समर्पण-एक प्रेमकथा भाग ९१

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ९१

मागील भागाचा सारांश: ज्योतीने लग्न केल्याचे मुक्ता पासून लपवले होते, म्हणून तिला खूप वाईट वाटले होते. ज्योती तिचा नवरा विनोद सोबत सिंगापूरला निघून गेली होती. नीरव हॉस्पिटलमध्ये नसताना गौरवने एक इमर्जन्सी केस हँडल केली होती. त्याबद्दल नीरजाने नीरवला त्याला फोन करून त्याचे कौतुक करण्याचा सल्ला दिला.

आता बघूया पुढे…

“गीता ताई, आत येऊ का?” नीरजाने गीताच्या रुमच्या दरवाजावर नॉक करून विचारले.

“हो, ये ना.” गीता दरवाजात बघून नीरजाला म्हणाली.

नीरजा गीताच्या बेडवर जाऊन बसली.

“मला वाटलं तू आराम करत असशील.” गीता ताई तिला म्हणाल्या.

“गीता ताई, मला एकदा अंजली सोबत बोलायचं आहे, त्याशिवाय मला स्वस्थ बसवणार नाही.” नीरजाने तिच्या मनातील इच्छा बोलून दाखवली.

“चल आपण दोघी जाऊयात. मी तुझी तिच्या सोबत ओळख करून देते.” गीता ताई आपल्या जागेवरून उठत म्हणाली.

गीता ताई व नीरजा दोघी रूममधून बाहेर आल्या व अंजलीच्या रुमच्या दिशेने जात होत्या.

“गीता ताई, अंजलीला मी डॉक्टर असल्याचे सांगू नका. माझं प्रोफेशन ऐकून कदाचित ती माझ्याशी बोलू शकणार नाही.” नीरजाने सांगितले.

यावर गीता ताईंनी मान हलवून होकार दिला.

“अंजली, आराम करते आहेस का?” रूममध्ये गेल्यावर अंजली बेडवर झोपलेली दिसल्यावर गीता ताईंनी विचारले.

अंजलीने मानेने नकार दिला. नीरजाला बघून ती उठून बसली. नीरजाकडे ती प्रश्नार्थक नजरेने बघत होती.

“अंजली, ही नीरजा आपल्या आश्रमातच रहायला होती. ती दरवर्षी इथे येत राहते. आज ती आपल्या सगळ्यांना भेटायला आली आहे, तर तुझी ओळख करून घ्यायला ती आली आहे.” गीता ताईंनी नीरजाची ओळख करून दिल्यावर नीरजाने अंजलीकडे बघून स्माईल दिली. अंजलीच्या चेहऱ्यावर मात्र काहीच भाव नव्हते.

“नीरजा, तू अंजली सोबत गप्पा मारत बस. मला एक अर्जंट काम आठवलं आहे, ते करून येते.” अस बोलून गीता ताई तेथून निघून गेल्या.

आता रूममध्ये अंजली व नीरजा दोघीच होत्या. अंजली निर्विकार चेहऱ्याने शून्यात बघत बसलेली होती. रूममध्ये एक प्लास्टिकची खुर्ची होती, ती बेडजवळ घेऊन त्यावर नीरजा बसली.

“अंजली, तुला माझ्याशी गप्पा मारायला आवडेल का?” नीरजाने अंजलीकडे बघून विचारले.

यावर अंजलीने तिच्याकडे बघितले, पण ती काहीच बोलली नाही. अंजलीच्या डोळयात तिला होणाऱ्या वेदना दिसून येत होत्या. एवढीशी पंधरा वर्षांची मुलगी पण तिच्या चेहऱ्यावरील भाव एखाद्या मोठया मुलीसारखे होते. नीरजाला अंजलीच्या डोळ्यातील वेदना बघून कसतरी झालं.

“अंजली, तू काहीच बोलली नाहीस तर मला तुझ्या मनात काय सुरू आहे हे कधीच कळणार नाही. मला नजरेची भाषा समजत नाही. ती कला मला अजून अवगत व्हायची आहे.

तुझ्या मनात यावेळी नेमकं काय वादळ सुरू आहे, याची कल्पनाही मला करवत नाहीये. पण तू बोललीच नाहीस, तर तुझं मन मोकळं होणार नाही. तू अशीच गप्प बसून किती दिवस आयुष्य काढणार आहेस?

अंजली, आयुष्य कोणाचच सोपं नसतं. तू तर कमी वयातच खूप काही सहन केल आहेस, पण तेच दुःख धरून काही साध्य होणार आहे का? प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट काळ हा असतोच. माझ्याही होता, तुझ्याही आहे.

मी अगदी लहान वयात आई वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेय. सगळं शिक्षण होस्टेलला राहून झालं. सुट्टीत काका काकूंकडे जायचे, तर त्यांचं वागणं बघून तिथेही जाणं बंद केलं. सुट्टीत इकडे आश्रमात यायला लागले आणि हेच माझं घर झालं. शालिनी ताई देवाकृपेने भेटल्या म्हणून मला शिक्षण घेता आलं आणि माझ्या पायावर उभं राहता आलं. अजूनही आयुष्यात संघर्ष सुरू आहेच पण तो तुला नंतर कधीतरी सांगेल.

हे सगळं सांगण्याचा हेतू एवढाच की, मी जर आई वडील नाही म्हणून दुःख करत बसले असते तर आज जिथे आहे किंवा आयुष्यात जे काही चांगलं घडलं आहे ते कधीच घडलं नसतं. अंजली, तुझ्या नशिबाने तुला या सगळ्यातून बाहेर काढायला बरेचजण मदत करायला तयार आहेत. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत.” नीरजा अंजलीला बोलत करण्याचा प्रयत्न करत होती.

