समर्पण-एक प्रेमकथा भाग ९४

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ९४

मागील भागाचा सारांश: संगीता ताई व शालिनी ताईंमध्ये बोलणं झाल्याने दोघींच्या मनात एकमेकींबद्दल जी अढी होती, ती दूर व्हायला मदत झाली. अंजलीला आता असलेल्या मनःस्थितीतून बाहेर काढण्यासाठी नीरजाने शालिनी ताई व गीताताईला पर्याय सुचवले.

आता बघूया पुढे…

नीरजाचे बोलणे ऐकल्यावर गीता ताई म्हणाल्या,
“ मॅडम, तुम्ही इथे नसताना अर्चना मॅडम आपल्या आश्रमात आल्या होत्या, त्या शिक्षिका आहेत. त्यांना आश्रमातील मुलींना, बायांना शिकवण्याची इच्छा आहे. त्या तसं मला बोलल्या होत्या. मी त्यांना फोन करून अंजलीला शिकवायला याल का म्हणून विचारते. त्या जर आल्या तर बरंच होईल. त्यांचा स्वभाव आणि बोलणं एकदम नीरजा सारखं आहे. अंजली त्यांच्याकडून सगळं काही मोकळेपणाने शिकून घेऊ शकेल अस मला वाटतं.”

“अच्छा, चालेल. तू त्यांना फोन करून उद्या भेटायला बोलावून घे. आपण त्यांच्याशी बोलून पुढचा प्लॅन ठरवूयात.” शालिनी ताईंनी सांगितले.

“ओके. मी लगेच त्यांना फोन करून येते.” गीता ताई बोलून केबिनच्या बाहेर पडल्या.

“आई, तुम्ही उद्या आमच्या सोबत घरी येणार नाही का?” नीरजाने विचारले.

“नाही. आश्रमातील बरीच कामं बाकी आहेत. शिवाय अंजलीचं काहीतरी मार्गी लावावं लागेल. इथलं सगळं सुरळीत झालं की मी घरी येईल.” शालिनी ताईंनी उत्तर दिले.

“असं काय करता आई. तुम्ही नसल्या की घर मोकळं मोकळं वाटतं. सरस्वती ताई पण बोलल्या की तुम्हाला घेऊनच परत या म्हणून.” नीरजा.

“नीरजा, मी घरी येणार आहे. माझ्यासोबत संगीता ताईंना सुद्धा थांबवून घेणार आहे, त्याही तयार आहेत. आम्ही दोघी सोबत घरी येऊ. संगीता ताई इथं राहतील तर त्यांना बाहेरच जग कस असत ते समजेल. गेले काही वर्षे त्या ज्या मनस्थितीत होत्या, त्यातून त्यांना पूर्णपणे बाहेर काढावं लागेल आणि ते आश्रमात राहून लवकर शक्य होईल.” शालिनी ताईंनी नीरजाला समजावून सांगितले.

“हो चालेल. तुम्ही दोघी लवकर घरी परत या.” नीरजा चेहऱ्यावर हसू आणून म्हणाली.

“आणि दुसरी गोष्ट, मुक्ताला बिजी ठेवता येईल असं काहीतरी करायला सांग. तिलाही एका वेगळ्या जगात जाण्याची गरज आहे. संगीता ताई इकडे असतील तर ती तिकडे एकटीच असेल, तर तिच्याकडे बराच मोकळा वेळ असेल.” शालिनी ताई.

“हो, त्यांना बिजी ठेवण्यासाठी काहीतरी करावे लागेल हे माझ्या डोक्यात आहेच. पुण्यात गेल्यावर त्यांना आवडेल असा एखादा कोर्स शोधते.” नीरजा म्हणाली.

“त्यात माझी काही मदत लागली तर हक्काने सांग.” शालिनी ताई.

“हो. चला मी आता जरा आश्रमात फेरफटका मारते. उद्या सकाळी लवकर निघावं लागणार आहे.” नीरजा बोलून शालिनी ताईंच्या ऑफिस मधून बाहेर पडली.

