समर्पण-एक प्रेमकथा भाग ९७

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग ९७

मागील भागाचा सारांश: स्नेहाच लिव्ह ऍप्लिकेशन द्यायला गौरव नीरजाकडे गेला. गौरवच्या बोलण्यावरून स्नेहा व त्याची चांगली मैत्री झाल्याचे नीरजाला कळले. नीरजा व मुक्ता रजनीला भेटायला गेल्या, त्यांच्यात बऱ्याच गप्पा झाल्या.

आता बघूया पुढे….

मोबाईलच्या रिंगने नीरजाला जाग आली. डोळे बंद असलेल्या अवस्थेत नीरजा हाताने बेडच्या बाजूच्या टेबलवर मोबाईल चाचपडत होती. मोबाईल हाताला लागल्यावर तिने किलकिले डोळे करून मोबाईल मध्ये बघितलं तर नीरवचा फोन येत होता.

“हॅलो, बोला नीरव.” नीरजा फुल्ल झोपेत होती.

“गुडमॉर्निंग डॉ नीरजा. आपल्याला आजपासून दररोज मॉर्निंग वॉकला जायचं आहे. विसरलात का?” नीरव थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला.

“नीरव, खूप झोप येत आहे. उद्यापासून वॉकला पक्का येत जाईल.” नीरजाला उठण्याची अजिबात इच्छा नव्हती.

“उद्या हा कधीच उगवत नसतो. कल करे सो आज कर, आज करे सो अब. पुढील दहा मिनिटात तू मला लॉनवर यायला हवी आहेस.” एवढं बोलून नीरवने फोन कट केला.

‘सकाळी सकाळी नीरव लेक्चर द्यायला सुरुवात करतात. नीरजा, उठ नाहीतर अजून लेक्चर ऐकावं लागेल. नीरव कधी काय वागतील, काही कळत नाही.’ नीरजा तोंडातल्या तोंडात बडबड करत उठून बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाली.

नीरजा आवरून खाली गेली तर नीरव लॉनमध्ये तिची वाट बघत उभा होता. हातातील घड्याळात बघून नीरव म्हणाला,
“नीरजा, तू दोन मिनिट लेट झाली आहेस.”

“नीरव, फक्त दोन मिनिट उशिरा आली आहे, दोन तास नाही.” पूर्ण झोप न झाल्याने नीरजा वैतागलेली होती.

“नीरजा, आपण डॉक्टर्स आहोत. वेळेचं महत्त्व सगळ्यात जास्त आपल्याला माहीत आहे. क्रीटीकल पेशंटला हॉस्पिटलला पोहोचायला पाच मिनिटं जरी उशीर झाला, तरी ते त्याच्या जीवावर बेतू शकतं.” नीरव बोलत असताना नीरजा त्याच्याकडे एकटक बघत होती.

“नीरव, आज तुमचा लेक्चर द्यायचा मूड असेल तर आपण तिकडे खुर्चीत बसूयात का?” नीरजा मिश्किल हसून म्हणाली.

“नाही नाही. आपण वॉक करायला जाणार आहोत.” नीरव पुढे चालू लागला व त्याच्या मागे नीरजा.

जॉगिंग ट्रॅकवर गेल्यावर दोघेजण सोबत चालत होते. आपण नीरजाला जरा जास्तच बोलून गेलो असं नीरवला वाटत होतं, म्हणून तो शांत बसला होता.

“सॉरी ते मी तुला जरा जास्तच बोललो.” नीरव दुसरीकडे बघत बोलला.

“इट्स ओके. मला तुमचा राग आला नाहीये. तुम्ही योग्य तेच बोललात फक्त वेळ चुकीची होती.” नीरजाला नीरवची खेचण्याचा मूड आला होता.

“चुकीची वेळ ती कशी काय?” नीरव जागीच थांबला.

“नीरव, टाईम इज मनी. आपण वॉक करत बोलूयात.” नीरजा चालू लागली, तिच्या पाठोपाठ नीरव.

“नीरजा, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. चुकीची वेळ कशी काय?” नीरजा बोलत नसल्याने नीरवने तिला पुन्हा विचारले.

“तुम्ही फोन केल्याने माझी झोप मोडली होती. पूर्ण झोप न झाल्याने डोकं भणभण करत होतं आणि त्यात तुमचं लेक्चर आय मिन तुम्ही बरोबर बोलत होता, पण त्यावेळी मला वेगळं काही ऐकून घ्यायची इच्छाच नव्हती. माझी झोपमोड झाली की माझी जाम चिडचिड होत असते.” नीरजा चालता चालता बोलत होती.

“तुझ्या चिडचिडीवर माझ्याकडे सॉलिड उपाय आहे.” नीरव चुटकी वाजवून म्हणाला.

“काय?” नीरजाने जागीच थबकून विचारले.

“फक्कड आल्याचा चहा.” नीरवने चेहऱ्यावर स्माईल आणून उत्तर दिले.

“हम्मम. चला मग घरी जाऊयात.” नीरजा म्हणाली.

“त्यासाठी घरी जाण्याची गरज नाहीये. कोपऱ्यावरील टपरीवर मस्त कडक आल्याचा चहा मिळतो. चल.” नीरव व नीरजा टपरीच्या दिशेने गेले.

टपरी जवळ असलेल्या बेंचवर नीरजा व नीरव बसले. चहा वाल्याने त्या दोघांना चहा आणून दिला. चहाचा एक घोट पिऊन नीरजा म्हणाली,
“चहा एकच नंबर आहे.”

नीरजाच्या चेहऱ्यावरील स्माईल बघून नीरव म्हणाला,
“चहा पिऊन एवढं कोणी खुश कस होऊ शकतं. चहा छान आहे यात काही वादच नाहीये.”

