समर्पण-एक प्रेमकथा भाग ९५

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ९५

मागील भागाचा सारांश: शालिनीताई आश्रमात नसताना अर्चना मॅडम आश्रमातील स्त्रियांना शिकवण्यास इच्छुक होत्या, तर त्यांना अंजलीला शिकवण्यासाठी बोलवायचे असे गीता ताईनी सुचवले. मुक्ताला तिच्या मावशीचा म्हणजेच ज्योतीच्या आईचा फोन आल्याने ती डिस्टर्ब झाली होती, तिला ज्योतीचा राग येत होता यावर नीरजाने तिला समजावून सांगितले. नीरजा, नीरव व मुक्ता पुण्याकडे जाण्यास निघाले असताना ते वाटेत नाश्ता करण्यासाठी थांबले होते, तिथे रणजीतची भेट झाली. रणजीत कडून त्यांना कळले की, त्याची बहिण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे क्लासेस घेते तर नीरजाने त्याच्याकडून त्याच्या बहिणीचा नंबर घेतला जेणेकरून मुक्ताला तिच्याकडे क्लासेस साठी पाठवता येईल.

आता बघूया पुढे….

“नीरजा, मी तुम्हाला दोघींना घरी सोडतो आणि मी लगेच तसाच हॉस्पिटलमध्ये जातो. तू घरी जा तुमचं आवरा आणि तुला मुक्ताला घेऊन क्लासच्या चौकशीला जायचं असेल तर जा नाहीतर मग हॉस्पिटलला ये. बघ म्हणजे तुला जस जमेल तसं कर.” नीरव गाडीत बसल्यावर म्हणाला.

“ओके, चालेल. मी घरी गेल्यावर रणजीतच्या बहिणीला फोन करते, त्या फ्री असतील तर मग मुक्ताला घेऊन त्यांच्याकडे जाईल. मुक्ता पण एकटी घरी बोअर होईल, तर तिचंही काहीतरी लवकरात लवकर शेड्युल सेट झालं म्हणजे बरं होईल.” नीरजाने आपली प्रतिक्रिया दिली.

पुढील काही वेळातच नीरव, नीरजा व मुक्ता घरी पोहोचले. त्याने दोघींना घराबाहेरच सोडले तो काही घरात गेला नाही, तो तसाच गाडी घेऊबी हॉस्पिटलमध्ये गेला.

नीरजा व मुक्ता घरात गेल्या सरस्वती ताई हॉलमध्ये होत्या, त्या नीरजाला दारात असताना म्हणाल्या,
“नीरजा मॅडम, शालिनी मॅडम आल्या नाही का?”

“नाही. आश्रमातील काही कामे अपूर्ण राहिल्याने त्या तिथेच थांबल्या आहेत. संगीता आई पण त्यांच्या सोबत आश्रमात थांबल्या आहेत. आश्रमातील कामे पूर्ण झाल्यावर आई लवकरच घरी परत येणार आहेत.” नीरजाने उत्तर दिले.

“मॅडम, तुमच्या दोघींसाठी काही खायला बनवायच आहे का?” सरस्वतीने विचारले.

“आम्ही वाटेत नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो, तर आता डायरेक्ट जेवणाच बघा. मी थोड्याच वेळात बाहेर जाईल, तर नीरवसाठीही डबा घेऊन जाईल तर फ्रीजमध्ये जी भाजी असेल ती बनवा. घरातील जे सामान संपलं असेल किंवा कमी असेल त्याची यादी मला करून द्या. मी घेऊन येईल. शालिनी आई येईपर्यंत या सगळ्याकडे मलाच लक्ष द्यावे लागेल.” नीरजा रूममध्ये जाता जाता म्हणाली.

मुक्ता व नीरजा आपापल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेल्या. रणजीतच्या बहिणीचा फोन नंबर नीरवने नीरजाला सेंड केला होता. फ्रेश झाल्यावर नीरजाने रणजीतच्या बहिणीला फोन लावला. चार-पाच रिंग नंतर फोन उचलण्यात आला,

“हॅलो, कोण बोलतंय?” समोरून विचारणा झाली.

“हॅलो, मी डॉ नीरजा नीरव जोशी बोलतेय.” नीरजाने उत्तर दिले.

“ओह! तुमचा फोन येईल अशी कल्पना रणजीतने दिली होती.” रणजीतची बहीण म्हणाली.