नीरजा आश्रमात इकडे तिकडे फिरत होती. सहज तिचं लक्ष लॉनवर पडलं. तिथे मुक्ता एकटीच बसलेली होती. नीरजा तिच्या जवळ जाऊन म्हणाली,
“मुक्ता, तू इकडे एकटी का बसली आहेस? आणि तुझा चेहरा इतका उदास का दिसत आहे? मी बोललेय ना तुला ज्योती ताईंचा इतका विचार करू नकोस म्हणून.”

“वहिनी, ज्योती ताईचा विचार डोक्यातून जाता जात नाहीये. त्यात मावशीचा फोन आला होता. मावशी फोनवर इतकी रडत होती. मावशीला वाटलं की, मला सगळं काही माहीत असेल म्हणून. मी आईची शपथ घेतली तेव्हा मी खरं बोलतेय यावर मावशीचा विश्वास बसला.

मावशीचं बोलणं आणि रडणं ऐकून खूप वाईट वाटलं. ज्योती ताई तिच्या जागेवर बरोबर असेलही पण या सगळ्यात मावशीचा काय दोष? सगळेजण मावशीच्या संस्कारांनाच नाव ठेवत आहे.

नऊ महिने बाळाला पोटात वाढवायचं, बाहेर आल्यावर त्याला जीवापाड जपायचं. स्वतःच्या घासातला घास काढून त्याला द्यायचा. आपल्यापेक्षा आपल्या बाळाचा जास्त विचार करायचा. आपल्या मुलीची प्रगती कशी होईल यासाठी कष्ट करायचे. तिला शिकवायचं, नोकरी करण्यासाठी स्वातंत्र्य द्यायचं आणि तिने आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेताना एकदाही त्या माऊलीचा विचार केला नाही.

आईच्या मायेशिवाय ज्योती ताई कशी राहू शकेल, हा विचार तिच्या मनाला शिवला नसेल का? मावशीच बोलणं ऐकून ज्योती ताईचा खूप राग येतो आहे.” मुक्ताच्या डोळ्यात पाणी तरळले.

नीरजाने तिच्या खांद्यावर हात ठेवून आधार दिला व ती पुढे म्हणाली,
“मुक्ता, ज्योती ताई किंवा त्यांच्या आई दोघीही आपापल्या जागेवर बरोबर असतील, पण आता याबद्दल आपण काहीच करू शकत नाही.तुला त्रास होणे स्वाभाविक आहे. संगीता आई व शालिनी आई इथेच आश्रमात पुढील काही दिवस राहणार आहेत

उद्या सकाळी आपण तिघेही परत पुण्याला जाऊयात तिकडे गेल्यावर आपण तुझ्यासाठी एखादा कोर्स शोधूयात ज्यात तुझं मन रमेल. त्या कोर्सच्या आधारे तुला नोकरी मिळू शकेल. तुझंही वेगळं आयुष्य सुरू होईल. सध्या ज्योती ताईंचा विषय तू डोक्यातून बाजूला काढण्याचा प्रयत्न कर.

आता ज्योती ताई चूक की बरोबर हे आपण सांगू सांगत नाही. ज्योती ताई फक्त सेफ असाव्या एवढीच माझी इच्छा आहे.”

“वहिनी, तुमचं म्हणणं मलाही पटतंय. मावशीचा फोन आल्याने मी पुन्हा त्या विचारांमध्ये गेले होते. आई इकडे आश्रमात रहायला तयार झाली ते एक बर झालं, तेवढंच तिचं मन रमेल.

मलाही आता काहीतरी करावं लागेल. असं शांत रिकामं बसून चालणार नाही. रिकामं राहिल्यावर डोक्यात नको नको त्या गोष्टी येत राहतात. मी ऑनलाईन कोर्सेस शोधते आणि तुम्हाला सांगते.” मुक्ताने सांगितले.

