समर्पण-एक प्रेमकथा भाग ८७

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ८७

मागील भागाचा सारांश: मुक्ता व ज्योती मध्ये नीरव व नीरजाच्या नात्यावरून चर्चा झाली. मुक्ताने ज्योतीला ती लग्न करायला तयार का होत नाही, हे विचारल्यावर नेहमी प्रमाणे उत्तर देणे टाळले. गौरव प्रेमाबद्दल हे फोनवर बोलला होता, ते नीरवने नीरजाला सांगितले. गौरव प्रेमात कसा फसला आणि डिप्रेशन मध्ये गेला हे नीरवने नीरजाला सांगितले.

आता बघूया पुढे…..

"नीरव, आत येऊ का?" नीरजाने त्याच्या रुमच्या दरवाजावर नॉक करून विचारले.

"हो, ये ना." नीरव म्हणाला.

"तुम्ही वॉक करून आलात का?" नीरजाने रूममध्ये जाऊन त्याला विचारले.

"नाही, आज उठण्याचा कंटाळा आला होता. शिवाय तुझाही फोन आला नव्हता, सो तसाच बेडवर पडून राहिलो. माझं राहूदेत, तू काही बोलायला आली होतीस का?" नीरवने विचारले.

"शालिनी आईंना घेऊन येण्यासाठी आश्रमात जावं असा डोक्यात विचार सुरू होता." नीरजाने उत्तर दिले.

"चांगला विचार आहे. संगिता आई व मुक्ताला सोबत घेऊन जा. संगिता आई समोर असेल तर शालिनी आई यायला नकार देणार नाही." नीरव म्हणाला.

"मला वाटतय की, नीरव तुम्ही पण आमच्या सोबत चला. आपण सगळेजण आश्रमात जाऊयात." नीरजाने तिच्या मनातील इच्छा बोलून दाखवली.

"मी कशाला? तुम्ही तिघी जाऊन या. शिवानीही तुमच्या सोबतीला असेलच." नीरव टाळत होता.

"नीरव, तुमच्या डोक्यात जो स्ट्रेस आहे ना, तो तिथे जाऊन कमी व्हायला मदत होईल. एक दिवस तरी काहीतरी वेगळं घडेल. सतत घर आणि हॉस्पिटल एवढं करून तुमच्या मनावर मळभ साचलं आहे. अहो, प्रत्येकाला रुटीन मधून ब्रेक गरजेचा असतो.

मला माहिती आहे की, तुम्ही आजवर कधीच आश्रमात गेला नाहीत, पण आज मी म्हणते म्हणून येऊन तर बघा. मी हे खात्रीने सांगते की, पुढच्या वेळी तुम्ही स्वतःहून मला आश्रमात जाऊयात अस म्हणाल." नीरजा त्याला म्हणाली.

"मी आश्रमात आलो, तर हॉस्पिटलच काम कस मॅनेज होईल?" नीरवचा प्रश्न.

"जस आपण गावाला गेलो होतो तसंच. इच्छा तेथे मार्ग." नीरजा हसून म्हणाली.

"बरं, मी हॉस्पिटलला फोन लावून ड्युटीज मार्गी लावतो. तू मुक्ता व संगिता आईला तयार व्हायला सांग. आपण दोन तासात निघूयात. लवकर गेलो तर उद्या लवकर परतीच्या वाटेवर निघता येईल." नीरवने सांगितले.

"ओह गॉड! जाण्याआधीच परत फिरण्याची भाषा करत आहात. जाऊदेत, तुम्ही यायला तयार झालात हेच भरपूर झालं." नीरजा रूममधून बाहेर पडताना बडबड करत निघून गेली.

नीरजा खाली गेली तर तिला मुक्ता सोप्यावर बसलेली दिसली. ती तिच्या जवळ जाऊन म्हणाली,
"गुड मॉर्निंग."

"गुड मॉर्निंग वहिनी." मुक्ताचा आवाज उदास वाटत होता.