“मॅडम, माझी नणंद आहे, तिच्यासाठी क्लासेसची चौकशी करायची होती, तर आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी कधी येऊ?” नीरजाने विचारले.

“संध्याकाळी 4.30 ला या, तेव्हा मी फ्री असेल. सकाळी क्लासेसच्या बॅच असल्याने आपल्याला निवांत बोलता येणार नाही.” रणजीतच्या बहिणीने उत्तर दिले.

“हो चालेल. आम्ही 4.30 पर्यंत तुमच्याकडे येऊ. मॅडम, तुम्ही लोकेशन शेअर केलं तर आम्हाला यायला सोपं जाईल.” नीरजा.

“हो, मी तुम्हाला फोन कट केल्यावर लगेच लोकेशन सेंड करते. इथे येण्यापूर्वी तुमच्या नणंदेला ऑनलाईन ‘रजनी’ज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट’ या वेबसाईटवर जाऊन कोर्सेसची माहिती वाचायला सांगा, म्हणजे तिला नेमका कोणता कोर्स करायचा आहे हे तिला समजेल आणि आपल्याला डायरेक्ट त्याच पॉईंटवर बोलता येईल.” रणजीतच्या बहिणीने म्हणजेच रजनीने हे बोलून फोन कट केला.

रजनी सोबत बोलून झाल्यावर नीरजाने शिवानीला फोन लावला,
“हॅलो, बोला मॅडम.” शिवानी.

“शिवानी, तू कुठे आहेस?” नीरजाने विचारले.

“फ्लॅटवर आहे.” शिवानीने उत्तर दिले.

“तिकडे कधी शिफ्ट झालीस?” नीरजाला प्रश्न पडला होता.

“तुमच्या सोबत बोलणं झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी.” शिवानीचे उत्तर.

“ओह.” नीरजा.

“तुम्ही पुण्यात परत आलात का?” शिवानीचा प्रश्न.

“हो. मला पुढील तासाभरात हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, सो त्याचसाठी तुला फोन केला होता.” नीरजा म्हणाली.

“ओके चालेल. मी आवरून दहा ते पंधरा मिनिटांत इथून निघते.” शिवानी.

शिवानी सोबत बोलून झाल्यावर नीरजा मुक्ताच्या रूममध्ये जाऊन म्हणाली,
“मुक्ता, माझं रजनी मॅडम सोबत बोलणं झालं. त्या आता बिजी आहेत. आपल्याला त्यांनी संध्याकाळी 4.30 वाजता भेटायला बोलावलं आहे. त्याआधी रजनी’ज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या वेबसाईटवर त्यांच्या कोर्सेसची माहिती आहे, ती एकदा बघून यायला त्यांनी सांगितले आहे.

तुला त्यातील कोणता कोर्स करायचा आहे यावर विचार करून ठेव. मी थोड्या वेळात हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. तू 4 वाजेपर्यंत घरी येते, तोपर्यंत तू आवरून ठेव. मी आल्यावर आपण लगेच रजनी मॅडमची भेट घ्यायला जाऊयात.”

“हो चालेल. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन या, मी आवरून ठेवते.” मुक्ताने सांगितले.

पुढील काही वेळात शिवानी नीरजाच्या घरी आली. नीरजाने जेवण केलं आणि नीरवचा डबा घेऊन ती घराबाहेर पडली. ती गाडीत बसल्यावर शिवानीने गाडी हॉस्पिटलच्या दिशेने मार्गस्थ केली.

“शिवानी, तू घरातून निघताना तुझे दादा-वहिनी काही म्हणाले नाही का?” नीरजाने विचारले.

“ दादा बोलला, हेही तुझंच घर आहे, अधूनमधून येत जा. वहिनी तर काहीच बोलली नाही.” शिवानीने मिश्किल हसून उत्तर दिले.

“स्नेहाच्या फ्लॅटवर रहायला काही प्रॉब्लेम होत नाहीये ना?” नीरजाचा पुढील प्रश्न.

“नाही. स्नेहा मॅडम स्वभावाने चांगल्या आहेत. काल संध्याकाळी त्यांचा हॉस्पिटलमध्ये पाय मुरगळला. पायाला सूज आलेली आहे, म्हणून त्या आज घरीच आहेत.” शिवानीने सांगितले.