“हो चालेल. मी इथे असताना रमाताई होत्या, त्या आत्ताच गावावरून आल्या आहेत, त्यांना भेटून येते.” नीरजा बोलून तेथून निघून गेली.

नीरजा एकेक करून आश्रमातील सगळ्यांना भेटली. रमाताईंची भेट घेऊन गप्पाही मारल्या. आश्रमातील सगळेजण एकत्र जेवायला बसले होते. अंजली रुममधून खाली जेवायला यायला तयार नसल्याने नीरजा व आश्रमातील अजून चार जणी तिच्यासोबत रूममध्ये जेवायला बसल्या. जेवण करताना सगळ्यांनी गमतीशीर विषय काढून अंजलीला हसण्यास भाग पाडले. अंजलीच्या चेहऱ्यावर आलेले हसू बघून नीरजाला बरं वाटलं.

जेवण झाल्यावर नीरजाने अंजली सोबत गप्पा मारल्या. अंजलीची आवड निवड जाणून घेतली. नीरवने आश्रमातील स्त्रियांना त्यांचे आरोग्य चांगले कसे राहील यासाठी मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर नीरजा, नीरव व मुक्ता पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले. वाटेत एके ठिकाणी नाश्ता करण्यासाठी ते थांबले. गाडीतून उतरल्यावर नीरवला त्याचा मित्र रणजीत नजरेला पडला. नीरवने रणजीतला आवाज दिला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली.

“रणजीत, तू इकडे कसा?” नीरवने विचारले.

“मी पुण्याला चाललोय. भूक लागली म्हणून नाश्ता करायला थांबलो होतो.” रणजीतने उत्तर दिले.

“चल मग आपण सोबत नाश्ता करू.” नीरव म्हणाला.

नीरव, नीरजा, मुक्ता व रणजीत चौघेजण एक टेबलच्या इथे जाऊन बसले. वेटरला बोलावून त्यांनी ऑर्डर दिली.

“नीरव, तू कुठे फिरायला गेला होतास का?” रणजीतने विचारले.

“आई जे कल्पतरू आश्रम चालवते ना तिकडे गेलो होतो.” नीरवने उत्तर दिले.

वेटर नाश्ता देऊन निघून गेला. चौघेजण खाता खाता बोलत होते.

“पुण्यातून जाण्यापूर्वी घरी जेवायला येऊन जा.” नीरव रणजीत कडे बघून म्हणाली.

“माझी ट्रान्सफर पुण्यातच झाली आहे, जेव्हा फ्री असेल तेव्हा जेवायला नक्कीच येईल.” रणजीतने सांगितले.

“अरे हे तर भारी झालं. पुण्यात आहेस तर वरचेवर भेट तरी होत जाईल. आता पुण्यात क्वार्टरला राहणार का?” नीरवला प्रश्न पडला होता.

“नाही. पुण्यात माझी बहिण राहते, तिच्याकडेच राहील.” रणजीत म्हणाला.

“अच्छा. तुझ्या बहिणीने इंजिनिअरिंग केलं होतं ना. एकदा आपण दोघे सोबत असताना तिला भेटलो होतो ना.” नीरव.

“हो तीच ही. ती सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे कोर्सेस घेते. मॅडमला चांगलंच डिमांड आहे.” रणजीत हसून म्हणाला.

“मला त्यांचा नंबर मिळेल का? मुक्ताला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे कोर्स करायचे आहेत तर त्यांच्याशी त्या संदर्भात बोलता येईल.” नीरजा म्हणाली.

“हो, चालेल. मी नीरवला नंबर सेंड करतो. तुम्ही तिला फोन कराल याची कल्पनाही तिला मी देऊन ठेवतो. ती तुमची मदत नक्कीच करेल.” रणजीत.

नाश्ता झाल्यावर नीरव व रणजीतने एकमेकांचा निरोप घेतला.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all