समर्पण-एक प्रेमकथा भाग ९२

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण- एक प्रेमकथा भाग ९२

मागील भागाचा सारांश: नीरजाच्या डोळ्यात विश्वास दिसल्याने अंजलीने तिच्याकडे आपलं मन मोकळं केलं. अंजलीच्या आयुष्यात जे काही घडलं होत ते तिने थोडक्यात नीरजाला सांगितले.

आता बघूया पुढे…..

अंजलीच्या रूममधून बाहेर पडल्यावर नीरजा थेट आपल्या रूममध्ये गेली. नीरव बेडवर डोळे मिटून पडलेला होता. दरवाजाचा आवाज झाल्याने त्याला जाग आली. नीरजा रूममध्ये येऊन खुर्चीवर डोकं धरून बसलेली होती. नीरजा अंजली सोबत बोलून आल्याने ती अशी शांत बसली असेल याचा अंदाज नीरवला आला होता.

नीरव आपल्या जागेवरून उठला. बाजूला असलेल्या टेबल वरून पाण्याची बाटली त्याने घेतली व नीरजा समोर जाऊन त्याने धरली. नीरजा खुर्चीत बसली होती व नीरव उभा होता. तिने त्याच्याकडे बघितले व त्याला मिठी मारली. नीरजा रडत होती. अंजलीची कथा ऐकून तिला त्रास होत होता. ते सगळं ऐकून तिचं मन हेलकावून निघाले होते.

नीरवने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. पुढील काही वेळ नीरजा त्याच्या मिठीत होती. नीरवनेही तिला रडून शांत होऊ दिलं. रूममध्ये नीरव शांतता होती. दोघेही काहीच बोलत नव्हते. आपण नीरवच्या मिठीत आहोत हे समजल्यावर नीरजा पटकन बाजूला झाली. नीरवने तिच्या समोर पुन्हा पाण्याची बाटली धरली. नीरजा त्याच्या हातातून बाटली घेऊन पाणी प्यायली.

नीरव दुसरी खुर्ची घेऊन तिच्या समोर बसला. तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला,
“नीरजा, अंजलीची कथा ऐकून तुझी ही अवस्था झाली आहे हे मला समजतंय. तुला इतका त्रास होतोय म्हटल्यावर नक्कीच तसं काहीतरी घडलं असेल. आता जरा शांत होत आणि मला सगळं सांग.”

नीरजाने नीरवला सगळं काही सांगितलं,
“नीरव, अंजली किती लहान आहे. तिच्या सावत्र आईला हे सगळं करताना काहीच कसं वाटलं नसेल? इतक्या नीच विचारांचं कोणी कस असू शकतं.

सावत्र असली म्हणून काय झालं, पण ती मुलगीच होती ना. मला विचार करून, ऐकून इतका त्रास होतो आहे, तर अंजली तर या सगळ्यातून गेली आहे, तिला किती त्रास होत असेल. आपण ज्या बाईला आपली आई मानलं त्या बाईनेच तिच्या सोबत हे असं वागावं.

नीरव, मी खरंच ग्रेटफुल आहे की, माझ्या आयुष्यात वेळीच वार्डन काकू, गीता ताई, शालिनी आई ह्या तिघीजणी वेळीच भेटल्या. अंजलीच्या आईसारखी एखादी भेटली असती तर कदाचित माझं आयुष्य काहीतरी वेगळंच झालं असत.”

नीरजाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. नीरव तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला,
“नीरजा, तुला असं कोणी भेटलं तर नाही ना, तर मग तो विचार मनात आणू नकोस. हे बघ नीरजा, प्रत्येकाच नशीब वेगवेगळ असतं. नशीबात जे लिहिलेलं असतं ते घडत जातं. आपण कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी ते घडणारच.

आता अंजलीच्या बाबतीत जे घडून गेलं ते प्रचंड भयानक होतं. आता ते आपण बदलू शकणार नाही, पण तिचं भविष्य घडण्यासाठी तिची मदत आपण करू शकतो, तेवढंच आपल्या हातात आहे. तू जर स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेतलास तर अंजलीला सावरायला कोण मदत करेल?

आता डोळ्यातील हे पाणी पुस. अंजलीला या सगळ्यातून कस बाहेर काढायचं, तिची मनस्थिती बदलण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार कर.”

आपल्या डोळ्यातील पाणी पुसत नीरजा म्हणाली,
“तुम्ही बरोबर बोलत आहात. अंजलीच मन डायवर्ट करण्यासाठी, तिच्या मनात जगण्याची इच्छा निर्माण करण्यासाठी मला काहीतरी करावं लागणार आहे.”

“ये हुई ना बात! चला तर मग लागा कामाला. आपल्याला उद्या परतीच्या प्रवासाला लागायचं आहे सो तुझ्याकडे वेळ कमी आहे. त्यात दोघी आयांच बोलणं झालं की नाही, त्यांच्यात सगळं सुरळीत झालं की नाही याकडेही तुला लक्ष द्यायचं आहे.” नीरव उठून बेडवर जाऊन बसला.

“अरे हो की, अंजलीच्या नादात मी आईंबद्दल विसरूनच गेले. ज्योती ताईंच्या मॅसेजमुळे मुक्ताही दुखावली गेली आहे. तिच्याशी पण बोलावं लागेल.” नीरजा बोलत असताना नीरव तिच्याकडे बघून हसत होता.

“तुम्ही माझ्याकडे बघून का हसताय?” नीरजाने विचारले.