"सकाळी सकाळी आवाजाला आणि मूडला काय झालंय?" नीरजाने तिच्या शेजारी बसत विचारले.

"ते ज्योती ताई सकाळीच निघून गेली." मुक्ताने उत्तर दिले.

"पण का?" नीरजालाही आश्चर्य वाटले.

"माहीत नाही, पण ती बोलली की, तिला काहीतरी अर्जंट काम आहे. तुम्हाला भेटून जा, असही मी बोलले पण तिने काहीच ऐकलं नाही. तसंही सध्या ती काहीच सांगत नाही." मुक्ताच्या चेहऱ्यावर ज्योती बद्दल वाटणारी काळजी दिसून आली.

"रिलॅक्स मुक्ता, ज्योती ताईंना काहीतरी कामाचं टेन्शन असेल. त्या स्वतःहून तुला सगळं काही सांगतील. त्याच अति टेन्शन घेऊ नकोस. आता त्यांचा विषय डोक्यातून काढून टाक आणि आवरायला लाग. आपल्याला शालिनी आईंना घ्यायला आश्रमात जायचं आहे. संगिता आईंना पण तयार व्हायला सांग. नीरवही आपल्या सोबत येणार आहेत सो पटकन तयार व्हावं लागेल, त्यांना कुठेही जायची आणि यायची खूप घाई झालेली असते." नीरजा म्हणाली.

"हो चालेल. मी पटकन आवरते." मुक्ता सोप्यावरून उठत म्हणाली.

"मुक्ता, तू चहा-नाश्ता केलास का?" मुक्ताला थांबवून नीरजाने विचारले.

"हो, मी चहा घेतलाय. नाश्ता थोड्या वेळात करेल." मुक्ता उत्तर देऊन निघून गेली.

मुक्ता किचनमध्ये गेली. सरस्वतीने तिला चहा दिला.

"सरस्वती ताई, आम्ही शालिनी आईंना घेऊन येण्यासाठी आश्रमात जाणार आहोत, तर वाटेत खाण्यासाठी म्हणून पराठे कराल." नीरजाने सांगितले.

"हो करते. शालिनी मॅडम शिवाय हे घर अपूर्ण वाटत आहे. तुम्ही त्यांना घेऊन याल तर बरंच होईल." सरस्वती ताईंच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.

"हो, मलाही त्या नाहीत तर घर खाली खाली असल्यासारख वाटत असतं. गप्पा मारत बसले तर आवरायला उशीर होईल आणि नीरव माझ्या नावाने ओरडत बसतील." नीरजा रिकामा चहाचा कप ठेवून निघून गेली.

रूममध्ये जाऊन तिने आपलं आवरलं. एक दिवस रहायला जितके कपडे लागतील तितके कपडे तिने घेतले. पुढील काही वेळातच नीरजा, नीरव, मुक्ता व संगिता तयार होऊन गाडीत बसले आणि आश्रमाच्या दिशेने मार्गस्थ झाले.

गाडीत पुढच्या सीटवर नीरव ड्रायव्हर शेजारी बसला होता. मागे मुक्ता, नीरजा व संगिता बसलेले होते. गाडीत कमी आवाजात एफ एम वर गाणी सुरू होती. नीरव नेहमीप्रमाणे मोबाईल मध्ये आपलं डोकं घालून बसला होता.

"वहिनी, आपण ज्या आश्रमात जाणार आहोत, तिथे तुम्ही आधी गेल्या आहात का?" मुक्ताने विचारले.

यावर नीरजा मिश्किल हसून म्हणाली,
"फक्त गेलेच अस नाही, तर काही काळ तिथे राहिले सुद्धा आहे. जेव्हा मला आपलं म्हणणार कोणी नव्हतं, तेव्हा याच आश्रमाने मला आपलंसं केलं. मोठ्या बहिणीची माया देणाऱ्या गीता ताई मला इथेच भेटल्या. माझ्या आयुष्याला वळण देणाऱ्या शालिनी आई मला इथेच भेटल्या.

