समर्पण-एक प्रेमकथा भाग ८९

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ८९

मागील भागाचा सारांश: नीरजा व नीरव आश्रमात पोहोचल्यावर शालिनी ताई तिथे नव्हत्या. त्या एका मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. एक महिन्यापूर्वी जी मुलगी आश्रमात आली होती, तिच्याबद्दल गीता ताईंनी नीरजाला सांगितले. त्या मुलीला बोलत करण्याचे काम नीरजाने करायचे ठरवले होते.

आता बघूया पुढे….

जेवण झाल्यावर नीरजा म्हणाली,
“आई, तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा. तुम्हाला अजूनही अशक्तपणा आहे. शालिनी आई आल्या की मी तुम्हाला बोलवायला येईल.”

“हो,मी रूममध्ये जाऊन जरावेळ पडते. मुक्ता, तू माझ्यासोबत येतेस की आश्रमात फेरफटका मारणार आहेस?” संगिताने मुक्ताला विचारले.

“मी तुझ्यासोबत येते. आश्रमात नंतर फेरफटका मारेल. पोटभर जेवण झाल्यावर मस्त झोप येते आहे.” मुक्ताने उत्तर दिले.

मुक्ता व संगिता दोघी आपल्या रूमकडे निघून गेल्या.

“आपला काय विचार आहे?” शून्यात बघत बसलेल्या नीरवला नीरजाने विचारले.

“मला दुपारी झोपायची सवय नसल्याने मला झोप तर येणार नाही. मला आश्रम दाखवशील का?” नीरव म्हणाला.

“हो, चला.” नीरजा जागेवरुन उठून उभी राहिली.

नीरजाने नीरवला पूर्ण आश्रम दाखवले. पूर्ण आश्रम फिरून आल्यावर नीरजा व नीरव गार्डन मधील झोपाळ्यावर बसले.

“नीरव, तुम्ही आश्रम फिरताना कसल्या तरी विचारात होतात. नेमकं तुम्हाला काय प्रश्न पडला आहे? कसला विचार करत आहात?” नीरवचा चेहरा बघून नीरजाला प्रश्न पडला होता.

यावर नीरव म्हणाला,
“आश्रमातील बायकांकडे बघितल्यावर एक समजलं की, आपल्यापेक्षा दुःखी आणि हतबल बरेचजण आहेत. आपल्याला आपलं दुःख, आपल्या वाटेत येणारी संकटे मोठी वाटतात. आज त्या बायकांकडे बघून समजले की, आपण त्या मानाने खूप सुखी आहोत.”

“हो, म्हणून तर मी अनाथ असल्याचं मला काही वाटत नाही. बाकीच्या अनाथ मुलांची परिस्थिती भयंकर असते. त्यामानाने माझी परिस्थिती खूप बेटर आहे. आपण त्या सगळ्यांचे नशीब बदलू शकत तर नाहीच, पण शालिनी आई जशी या सगळ्यांची मदत करत असतात, त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या परीने त्यांची मदत करायची. जेणेकरून आपल्याला काहीतरी केल्याचे समाधान लाभेल.” नीरजाने सांगितले.

“हो, माझ्याही डोक्यात बरच काही सुरू आहे. आई आल्यावर तिच्याशी मी बोलणार आहेच.” नीरव म्हणाला.

नीरव व नीरजाचे बोलणे सुरू असताना शालिनी ताईंची गाडी गेट मधून आत आली. पार्किंग मध्ये जाऊन गाडी उभी राहिली. गाडीतून शालिनी ताई आधी खाली उतरल्या. त्यांच्या पाठोपाठ एक बाई व एक मुलगी खाली उतरल्या. ती बाई त्या मुलीला आत घेऊन गेली.

शालिनी ताईंची नजर नीरव व नीरजाकडे गेल्याने त्या त्यांच्या दिशेने आल्या. नीरव व नीरजाला बघून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते.

“तुम्ही दोघे इकडे कसे?” शालिनी ताईंनी त्यांच्या जवळ येऊन विचारले.

एका शिपायाने शालिनी ताईंना बसायला खुर्ची आणून दिली.

“आई, आम्ही तुम्हाला घ्यायला आलोय.” नीरजाने उत्तर दिले.

“नीरव, तुला किती वेळेस मी आश्रमात ये म्हणून बोलले असेन पण तू नेहमी इथे यायला टाळाटाळ करत होतास. आज तुला इथे बघून मला आनंद झाला आहेच पण त्यापेक्षा आश्चर्य जास्त वाटत आहे.” शालिनी ताई नीरवकडे बघून म्हणाल्या.

“माझी आई मला न भेटता आश्रमात निघून आली. शिवाय ती परत यायला तयार नव्हती, म्हणून मला तिला घ्यायला तर यावेच लागणार होते ना.” नीरव म्हणाला.

“नीरव, मी परत येणारच होते, पण इथे या मुलीचा जरा गोंधळ झाला होता, म्हणून थांबून घेतले. मी कितीही म्हटलं तरी तुझ्यापासून, त्या घरापासून दूर राहू शकत नाही.” शालिनी ताई म्हणाल्या.

“आई, तिने काही सांगितलं का? नेमकं तिला काय झालंय? तिला हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेला होतात?” नीरजाने प्रश्नांचा भडीमार केला.