“अग, तू अंजलीच्या विचारातून बाहेर यावं म्हणून मी सहजच आयांचा विषय काढला. तू तर त्यावर सिरियसली विचार करायला लागलीस. तू सगळ्यांचा इतका विचार करत आहेस, हे चांगलंच आहे, पण त्यांचा विचार करण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस. सगळ्याचा अतिताण घेत जाऊ नकोस. आता मुक्ता काय लहान नाहीये, तिला ज्योतीच्या वागण्याचा त्रास होणं स्वाभाविक आहे, पण तिची ती त्यातून बाहेर पडेल. तिलाही या सगळ्याची सवय लागू दे.

आता राहिला प्रश्न आयांचा तर त्या दोघी त्यांच्यातील गैरसमज किंवा जे काही आहे ते सॉर्ट करतील आणि समजा काही झालंच तर आपण आहोतच.” नीरवने हसून उत्तर दिले.

“हम्मम, तुमचंही म्हणणं बरोबर आहे. मी गीता ताईंना जाऊन अंजलीची कथा सांगून येते. त्या माझी वाट बघत असतील. पुढे काय करावं लागेल हेही त्यांच्याशी बोलून ठरवते.” नीरजा आपल्या जागेवरून उठत म्हणाली.

“आणि हो मी गौरवला फोन करून त्याच्या कामाचं कौतुक केलं. तू पुन्हा त्याचाही विचार करत बसशील. माझी बायको अतिविचार करणारी आहे, हे मला नेहमी लक्षात ठेवावं लागेल.” नीरव हसत अगदी सहजपणे बोलून गेला.

नीरजाही यावर हसत रूमच्या बाहेर गेली, थोडं पुढे गेल्यावर नीरव नेमकं काय बोलून गेला हे तिच्या डोक्यात आलं.

‘नीरव मला त्यांची बायको म्हणाले तेही पहिल्यांदा आणि एकदम सहजच.’ नीरजा स्वतःशी बोलत गालातल्या गालात हसत होती.

“ओहो नीरजा मॅडम, गालातल्या गालात हसायला काय झालंय, जरा आम्हालाही कळूदेत.”

नीरजाने आवाजाच्या दिशेने बघितले व ती आश्चर्य चकित होऊन म्हणाली,
“रमाताई, तुम्ही कधी आलात? तुम्ही कल्पतरू मध्ये राहत नाहीत, हे मला गीता ताईंकडून कळालं होत.”

“सहा महिन्यांपूर्वी गावाला भावाकडे गेले होते. वडिलांची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करण्यासाठी माझी सही आवश्यक होती, त्यासाठी इतक्या वर्षानी मला घेऊन जायला म्हणून तो इकडे आश्रमात आला होता.

भावाला वाटलं होतं, येईल, चार दिवस राहील आणि सही करून निघून जाईल. पण मी सहा महिने माझी चांगली सेवा त्यांच्या कडून करून घेतली. शिवाय येताना 5 लाख खात्यावर जमा करायला लावले आणि मगच सही केली.

इतकी वर्षे मी जीवंत आहे की मेलीय हे तो बघायला आला नव्हता. सही मागायला आला आणि मी लगेच देऊन टाकेल, इतकी साधी वाटले होते का? मी त्यांना सहा महिन्यात चांगलंच धारेवर धरलं होतं.

खूप किस्से आहेत ते नंतर कधीतरी सांगेल. तू कशी आहेस ते सांग.” रमाने सांगितले.

“बरं ऐका, मी आता गीता ताईंकडे चालले आहे. जरा एका महत्त्वाच्या विषयावर त्यांच्या सोबत बोलायचं आहे. मी आज रात्री इथेच आहे, तर तुमच्याशी नंतर येऊन बोलते.” नीरजा म्हणाली.

“हो चालेल. मी इथे नसताना कोणत्या घडामोडी घडून गेल्या याचा मलाही सगळ्यांकडून आढावा घ्यायचा आहे. तू तुझ्या कामाला जा, मी माझ्या कामाला जाते.” रमा बोलून तेथून निघून गेली.

नीरजा गीता ताईंच्या ऑफिसच्या दिशेने गेली. नीरजाने गीता ताईंना अंजलीची कथा सांगितली, ती ऐकून त्यांच्याही डोळ्यात पाणी आले. अंजलीला या सगळ्यातून बाहेर कस काढायच यावर गीता ताई व नीरजा मध्ये सविस्तरपणे बोलणं झालं.
—---------------------------------------------------

नीरजा रूममधून निघून गेल्यावर नीरव स्वतःवरच रागावला,
‘नीरव, तुला नेमकं काय झालंय? नीरजाला तू स्वतःची बायको असं म्हणालास तेही अगदी सहज. नीरजाने या सगळ्याचा वेगळा अर्थ काढला तर….
एकतर माझ्या मनात नीरजा बद्दल काय सुरू आहे हे कळत नाहीये आणि असं काही बोलून तिच्या मनात वेगळ्याच आशा पल्लवीत होतील. नीरव, तुला तुझ्या बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. पण मला एक कळत नाहीये, मी तिला इतक्या सहजपणे बायको कसा म्हणालो?’ नीरवला स्वतःच्या बोलण्याचं आश्चर्य वाटत होतं.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe
(नमस्कार, ह्या कथेचा मागील भाग प्रकाशित होऊन जवळपास अडीच महिने झाले आहेत. तुम्ही ह्या भागाची आतुरतेने वाट बघत असाल याचीही मला कल्पना आहे. काही महिने मला लिखाण करायला जमणार नाही या आशयाची पोस्ट ईरावर मी टाकली होती. माझ्या आयुष्याचे दुसरं पर्व सुरू झाल्याने लिखाणात गॅप पडला होता. आता रेग्युलर भाग लिहिण्याचा प्रयत्न करणार आहेच, पण काही कारणाने जर गॅप पडला, तर तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते. आपण सगळे आधीप्रमाणेच या कथेला भरभरून प्रतिसाद व प्रेम द्याल ही मला खात्री आहे.)

🎭 Series Post

View all