“योग्य वेळी योग्य गोष्ट मिळाली की चेहऱ्यावर हा असाच आनंद मिळतो. वेळ निघून गेल्यावर कितीही काहीही मिळालं तरी त्याची किंमत राहत नाही. नाही ते दिवस परत येतात नाही ती वेळ.” नीरजा शून्यात बघत बोलत होती.

“नीरजा, इतकी का सिरीयस होत आहेस? काही झालंय का?” नीरवच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसून येत होते.

“काही नाही. हॉस्पिटलला जायला आपल्याला उशीर होईल. चला आपण घरी जाऊयात.” नीरजा घराच्या दिशेने निघाली. चहाचे पैसे देऊन नीरव तिच्या पाठोपाठ निघाला. वाटेत नीरजा शांतच होती. नीरजा अशी अचानक शांत झाल्याचे कारण नीरवला समजत नव्हते.

घरी गेल्यावर मुक्ता हॉलमध्ये बसलेली होती. तिने नीरव व नीरजाला गुडमॉर्निंग विश केलं, पण नीरजा तिला विश न करताच आपल्या रूममध्ये निघून गेली. नीरव व मुक्ताला तिच्या या वागण्याचे आश्चर्य वाटले.

“दादा, तुमच्या दोघांचं भांडण झालंय का?” मुक्ताने विचारले.

“नाही. ती बोलता बोलता अचानक शांत झाली. मलाही काहीच कळलं नाही.” नीरवने उत्तर दिले.

“वेळ भेटला तर मी बोलेल तिच्याशी.” मुक्ता म्हणाली.

“बोल नाहीतर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मी बोलतो. मुक्ता, आज तुझा क्लासचा पहिला दिवस आहे ना. तुला शिवानी क्लासला सोडवत जाईल. काही हवं असेल तर सांगत जा. माझं एक क्रेडिट कार्ड तुझ्याकडे देऊन ठेवतो. तुला काही घ्यायचं असेल तर घेत जा.” नीरव म्हणाला.

यावर मुक्ता म्हणाली,
“दादा, मला क्रेडिट कार्ड नको. मला पैसे लागल्यावर मी स्वतः मागून घेत जाईल. मला बाबा पैसे द्यायचे त्यातील काही पैसे मी बाजूला ठेवायचे सो त्यातील काही पैसे माझ्याकडे शिल्लक आहेत. मी बसने क्लासला जात जाईल.

दादा, मला तेही आयुष्य जगायचं आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा ड्रायव्हर, गाडी घेऊन जात जाईलच. मला तुम्ही सगळीच मदत करत आहात, पण यापुढील रस्ता मला चालून बघायचा आहे. थोड्या अडचणी आल्या तरच त्यातून मार्ग काढायला मला शिकता येईल. प्रत्येक वेळी तू किंवा वहिनी माझ्या सोबत असतीलच असे नाही ना.”

“मुक्ता, आज एकदम मोठ्या आणि शहाण्या मुलीसारखं बोललीस. तुला केव्हाही काहीही अडचण आली तर मला हक्काने सांगत जा.” नीरव हसून म्हणाला.

“दादा, सध्यातरी मला तुझ्याकडून एकच गोष्ट हवी आहे.” मुक्ता.

“काय?” नीरवने विचारले.

“दादा, नीरजा वहिनीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू तिला बायकोचा अधिकार दिला नाही, तरी ती तुझ्यासाठी,आपल्या घरासाठी सगळं काही करत आहे. तिच्यासारखी चांगली जोडीदार तुला शोधून सापडणार नाही. एकदा तिचा बायको म्हणून विचार कर. ती एक व्यक्ती म्हणून सुद्धा ग्रेट आहे. मी तुझ्यावर बळजबरी करणार नाही, पण एकदा वहिनीकडे त्या नजरेने बघण्याचा प्रयत्न कर.” मुक्ता बोलत होती.

“हम्मम. मला हॉस्पिटलला जायला उशीर होईल.” एवढं बोलून नीरव तेथून निघून गेला.

‘हा दादा पण ना. मी बोललेलं याच्या डोक्यात गेलं असेल की तो त्याकडे दुर्लक्ष करेल. काही दिवस वाट बघते नाहीतर पुन्हा त्याच्याशी बोलेल.’ मुक्ता मनातल्या मनात बोलत होती.

‘नीरजा अचानक अशी शांत का झाली असेल? वेळेबद्दल ती काहीसं कोड्यात बोलली. त्याचा अर्थ मला कळलाच नाही. बरं मी तुला चुकीच बोललेलं मला आठवत नाहीये. घरी नीरजा सोबत बोलायला जमणार नाहीच. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिला डायरेक्ट विचारतो.
आता त्यात मुक्ताला या विषयावर आजच बोलायला हवं होतं का? ती बोलली ते योग्यच बोलली, पण इथे माझ्याच मनाचा गोंधळ उडाला आहे. काय चूक, काय बरोबर काहीच कळत नाहीये. गौरव सोबत पहिल्यासारखी मैत्री असती तर त्याच्यासोबत मला माझ्या मनाची अवस्था शेअर करता आली असती. आता मी कोणाशी हे सगळं बोलू शकतो? गौरव सोडून मला दुसरा जवळचा मित्रही नाही, ज्याच्याशी मी नीरजा या विषयावर बोलू शकेल.’ नीरव रेडी होत असताना विचार करत होता.

नीरजाला अचानक काय झालं असेल? नीरव गौरव सोबत नीरजा या विषयावर बोलेल का? बघूया पुढील भागात…..