“नीरजा, जरा श्वास तर घे. गीताने त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे तुला सांगितले असेलच, तिचं नाव अंजली आहे हे आज कळलं. काल तिला अचानक खूप जास्त ब्लिडींग व्हायला लागलं होतं, तिच्या पोटात दुखत होत म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

डॉक्टर म्हणाले की, “तिला ओवरीयन सिस्ट होता आणि तो फोर्समुळे फुटला आणि ब्लिडींग सुरू झाले.”

डॉक्टरांनी ते सगळं क्लिन केलं. आता ती बरी आहे. आता प्रॉब्लेम एकच आहे की, ती बोलत नाहीये. स्वतः बद्दल काहीच माहिती सांगत नाहीये. ती बोललीच नाही तर आपण तिची मदत कशी करू हेच मला कळत नाहीये.” शालिनी ताईंच्या चेहऱ्यावर अंजली बद्दल वाटणारी काळजी दिसून येत होती.

“आई, इतक्या कमी वयात तिला हे सगळं सहन कराव लागतय. सगळंच अतिशय भयानक आहे. मला तर ऐकूनच कसतंरी वाटतंय.” नीरव म्हणाला.

यावर शालिनी ताई म्हणाल्या,
“नीरव, तू हॉस्पिटलमध्ये हे सगळं बघत असशीलही पण त्यापेक्षा काही घटना भयंकर असतात. आपण हे सगळं होण्यापासून थांबवू तर शकत नाही, पण निदान या क्षणी अंजलीची मदत तर करू शकतो. या घटनांचा अतिविचार केला की आपल्यालाच त्रास होतो.

अंजलीला बोलत कस करावं हेच कळत नाहीये. ती बोलली नाही तर मोकळी होणार नाही. तिच्या डोळ्यात जे दुःख दिसतंय तेही समजणार नाही.”

“आई, मी अंजली सोबत बोलून बघू का? कदाचित ती माझ्याशी बोलायला तयार झाली तर….” नीरजाने आपल्या मनातील विचार बोलून दाखवला.

“चालेल. तू तिच्याशी एकदा बोलून घे.” शालिनी ताई बोलत असतानाच मुक्ता तिथे आली.

“दादा, वहिनी तुम्ही इथे आहात तर.. मी तुम्हाला बघायला तुमच्या रूममध्ये गेले होते.” मुक्ता म्हणाली.

“मुक्ता, तू आलेली आहेस हे मला नव्हतं माहीत.” शालिनी ताईंना मुक्ताला बघून आश्चर्य वाटले होते.

“मी व आई आम्ही दोघी आलो आहोत.” मुक्ताने सांगितले.

शालिनी ताई पुढे काही बोलणार तेवढ्यात नीरजा म्हणाली,
“पण तू आम्हाला शोधत का होतीस?”

“आपण परत कधी जाणार आहोत, हे विचारायला आले होते.” मुक्ता खरं बोलत नव्हती याचा अंदाज नीरजाला आला होता. नीरव व शालिनी ताईंसमोर तिने तो विषय न काढणेच योग्य उचित ठरवले.

“मुक्ता, आपल्याला आजच्या आज रिटर्न जाता येणार नाही. आपण उद्या सकाळी जाऊयात.” नीरवने मुक्ताला सांगितले.

“संगिता ताई कुठे आहेत?” शालिनी ताईंनी विचारले.

“आई रूममध्ये आराम करत आहे.” मुक्ताने उत्तर दिले.

“नीरव, त्यांना सोबत का घेऊन आलास? त्या आधीच आजारी होत्या. त्या प्रवासाने अजून जाम होतील.” शालिनी ताई म्हणाल्या.

“काकू, तुम्ही आईमुळे आश्रमात निघून आलात ही गोष्ट आईला खात होती. तिला तुम्हाला घ्यायला यायचंच होत. तिला तुमच्याशी बोलायचं आहे. एकदा दोघीजणी शांतपणे बोलून घ्या म्हणजे दोघींच्या मनात जे काही आहे ते बाहेर पडेल.” मुक्ताने सांगितले.

“हो आई. मुक्ता बरोबर बोलत आहे. एकदा तुम्ही दोघी बोलून घ्या. बोलल्याशिवाय काहीच सॉर्ट होणार नाही.” नीरजाने मुक्ताच्या बोलण्याला दुजोरा दिला.

“ठीक आहे. मी रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन येते, मग संगिता ताईंसोबत बोलते. नीरजा, तू एकदा अंजली सोबत बोलण्याचा प्रयत्न कर.” शालिनी ताई आपल्या जागेवरुन उठल्या आणि आत निघून गेल्या.

नीरजा, नीरव व मुक्ता असे तिघेजण तिथे होते. तेवढयात नीरवचा मोबाईल वाजला. हॉस्पिटल मधून फोन असल्याने तो मोबाईल घेऊन बाजूला निघून गेला.

“मुक्ता काय झालंय? तू इतकी काळजीत का दिसत आहेस?” नीरजाने अस विचारल्यावर मुक्ता तिच्या बाजूला बसली आणि आपला मोबाईल तिच्या हातात देऊन म्हणाली,

“ ज्योती ताईचा मॅसेज आलाय. तो वाचून माझ्यातर पायाखालची जमीनच हादरली. मला तर काय करावं सुचत नाहीये.”

मुक्ताच्या डोळयात अश्रू जमा झाले होते. ज्योती बद्दल वाटणारे प्रेम, काळजी या सगळ तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. नीरजाने मुक्ताच्या हातातून मोबाईल घेतला.

ज्योतीने असा काय मॅसेज केला असेल, ज्यामुळे मुक्ता टेन्शन मध्ये होती, बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all