समर्पण-एक प्रेमकथा भाग ८८

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ८८

मागील भागाचा सारांश: ज्योती अचानक निघून गेल्याने मुक्ताला टेन्शन आले होते. ज्योतीची काळजी करू नकोस, म्हणून नीरजाने तिला समजावून सांगितले. नीरव, नीरजा, संगिता व मुक्ता आश्रमात शालिनी ताईंना घेऊन येण्यासाठी निघाले होते. वाटेत मुक्ता व नीरजा मध्ये आश्रमा वरून गप्पा झाल्या.

आता बघूया पुढे….

वाटेत नाश्ता करण्यासाठी एका हॉटेल जवळ नीरवने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. घरुन आणलेले पराठे त्यांनी खाल्ले आणि हॉटेल मधून चहा मागवला. नाश्ता करून झाल्यावर पुढच्या प्रवासाच्या दिशेने ते मार्गस्थ झाले.

कल्पतरू आश्रमाचा बोर्ड दिसल्यावर नीरजाच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली. गेटमधून एंट्री केल्यावर गाडी एका बाजूला पार्क केली. कमानीतून आत गेल्यावर बाहेर मोठं गार्डन होतं. चारही बाजूला मोठ मोठी झाडे होती. एका बाजूला फुलांची झाडे होती. सगळीकडे हिरवळ बघून मनाला प्रसन्न वाटत होतं.

लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आणि झोके होते. तेथून जवळच लोखंडी झोपाळा होता. हे सगळं एका कोपऱ्यात होतं, तिथे लहान मुलं खेळत होती. चारही कोपऱ्यात बसण्यासाठी बाक होते.

गाडीतून उतरल्यावर नीरव, मुक्ता व संगिता आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करत होते.

"चला आपण ऑफिसमध्ये जाऊयात, तिकडे गीता ताई असतील, त्यांना शालिनी आई कुठे असतील, हे माहीत असेल." नीरजाच्या पाठोपाठ सगळेजण चालत होते.

ऑफिस जवळ जाऊन नीरजा दरवाजावर नॉक करून म्हणाली,
"गीता ताई, आत येऊ का?"

गीता ताईंनी दरवाजाकडे आश्चर्याने बघितले. दरवाजात नीरजाला बघून त्या खुर्चीतून उठून उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नीरजाला बघून त्यांना किती आनंद झाला हे समजत होते.

"नीरजा, आत ये ना." त्या हसून म्हणाल्या.

नीरव व नीरजा आत गेले. मुक्ता व संगिता बाहेर असलेल्या बेंचवर बसल्या.

"आज तुम्ही आश्रमाची वाट कशी चुकलात?" गीता ताईंनी नीरव व नीरजाकडे बघून विचारले.

"गीता ताई, तुमच्या बोलण्याचा हेतू माझ्यापर्यंत पोहोचला आहे. मला इकडे कधीपासून यायची इच्छा होती, पण एकेक गोष्टी अश्या सुरू होत्या की, यायला जमलंच नाही. आता आई इकडे आल्याने त्यांनाच घ्यायला आलो आहोत." नीरजाने सगळं सविस्तरपणे सांगितले.

"आई कुठे आहे?" नीरवने विचारले.

"शालिनी मॅडम, जरा बाहेर गेल्या आहेत. त्यांना यायला दोन ते तीन तास तरी लागतील." गीता ताईंनी उत्तर दिले.

"पण ती कुठे गेली आहे?" नीरवला प्रश्न पडला होता.

"मागच्या महिन्यात एक पंधरा वर्षांची मुलगी आली होती. काल तिच्या पोटात जरा जास्तच दुखायला लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. शालिनी मॅडम तिला घेऊन येण्यासाठी गेल्या आहेत. त्यांना सगळी प्रोसिजर पूर्ण करून यायला वेळच लागेल. मी त्यांना फोन करून तुम्ही आल्याचं कळवते, त्या लवकर येण्याचा प्रयत्न करतील." गीता ताई हातात मोबाईल घेत म्हणाल्या.

"नाही नको. आईला तिचं काम करुद्यात. आम्ही वाट बघू." नीरव म्हणाला.

"चालेल. तुम्ही गेस्ट रूममध्ये जाऊन आराम करा. मी तुमची जेवणाची व्यवस्था करायला सांगते." गीता ताईंनी शिपायाला बेल वाजवून बोलावले आणि सगळ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करायला सांगितली.

नीरजा सोडून सगळेजण शिपाया सोबत गेस्टरूम कडे गेले. नीरजा गीता ताईंसोबत तिथेच थांबली.

"नीरजा, आज बऱ्याच दिवसांनी तुला भेटून छान वाटलं. शालिनी मॅडमकडून घरी घडलेली सविस्तर हकीकत कळली. त्या पहिल्यांदा इतक्या मनमोकळेपणाने बोलल्या. त्यांच्या कडून सगळं ऐकल्यावर तुझी काळजी वाटली होती आणि तू सगळं ज्या पद्धतीने हाताळल त्याबद्दल तुझं कौतुक सुद्धा वाटलं.” गीता ताईंच्या डोळयात नीरजा बद्दल कौतुकास्पद भावना होत्या.

“गीता ताई, समोर असे प्रश्न होते की ते सोडवल्या शिवाय पुढे जाता येतच नव्हतं. आता सगळं ठीक होईल अस वाटत होतं, तर त्यात शालिनी आई इकडे निघून आल्या. आता त्या परत घरी आल्या म्हणजे इथे येऊन काही फायदा झाला असे वाटेल.” नीरजा म्हणाली.