अंजलीच्या डोळ्यातून पाणी वाहायला सुरुवात झाली होती. नीरजा तिच्या जवळ जाऊन उभी राहिली. तिच्या डोक्यावरून तिने मायेने हात फिरवला तशी अंजली तिच्या कुशीत घुसून हमसून हमसून रडत होती. नीरजाने तिला रडून मोकळं होऊ दिलं. अंजली थोडी सावरल्यावर ती नीरजाच्या मिठीतून बाजूला झाली.

नीरजा अंजलीचा हात हातात घेऊन म्हणाली,
“अंजली, आता तरी माझ्याशी बोलशील ना?”

अंजलीने मान हलवून होकार दर्शवला. अंजलीने बोलायला सुरूवात केली,
“ नीरजा ताई, जे घडलंय ते आठवून मला खूप त्रास होत असतो, म्हणून इतक्या दिवस मी कोणाशीच बोलले नव्हते. माझं वय जरी कमी असल तरी अगदी लहान वयातच मला मोठं व्हावं लागलं. कारण घरातील परिस्थिती अशी होती की, मला माझं बालपण जगताच आलं नाही.

माझ्याकडून एकच चूक झाली की, मी वेळीच घर सोडले असते तर माझी ही अवस्था झालीच नसती. मलाच निर्णय घ्यायला उशीर झाला.

माझी आई घरोघरी जाऊन धुणीभांडी करायचे काम करत होती, तर वडील रिक्षा चालवायचे. मी घरात सगळ्यात मोठी, माझ्यानंतर लहान बहीण आणि भाऊ. आई कामाला जायची तेव्हा मला बहीण भावाला सांभाळावे लागत होते.

मला शाळेत जायला आवडायचे पण घरातील जबाबदाऱ्यांमुळे निम्म्या दिवस घरी थांबावे लागायचे. माझ्या वयाच्या मुलींसोबत मला खेळताही येत नव्हते. आईला दुसऱ्या एरियात चांगलं काम मिळाल्याने आम्ही दुसरीकडे रहायला गेलो. तिकडे आमच्या शेजारी एक शेलार काका राहत होते. माझ्या वडिलांची व त्यांची मैत्री झाली. माझे वडील त्यांच्या जोडीने दारू प्यायला लागले होते.

वडील घरात नसतानाही शेलार काका आमच्या घरी यायचे. मला त्यांचं वागणं खटकायला लागलं होतं. ते मला नेहमी स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे. मला तो स्पर्श घाणेरडा वाटायचा. मी आईला याबद्दल सांगितलेही होते, पण ती म्हणायची, ते तुझ्या वडिलांसारखे आहेत, उगाच काही अर्थ लावू नकोस.

शेलार काका दिवसरात्र आमच्या घरात ठाण मांडून बसायचे, जस काही ते घर त्यांचंच होतं. आमच्या साठी दररोज काहीना काही खायला घेऊन यायचे. आमच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचा क्लास झाला होता त्यावरून शेलार काकांचे वागणे जरा जास्तच मला खटकायला लागले होते.

एके दिवशी मी शाळेतून लवकर आले तर काका आणि आईला नको त्या अवस्थेत बघितलं, तेव्हा मला आईने धमकी दिली आणि शांत बसायला लावले. शेलार काका आणि आई मध्ये अनैतिक संबंध आहेत हे मला कळले होते, तरी मला शांत बसावे लागत होते.

मी जर त्याबद्दल कोणाला सांगितलं तर आईने जीव द्यायची धमकी दिली होती. माझ्यासोबत जी घटना घडली त्याच्या आधी पंधरा दिवसांपासून शेलार काका माझ्याशी लगट करायला लागले होते. आईला हे समजत असून सुद्धा तिने त्यांना कधीच अडवलं नाही.

त्या दिवशी माझं पोट दुखत असल्याने मी लवकर घरी आले होते, घरात कोणीच नव्हतं. मी घरात गेले तर माझ्या पाठोपाठ शेलार काका घरात घुसले आणि दार लावून घेतले. मी ओरडण्याचा प्रयत्न करू लागले तर त्यांनी माझ्या तोंडात बोळा कोंबला आणि त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्यांनी करून घेतलं. मला ज्या यातना झाल्या त्या शब्दांत सांगू शकत नाही.

मी डोळे जेव्हा उघडले तेव्हा आई आणि शेलार काका समोर हसत बसले होते. शेलार काकांनी आईच्या हातावर पैसे टेकवले आणि ते निघून गेले. पुढील दोन ते तीन दिवस मी तापाने फणफणले होते. त्या काळात मला माझ्या आयुष्याच एक सत्य समजलं. मी जिला आपली आई समजत होते, ती माझी सावत्र आई होती. शेलार काका व आईचा मला विकण्याचा प्लॅन होता. एक दिवस मी संधी शोधून घरातून बाहेर पडले.

चालून चालून थकल्यावर मी बेशुद्ध झाले होते. डोळे उघडल्यावर मी आश्रमात असल्याचे मला कळले. मी ज्या बाईला आई समजून प्रेम दिले तिने माझा इतका मोठा विश्वासघात केला तर मी येथील परक्या लोकांवर विश्वास कसा ठेवू शकले असते?

आज तुझ्या डोळयात मला विश्वास दिसला म्हणून मी बोलले. ताई, मला त्या जगात परत जायचं नाहीये.”

अंजलीची कथा ऐकून नीरजाच्या डोळयात पाणी आले.

“तुला त्या जगात परत जाण्याची गरज नाहीये. तुला आता परत ते सगळं आठवायची सुद्धा गरज नाहीये. चल तू आराम कर. रात्री आपण एकत्र जेवण करू.” नीरजा अंजलीला आधार देऊन निघून गेली.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all