“ओह! पाय मुरगळल्यावर ती घरी कशी आली? तू तिला घ्यायला गेली होतीस का?” नीरजाला स्नेहाची काळजी वाटत होती.

“मला त्यांनी घ्यायला बोलावलं असतं तर मी गेले असते, पण त्या घरी आल्यावर मला त्यांचा पाय मुरगळल्याचे कळले. त्यांना डॉ गौरव सर सोडवायला आले होते.” शिवानी म्हणाली.

“ओके.” नीरजा एवढंच बोलली.

नीरजाने फोन करून स्नेहाची चौकशी केली. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर नीरजा आधी स्वतःच्या केबिनमध्ये गेली. टेबलवर पडलेल्या फाईल चेक केल्या.

“मे आय कम इन मॅडम.” दरवाजावर नॉक करून आवाज आल्याने नीरजाने दरवाजाकडे बघितले.

“नीरव, तुम्ही पण ना. तुम्ही आत येण्याची परमिशन का मागत आहात?” नीरजा हसून म्हणाली.

नीरव केबिनमध्ये तिच्या समोर येऊन बसत म्हणाला,
“प्रोटोकॉल मॅडम. मीच नियम पाळले नाहीत, तर हॉस्पिटल मधील स्टाफही तेच करेल.”

“करेक्ट.” नीरजा हसून म्हणाली.

“एक दिवस हॉस्पिटलमध्ये नव्हतो, तरी काम बघून असं वाटतंय की, मी खूप दिवस सुट्टीवर होतो.” नीरव.

“हॉस्पिटलचे मालक म्हटल्यावर ते होणारच. एनिवेज मी तुमच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले आहे. तुम्हाला भूक लागली असेल तर जेवण करून घ्या.” नीरजा म्हणाली.

“हे अगदी बर केलंस. मला भूक लागली होतीच तर तुला कॅन्टीन मध्ये येतेस का म्हणून विचारायला आलो होतो. माझ्यासोबत तू पण जेवणार आहेस ना?” नीरवने विचारले.

“नाही. मी घरून निघताना जेवण करून आले आहे.” नीरजाने उत्तर दिले.

“मग मी एकटाच जेवू का?” नीरव.

“तुम्ही इथेच जेवण करा. मी तुमच्या सोबत गप्पा मारून तुम्हाला कंपनी देते.” नीरजा चेहऱ्यावर हसू आणून म्हणाली.

नीरव डबा उघडून नीरजाच्या केबिनमध्ये जेवायला बसला. तो ज्या स्पीडने जेवण करत होता, ते बघून त्याला किती भूक लागली असेल याचा अंदाज नीरजाला आला होता. फास्ट जेवण करता करता नीरवला ठसका लागला. नीरजाने आपल्या जागेवरून उठून त्याला पटकन पाणी प्यायला दिले आणि त्याच्या पाठीवरून तिने हात फिरवला.

पाणी पिऊन झाल्यावर त्याने तिच्या डोळ्यात बघितले तेव्हा तिने तिचा हात पाठीवरून काढला आणि ती आपल्या जागेवर जाऊन बसली. आपण भावनेच्या भरात हे काय करून बसलो याचा तिला पश्चाताप येत होता. नीरव मात्र गालातल्या गालात हसत होता.

“थँक्स.” नीरव म्हणाला.

“कशाबद्दल?” नीरजाने विचारले.

“मला ठसका आल्यावर तू क्षणाचाही विलंब न करता पाणी दिले म्हणून.” नीरवने उत्तर दिले.

“त्यात थँक्स बोलण्यासारखं काहीच नाहीये. एवढी भूक लागेपर्यंत वाट कशाला बघायची. थोडी भूक लागल्यावरच काहीतरी खाऊन घ्यायला हवं. भुकेच्या नादात तुम्ही अतिफास्ट खात होतात आणि म्हणूनच ठसका लागला.” नीरजा पुढे म्हणाली.

यावर नीरव म्हणाला,
“काम करत असताना भूक तहान सगळं विसरण्याची माझी सवय आहे.”

“उद्यापासून मलाच तुमच्या जेवणाच्या वेळा लक्षात ठेवाव्या लागतील. एकदा ठराविक वेळेला जेवण करण्याची सवय लागली की मग बरोबर तुम्ही वेळेत जेवण कराल.” नीरजा चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली.

शिपाई नीरवला बोलवायला आल्याने नीरव पटकन जेवण उरकून निघून गेला.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all