"ताई, तू नेहमी माझ्या या प्रश्नाचे उत्तर देणे टाळत असतेस." मुक्ताला आता राग आला होता.

यावर ज्योती म्हणाली,
"मुक्ता, अज्ञानात शहाणपण असत, हे तुला जेव्हा खर काय आहे ते कळल्यावर पटेल. लवकरच तुला सगळं खरं कळणार आहे. फक्त एकच सांगेल की, माझ्यावर तुझा जो विश्वास आहे तो ढळू देऊ नकोस. मी जे काही करेल ते विचारपूर्वकच असेल हे तुला माहीत असेलच.

नीरजा वहिनी आणि नीरव तुझ्यासोबत आहेत, ते तुझं कधीच वाईट होऊ देणार नाही. ते सांगतील ते ऐकत जा. मी आता मावशी सोबत जाऊन बोलते."

एवढं बोलून ज्योती तेथून निघून गेली होती. मुक्ता ज्योतीच्या बोलण्याचा विचार करत तिथेच बसली होती.

'ही ज्योती ताई, अस कोड्यात का बोलून गेली? ती नेमकं काय करणार आहे? काहीतरी मोठी गडबड दिसते आहे, पण ती काही सांगायला सुद्धा तयार नाहीये. मी कितीही खोदून विचारलं तरी ती सांगणार नाहीच. तिचा तो स्वभावच आहे.'
––---–---------------------------------------------
नीरजा व नीरव वॉक करत घरापासून बरेच दूर गेले होते. आज दोघेही शांत होते. नीरवच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू होते, याचा अंदाज नीरजाला होता.

"तू जाऊन त्या बेंचवर बस. मी दूध घेऊन येतो." नीरव बोलून दुधाच्या स्टॉल कडे गेला.

नीरव दोन ग्लास दूध घेऊन आला. एक ग्लास नीरजाच्या हातात देऊन तो तिच्या शेजारी बसला.

"नीरव, डोक्यात काय सुरू आहे? घरातून निघाल्यापासून बघते आहे, तुम्ही काही बोलतच नाहीयेत?" नीरजाने विचारले.

"गौरवचा फोन आला होता,राहून राहून त्याचं बोलणं डोक्यात येत आहे." नीरवने उत्तर दिले.

"गौरव सर अस काय बोलले?" नीरजाने विचारले.

"मला आलेल्या अनुभवामुळे तू प्रेमात पडताना विचार करू नकोस, अस तो बोलला. प्रेमामुळे त्याच्या आयुष्याची माती झाली तरी त्याला प्रेम चूक वाटत नाही, त्याचे विचार स्ट्रेंजच आहेत." नीरवने सांगितले.

"गौरव सरांना आलेल्या अनुभवामुळे तुम्ही प्रेमात पडायला घाबरत आहात, हे खरं आहे का?" नीरजाने अगदी सहजपणे विचारले.

"माहीत नाही, कदाचित हो." नीरवने प्रामाणिक उत्तर दिले.

"नीरव, गौरव सरांना नेमका कोणता अनुभव आला हे मला सांगू शकता का?" नीरजाने मूळ मुद्द्याला हात घातला होता.

"हो सांगतो. तुला तर माहितीच आहे. डॉ गौरव आठवले लेक्चर किती भारी द्यायचे. बऱ्याच कॉलेज मध्ये त्याला गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावले जायचे. पहिल्या आठवड्यात इकडे तर दुसऱ्या आठवड्यात कुठेतरी दुसरीकडेच तो असायचा. त्याचा पाय असा जमिनीवर नव्हताच.

असच एकदा तो एका कॉलेजला लेक्चर दयायला गेला, तिथे डॉ कामिनी व त्याची भेट झाली. तिला बघाताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. कामिनी दिसायला होतीच सुंदर, हे साहेब तिच्या रूपावर भाळले.

कामिनी सोबत त्याच जुळल्यावर तो मला जास्त भेटत नव्हता की फोनवर बोलत सुध्दा नव्हता. त्याच्या तोंडी एकच जप होता, कामिनी एके कामिनी. पुढे जाऊन त्याला कळलं की, कामिनीच लग्न झालेल आहे आणि तिचा नवरा दुबईत असतो. पण त्याला कामिनी इतकी आवडायची की त्याने तरीही कामिनी सोबत रिलेशन ठेवलं होतं

आता त्यांच्यात नेमकं पुढे काय झालं माहीत नाही, पण कामिनी दुबईत निघून गेल्यावर गौरव डिप्रेशन मध्ये गेला होता. त्याच्याशी खूप वेळेला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप दूर निघून गेला होता." नीरवने सांगितले.

"मला एक सांगा, तुम्ही कधी त्या कामिनीला भेटला होता का?" नीरजाचा प्रश्न.

"नाही, फक्त फोटो बघितला होता." नीरवचे उत्तर.

"आता तुम्हाला जे गौरव सरांनी सांगितलं तेवढंच ठाऊक आहे. त्याव्यतिरिक्त रिअल परिस्थिती कशी असेल? हे तुम्हाला माहित नाहीये, बरोबर ना?" नीरजाचा प्रश्न.

"बरोबर." नीरवचे उत्तर.

"तुम्ही ज्या मुलीला भेटला नाही, तिच्याबद्दल तुम्ही काहीच मत बनवू शकत नाही. नेमकी खरी कथा काय होती, हेही तुम्हाला माहित नाहीये. गौरव सर व कामिनी मध्ये प्रेम होतं का? की वेगळं काही होत हे माहीत नसताना प्रेम हे चूक असत, हे तुम्ही ठरवू शकत नाही.

आपल्या आसपास एकदा बघा. शालिनी आईंनी तुम्हाला जन्म दिला नव्हता तरी तुमच्यात जो बॉण्ड निर्माण झाला आहे त्यात आई-मुलाचे प्रेमच आहे ना? आज मी तुमच्या सोबत इथे बसले आहे, हे प्रेमामुळेच ना? मुक्ता, संगिता आईंना आपण गावावरून आणलं यातही प्रेम आहेच ना?

तुम्हाला तुमच्या कामाबद्दल प्रेम आहे. मुक्या प्राण्याला आपण जीव लावला तरी त्याच्या मनात जी भावना निर्माण होते, ते एक प्रकारचं प्रेमच आहे ना?

प्रेम या भावनेचा विचार करताना चुकीची उदाहरणे डोळ्यासमोर न ठेवता आपल्याच आजूबाजूला आपल्याला माहीत असणारी उदाहरणे डोळ्यासमोर ठेवा." नीरजाने त्याला समजावून सांगितले.

नीरव नीरजा कडे एकटक बघत होता.

"चला निघूयात." नीरजा आपल्या जागेवरुन उठली. नीरव व नीरजा घराच्या दिशेने मार्गस्थ झाले.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all