“नीरव स्वतः आला आहे म्हटल्यावर शालिनी मॅडम परत येतील. ते सगळं जाऊदेत, तुमच्या दोघांचं नात अजून पुढे सरकलं की नाही?” गीता ताईंनी विचारले.

“अजून तरी तिथेच आहे, पण नीरवचं बदललेलं वागणं बघून लवकरच आमच्या नात्याचं समीकरण बदलेल अस वाटत आहे.” नीरजाने उत्तर दिले.

“असच होऊ दे बाई. तू जाऊन फ्रेश हो. प्रवासाने थकली असशील. जेवण तयार झालं असेल तर गरमागरम जेवण करून घे.” गीता ताई म्हणाल्या.

“हो मी फ्रेश होऊन येते.” नीरजा गीता ताईंच्या ऑफिस मधून बाहेर पडली.

पुन्हा तिला काहीतरी आठवलं म्हणून ती पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन गीता ताईंसमोर उभं राहून म्हणाली,
“गीता ताई, मघाशी तुम्ही त्या मुलीबद्दल सांगत होता, तिचा नेमका खरा किस्सा काय आहे? नीरव समोर असल्याने तुम्ही फार काही सांगितलं नाही आणि मी पण काही विचारलं नाही.”

यावर गीता ताई हसून म्हणाल्या,
“तरी मी विचार करत होते, तुला अजून त्याबद्दल काही प्रश्न कसा पडला नाही. ती मुलगी जेव्हा इथे आश्रमात आली, त्याआधी तिचा कोणीतरी रेप केला होता, अस मेडीकल चाचणीत आढळून आले होते. आता कोणी, कसा, कधी याबद्दल काहीच माहिती मिळू शकली नव्हती. ती मुलगी पण काहीच सांगायला तयार नव्हती.

आम्ही पोलिसांना या सगळ्याची कल्पना दिली होती. उद्या पुढे जाऊन आपल्यावर हे प्रकरण शेकायला नको म्हणून. काल तिला पाळी आली होती आणि पोटात खूप दुखायला लागले होते, मग तिला पटकन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. काळजीच कारण नाही असं डॉक्टर बोलले.

तिच्याकडे बघितलं की, खूप वाईट वाटतं. ती कोणाशीच बोलत नाही. स्वतःच्या विश्वात रममाण असते. शालिनी मॅडमनेही तिला बोलत करण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीच बोलत नाही. ती कुठली आहे, तिचे आई वडील कोण याबद्दल ती काहीच सांगत नाही.”

“गीता ताई, तिच्या सोबत नक्कीच काहीतरी भयानक घडलं असेल, म्हणून ती शांत झाली असेल. मला जमलं तर मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल.” नीरजा विचार करून म्हणाली.

“चालेल. ती बोलली तर तेवढीच तिची ओळख पटायला आपल्याला मदत होईल. तिचं नावही कळेल.” गीता ताई म्हणाल्या.

एवढं बोलून नीरजा तेथून निघून गेली. नीरजा गेस्टरूम कडे गेली. एका रूममध्ये ती गेली तर तिथे मुक्ता व संगिता होत्या.

“वहिनी, तुमचं सामान बाजूच्या रूममध्ये ठेवलेलं आहे. दादा आणि तुम्हाला एकच रूम शेअर करावी लागेल.” मुक्ताने तिला सांगितलं.

नीरजाने डोक्यावर हात मारून घेतला आणि ती बाजूच्या रूममध्ये गेली. नीरव बेडवर भिंतीला पाठ टेकवून हातात मोबाईल घेऊन बसला होता. नीरजाला रूममध्ये आलेलं बघून आपल्या हातातील मोबाईल त्याने बाजूला ठेवला.

आपल्या बॅगमधील कपडे घेऊन ती बाथरुम मध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेली. नीरजा रूममध्ये परत आल्यावर नीरव म्हणाला,
“गीता ताई, ज्या मुलीबद्दल सांगत होत्या. ती रेप केस होती का?”

“तुम्हाला कसं कळल?” नीरजा त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली.

“गीता ताई, ज्या पद्धतीने बोलत होत्या त्यावरून असच काहीतरी असेल हा अंदाज मी बांधला होता.” नीरवने सांगितले.

नीरजाने तिच्या कडील माहिती त्याला पुरवली. सगळं ऐकल्यावर नीरव म्हणाला,
“हे काम तिच्या जवळच्या व्यक्तीच असेल. ज्याच्यावर तिचा खूप विश्वास असेल. ती इतक्या शॉक मध्ये म्हणूनच असेल. तू एकदा तिच्याशी बोलून बघ, नक्कीच ती काहीतरी सांगेल.

तुला काऊनसेलिंग चांगलं जमत याची मला कल्पना आहे. मी पण तिच्याशी बोललो असतो, पण मी जेन्ट्स असल्याने ती माझ्याशी बोलणार नाही.”

“ती आल्यावर मी तिला बोलत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल.” नीरजाने सांगितले.

शिपाई जेवण तयार आहे हे सांगायला आल्यावर नीरव, नीरजा, मुक्ता व संगिता जेवण करण्यासाठी डायनिंग एरियात जाऊन बसले. गीता ताईंनी दिलेल्या सुचनांप्रमाणे स्वयंपाक घरातील असलेल्या शांताने सगळ्यांना जेवायला वाढले.

क्रमशः
©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all