मी कल्पतरू आश्रमात गेले नसते, तर शालिनी आईंची आणि माझी भेट झाली नसती, परिणामी मी इथे नसते. आताही मला माहेरी जात आहोत असच वाटत आहे. शिक्षण आणि कामाच्या व्यापात मला इतके बऱ्याच वर्षांपासून आश्रमात जायला जमले नाही, हे जरी खरं असलं तरी मला आश्रमाची आठवण नेहमी येत असते हेही तितकंच खरं आहे."

नीरव हातातील मोबाईल बाजूला ठेवून नीरजाच बोलणं ऐकत होता.

"वहिनी, आश्रमात राहताना आपण इथे आहोत याच कधी वाईट वाटलं नाही का? तुम्हाला त्रास व्हावा म्हणून मी बोलत नाही. मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की, त्यावेळी तुमच्या मनात काय विचार सुरू होते?" मुक्ताला प्रश्न पडला होता.

"कस असत ना मुक्ता, आपल्याकडे जे आहे त्यात धन्यता न मानता आपल्याकडे जे नाही याबद्दल विचार करून आपण आजच्या आनंदावर विरजण पाडून घेतो. आजचा क्षण एन्जॉय करण्यापेक्षा आपण भविष्याचा विचार करत बसतो. हा आपला मानवी स्वभाव आहे.

मला निदान रहायला छत होतं. मी थोडी मोठी झाल्यावर आश्रमात आले होते. मला सगळं काही समजत होतं. याउलट काही मुली आपल्याला सिग्नलवर भीक मागताना दिसतात किंवा आश्रमात जन्म झाल्याबरोबर येतात, त्यांचा विचार करता मी तर सुखी होते." नीरजा हसून म्हणाली.

"वहिनी, तुमचे विचार खरंच खूप ग्रेट आहेत." मुक्ताच्या डोळ्यात नीरजा बद्दल कौतुक दिसून आलं.

"माणसाला परिस्थिती बदलायला भाग पाडते. माझे विचार आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे बदलले आहेत." नीरजा म्हणाली.

"नीरजा, शालिनी ताई मला बघून डिस्टर्ब तर होणार नाहीत ना? मी आश्रमात आलेली त्यांना आवडलं नाही तर…" संगिताने तिच्या मनातील शंका बोलून दाखवली.

यावर नीरजा काही बोलण्याच्या आतच नीरव म्हणाला,
"अस काही होणार नाही. मी आईला खूप चांगल्या रीतीने ओळखतो. आपल्या सगळ्यांना तिथे बघून आईला आनंदच होणार आहे. मला बघून तर सगळ्यात जास्त. मी आश्रमात यावं म्हणून आई कधीची मागे लागली होती. हेल्थ चेकअपच्या नावाखाली ती मला बोलवायची, पण मी इतका शहाणा होतो की, हॉस्पिटलच्या टीमला पाठवायचो पण स्वतः जात नव्हतो.

मी आश्रमात जाणार नाही, हे नंतर तिने स्विकारलं होत, मग काही मला चल म्हणून आग्रह केला नाही."

नीरव शालिनी ताईंबद्दल भरभरून बोलत होता.

सगळ्यांना अचानक आश्रमात बघून शालिनी ताईंना आनंद होईल का? शालिनी ताई त्यांच्या सोबत परत जायला तयार होतील का? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe
(मला कल्पना आहे की, तुम्ही सगळे या भागाची आतुरतेने वाट बघत होता. सगळे वाचक जेव्हा माझ्या तब्येतीची चौकशी करतात, ते बघून खूप छान वाटलं. माझी तब्येत बरी आहे, पण सध्या माझ्या वैयक्तिक आयुष्यात जी फेज सुरू आहे, त्यात मला लिखाणाला पुरेसा वेळ देता येत नाही. मी ही कथा अर्धवट सोडणार नाहीये. मला जस जमेल तसं लिहीत जाईल, फक्त रेग्युलर भाग येतील की नाही याची खात्री मी देऊ शकणार नाही. होप सो तुम्ही मला समजून घ्याल.)


🎭 Series Post

View all